मदर रडार
ती बाटली घेऊन प्रोफेसर आणि पूजा पॉलीमोरॉन्सच्या स्पेसशिपकडे निघाले. आता ते पॉलीमोरॉनच्या स्पेसशिपसमोर उभे होते. मदर रडारने प्रोफेसरला ओळखले होते. स्पेसशिपच्या फोर्स फिल्डनं त्यांना आत ओढून घेतलं. हे जेव्हा घडलं तेव्हा पूजाला जाणवलं कि असं आधी सुद्धा आपल्यासोबत अनेक वेळा घडलं आहे. नक्की कधी ते कळत नव्हतं. कदाचित हा ‘देजा-वू’ सारखा प्रकार होता.
पॉलीमोरॉन्सच्या स्पेसशिपमध्ये एक प्रचंड मोठी प्लास्टिकची आकृती बसली होती. तिचा आकार एखाद्या अवास्तव मोठ्या राक्षसीणीसारखा होता. तिच्या अंगावर अनेक कंप्युटर होते. तिला खेकड्यासारख्या पुढे २ आणि विंचवासारखी मागे १ विषारी अशा नांग्या होत्या. आत जाताच प्रोफेसरने तिला साष्टांग नमस्कार घातला.
“अरे हे काय नवीन? देऊळ आहे का हे?” पूजाने विचारलं.
“ ही पॉलीमोरॉन्सची राणी म्हणजे प्लास्टिकॉन ग्रहावरची मदर रडार! सगळे हिला असाच नमस्कार करतात. तू पण कर. नाहीतर ती रागावेल. असाही तिचा मेनफ्रेम सध्या प्लास्टिक इटर व्हायरसने इन्फेक्ट झालाय...!”
पूजाने प्रोफेसरचे ऐकले आणि तिला साष्टांग नमस्कार घातला. ती उठेपर्यंत प्रोफेसर आणि मदर रडार पुजाला समजणार नाही अशा भाषेत संभाषण करू लागले. प्रोफेसरने तिला विचारले ती इकडे पृथ्वीवर का आली आहे. तेव्हा ती बोलू लागली. पण पुजाला काहीच कळत नव्हते. प्रोफेसर आणि मदर रडारमध्ये बराच वेळ वाद-विवाद चालला. ते जवळपास भांडतच होते. आता मात्र पूजा वैतागली होती. शेवटी तिने प्रोफेसरला विचारले
“ तुम्ही काय बोलताय..? मला काहीच कळत नाहीये!”
मदर रडार मधून विचित्र आवाज येऊ लागले आणि अचानक ते आवाज थांबले. मदर रडार पुन्हा बोलू लागली.
“भाषा सुनिश्चित! मराठी, पृथ्वी!”
आता मदर रडार चक्क मराठीत बोलू लागली होती. ती पुढे म्हणाली.
“आमच्या ग्रहावरील परिस्थिती सध्या चांगली नाही. आमच्या इथले खाद्य आणि प्रजननासाठी लागणारे प्लास्टिक संपले आहे. आम्ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहोत. आम्हाला आणखी प्लास्टिक हवे आहे. त्यासाठी आम्हाला इथल्या सर्व प्लास्टिकची गरज आहे. ते आम्ही घेऊन जाऊ इच्छितो. तू पृथ्वीवरील जीवांची प्रतिनिधी आहेस असे वाटते. तुझी परवानगी आहे का?
“ मी? प्रमुख ? प्रतिनिधी ?” अवघी २६ वर्षाची पूजा गोंधळून म्हणाली आणि तिने प्रोफेसरकडे पहिले. प्रोफेसरने मान हलवून नकार दिला.
“असेही प्लास्टिक म्हणजे तुमची एक वैश्विक समस्या आहे हे मला माहित आहे. आम्ही तुमचे सर्व प्लास्टिक घेऊन जाऊ आणि तुम्हाला फायदाच होईल.”
