Get it on Google Play
Download on the App Store

होल्ड अप प्रकरण 23


 

 होल्ड अप प्रकरण २३
मरुशिका चा जळफळाट झाला.
“हो. ” ती नाईलाजाने म्हणाली.
“ आता मी जे बोलणार आहे,त्यात अजिबात गोंधळ आणि चूक व्हायला नको आहे मला, समजुतीत.”  पाणिनी म्हणाला.  “ पुढच्या कोणत्याही साक्षीत जर असं सांगितलं गेलं की तुमच्या कडे दरोड्याच्या वेळी चंदेरी सिगारेट केस होती, तर ती साक्ष चुकीची समजण्यात येईल.बरोबर आहे?”  पाणिनी ने विचारलं.
“ पटवर्धन, तुम्ही एका विशिष्ट सिगरेट केस बद्दल बोलताय.” मरुशिका म्हणाली.
“ मला वाटलंच होतं की तुम्ही आता अशी पलटी माराल म्हणून. तुम्हाला मी पुन्हा विचारतो, पुढच्या कोणत्याही साक्षीत जर असं सांगितलं गेलं की तुमच्या कडे दरोड्याच्या वेळी कोणतीही सिगारेट केस होती, तर ती साक्ष चुकीची समजण्यात येईल.बरोबर आहे?”  पाणिनी ने विचारलं.
“ मला ... मला  ... विचार करू दे जरा.” मरुशिका चा आता गोंधळ उडालेला दिसत होता.
“ पण तुम्ही घरातून निघताना सुट्ट्या सिगारेट्स आणि काडेपेटी घेतली होती हे तुम्हाला आठवतंय ना?”  पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ तुमच्या कडे  दुसरी सिगारेट केस असती तर तुम्ही सुट्ट्या सिगारेट्स  कशाला खरेदी केल्या असत्यात? नाही का?”  पाणिनी ने विचारलं.
“ कधी कधी एखाद्या मुली कडून मी उधारीवर म्हणजे एखाद्या दिवसापुरती सिगारेट केस घेत असे. अर्थात असं फार क्वचित घडलंय.” – मरुशिका
“ मुली कडून म्हणजे नक्की कोणाकडून? ”
“ माझ्याकडे बार गर्ल म्हणजे ज्यांना मी आमच्या क्लब ची मॅनेजर म्हणते अशा एखाद्या मुली कडून.”
“ एखाद्या मुलीचे नाव सांगा मला जिच्या कडून तुम्ही कधी काळी सिगारेट केस मागून घेतली होती.”  पाणिनी म्हणाला.
“ सिया माथूर.” –मरुशिका म्हणाली.
“ दरोड्याच्या वेळी ही माथूर तुमच्या नोकरीत होती?”
“ हो.”
“ आणि आज सुध्दा आहे?”
“ हो.”
“ दरोड्याच्या दिवसापासून आज अखेर सलगपणे ती तुमची नोकरी करत्ये?”
“ हो.”
“ अत्ता ती कुठे आहे तुम्हाला माहिती आहे?”  पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ कुठे आहे? ”  पाणिनी ने विचारलं.
“ ती एका डॉक्टर च्या देखरेखी खाली आहे. तिला एवढा त्रास दिलं गेला की......”
“ ते जाऊ दे. कुठे आहे तेवढेच सांगा.” न्या.एरंडे यांनी फटकारले.
“ एका खाजगी नर्सिंग होम मधे. ” – मरुशिका
“ विलासपूर ला तिचं एक घर आहे माहित्ये हे तुम्हाला?”
“ काही काळ ती विलासपूर मधे असते असं मला समजलंय.”
“ पण तुम्ही तर म्हणालात की ती सलगपणे तुमच्याकडे नोकरी करत होती म्हणून ”  पाणिनी म्हणाला.
“ सलगपणे.. म्हणजे हो आणि नाही  दोन्ही.”
“ नीट सांगा.”
“ म्हणजे तिच्या नोकरीचे स्वरूप असं आहे की तिने सलग प्रत्येक रात्री माझ्याकडे काम केलच पाहिजे असं नाही.तिला हवं तेव्हा ती ब्रेक घेऊ शकते. ”
“ सिया माथूर नावाच्या दोन मुली आहेत?”
“ माझ्या कडे नोकरीला असणाऱ्या?” –मरुशिका ने विचारलं.
“ नोकरीला असणाऱ्या किंवा नसणाऱ्या.”  पाणिनी म्हणाला.
“ मिस्टर पटवर्धन, या देशात सिया माथूर किती आहेत हे मी कसं सांगू शकते तुम्हाला?”
“ तुम्हाला किती सिया माथूर माहिती आहेत?”
“ एक.”
