Get it on Google Play
Download on the App Store

होल्डअप प्रकरण 16

 

प्रकरण १६
पाणिनी ऑफिसला आला तेव्हा दार बंद होत आणि दाराला चिट्ठी होती,
‘ मी आणि मृद्गंधा बाहेर गेलोय.काही लागलं तर माझ्या घरी फोन करा.’
पाणिनी ने चिट्ठी वाचून फाडून कचरा पेटीत टाकली.
दार उघडून आत आला तेवढ्यात फोन खणखणला.
“ सर मी अडकल्ये.” सौम्या चा तार स्वरातला आवाज आला.
“ नेमकं काय झालंय सौम्या?”
“ फोन वर सांगणे योग्य नाही सर.”
“ तू आहेस कुठे अत्ता?”
“ ज्या घरातून ठसे घ्यायचे होते तुम्हाला, तिथे.”
काय घडलं असावं ते पाणिनी च्या पटकन लक्षात आलं.त्याने मृद्गंधा ने जिथे ठसे घेण्याची उपकरणं ठेवली होती तिथे पाहिलं.तिथे काही नव्हतं त्या जागेवर.
“ मृद्गंधा तुझ्या बरोबर आहे, सौम्या?”  पाणिनी ने विचारलं.
“ नाही तिच्या मागावर तो माणूस होता. मी तिला म्हणाले की त्याला हूल दे आणि तू माझ्या अपार्टमेंटमध्ये जा.” –सौम्या म्हणाली.
“ बर मग काय झालं?”
“ तुम्ही इथे आलात तर बरं होईल सर.”
“ निघालोच मी. पण मला पटकन सांग, तू अडचणीत नाहीयेस ना?”
“ त्या दृष्टीने नाही, पण नाजुक अवस्थेत आहे हे नक्की.”
“  काळजी नको करू आलोच मी. ”  पाणिनी म्हणाला.
पुढच्या पंधराव्या मिनिटाला पाणिनी  ने सिया मथुर च्या  अपार्टमेंट च्या दाराची बेल वाजवली होती.
सौम्या ने दार उघडलं आणि आपल्या ओठावर बोट ठेऊन पाणिनी ला बोलू नका अशीखूण केली?
“ काय झालंय सौम्या?” हळू आवाजात पाणिनी ने विचारलं.
“ तुम्हाला इथले ठसे काहीही करून हवेच होते हे मी जाणलं आणि मृद्गंधा ला सांगितलं की त्या माणसाला मुद्दाम तुझा पाठलाग करू दे. त्याला माझ्या घरा पर्यंत ने.तिने बरोब्बर तसाच केलं आणि तो पर्यंत मी इकडे कनक ची उपकरणे वापरून ठसे जमा केले.” –सौम्या म्हणाली
पाणिनी ने खुष होऊन तिची पाठ थोपटली.
“ पण आता मात्र मी लटकले.” सौम्या म्हणाली आणि पाणिनी ला घेऊन बेडरूम मधे गेली.
अंथरुणावर बेशुद्ध अवस्थेत एक स्त्री आडवी पडली  होती.तिच्या  माने पर्यंत चादर ओढली होती.
“ माय गॉड ! ” पाणिनी ओरडला.
“ मी इथे ठसे जमा करत आत आले तार ही कपाटाला डोकं आणि खांदे टेकून बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. पूर्ण कपडे अंगावर होते , अगदी बूट सुध्दा. महा मुश्किलीने मी तिला कॉटवर आणून झोपवलं.”
“  मला संशय आहे मी ज्या बार बाले बरोबर , म्हणजे  सिया माथूर उर्फ मिष्टी बरोबर क्लब मधे घालवला ती ही असावी. पण या मुली रात्री एवढा मेक अप करतात की अत्ता सहज ओळखू येत नाहीत.”
पाणिनी ने तिच्या अंगावरचे पांघरून काढलं, तिच्या अंगातल्या जॅकेट वरून हात फिरवला. खिशात काहीतरी आहे असं वाटलं म्हणून आत हात घातला. एक चामड्याची की चेन आणि त्याला एक किल्ली हातात आली.
“ यातून काहीतरी क्लू लागेल.” तो उद्गारला.
हातात किल्ली घेतली आणि बाहेर गेला. बाहेरच्या दाराला किल्ली लागते का पाहिलं.
“ काय झालं? लागली किल्ली?” सौम्या ने विचारलं.
“ नाही.”
“ तुम्ही येई पर्यंत मी चे कपडे तपासले सर. विलासपूर च्या दुकानाचं लेबल आहे त्याला.”
