गावची वाट...
माणसाचा ताफा घेऊन
गाठतोय मी समुद्राचा काठ...
टाकावा म्हणलं बुडवून
कुबट जातीचा माठ...
सागरात अर्पून टाकावा
कोरड्या माणुसकीचा थाट...
आणि पुन्हा करावं म्हणलं
समुद्रमंथन हातोहात....
काढावी त्यातून इमान
राखणाऱ्या माणसाची पाठ..
पेटवावी माणुसकीची ज्योत
आणि घडवावी संस्कृतीची पहाट..
घेतील महिलाही मोकळा श्वास
अन चालतील बिनधास्त वाट....
अंधारात दिपतील एक होऊनि
अभाळातल्या चांदण्या दाट...
माणसाचा ताफा घेऊन
गाठेन मी परत गावची वाट...
संजय सावळे