“ फक्त एकच?”  पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ तिला एकटीलाच तुम्ही भेटलाय?”
“ हो.”
“ सिया माथूर ला बहीण आहे?”
“ नाही.”
“ सिया माथूर हीच मुलगी मिष्टी या नावाने वावरते?”  पाणिनी ने विचारलं.
“ ते तिने व्यवसायासाठी घेतलेलं म्हणजे प्रोफेशनल नाव आहे.”  मरुशिका म्हणाली.
“ तुमच्या कंपनीत माथूर नावाच्या दोन मुली नाहीयेत?”
“ तुमच्या डोक्यात ही कल्पना कुणी घुसवली पटवर्धन? ” मरुशिका ने विचारलं.
“ आहेत की नाहीत?”
“ नाहीत.”
“ कधी काळी होती?”  पाणिनी ने विचारलं.
“ मी नक्की... म्हणजे काही मुलीना मी जास्त जवळून ओळखते ...”
“ हो की नाही ? ”
“ मला माझं रेकोर्ड बघाव लागेल.” मरुशिका म्हणाली.
“ तुम्ही जिचा संदर्भ देताय त्या माथूर व्यतिरिक्त आणखी कोणी माथूर नावाची मुलगी तुमच्याकडे कधीकाळी नोकरीला होती का?”  पाणिनी ने विचारलं.
“ काय आहे पटवर्धन, या मुली बऱ्याच वेळा वेगवेगळी नाव घेतात, त्यामुळे... विशेषतः त्यापैकी कोणी एकमेकांसारख्या दिसत असतील तर. .. म्हणजे एखादी लोकप्रिय झालेली मुलगी सोडून गेली तर तिच्या सारखी दिसणारी दुसरी मुलगी आली तर ती तिचे नाव लावते.म्हणजे हे लगेचच होत नाही, पण पाच सह महिन्याने आधीच्या मुली सारखी दिसणारी मुलगी येते मग ती आधीच्या मुलीचे नाव लावते कारण इथे येणारे ग्राहक हे रिपीटर असतात, म्हणजे पुन्हा पुन्हा येणारे. त्यांना एखाद्या मुलीची सर्व्हिस आवडली तर ते पुढच्या वेळी तीच मुलगी हवी म्हणून आग्रह धरतात.” मरुशिका म्हणाली.
“ म्हणजे सोडून गेलेल्या बारबाला चे नाव नव्याने येणाऱ्या मुलीने घ्यायचं हे तुमच्या क्लब ची पद्धतच आहे असे म्हणता येईल ?”  पाणिनी ने विचारलं.
साक्षीदार काय उत्तर द्यायचं या विवंचनेत होता.तिच्या चेहेऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती.आरुष काणेकर तिच्या मदतीला धावला.
“ युअर ऑनर, इतका वेळ मी संयम राखून होतो. जो पर्यंत ही उलट तपासणी गुन्ह्याच्या ठिकाणाहून मरुशिका ना लिफ्ट देणाऱ्या मुली पर्यंत मर्यादित होती.अगदी एकाच नावाच्या दोन मुली आहेत का हे विचारलं गेलं तेव्हा  सुद्धा मी हरकत घेतली नाही पण आता ही प्रश्नोत्तरे  बारबालांच्या खाजगी आयुष्यात डोकावू पहात आहेत.अशा अठरा बारबालांच्या आयुष्याचा पंचनामा मांडणार असतील तर ही उलट तपासणी महिना महिना चालेल. ” आरुष काणेकर म्हणाला.
“ मी मान्य करतोय काणेकरांची हरकत. पाणिनी पटवर्धन यांनी आपली तपासणी गुन्ह्याच्या ठिकाणाहून मरुशिका ना लिफ्ट देणाऱ्या मुली ची ओळख पटवण्याच्या  मुद्यावर सीमित ठेवावी.” न्या.एरंडे म्हणाले.
“ आणि मरुशिका ने कोणाकडून सिगारेट केस उधार घेतली होती या मुद्यावर ! ”  पाणिनी म्हणाला.
“ कोर्टाला जाणीव आहे त्याची. सिया माथूर बद्दलच्या प्रश्नांना बंधन घालत नाहीये मी मिस्टर पटवर्धन. विचार पुढे.” एरंडे म्हणाले.
“ मरुशिका, तुम्ही गुन्ह्याच्या दिवशी सिया माथूर कडून सिगारेट केस उसनी घेतली होती?”  पाणिनी ने विचारलं.
“ मला...म्हणजे..मी... खात्री नाही देता येणार.” मरुशिका चाचपडत म्हणाली.
“ म्हणजे तुम्ही सुट्ट्या सिगारेट खरेदी केल्यात तरी तुमच्या पर्स मधे रिकामी सिगारेट केस असायची शक्यता होती असं म्हणता येईल? ”  पाणिनी ने विचारलं.
