होल्ड अप भाग 7
होल्ड अप
प्रकरण ७
“ तुझ्या सहवासात दिवसभराचा एकटे पणा निघून जाईल.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही मला माझं नाव सांगून बोलावून घेतलंत? ” –मिष्टी.
“ हं ” पाणिनी म्हणाला.
“ कसं काय?” –मिष्टी
“ मी तुझ्या बद्दल ऐकलं होतं. तू व्यस्त होतीस कामात?”
“ मी...मी इथे नव्हते. घरी होते मी.”
पाणिनी काहीच बोलला नाही.
“ एकटीच...” तिने वाक्य पूर्ण केलं आणि पाणिनी कडे पाहिलं.
पाणिनी च्या चेहेऱ्यावर काहीच भाव उमटले नाहीत तेव्हा ताण हलका करण्यासाठी ती म्हणाली,
“ मला आश्चर्य वाटलं तुम्ही मला कस काय ओळखत होता ! ”
“ माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने तुझ्या बद्दल सांगितलं.”
“ विशेष आहे हे. कारण मला इथे फार दिवस झालेले नाहीत.” –मिष्टी
“ मला त्या व्यक्तीने तसंच सांगितलं ” पाणिनी म्हणाला.
ती हसली. “ तुम्ही गप्पिष्ट दिसता.” तेवढ्यात तिने ऑर्डर केलेलं पेय आलं.
स्टेज वर पुन्हा नृत्याला आमंत्रित करणारं वाद्य वाजू लागलं.पाणिनी ने भुवई उंचावून नाचायचं का असं तिला विचारलं.तिने लगेच होकार दिला.पुढच्याच क्षणी दोघे स्टेज वर चढले आणि तिच्या बरोबर पाणिनी ने नाचाच्या काही स्टेप्स टाकल्या.त्या अवधीत तिने त्याच्याशी शारीरिक लगट करायचा प्रयत्न केला.
“ तुम्ही इतरांपेखा वेगळे आहात. मी सगळ्याच गेस्ट बरोबर असं नाही नृत्य करत.” ती त्याच्या जवळ झुकत म्हणाली.
“ तू म्हणालीस ते खरं तर आम्ही पुरुषांनी म्हणणं अपेक्षित आहे का? ” पाणिनी नं विचारलं.
“ तुम्ही तरुण आहात, ताकदवान आहात, सुंदर आहात तरी ही लांडग्या सारखे नाहीत.”
“ खुषमस्करीपणा ! ” पाणिनी म्हणाला.
“ असेल पण ते मनापासून बोलले मी.”
पुन्हा वेटर त्यांच्या जवळ आला. पाणिनी ने मोकटेल किंवा ज्यूस काय हवं आहे असे तिला खुणेने विचारलं.
“ नको मला काही.इतर बार प्रमाणे आम्ही इथे ग्राहकाला उगाचच पेय खरेदी करायला लावून खर्चात पाडत नाही.आम्हाला अशा गोष्टींसाठी कमिशन मिळत नाही.” मिष्टी म्हणाली.
“ मग कशा पद्धतीने चालतं तुमचं काम?” पाणिनी नं विचारलं.
“ तुम्हा बाहेरच्या लोकांना वाटतं तसं नाही. इथल्या वातावरणाचा आम्ही बार बाला म्हणजे एक अपरिहार्य भाग असतो.समाजात आम्हाला बारबाला म्हंटलं जात असलं तरी हे आमचं घर आहे.म्हणूनच आम्हाला इथे मॅनेजर म्हणून मान दिला जातो.”
“ दिला जातो म्हणजे कोण देतो तुम्हाला हा मान?” पाणिनी नं विचारलं.
