हार्वेस्ट
हा प्रकार घडला तेव्हा संध्याकाळचे आठ वाजले होते. अकरा वाजेपर्यंत न्यूज चॅनलच्या गाड्या आणि इतर सर्व जमा झालेला फौजफाटा यांची पांगापांग झाली. प्रोफेसरला माहीत होते की प्लास्टिकॉनचा मदर रडार गप्प बसणार नाही आणि हे खूप मोठे षडयंत्र आहे. रात्री बारा साडेबाराच्या सुमारास पुन्हा आकाशात विजा कडाडू लागल्या. संध्याकाळी ज्याप्रमाणे सी.डी.एम.ए. टॉवरवर वीज पडली त्याचप्रमाणे आता पुन्हा टॉवरवर विजा कोसळू लागल्या. काही क्षणातच मदर रडारने पुन्हा एक प्लास्टिक बीम सायलोवर सोडली. आता सायलो अॅक्टिव्हेट झाली होती. सायलोच्या आतमध्ये इनबिल्ट असलेला प्लास्टिक चेन रिअॅक्टरसुद्धा सुरु झाला होता. सलग दहा ते वीस मिनिटं हा खेळ चालू होता आणि मग सायलोवर पडणारी वीज अचानक थांबली. पाहता-पाहता मदर सायलो मधून असंख्य सायलोज बाहेर पडू लागल्या. प्रत्येक सायलो उडत-उडत जाऊन टुजी, थ्रीजी, फोरजी, सी.डी.एम.ए. आणि विजेचे टॉवर यांच्याजवळ जाऊन इन्स्टॉल झाल्या. सर्व सायलो आता पुन्हा तेच काम करणार होत्या जे मदर सायलोने केले होते. काही क्षणात आकाशात पुन्हा विजा कडाडू लागल्या आणि जिथे जिथे सायलो इन्स्टॉल झाली होती त्या प्रत्येक टॉवरवर वीज पडत होती आणि त्या टॉवरद्वारे प्रत्येक सायलोला पॉवर सप्लाय होत होता. प्रत्येक सायलोमधला व्हॅक्यूम पम्प सुरू झाला आणि संपूर्ण जगात एकच हाहा:कार माजला. जगातील प्लास्टिकचा कचरा हा त्या सायलो ओढू लागल्या. काही मिनिटातच संपूर्ण समुद्र ढवळला जाऊ लागला. समुद्राच्या तळाशी असलेले सर्व टाकाऊ प्लास्टिक आता ओढले जाऊ लागले. प्लास्टिक इतक्या जास्त प्रमाणात ओढले गेल्याने समुद्रात प्रचंड मोठ्या लाटा उसळू लागल्या आणि संपूर्ण जगातील देशांमध्ये किनारपट्टीच्या प्रदेशात त्सुनामी सारखी परिस्थिती निर्माण झाली. अतोनात नुकसान होऊ लागले. त्याचबरोबर जगातील सर्व उपयोगाच्या प्लास्टिकच्या गोष्टीसुद्धा सायलो ओढुन करून घेऊ लागल्या. सगळीकडे जणू काही प्लास्टिकची वावटळ उठली होती.
इकडे पूजाचा घरामध्ये तिची आई खूपच घाबरली होती. तिने पूजाला फोन केला...
" पूजा कुठेस? माझे सगळे टप्परवेअरचे डबे खिडकीतून उडून बाहेर गेले. फ्रिजमधल्या प्लास्टिकच्या सगळ्या बाटल्या उडून गेल्या. मिक्सर, तुझी लहानपणीची सगळी खेळणी, तुझा कॉम्प्युटर, शोकेसमधल्या वस्तू.... एवढंच काय अगं! आपला टीव्हीसुद्धा उडून गेलाय. मला कळत नाही मी काय करू. खिडकीच्या बाहेर पाहिलं तर सगळ्या प्लास्टिकच्या वस्तू हवेत उडताना दिसतात. आता माझ्या प्लास्टिकच्या कुंड्या उडून गेल्या. माझी झाडं....."
पूजाची आई पुढे काही म्हणणार इतक्यात तिचा फोनसुद्धा खिडकीतून उडून बाहेर गेला. आता मात्र पूजाला टेन्शन येत होते. इतक्यात प्रोफेसर म्हणाला
"पहिले फक्त कचरा खेचून घेत होते म्हणून मी गप्प बसलो. पण आता यांना थांबवलं नाही तर पृथ्वीवरचं सगळं उपयुक्त प्लास्टीकसुध्दा खेचून घेऊन जातील. इतकाच नाही हे प्लास्टिक ओढून घेत असताना नासधूस करतील ती वेगळीच. तू अंकायामध्येच थांब. मी जाऊन येतो."
" नाही... मी पण येणार, विशाल माझ्यामुळेच या मॅटरमध्ये अडकलाय. त्याला वाचवताना मी समोर असणं गरजेचं आहे." ती म्हणाली.
" ठीक आहे चल."
मग अंकायाच्या पॅनलमधून एक छोटीशी बाटली बाहेर आली.
अंकाया : “प्रोफेसर, तुम्ही जेव्हा आत जाल तेंव्हा त्या मदर रडारच्या पॅनलवर ही बाटली उघडून त्यातले लिक्विड ओता. यामध्ये अँटी-प्लास्टिक ईटर व्हायरस आहे. प्लास्टिकॉनचे मदर रडारसुद्धा प्लास्टिक ईटर व्हायरसने इन्फेक्टेड आहे. हे लिक्विड मदर रडारच्या पॅनलवर ओतलं की प्लास्टिक ईटर व्हायरस इन्फेक्शन रडारमधून नष्ट होईल. पुन्हा प्लास्टिकॉन आणि पॉलीमोरॉनच मूळ रूप जागासमोर येईल. ते इतके वाईट नाहीत व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे त्यांची प्लास्टिक खाण्याची भूक कधी संपत नाहीये. त्यामुळे ते एवढे आक्रमक झाले आहेत आणि प्लास्टिक हार्वेस्ट करत आहेत."