“ पर्स मधील सिगारेट केस रिकामी नसती तर मी सुट्ट्या सिगारेट कशाला खरेदी केल्या असत्या ? ” -मरुशिका म्हणाली.
“ प्रश्न तुम्ही मला नका विचारू, मी तुम्हाला विचारतोय.”
“ असेल रिकामी केस माझ्या पर्स मधे.”—मरुशिका
“ पण अशी रिकामी केस तुमच्या पर्स मधे असती तर तुम्ही खरीद्लेल्या  सुट्ट्या सिगारेट्स  लगेचच त्या रिकाम्या केस मधे भरल्या असत्यात , नाही का?”  पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ आणि तुम्ही जर कोणाकडून सिगारेट केस उसनी घेतली असेल तर ती सिया माथूर कडून घेतली असेल?”
“ हो.”-मरुशिका
“ आणि उसनी घेतली होती की नाही या बद्दल तुम्ही सांगू शकत नाही?”
“ त्याच रात्री घेतली असावी की नाही या बद्दल ठाम पणाने नाही सांगू शकणार.”
“ सगळ्या बारबालांशी तुमची चांगली मैत्री आहे असे म्हणाला होतात तुम्ही?”  पाणिनी ने विचारलं.
“  हो.”
“ त्या सर्वांना तुम्ही नियमित आणि अद्ययावत पगार दिला आहे आत्तापर्यंत?”  पाणिनी ने विचारलं.
“ आम्ही त्याला पगाराचे स्वरूप देत नाही पटवर्धन.”
“ जे काही म्हणत असल ते, पण सिया माथूर ला तुमच्या कडून काहीही देणे बाकी नाहीये?”
“ आमच्या दोघीत रुनाको धनको असे संबंध नाहीत.”
“ तुम्ही तिला सिगारेट केस साठी पैसे दिलेत?”  पाणिनी ने विचारलं.
“ सिगारेट केस चे पैसे?” मरुशिका ने आश्चर्याने विचारलं.
“ हो.”
“ नाही.”
“ पण तुम्ही जर तिच्याकडून उसनी घेतली असेल सिगारेट केस, तर तिला तुम्ही ती परत करू शकला नसतात कारण ज्या पर्स मधे तुम्ही ती ठेवली  होती ती पर्स तर पोलिसांनी ताब्यात घेतली होती त्यामुळे तुम्ही त्या केस चे पैसे माथूर ना देणे लागता. बरोबर का?”  पाणिनी ने विचारलं.
“ म्हणजे...मी... हो. बरोबर आहे ”
“ तशी भरपाई तुम्ही केल्ये का मरुशिका?”
“ नाही.”
“ आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही तिला काहीही देणे लागत नाही, म्हणजे तुमच्यात रुनाको-धनको असे नाते नाही.बरोबर का?”  पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ याचाच अर्थ तुमच्या पर्स मधे त्या प्रसंगी तिची सिगारेट केस असायची शक्यता नाही. बरोबर ना?”
“ म्हणजे ..नसेल माझ्या पर्स मधे.”—मरुशिका अडखळत म्हणाली.
“ सिगारेट केस संदर्भातले माझे प्रश्न संपले.” पाणिनी म्हणाला. आरुष काणे कर उठून काहीतरी बोलायचा प्रयत्न करणार, तेवढ्यात पाणिनी म्हणाला, “ फक्त सिगारेट केस बद्दल चे संपलेत प्रश्न.” कोर्टात हास्याची लकेर उमटली.
“तर मग ही केस तुम्ही तुमच्या पर्स मधे ठेवण्यास उत्सुक असल ना?” तिच्या समोर केस नाचवत पाणिनी म्हणाला.
११७०
तिने मानेने हो म्हणून त्याच्या हातातून पर्स घेतली आणि पाणिनी कडे पाठ करून पर्स उघडून पटकन केस आत टाकली.
“ मागच्या शनिवारी तुम्हाला होल्ड अप बद्दल बरंच काही लक्षात होतं पण त्यातलं बरंच काही तुम्ही शुक्रवारी साक्ष देत असतांना आठवू शकलं नाहीत. ”   पाणिनी म्हणाला.
“ बरंच काही नाही पण काही काही बाबी.”—मरुशिका
“ आणि त्याबद्दल तुम्ही मिस्टर कामोद यांना संपर्क केला नाहीत?”
“ मी त्यांच्याशी बोललेली नाहीये. आणि हे मला निक्षून सांगायचंय.सगळ्यांच्याच माहिती साठी, की शुक्रवारी हा खटला सुरु झाल्यापासून मी त्यांच्याशी बोललेली नाही.”