“ अर्थात मरुशिका मॅडम.” तिचं नाव घेताना मिष्टी चा चेहेरा अभिमानाने चमकला. “ जे कोणी निराश होऊन इथे येतात त्यांना आम्ही मुली कंपनी देतो.त्यांच्या सोबत नाच करतो, त्यांना बोलतं करतो. पण मरुशिका आम्हाला ठराविक मर्यादा ओलांडून देत नाहीत.त्यांचं लक्ष असतं. कारण त्यांच्यावरही वरच्या लोकांचं लक्ष असतं. या क्लबात ‘तसे ’ काही प्रकार चालतात अशी बातमी पसरली तर लगेच सगळे क्लब बंद होतील. इथे मोठाले सेलिब्रेटी येतात, त्यांना बघायला इतर जण येतात,अशा प्रकारे आमचा व्यवसाय वाढतो. तो पलीकडे बसलाय ना, तो मोठा........”
“ मिष्टी, मला सेलिब्रेटी मधे रस नाही.” पाणिनी म्हणाला.
“ मग,कशात आहे?”
“ तुझ्यात आहे.अत्ता या क्षणी.” पाणिनी म्हणाला.
“ मी.. मी उपलब्ध नाहीये.” मिष्टी म्हणाली.
“ तू आहेसच की अत्ता इथे.” पाणिनी म्हणाला.
“मी उपलब्ध नाहीये.” ते पुन्हा म्हणाली
“ मला त्या अर्थी म्हणायचं नव्हत. मी समाधानी आहे. ” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही खरंच वेगळे आहात.खूप चांगले आहात.”
“ मी सहज पणे कुणाला वश होण्यातली नाही.”
“ म्हणजे इथे माझ्या जवळ येण्यापूर्वी तू माझा पूर्ण अभ्यास केला होतास?” पाणिनी नं विचारलं.
“ अर्थातच. मिस्टर....?”
“ पाणिनी.” पाणिनी म्हणाला.
“ वेगळंच नाव आहे तुमचं.”—मिष्टी.
“ पण ते खरं नाव आहे.घेतलेलं नाव नाही. मला लोकांच्यात रस आहे, त्यांच्या स्वभावाचा मी अभ्यासक आहे.”
“ तुम्हाला माणसात रस आहे म्हणताय , सध्या कोणामध्ये आहे? ”
“ तुझ्यात. तू नृत्य चांगलंच करतेस.”
“ मी प्रोफेशनल डान्सर आहे.पण मला नाही आवडत तसं.”
“ काय नेमकं?”
“ डान्सर म्हणून आवडतं, पण प्रोफेशनल म्हणून नाही. त्यामुळे कलेचा आदर राखला नाही जात.”
“ पण तुला जगण्यासाठी पैसे तर कामाववेच लागत असतील ना? मला वाटतं कमिशन बेसिस वर....” तेवढ्यात वेटर आला.पाणिनी त्याला कॉफी किंवा ज्यूस ची ऑर्डर द्यायला लागला. मिष्टी ने त्याला नको म्हणून सांगितलं.
“ आपण कुठेतरी बाहेर जाऊया का?”
“ कुठे?” पाणिनी नं विचारलं.
“ जिथे जरा गंमत करता येईल , थ्रिलिंग वाटेल अशा ठिकाणी.”
“ तुला हाच विषय माझ्याशी बोलायचं होता ना? पण त्यासाठी बरंच आडून वळून या विषयावर याव लागलं तुला, खरं की नाही?” पाणिनी नं विचारलं.
“ खरं आहे.”
“ तू नेहेमीच एवढी संकोची असतेस?” पाणिनी नं विचारलं.
“ हो.पण एकदा मी मोकळी झाले, की मग एकदम सुसाट सुटते मी.”
“ बर,तर मग?”
“ माझं निमंत्रण अजून खुल आहे ! ”—मिष्टी
“ चला तर जाऊया.”
पाणिनी ने सगळ्याचं बिल चुकतं केलं आणि तिला घेऊन बाहेर पडला.बाहेरच्या पहारेकऱ्याला त्याने गाडी काढण्यासाठी खूण केली.