“ आपल्याला या किल्लीचं रहस्य शोधायलाच लागेल.” पाणिनी स्वत:शी बोलला
“ आपण डॉक्टरांना बोलवायचं की पोलिसांना? की दोघांना?” –सौम्या
“ मला वाटत आपण डॉक्टरांना च बोलावलेलं बर.”  पाणिनी म्हणाला.
“ त्या नंतर काय? तुम्ही निघून जाणार बाहेर सरळ?” सौम्या ने विचारलं.
“ आपण दोघेही निघून गेलो तर?”  पाणिनी ने विचारलं.
“ नाही, तस नाही करून चालणार. येताना मला लिफ्टमन ने बघितलंय.त्याला मी सांगून बसल्ये की मी हॉस्पिटल ची नर्स आहे. सिया माथूर हॉस्पिटल मधे आहे आणि तिचे कपडे आणि इतर वस्तू अनायालामी आल्ये. हे सांगितल्यावर त्याने मला त्याच्या जवळच्या किल्लीने दार उघडून दिलं ”
“ संशय आला त्याला तुझा?”  पाणिनी म्हणाला.
“ नाही, बिलकुल नाही.पण त्याने मला नीट बघून घेतलंय.म्हणजे पोलिसांनी त्याला छेडलं तर तो माझं वर्णन अगदी व्यवस्थित करू शकेल.मी इथेच थांबते आणि काय होईल त्याला तोंड देते.”
पाणिनी उठून उभा राहिला.त्याने त्याच्या परिचित डॉक्टर शुचिष्मंत ना फोन लावला. सर्वात प्रथम त्यांना पत्ता सांगितला.
“ इथे जी स्त्री आहे तिने माझ्या अंदाजाप्रमाणे झोपायच्या गोळ्यांचा मोठा डोस घेतलाय.नाडी एकदम मंद लागत्ये. आणि ती बेशुद्ध पडल्ये. तुम्ही अत्यंत तातडीने इथे या.”
“ मी लगेच निघतो.” डॉ.शुचिष्मंत  म्हणाले.
“ आपल्याला हे सर्व गुप्त ठेवायचंय.”  पाणिनी म्हणाला.
“ काळजी करू नका.माझा स्वभाव माहित्ये तुम्हाला.यापूर्वी आपण एकत्र काम केलंय.” शुचिष्मंत म्हणाले.
“ सर मला समजतच नाहीये की या बाईला अँब्यूलन्स मधून नेलं होत ना.... तर....” सौम्या ने आश्चर्य करत विचारलं.
“ तुला काय माहीत की तिला नेलं होतं ? ”  पाणिनी ने विचारलं.
“ का बरं? इथे अँब्यूलन्स आली, त्यातून दोन तीन माणसे उतरली....अर्थात तिला कुठे नेलं ते माहीत नाही झालं.... ” सौम्या बोलता बोलता अडखळली.
“ बोल ,बोल, सौम्या. काहीतरी मनात आलं होत तुझ्या. पण तू थांबलीस.”  पाणिनी म्हणाला.
“अँब्यूलन्स मधून उतरलेल्या माणसांनी सियाला  धरून चालवत बाहेर आणलं, अँब्यूलन्स मधे बसवलं, स्वाभाविक पणे सर्वांनाच वाटलं असेल की तिला हॉस्पिटल ला नेलं.” सौम्या म्हणाली.
“ बरोबर.पुढे काय  झालं असावं असं वाटतंय तुला? ”  पाणिनी ने विचारलं.
“ त्यांनी तिला हॉस्पिटल मधे न नेता परत इथेच आणून सोडलं असावं ती मरावी म्हणून मुद्दामच.”
“ त्यांनी कसं आणलं असेल तिला इथे परत?”  पाणिनी ने विचारलं.
“ कदाचित मागच्या दाराने. ... पण.. पण... त्यांना जर तिला इथेच परत आणायचं होतं तर त्यांनी तिला बाहेर नेलाच का असेल? ” सौम्या म्हणाली.
“ अत्यंत कौशल्याने केलेला खून  किंवा खुनाचा प्रयत्न असू शकतो हा.”  पाणिनी म्हणाला.
“ म्हणजे?” --सौम्या.
“लक्षात घे. सियाने मृद्गंधा समोरच झोपेच्या गोळ्या घेतल्या.म्हणजे ती त्याला साक्षीदार आहे. तिने हे कनक ला कळवलं, कनक म्हणाला की तो पोलिसांना कळवेल.आणि त्याने ते केलं सुध्दा. म्हणजे त्यामुळे काय झालं? कनक आणि मृद्गंधा दोघांची जबाबदारीतून मुक्तता झाली.”  पाणिनी म्हणाला.