पाणिनी पटवर्धन ने न्यायाधीशांकडे पाहून म्हंटले, “ मला जरा एक दोन मिनिटांची मुभा द्या प्लीज ” आणि न्यायाधीश काय म्हणतात याची वाट न बघता तो कोर्टाच्या मागील भागात बसलेल्या कनक ओजस कडे गेला. आता त्यांची पाठ न्यायाधीशांकडे होती.
“ काय चाललय पाणिनी ? ” कनक उद्गारला.
“ मी मरुशिका वर दबाव टाकण्यासाठी असं केलंय कनक ! मला सांग, तुला समोर न्यायाधीश आणि मरुशिका दोघांचे चेहेरे दिसताहेत? ”
“ व्यवस्थित, एरंडे एकदम अस्वस्थ झालेत.कुठल्याही क्षणी ते हातोडा वाजवून तुला उलट तपासणी सुरु करायला आदेश देतील असं वाटतंय. मरुशिका मात्र एकदम टेन्शन मधे आहे.”
“ कनक, तिने पर्स उघडताना मला दिसलं की तिच्या पर्स मधे एक पिवळ्या रंगाच्या कागदावर काहीतरी लिहिलेली चिट्ठी आहे. बहुतेक ती तिला पर्स मधून काढून टाकायची असावी पण ते ते करायला विसरली असावी.कदाचित ती चिट्ठी तिला आरुष काणेकर किंवा कामोद ने लिहिली असावी. तिला मी दोन वेळा पर्स उघडायला लावली काहीतरी कारण दाखवून तेव्हा तिच्या चेहेऱ्यावर मला अस्वस्थ भाव दिसले.मला वाटत की ती कोर्टाच्या बाहेर पडेल तेव्हा सगळ्यात प्रथम ती तो कागद कचरा कुंडीत टाकून देईल. तुझा माणूस तिच्या मागे ठेव आणि तिने टाकलेला कागद मिळवायचा प्रयत्न कर.म्हणजे मला हवाच आहे तो.अर्थात ती लेडीज टॉयलेट मधे गेली आणि  तिथे तो कागद फ्लश करून टाकला तर आपण काही करू शकणार नाही. अगदी तू तुझी स्त्री हेर लेडीज टॉयलेट मधे पाठवालीस तरी ती तिला असं करण्यापासून थांबवू शकणार नाही,त्यामुळे तिला काहीतरी कल्पना लढवून लेडीज टॉयलेट  मधे जाणार नाही असे बघ.”
तेवढ्यात एरंडे यांनी पाणिनी पटवर्धन ना हाक मारून तातडीने काम सुरु करायची सूचना दिली.पाणिनी लगेच साक्षीदाराच्या च्या दिशेने जाऊ लागला. जाता जाता  त्याने कनक ला विचारलं,    
“ऐश्वर्या मॉडेल एजन्सी च काय कनक? ”
“ मी माझ्या दोन स्त्री हेरांना तिथे अर्ज करायला सांगितलाय, मृद्गंधा ला सुध्दा.” –कनक म्हणाला.
“ मिस्टर पटवर्धन काय चाललंय ? वेळ काढू पणा? लगेचच चालू करा पुढचे प्रश्न.” एरंडे म्हणाले.
“ माझे प्रश्न संपलेत.”  पाणिनी म्हणाला.
“ सरकार पक्ष सुध्दा थांबतोय.” अचानक आरुष कणेकरांनी जाहीर केलं. न्यायाधीश पण आश्चर्यचकित झाले.
“ पाणिनी पटवर्धन तुमचा साक्षीदार बोलवा ” एरंडे म्हणाले.
“ सिया माथूर ! ” पाणिनी ने जाहीर केलं.
प्रकरण २२ समाप्त.
 
प्रकरण २३
मरुशिका पिंजऱ्यातून बाहेर पडत असतानाच चमकली.पटकन आरुष काणेकर च्या कानात कुजबुजली.आरुष उठून उभा राहिला, “ युअर ऑनर, सिया माथूर जेवढी पाणिनी पटवर्धन ना हवी आहे तेवढीच सरकार पक्षाला ही.पण मी खात्री पूर्वक सांगतो की सद्य स्थितीत तिचे कोर्टात येणे अशक्य आहे.”
“ का? काय झालंय अशक्य असायला?” न्या.एरंडे यांनी विचारलं.
“ या कोर्टासमोर मी हे सांगावं असं मला वाटत नाही.जरी माझ्याकडे पुरावे असले तरी.”
“ असं कोड्यात बोलू नका.जे आहे स्पष्ट सांगा. नाहीतर तिला हजर करा कोर्टात.”