“ आपण माझ्या गाडीने जायचंय.तुमची गाडी इथेच राहू दे.”
“ एकनाथ, माझी गाडी काढ.” तिने आज्ञा केली.
त्या एकनाथ नावाच्या युनिफॉर्म मधल्या शोफर ने लांबसडक लिमोसीन कार बाहेर काढली आणि त्या दोघांना आत येण्यासाठी दार उघडून धरलं.
दोघे आत बसले.
आश्चर्याने पाणिनी ने विचारलं, “ आता पुढे काय?”
“ आपण बाहेर फिरायला चाललोय.”—मिष्टी म्हणाली.
“ मी कोण आहे हे आता तुला माहिती झालंय ,म्हणजे तसं मी समजतोय, आणि आता हे जे तू माझ्यासाठी करणार आहेस ते खास माझ्यासाठी असणार आहे असं समजू का?” पाणिनी नं विचारलं.
“ नाही.म्हणजे तुम्ही कोण आहात याच्याशी मला काही कर्तव्य नाही. तुम्ही चांगले आहात म्हणून.”
तिने गाडीतलं एक बटण दाबल.त्या बरोबर ड्रायव्हर आणि त्यांच्या मधे एक पडदा तयार झाला.
“ काय आहे हे?” पाणिनी ने चकित होऊन विचारलं.
“ प्रायव्हसी!” ती त्याच्या अंगाला खेटत म्हणाली. “ तुम्हाला नाही आवडत असा एकांत?”
पाणिनी हसला. त्याने तिच्या शरीरावरून हात चाचपून आत कुठे शस्त्र लपवले नाही ना याची खात्री केली.
तसं काही नसल्याची खात्री झाल्यावर त्याने आपले हात बाजूला केले.
“ कुठे जातोय आपण?” त्याने विचारलं.
“ फिरायला. थांबलात का? मी आवडत नाही तुम्हाला?”—मिष्टी
“ तू एखादा चाकू,सुरा किंवा बंदूक दडवली नाहीस ना हे बघत होतो मी.” पाणिनी म्हणाला.
ती हसली.“ एकाच बाजूला पाहिलंत तुम्ही. आता ही दुसरी बाजू ही बघा.” ती म्हणाली आणि वळली.
“ गरज नाही बघायची.” पाणिनी म्हणाला. “ निसर्गानेच तुला मोठे शस्त्र दिलंय. तुझं शरीर !”
“ तुम्ही मलाच का बोलावून घेतलंत?” तिनं विचारलं.
“ तू सुंदर आणि शूर आहेस म्हणून.”
“ कोणी सांगितलं?”
“ मित्राने.” पाणिनी म्हणाला.
“ मी सगळ्यांना घेऊन असं फिरायला नाही जात गाडीनं. फक्त डान्स करते आणि निघून जाते.”
“ तुझी नोकरी आवडते तुला?” पाणिनी नं विचारलं.
“ फार नाही आवडत.”
“ मरुशिका मतकरी आवडते?” पाणिनी नं विचारलं.
“ माझी अगदी जवळची वाटते मला ती. खूप समजून घेणारी आहे. तिच्या मुळेच नोकरी करावीशी वाटते.”
“ तू खूप लोकांना भेटत असशील ना?”
“ बऱ्यापैकी.”
नंतर बरंच वेळ शांततेत गेला.
“ तुम्ही खरंच वेगळे आहात पण,”-मिष्टी एकदम म्हणाली.
“ सांग ना कुठे जातोय आपण?”
“ कळेलच.”
