कोण आहे तो?
तो माणूस म्हणजे प्रोफेसर नक्की कोण होता? याचा छडा लावल्याशिवाय गप्प बसेल तर ती पूजा कसली? तिने तडक विशालला त्याच्या ऑफिस समोरच्या रघुलीला मॉलच्या फूड कोर्टमध्ये बोलावून घेतले आणि सगळी घडलेली हकीकत सांगितली. हे ऐकून विशाल मोठ्याने हसू लागला.
“तुझा लॅपटॉप आहे ना आता तुझ्याकडे?” तिने विचारले.
“हो आहे... पण...” तो म्हणणार इतक्यात ती म्हणाली.
“ दे जरा काम आहे...”
त्याने लगेच लॅपटॉप बॅगमधून बाहेर काढून तिला दिला. त्यांनी ओर्डर केलेला पिझ्झा येईपर्यंत ती गुगल सर्च करू लागली. तिने गुगलवर ‘प्रोफेसर’ हा कीवर्ड सर्च केला आणि तिला काही शास्त्रज्ञ, प्रोफेसर, काही सिनेमातील पात्र यांचे फोटोस सापडले. मग तिने सर्च केले ‘प्रोफेसर+पॉलीमोरॉन’ त्याचे तिला पुन्हा काही विचित्र सर्च रिझल्ट मिळाले. शेवटी तिने ‘प्रोफेसर एक्स +फूडट्रक’ असे कीवर्ड सर्च केले. तर तिला पहिला सर्च रिजल्ट मिळाला www.whoistheprofessarx.co.in. ही वेबसाईट तिने ओपन केली. तो एका डीटेक्टीव पंजाबी मुलाचा ब्लॉग होता. त्याचे नाव होते जसबीर सिंग वालिया. त्या ब्लॉगवर त्याचा नंबर आणि पत्ता दिला होता. तिने लगेच त्याला फोन केला. त्याच्या दुकानात पनवेलला खांदा कॉलनीमध्ये त्याला जाऊन भेटायचे ठरले. तोपर्यंत तयार झालेला पिझ्झा घेऊन विशाल टेबलवर आला होता. त्यांनी पिझ्झा खाल्ला आणि विशालच्या बाईकवर दोघे घरी गेले.
दुसऱ्या दिवशी रविवार होता. पूजा आज सकाळी सहा वाजता उठलेली पाहून तिच्या आईला आश्चर्य वाटले. ती भराभर तयार झाली. तिने विशालला फोन केला. तेव्हा आठ वाजले होते. रविवार आणि ऑफिसला सुट्टी असल्यामुळे अर्थातच विशाल अजून झोपलेलाच होता. तिने त्याला उठवले आणि
“अर्ध्या तासाच्या आत खाली ये!” असं हुकुम सोडला.
आठ वाजून चाळीस मिनिटांनी दोघे पनवेलला जायला निघाले. साडे नऊ वाजता ठरल्याप्रमाणे ते जसबीरच्या दुकानाजवळ पोहचले होते. जसबीरचा हेल्मेट आणि बाईक अॅक्सेसरीजच दुकान होतं. तो रोज नऊ वाजताच दुकान उघडत असे. पूजा दुकानात गेली आणि विशाल बाहेरच बाईकवर बसून राहिला. गाडी टोइंग होईल अशी त्याला भीती होती. जसबीरने आपला लॅपटॉप सुरु केला आणि तो प्रोफेसर एक्सबद्दल तिला माहिती देऊ लागला. त्याने विचारले,
“ ओ में क्या मॅडमजी... आपने सच्चीमे देखा उसे?” पूजाने फक्त मान हलवून हो सांगितले.
मग त्याने लॅपटॉपवर एक फोटो दाखवला आणि विचारले.. “यही आदमी वेखीयासी आपने?”
“हा बिलकुल यही बंदा था!” पूजा म्हणाली.
मग त्याने इतिहासातील अनेक महत्वाच्या घातपाताच्या प्रसंगांचे फोटो दाखवले ज्यामध्ये तो उपस्थित असलेला दिसत होता पण गर्दीत हरवून गेला होता. भारताचे भूतपूर्व पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांना जेव्हा ‘तो’ हार घातला होता. तेव्हाचा एक फोटो त्याने दाखवला. तेव्हा गर्दीत तो माणूस म्हणजे प्रोफेसर एक्स मागे उभा होता. नंतर त्याने १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील काही हृदय हेलावून टाकणारे फोटोस दाखवले. त्यातील अनेक फोटोमध्ये तो होता. २७ जुलै,२००५ मध्ये बदलापूरचे बारवी धरण फुटल्यामुळे आलेल्या अभूतपूर्व पुराची काही दृश्ये त्याने दाखवली. बदलापूरपासून डोंबिवलीपर्यंतचा परिसर कसा पूर्णपणे वाहून गेला होता हे पाहून पूजाचे मन सुन्न झाले. या सर्व घटनांचा तो मूक साक्षीदार होता.
“ दरअसल, मुझे तो लागता है...कि ये आदमी यमराज का दूत है और ये सब यही आदमी करता या करवाता है| या शायद नाही| लेकीन ये बात जरूर सच है कि, वो इतिहास का अकेला गवाह है|”
आता त्याने एक खूप जुने इंग्रजी पेपरातील कात्रण बाहेर काढले. ज्यात त्रावणकोरचे चित्रकार राजा रवी वर्मा यांच्यावर चालवण्यात आलेल्या खटल्याची बातमी होती. त्यांनी देवाधीकांची चित्र काढली होती. त्यातीलच देवी सरस्वतीच्या मॉडेलची आणखी इतर नग्न चित्रे रेखाटली म्हणून हा खटला चालू होता. त्यातील कोर्टाच्या बाहेर एका ब्रिटीश फोटोग्राफरने काढलेले एक कृष्ण धवल छायाचित्र होते. त्यामध्ये प्रोफेसर चक्क वकिलाच्या पोशाखात दिसत होता.
“देखिये यहा कोई साजीश तो नही है, लेकीन सेम बंदा यहा भी वकील बन के देख गया था!”
पूजा अगदी निरुत्तर झाली होती.
पुढे तो म्हणाला,
“प्रोफेसर म्हणजे एक दंतकथा वाटते, आख्यायिका वाटते पण खर सांगायचं तर तो खरच अस्तित्वात आहे आणि तो दिसतोय म्हणजे नक्कीच काहीतरी संकट येणार आहे.”
पूजाला त्याचे म्हणणे पटत नव्हते. तिला वाटत नव्हते कि, प्रोफेसर घातपात घडवून आणत असेल. कारण दोन दिवसापूर्वी पॉलीमोरॉन तिला मारणार होते. त्यानेच तिचा जीव वाचवला होता.