“ सिया माथूर यांची छळवणूक झाल्ये.तिच्या मागावर जे गुप्त हेर नेमले होते त्यांनी तिला त्रास दिलंय.एवढंच नाही तर आरोपीचे वकील पटवर्धन यांनी सुध्दा. त्यांनी मरुशिका यांच्या क्लबात जाऊन सिया माथूर ला आपल्या बरोबर फिरायला नेलं. ” –काणेकर म्हणाला.
“ तिच्या मनाविरुद्ध? ती क्लबात बारबाला म्हणून काम करते.ग्राहकाला सेवा देणे हे तिचे काम आहे. माझ्या सारक्या अनेक ग्राहकांना ती सेवा देते. ” पाणिनी म्हणाला.
“ पटवर्धन थांबा.मधे बोलू नका.काणेकरांचं निवेदन झालं की नंतर तुमचं म्हणणं मांडा.” –एरंडे
“ शनिवारी दुपारी तिला समन्स दिलं गेला.तो अशा स्थितीत दिला गेला की ती पूर्ण असहाय्य होती.तो देताच आरोपीच्या एका नातलगाने तिच्या घरात घुसायचं प्रयत्न केला.सिया माथूर ने झोपेच्या गोळ्यांचा मोठा डोस घेतला. तिची स्थिती नाजुक आहे.ती सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे आणि त्यांनी तिला साक्ष देण्यासाठी बंदी केली आहे. ” काणेकर म्हणाला.
“ तुमच्याकडे डॉक्टरांनी दिलेला दाखला आहे?” न्या.एरंडे यांनी विचारलं.
“ यस सर. डॉक्टर डोळे यांचा दाखला आहे.” –काणेकर
“ तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर शुचिष्मंत आहेत. ”  पाणिनी म्हणाला.
“ ते आधी होते. म्हणजे माथूर चे नातलग येण्यापूर्वी.नातेवाईक आल्यावर त्यांनी डॉ.डोळे यांना आणलंय.” काणेकर म्हणाला.
“ डोळे डॉक्टरांनी तिला त्यापूर्वी कधी पाहिलं होतं? तपासलं होतं?”  पाणिनी ने विचारलं.
“ ते मला नाही माहीत. मला इतर महत्वाची कामे असतात, मी क्लब मधल्या बार बाला बरोबर वेळ घालवत नाही.” काणेकरांनी टोमणा मारला.
“ ते शोधून काढवं लागेल. ”  पाणिनी म्हणाला.
न्यायाधीशांनी हातोडा आपटला आणि दोन्ही वकीलांना गप्प बसवलं.  “ डॉ. शुचिष्मंत यांचं काय?ते या सगळ्यात कुठे बसतात? ” त्यांनी विचारलं.
“ कोणीतरी अज्ञात इसमाने फोन केला म्हणून ते आले.त्यांनी तिला तात्पुरती म्हणजे फर्स्ट एड ट्रिटमेंट दिली आणि इस्पितळात पोचवलं.रुग्णाने त्यांना कधीही बघितलं नव्हतं, सहजिकच तिचे नातलग आल्यावर त्यांनी त्यांच्या डॉक्टरला बोलावून घेतलं. ” काणेकर ने उत्तर दिले.
“ रुग्णाने  डॉक्टर डोळे ना तरी पाहिलं होत का त्यापूर्वी?” पाणिनी ने विचारल.
“ मला माहीत नाही ते.”
“ अरे वा ! तिने शुचिष्मंत यांना पूर्वी कधी  न पाहिल्याचे तुम्हाला माहिती आहे पण डोळे यांना पाहिलं की नाही हे माहीत नाही?”
पाणिनी च्या या प्रश्नावर आरुष काणेकर काही बोलू शकला नाही.
“ मला वाटत सरकार पक्षाला हवं तसं सर्टीफिकेट मिळावं यासाठी म्हणजे रुग्ण साक्ष द्यायला सक्षम नाही असे सर्टीफिकेट मिळावं यासाठी मुद्दामच डॉ.डोळे यांना नेमल असावं.”  पाणिनी म्हणाला.
“ असं काहीही नाहीये.” आरुष काणेकर म्हणाला.
“ मरुशिका ने तर डोळे डॉक्टरांना नेमलं नाही ना?”  पाणिनी ने विचारलं.
“ त्यांचं बिल कोण देतोय मला नाही माहीत.मला एवढंच माहित्ये की त्यांनी रुग्ण साक्ष द्यायच्या अवस्थेत नाही असा दाखला दिलाय आणि मी स्वतः या बाबतीत त्यांच्याशी बोललोय फोनवर.”—काणेकर.
न्यायाधीश एरंडे यांनी डॉक्टरांनी दिलेला दाखला पहिला. “खूप नर्व्हस असल्याने येऊ शकत नाही असा उल्लेख आहे दाखल्यात.” ते म्हणाले.  “ मिस्तर काणेकर, प्रत्येक साक्षीदाराने अशा कारणास्तव कोर्टात यायचं टाळलं तर किती खटले अडकून राहतील ! मला सांगा, काणेकर,तिने गोळ्या शनिवारी घेतल्या, तिला शुद्ध कधी आली?”