ती म्हणाली आणि त्यांची गाडी अचानक झोकदार वळण घेऊन थांबली.तिने पुढे झुकून पुन्हा बटण दाबले त्या बरोबर मधला पडदा वर झाला आणि पाणिनी ला दिसलं की त्यांची गाडी एका इमारतीच्या मागच्या भागातल्या एका पार्किंग मधे उभी आहे. भटा खान्यातल्या कांद्याचा ओलसर वास तिथे दरवळत होता. पाणिनी ने घड्याळात पाहिलं तर बरोब्बर एकवीस मिनिटं झाली होती त्यांना निघून. क्षणभर त्याला असाही भास झाला की फिरून पुन्हा आपण जिथून निघालो त्याच व्हिला च्या बाहेर आलोय की काय.
तिने खाली उतरून दार उघडलं आणि पाणिनी ला उतरायला मदतीचा हात दिला.पार्किंग मधल्या तीन पायऱ्या चढून एका मंद दिवा असलेल्या पोर्च मधे ती पाणिनी ला बरोबर घेऊन आली.आपल्या जवळची किल्ली तिने दारात घातली.
“ इथे राहतेस तू?” पाणिनी ने विचारलं.
तिने उत्तर न देता दरवाजा उघडला. आत खोली असेल असं पाणिनी ला वाटलं होत त्या ऐवजी एक लांब सडक कोरीडोर होता.त्याच्या टोकाला उजव्या हाताला आणखी एक दार होत ते उघडलं आणि ती आत शिरली.खुणेने तिने पाणिनी ला आत बोलावलं.ती प्रशस्त खोली होती.साधंच पण भरपूर फर्निचर असलेली.भिंती लागत बार टेबल आणि स्टूल.त्यावर माणसं बसली होती आणि वेटर्स त्यांना मद्य पुरवत होते.त्या खोलीच्या आतील बाजूचं दार उघडलं.एक तिशीच्या घरातला माणूस ते उभे होते त्या खोलीत आला. त्याच्या गळ्याला टाय होता.तो मिष्टी कडे बघून हसला. “ तू कोणाला घेऊन आल्येस इथे ?” त्याने मिश्तीला विचारलं.
“ तो स्वतः ची ओळख करून देईल.” मिष्टी म्हणाली.
“ गरज नाही त्यांची . हा पाणिनी पटवर्धन आहे.प्रसिद्ध वकील.”
“ बाप रे ! अरे देवा!” मिष्टी च्या तोंडातून अकस्मात उद्गार बाहेर पडला.
“ मला वाटत पटवर्धन, तुम्ही व्यावसायिक कामासाठी इथे आलेले नाहीत.” टाय वाला म्हणाला.
“ समजा असेन , तर? ” पाणिनी ने विचारलं.
“ अर्थात तुमच्या व्यवसायाचा जो पर्यंत आमच्या धंद्याशी संबब्ध येत नाही तो पर्यंत आम्हाला त्यात पडायचं कारण नाही.” तो म्हणाला.
“ आणि मी काही सरकार पक्षाच्या नोकरीत नाही.” पाणिनी हसून म्हणाला.
“ तुम्ही आत यायची तसदी घ्याल पटवर्धन?”
“ मला वाटत ,त्या साठीच मला इथे आणण्यात आलंय.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही तुमचं नशीब अजमाऊन पाहणार असाल, तर तुमचा खिसा जरा हलका करणं आम्हाला आवडेल.”
“ आणि मिष्टी?” पाणिनी ने विचारलं.
“ तिला यासाठी ठोक बक्षिसी आणि तुमचा खिसा जेवढा खाली होईल त्याच्या काही टक्के कमिशन मिळेल.”-तो माणूस म्हणाला.
“ आणि माझा खिसा भरत गेला तर? म्हणजे मी जिंकत गेलो तर?” पाणिनी ने विचारलं.
“ अशा स्थितित बार बाला ना तोटा होईल.म्हणजे कमिशन मिळणार नाही पण इथ पर्यंत ग्राहकाला आणल्याबद्दल त्यांना ठोक रक्कम मिळायची ती मिळणारच.”
“ मला वाटत आपण आत जाऊ या.” पाणिनी म्हणाला.
( प्रकरण ७ समाप्त)