पूजा नार्वेकर
नेहमीप्रमाणे त्या दिवशीही पूजा सकाळी नऊ वाजताच उठली आणि कामाला जाण्यासाठी घाईघाईत तयार झाली. रोज तिची आई तिला सकाळी सात वाजल्यापासून उठवत असे आणि दोन तास त्यांच्या घरात तिला उठवण्याचा जंगी कार्यक्रम होत असे. कितीही उठवायचा प्रयत्न केला तरी पूजा लेडी कुंभकर्ण होती. आईने तिच्यापुढे हात टेकले होते. “जरा मुलीसारखी वाग...!” असं सांगून-सांगून ती थकली होती.
तिचा बालमित्र आणि शेजारी विशाल घाडी तिच्यावर एकतर्फी प्रेम करत असे आणि तिला त्याने प्रपोज सुद्धा केले होते पण पूजाचे उत्तर फिक्स होते.
“I love you as a friend ! मी तुझ्याबद्दल कधी तसा विचार केलाच नाहीये!”
बिचारा विशाल, ती कधीतरी हो म्हणेल या आशेवर फ्रेंडझोन मोडमध्ये वाट पाहत होता. तसा विशाल एक चांगला मुलगा होता. त्याचे आई बाबा नव्हते. तो सेम बिल्डींग मध्ये आजीबरोबर राहायचा. तसे पूजाचे वडील सुद्धा देवाघरी गेले होते. त्यामुळे त्या दोघांचे नेहमी चांगले जमायचे. तो सुद्धा वाशीच्या मिलेनियम टॉवरमध्ये एका कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीला होता. त्याला पुजाबरोबर सेटल व्हायचे होते. पूजाच्या आईला सुद्धा विशाल जावई म्हणून पसंत होता. पण काय करणार....!! पूजा अजूनही विशालच्या आय लव्ह यु चे उत्तर देत नव्हती शादी तो दूर कि बात थी!