“ माहीत नाही.” काणेकर म्हणाला.
“ शनिवारीच?” –एरंडे
“ सांगता नाही येणार मला.”
“ मला हे असले वेळकाढू पणा चे डावपेच नाही आवडत.” न्यायाधीश म्हणाले. “ यात खूपच कच्चे दुवे राहिले आहेत असं माझं म्हणणं आहे.समन्स देऊन सुध्दा साक्षीदार हजर राहिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे.सतत होणाऱ्या विलंबामुळे या कोर्टाची सहनशक्ती  आता संपायला लागली आहे.मी नाईलाजाने दुपारी दोन वाजे पर्यंत कामकाज तहकूब करतो, कामकाज म्हणजे या साक्षीदाराची साक्ष. तो पर्यंत बचाव पक्षाने दुसरा साक्षीदार तपासावा.”
“आरोपी सोडून आमचे अन्य कोणी साक्षीदार नाहीत.” पाणिनी पटवर्धन ने जाहीर केले.  “ मात्र आरोपीला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे करण्यापूर्वी आम्ही सिया मथुर हिची  अगदी सविस्तर साक्ष काढू इच्छितो. थोडक्यात न्यायाधिशांच्या हातात निकालासाठी हे प्रकरण सुपूर्त करण्यापूर्वीचा शेवटचा साक्षीदार म्हणजे आरोपी असेल.पण त्या आधी सिया मथुर ही आम्हाला इथे हवीच आहे. ! ”
“ हे अत्यंत चीड आणणारे आहे. एकीकडे आम्ही ओरड करतोय की कोर्टाकडे कामाचा फारच ताण आहे.आणि इथे कोर्टात काम करणारे तुमच्या आमच्या सारखे लोक चालू खटल्यात खीळ घालायचा प्रयत्न करताहेत. केबल एका डॉक्टरच्या दाखल्यावर साक्षीदाराला कोर्टात हजर राहण्यासाठी प्रयत्न चाललाय ! मी आता सांगतो काय ठरवलंय ते.” न्यायाधीश म्हणाले,  “ मी दहा मिनिटांची सुट्टी जाहीर करतो.त्यात मी डॉक्टर डोळे यांच्याशी स्वतः बोलून घेणार आहे. मी त्यांच्या सर्टीफिकेट ला मान्यता देणार नाहीये. पुन्हा कोर्ट चालू होईल तेव्हा एकतर मला इथे डॉ.डोळे हवेत किंवा सिया माथूर पाहिजे. मिस्टर पटवर्धन, तुमचं काय म्हणणं होतं? डॉक्टर डोळे यांचं बिल मरुशिका मतकरी यांनी दिलंय?”
“ माझा असा विश्वास आहे की सिया माथूर कोर्टात आज येऊ शकणार नाही असा दाखला देण्यापुरतीच डॉ.डोळे यांची नेमणूक करण्यात आल्ये.डॉ.शुचिष्मंत हे सिया माथूर च्या तब्येती बद्दल जेवढे अनभिज्ञ होते ,तेवढेच डॉ.डोळे हे सुध्दा आहेत. ”  पाणिनी म्हणाला.
“ डॉ.शुचिष्मंत हे पाणिनी पटवर्धन यांचे अशील आहेत, जुने. त्यांनीच त्यांना बोलावलं आणि हॉस्पिटलात दाखल करून घेतलं.”-आरुष काणेकर म्हणाला.
“ पुढच्या दहा मिनिटात हा विषय मी संपवून टाकणारच आहे.मी डोळ्यांशी बोलल्यावर मला जर वाटलं की सिया माथूर कोर्टात येऊ शकत नाही तर बचाव पक्षाने दुसरा साक्षीदार आणावा नाहीतर आरोपीला साक्षीदार म्हणून आणावं.” न्यायाधीश एरंडे म्हणाले आणि उठून आपल्या चेंबर मधे गेले.
“ पटवर्धन, तुम्ही सिया माथूर चा हट्ट का धरताय? तुम्हाला तिच्या साक्षीचा काहीच फायदा नाहीये.झालं तर नुकसानच आहे.” आरुष म्हणाला.
“ तिला तपासाल्यावरच ते समजेल.”  पाणिनी म्हणाला.
कोर्टातून कनक ओजस आत येताना पाणिनी ला दिसला.त्याने अंगठा वर करून पाणिनी ला दाखवला.पाणिनी ची कळी खुलली.
“ येस कनक काय विशेष?”  पाणिनी ने विचारलं.