“ नाही... म्हणजे नको... मला विचार करायला वेळ हवा आहे...” पूजा म्हणाली
असे म्हणताच मदर रडार म्हणाली “आमच्याकडे जास्त वेळ नाहीये. नाही म्हणालीस तर परिणाम भोगायला तयार राहा...!”
मग त्या यानातील एक मोठे टाकीचे झाकण उघडले. त्या टाकीमध्ये उकळते प्लास्टिक होते आणि मग खूप उंचावरून हार्नेस बांधलेला विशाल टाकीच्या वर आणला गेला. मदर रडारने विशालला ओलीस ठेवले होते. हे पाहून प्रोफेसर म्हणाला...
“ तो निष्पाप आहे. त्याला सोडून दे.”
“ मग आम्हाला पूजाकडून तोंडी होकार हवा आहे.” मदर रडार म्हणाली.
“ होकार देणारी मी कोण...? हवाच होता तर आधी कोण्या मोठ्या उच्चपदस्थ व्यक्तीचा होकार घ्यायला हवा होता. मी एक साधी मध्यमवर्गीय मुलगी! मी कशी परवानगी देणार?”
“आमच्याकडे स्त्री प्रधान संस्कृती आहे. मी राणी आहे आणि सर्व पुरुष माझे गुलाम आहेत. तुझ्या स्टोरमध्ये जेव्हा आमच्या आकाराच्या प्लास्टिकच्या मूर्ती पहिल्या तेव्हा सर्वप्रथम मी त्यांना जिवंत केले. आधी त्या इलेक्ट्रिक काम करणाऱ्या माणसाने आम्हाला विरोध केला म्हणून आम्ही तिकडेच त्याला संपवला आणि मग तुमच्या ग्रहावरची सर्वात पहिले नजरेस पडलेली स्त्री म्हणजे तू... म्हणून ते तुझ्याशी संवाद साधायला तुझ्याजवळ येत होते तर तू घाबरून पळत सुटलीस आणि हा प्रोफेसर! महाकाल लोकांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे याने बॉम्बने आमचे कितीतरी पॉलीमोरॉन मारून टाकले. ”
पुजाला काहीच कळेना. प्रोफेसर मात्र आता चांगलाच अडकला होता. त्याने असे का केले हे त्याला सांगणे भाग होते.
“हे बघ, ही चूक जर माझ्याकडून झाली आहे तर पृथ्वीवरच्या लोकांना त्रास देऊन काय उपयोग आहे? आणि हा विशाल...! याला का टांगून ठेवलं आहेस?”
“ निव्वळ मनोरंजन!” असं म्हणून मदर रडार जोरजोरात हसू लागली.
“ अवकाश कायदा खंड ७६ नियम २४३० नुसार तुम्ही पृथ्वीवर अतिक्रमण केलं आहे. धुमकेतू पोलीस डीपार्टमेंटमध्ये ही गोष्ट कळली तर तुमचं काही खरं नाही.”
पूजा पार गोंधळून गेली होती. ती रडू लागली कारण विशाल गुंगीतून जागा झाला होता. तो ओरडू लागला.
“ पूजा....पूजा...... वाचवा...! वाचवा मला...!”
मदर रडार आता जोरजोरात हसू लागली.
पूजा आता विशालला वाचवण्यासाठी पुढे सरसावली. विशालला टाकीच्या वर २५ फुट उंचावर टांगला होता. तो सर्रकन खाली म्हणजे अगदी १०-१२ फुट उंचीवर आला. विशालला घाम फुटला. पूजा हतबल होती.
“मागे सरक, नाहीतर तो उकळत्या प्लास्टिकमध्ये पडेल.” प्रोफेसरने तिला अडवले.
“ हे बघ तुझी तक्रार माझ्याबद्दल आहे यांना सोडून दे” प्रोफेसर मदर रडारला म्हणाला.
