Get it on Google Play
Download on the App Store

धाव!

पूजा वाशीच्या सेंटर वन मॉलमध्ये एका कपड्याच्या स्टोरमध्ये नोकरीला होती. कोपरखैरणे ते वाशी ती रोज तिच्या स्कुटीवर जात असे.

आजही नेहमीप्रमाणे तिने निघताना आईला म्हणजे क्षमा नार्वेकरला बाय केले आणि ती घरातून बाहेर पडली. पार्किंग मध्ये येऊन तिने आपली स्कूटरची डिक्की उघडली आणि हेल्मेट काढून डोक्यावर घातले. स्कूटर सुरु करून ती निघाली. कोपरखैरणे ते वाशी अंतर फार नाहीये. तसं तिला हेल्मेट घालायला आवडत नसे पण, रस्त्यात पोलीस असत आणि दोन-तीनदा पावती फाडावी लागल्यामुळे ती आजकाल हेल्मेट विसरत नसे.  पूजा मॉलच्या पार्किंग मध्ये गेली तिने स्कुटी पार्क केली. नंतर ती लिफ्टने पहिल्या मजल्यावर तिच्या कामाच्या ठिकाणी स्टोरमध्ये गेली आणि आपल्या कामाला लागली.

संपूर्ण दिवस नीट गेला. संध्याकाळी आपले काम संपवून स्टोर बंद करून ती घरी जायला निघाली. इतक्यात मॉलच्या सिक्युरिटी गार्ड ने तिला अडवले आणि चीफ इलेक्ट्रिशियन मंगेश दादासाठी एक पाकीट दिले. तिने त्याला सगळीकडे शोधले पण मंगे्शदादा तिला कुठेही दिसला नाही. ती त्याला शोधत-शोधत बेसमेंटमध्ये गेली तरी तो तिला दिसला नाही. मग तिला आठवले कि, तिने त्याला स्टोरेज गोडाऊनमधल्या ट्युबलाईट दुरुस्त करायला सांगितल्या होत्या. म्हणून ती गोडाऊनमध्ये गेली.  ती आत जाऊन त्याला हाक मारू लागली. गोडाऊनमध्ये कोणीच नव्हते. तिला एकटीला भीती वाटत होती. इतक्यात गोडाऊनमध्ये ठेवलेला एक प्लास्टिकचा पुतळा तिच्या दिशेने चालत येऊ लागला. तिला पहिले तिच्या डोळ्यांवर  विश्वासच बसत नव्हता.  तिला वाटले कि, मंगेशदादा लाल रंगाचा हूडी टी-शर्ट घालून रोबोटसारखा चालून तिला घाबरवत आहे. तिने त्याला विनंती केली,  

“ दादा, थट्टा पुरे! मला अशी थट्टा आजिबात आवडत नाही!”

असे म्हणून देखील मंगेश दादा थांबेना, तेव्हा तिची भीतीने पार गाळण उडाली आणि ती एक-एक पाउल मागे जाऊ लागली. तिने त्या पहिल्या पुतळ्या वरील नजर हटवून आजूबाजूला पहिले तर तिला दिसले कि, दहा ते बारा पुतळे तिच्यावर चाल करून येत आहेत. ती त्यांना थांबण्याची विनंती करू लागली पण ते अधिकाधिक आक्रमक होऊ लागले. आता त्या पुतळ्यांनी आपले हात वर केले तर तिला दिसले कि, ते हात हातोडीचा आकार घेत आहेत.  इतक्यात एक मनुष्य मागून आला आणि त्याने तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाला,

“धाव!”   

तिने क्षणाचाही विलंब केला नाही आणि त्याच्याबरोबर ती धावली. आता ते पुतळे सुद्धा त्या दोघांच्या मागे धावू लागले. ते धावत-धावत लिफ्टपर्यंत पोचले आणि झटकन लिफ्टचे बटन दाबून लिफ्टचे दार उघडले. ते आत शिरणार इतक्यात ते पुतळे त्यांच्या अगदी एक फुट अंतरावर आले होते. त्यांनी आजिबात वेळ वाया न घालवता लिफ्ट मध्ये प्रवेश केला. परंतु एका पुतळ्याने लिफ्टच्या बंद होत असलेल्या दरवाज्यातून आत हात घालून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या माणसाने तो प्लास्टिकचा हात पूर्ण ताकदीनिशी त्या पुतळ्याच्या दंडातून उपटून काढला. पूजा रडत होती.  बेसमेंट मधून वर पोचेपर्यंत त्या माणसाने तिला सांगितले,

“ मंगेश मेला!”  आणि त्याने आपल्या खिशातून एक बॉम्ब बाहेर काढला.

पूजा घाबरली आणि विचारू लागली, “नक्की कोण आहेस तू?”

तो म्हणाला, “ मी प्रोफेसर, आणि तू ?”

“पु..पूजा... नार्वेकर “ ती म्हणाली.

“ तुला भेटून आनंद झाला पूजा.  मी मॉल बॉम्बने उडवणार आहे. जीव वाचव! पळ!”

जाता-जाता त्याने तिला तो प्लास्टिकचा हात दिला आणि हा हात फेकून दे असे सांगितले.

तिने तो प्लास्टिकचा हात घेऊन तिकडून काढता पाय घेतला. ती सेंटर वन मधून धावत-धावत रेल्वे स्टेशनच्या दिशेने पळत सुटली आणि तिला काही कळायच्या आत एक प्रचंड मोठा स्फोट झाला. तिने मागे वळून पहिले ती ज्या मॉलमध्ये काम करत होती तो मॉल बॉम्बस्फोटामध्ये जमीनदोस्त झाला होता. तिने डोक्याला हात लावला कारण, तिची लाडकी स्कुटी त्या मॉलच्या पार्किंगमध्ये उभी होती. तिला काय करायचे ते कळत नव्हते.