“ तुझा अंदाज बरोब्बर ठरला पाणिनी.”—कनक
“ कशाच्या बाबतीतला?”
“ तिच्या पर्स मधल्या पिवळ्या पेपर बद्दल.”—कनक
“ काय सांगतोस? मिळाला तुला तो? कुठे? कसा?”  पाणिनी ने विचारलं. तो आता एकदम उल्हासित झाला होता.
 कनक ने तो पाणिनी च्या कोटाच्या खिशात सरकवला.
“ मरुशिका ला कळलंय की तुला तो मिळालाय म्हणून?”  पाणिनी म्हणाला.
“ छे ! भलतंच काय?” कनक ओजस उद्गारला.
“ तू मिळवलास कसा तो? ”  पाणिनी ने विचारलं.
“ माझा अंदाज होताच की ती कोर्टातून बाहेर पडल्यावर प्रथम लेडीज बाथरूम मधे जाईल, तिने आत जाऊन तो कागद  फाडून फ्लश करून टाकला असता तर आपल्या हातात काहीच राहिले नसते, म्हणून मी लेडीज बाथरूम च्या दारावर  ‘ दुरुस्ती साठी बंद आहे ’ अशी कागदी पाटी लावली, आणि दाराला बाहेरून कुलूप लावलं. त्यामुळे तिचा नाईलाज झाला, तिने कोणाचे लक्ष नाही असं बघून बाहेरच्या कचऱ्याच्या डब्यात तो कागद टाकला.माझ्या माणसाने ती गेल्यावर तिथून मिळवला आणि त्याच्या जागी तसाच दिसणारा पिवळा कागद टाकला त्यामुळे जर तिने पुन्हा येऊन तो कचरा डबा पहिला असता तरी तिला त्यात एक पिवळा कागद दिसला असता आणि तिला संशय आला नसता. हा प्रकार झाल्यावर आणि ती गेल्यावर मी बाथरूम वरची पाटी काढली आणि कुलूप ही उघडलं. ” कनक म्हणाला.
“ ते करताना तिने बघितलं नसेल ना?”  पाणिनी ने विचारलं.
“ छानच काम केलंस कनक. आता आणखी एक कर,हिमानी दुनाखे चं पोस्ट मार्टम झालं त्यावेळी तिच्या शरीरावर कुठे भाजलेल्या डागाची खूण सापडली का? याची माहिती काढ. ”  पाणिनी म्हणाला.
“ मी आधीच काढली आहे. तिच्या उजव्या गुढग्यावर तू म्हणतोस तसा डाग आहे पाणिनी.”
“ एखाद्या नाण्याच्या आकाराचा?”  पाणिनी ने विचारलं.
“ साधारण तसाच. पोस्ट मार्टम करणाऱ्या डॉक्टरना त्याचा नेमका अर्थ सांगता आला नाही.....”
तेवढ्यात पट्टेवाला बाहेर आला आणि त्याने पाणिनी ला हाक मारली. “ पटवर्धन, तुम्हाला आणि आरुष काणेकर अशा दोघांनाही साहेबांनी त्यांच्या केबिन मधे बोलावलंय.”
 “ कनक,मी पटकन जाऊन येतो.मला कदाचित तुझी साक्ष काढावी लागेल.तो पिवळा कागद तुला कसा मिळाला या बद्दल.”  पाणिनी म्हणाला.
आरुष काणेकर आणि पाणिनी पटवर्धन एकत्र न्यायाधीश एरंडे यांच्या चेंबर मधे गेले.एरंडे हातात फोन धरून बसले होते. दोघे आत येताच त्यांना उद्देशून म्हणाले, “ डॉक्टर डोळे फोन वर आहेत.त्यांचं म्हणणं आहे की सिया माथूर दुपारी दोन वाजता कोर्टात येऊ शकते साक्ष द्यायला, पण त्या वेळी त्यांनी कोर्टात हजर असणे गरजेचे आहे.साक्ष देताना ती अचानक नैराश्यात जाऊ शकते.जर तिला तसा काही त्रास झाला तर तिची साक्ष थांबवायचा त्यांना अधिकार असावा अशी त्यांची अट आहे.”
“ मला ठीक वाटतंय हे.” काणेकर म्हणाला.
“ मला बोलायचंय त्यांच्याशी.” पाणिनी न्यायाधीशांना म्हणाला.
“ डॉक्टर डोळे, आरोपीचे, म्हणजे बचाव पक्षाचे वकील पाणिनी पटवर्धन यांना तुमच्याशी बोलायचंय.” एरंडे म्हणाले आणि त्यांनी फोन पाणिनी पटवर्धन कडे दिला.
“ नमस्कार डॉक्टर. मला सिया माथूर बद्दल विचारायचं होतं.”  पाणिनी म्हणाला.