“ प्रोफेसर आता काही उपयोग नाही. आमची मदत तू करू शकत होतास. सायक्रॉक्सनी आमच्यावर अनेक वर्षे आक्रमणे केली तेव्हा आमच्यासारख्या शांतताप्रिय प्रजातीने तुम्हाला किती वेळा विनवणी केली होती. तरी तुम्ही आम्हाला वाचवले नाही हा इतिहास आहे. पण ५२३ वर्षापूर्वी त्यांनी सुरु केलेल्या जैविक युद्धात आम्ही जवळपास ६५% नष्ट झालो. पण प्लास्टिकॉनच्या मातीतच हार न मानण्याचा स्वभाव आहे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी आम्ही पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही आणि आता तर आम्ही संपूर्ण पृथ्वीवरील प्लास्टिक हिसकावून घेऊ. प्लास्टिकॉन तर आमचा आहेच. पण लवकरच पृथ्वीवर सुद्धा आमचं साम्राज्य असेल. तुमच्या इम्पेरीयनच्या सम्राटाला आम्ही कितीवेळा विनंती केली होती तरी तुम्ही दुर्लक्ष केलंत. तुम्ही सायक्रॉक्ससारख्या नीच वृत्तीच्या प्रजातीशी शांतता करार केलात? मैत्री केलीत? पण आमची मैत्री विसरलात. गेली ५०० वर्ष आम्ही पृथ्वीवर कायम लक्ष ठेवून होतो. १८६२ मध्ये अलेक्झांडर पार्कसने पार्क साईन प्लास्टिक शोधलं तेव्हा आम्हाला आशेचा किरण दिसला होता. पण आम्हाला असं वाटलं सुद्धा नव्हतं कि पृथ्वीच्या मृत्यूमध्ये आमचे जीवन असेल. त्यानंतर आम्ही २०० वर्ष वाट पहिली आणि शेवटी तो दिवस उजाडलाच १९५२ मध्ये जेव्हा झिग्लरने पॉलिथिलीनचा शोध लावला. That was it. It was the first nail in the coffin. नंतर आम्हाला काही करावं लागलच नाही. प्लास्टिकचा हा राक्षस याच मूर्ख मानवांनी मोठा होऊ दिला. पृथ्वी म्हणजे खरं सांगायचं तर आमची शेती आहे... प्लास्टिकची...!” असं म्हणून मदर रडार मोठमोठ्याने हसू लागली.
पूजा आणि विशाल हे सगळं ऐकून पार गोंधळून गेले होते. पुढे प्रोफेसर म्हणाला...
“ हे बघ, जे झालं ते वाईट झालं. मी माफी मागतो.सायक्रॉक्स आता इम्पेरीयनचा मित्र नाहीये. शांतता करार त्यांनी कधीच भंग केला आहे. माझं ऐक, आता तुम्ही खरच इतकं प्लास्टिक जमा केलं आहे कि प्लास्टिकॉन पुन्हा तसाच होऊ शकेल जसा ६०० वर्षांपूर्वी होता. तुम्ही कधीही आक्रमक किंवा परजीवी प्रजाती नव्हतात. तुमच्या ग्रहावर झालेल्या प्लास्टिक इटर व्हायरसचे औषध माझ्या अंकायाने शोधले आहे. मी हे तुझ्या वितळलेल्या प्लास्टिकच्या टाकीत टाकतो. रिवर्स इंजिनिअरिंग करून तुम्ही पुन्हा हे निर्माण करा आणि सायक्रॉक्सने दिलेल्या महामारीच्या शापातून मुक्त व्हा. मला पुन्हा शांतताप्रिय प्लास्टिकॉन पहायला आवडेल.”
असे म्हणून प्रोफेसरने अँटी प्लास्टिक इटर व्हायरस त्या टाकीत ओतले. मदर रडारचा आकार आता पूर्णपणे बदलला होता. तिचा आकार आता लहान झाला होता आणि ती आता एखाद्या तेज:पुंज देवी सारखी दिसत होती. ती खूपच सुंदर दिसत होती. इतकी सुंदर जणू काही एखादी गोंडस बार्बी डॉलच!