डॉक्टर डोळे त्याला क्लिष्ट अशा वैद्यकीय भाषेत काय काय सांगू लागले.पाणिनी वैतागला.  “ डॉक्टर ते सगळं राहू दे. मला एवढंच सांगा की तुम्हाला तिच्या पार्श्वभूमी बद्दल कितपत ज्ञान आहे?” 
“ बऱ्यापैकी आहे, म्हणजे ती......” डॉक्टर म्हणाले.पाणिनी ने त्यांना मधेच थांबवले.
“ ही माहिती तुम्हाला पूर्वीच होती की तुम्हाला, तिला तपासायला बोलावल्यावर मिळाली? ”  पाणिनी ने विचारलं.
“ मला बोलावल्यावर.” –डोळे.
“ कधी बोलावलं होतं?”  पाणिनी ने विचारलं.
“ शनिवारी संध्याकाळी सात च्या सुमारास.”—डोळे.
“ कोणी बोलावलं?”  पाणिनी ने विचारलं.
“ सिया माथूर च्या मैत्रिणीने.”
“ तुम्ही त्यापूर्वी कधी सिया माथूर ला तपासलं होत, रुग्ण म्हणून?”  पाणिनी ने विचारलं.
“ नाही.”
“ पण तुम्हाला बोलावणाऱ्या मैत्रिणीला तुम्ही यापूर्वी भेटला होता?”
“ मला नाही... म्हणजे.... पटवर्धन, या प्रश्नामागे नेमका काय हेतू आहे?”
“ तुम्हाला बोलावणाऱ्या व्यक्तीचे नाव मरुशिका होतं?”  पाणिनी ने विचारलं.
“ या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देत बसणार नाही मी.”—डोळे.
“ मला नाही तर न्यायाधीशांना सांगा.त्यांच्याकडे मी फोन देतोय डॉक्टर, बोला.”  पाणिनी म्हणाला. आणि त्याने एरंडे यांचेकडे फोन दिला.
“ डॉक्टर तुम्ही मरुशिका मतकरी चे डॉक्टर आहात ही वस्तुस्थिती आहे?” एरंडे यांनी विचारले.पलीकडून डॉक्टर डोळे काहीतरी बोलले त्यामुळे न्यायाधिशांच्या कपाळावर आठ्या पडल्या.
“ डॉक्टर,तुम्ही न्यायाधीशांशी बोलताय.मला यापेक्षा व्यवस्थित उत्तर अपेक्षित आहे तुमच्या कडून ”
पलीकडून पुन्हा डॉ.डोळे काहीतरी बोलले. जे एरंडे यांना आवडलेले दिसले नाही.
“ डॉक्टर तुम्ही दोन वाजता तुमच्या पेशंट ला घेऊन इथे या. ज्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला अत्ता फोन वरून विचारली, तीच तुम्हाला भर कोर्टात सर्वांसमोरच मी विचारणार आहे. अच्छा.” एरंडे म्हणाले आणि त्यांनी फोन ठेऊन दिला.
“ पटवर्धन, काणेकर, काय चाललंय हे सर्व? मला भयंकर चीड आणणारं आहे हे सगळंच. आपण पुन्हा कोर्टाचं कामकाज चालू करुया. दोन्ही वकिलांनी एकमेकावर टीका आणि आरोप प्रत्यारोप न करता या खटल्याला वेग देण्याचा प्रयत्न करा.मिस्टर पटवर्धन, तुम्ही सिया माथूर येई पर्यंत दुसरा साक्षीदार तपासा.ठीक दोन वाजता मला माथूर आणि डॉ.डोळे इथे हजर हवेत.” एरंडे म्हणाले.
“ जज्ज साहेब, मला नाही वाटत सिया माथूर ची साक्ष घेण्याची पटवर्धन यांची खरोखर इच्छा असावी.ते काहीतरी बनाव रचताहेत. सिया माथूर ही खरंतर त्यांच्या विरोधातील साक्षीदार असणार आहे. तिच्या साक्षीचा पटवर्धन ना काहीही फायदा होणार नाहीये. त्यांनी बचावाची जी नीती आखली असेल त्याला माथूर च्या साक्षीने धक्काच बसणार आहे.त्यामुळे तिची साक्ष काढून बचाव पक्ष स्वतःवरच बंधन घालून घेईल.”  काणेकर म्हणाला.
“ मला कशाने धक्का बसेल आणि कशाचा फायदा होईल हे तुम्ही मला सुचवायची गरज नाही,तुम्ही स्वतःच्या पायाखालची वाळू घसरत नाहीये ना तेवढच बघा.”  पाणिनी म्हणाला. आणि बाहेर पडला.
(प्रकरण २३ समाप्त.)