“ काय म्हणायचंय तुम्हाला नेमकं? ”
“अँब्यूलन्स मधल्या दोन माणसांनी सियाच्या इमारतीत जाऊन एका बाईला धरून खाली आणलं. तिचा चेहेरा कोणीच नीट बघू शकलं नाही.आपण गृहित धरतोय की त्यांनी सियाला आणलं म्हणून. ते सियाच्या फ्लॅट पर्यंत गेले की नाही हे सुध्दा आपण कोणी बघितलं नाहीये.कदाची वाटेतच कोणीतरी त्यांना भेटले असेल आणि म्हणाले असेल की मी झोपेच्या गोळ्यांचा मोठा डोस घेतलाय आणि मला कसतरीच होतंय, त्यामुळे त्यांना वाटलं असेल की याच पेशंट साठी आपल्याला बोलावलं गेलयं म्हणून.त्या नंतर पोलीस तिथे आले पण त्यांनी सियाच्या अपार्टमेंटमध्ये जाण्याचे कष्ट सुध्दा घेतले नाहीत, कारण ते येई पर्यंत रस्त्यात बघ्यांची गर्दी झाली होती. तिथे जमलेल्या काहींनी सांगितलं त्यांना की तुम्ही उशिरा आलात,अत्ताच अँब्यूलन्स येऊन पेशंट ला घेऊन गेली. पोलिसांच्या दृष्टीने विषयच संपला.ते निघून गेले.इकडे सिया मात्र या फ्लॅट मधे शेवटच्या घटका मोजत होती. ”  पाणिनी म्हणाला.
“ कपाटात.” सौम्या ने दुरुस्ती केली.
“ तिने कदाचित कपडे बदलून बाहेर जायचा विचार केलं असेल म्हणून ती कपाटा जवळ गेली असेल पण झोपेमुळे तिथेच पडली असेल.उपचार झाले नाहीत तर मरणाला सामोरी जाण्यासाठी !  ”  पाणिनी म्हणाला.
“ हा खून आहे सर.” –सौम्या
“ सिध्द करून दाखव.” पाणिनी ने आव्हान दिलं  ”  सौम्या, तिने स्वतःहूनच गोळ्या घेतल्या. पुढे घडलेल्या घटना म्हणजे योग योगांची मालिका असू शकते.”
“ पण मुळात ती झोपेच्या गोळ्या घेईलच का?”  सौम्या ने विचारलं.
“ कदाचित तिच्या तोतया मुलीने घेतल्या असतील. म्हणजे सिया सारख्या दिसणाऱ्या मुलीने.”
सौम्या हादरलीच. “ सर, परंतू तुम्हाला काय माहीत की तिची तोतया होती म्हणून? ”
“ हा सर्व अंदाज आहे माझा. सौम्या तू डॉक्टर येई पर्यंत किचन मधे जाऊन जरा पाणी गरम करत ठेव.”
“ पाणी? ”
“ हो कदाचित डॉक्टरांना लागेल ते असा माझा अंदाज आहे. आणखी एक काम कर, एकदम कडक कॉफी बनव.तिला शुद्धीवर आणायला ती उपयोगी पडेल. डॉक्टर यायलाच पाहिजेत एव्हाना, पण त्यांना उशीर झालाच तर तिला कडक कॉफी पाजून बघूया. या झोपेच्या गोळ्यांचा परिणाम शरीरात व्हायला तसा वेळच लागतो.”  पाणिनी म्हणाला.
पाणिनी च्या सुचने नुसार सौम्या ने पाणी गरम करायला ठेवलं, आणि दुसरीकडे कॉफी करायला घेतली.
“ तुम्हाला काय वाटतंय,कोर्टात आपल्या बाजूने साक्ष द्यायला कनक ने आणलेली आणि आपल्या ऑफिसात बसवून ठेवलेली  आणि तिथून पळून गेलेली तीच ही मुलगी आहे?” सौम्या ने विचारलं.
“ मला सांगता येत नाहीये अत्ता. मी विचार करतोय दोन शक्यतांचा.एक तर त्या बहिणी असाव्यात, किंवा सारख्या दिसणाऱ्या पण कौटुंबिक संबंध नसणाऱ्या दोन मुलींचा.”  पाणिनी म्हणाला.
“ दोन वेगळ्या ठिकाणी असणाऱ्या घरांमुळे? ”
“ ते एक कारण आहेच.”  पाणिनी म्हणाला.
“ एकच मुलगी विलासपूर आणि देवगिरी अशा दोन्ही ठिकाणी जाऊ-येऊ शकते, काही खास कारण असेल तर.” सौम्या ने शक्यता वर्तवली.
पाणिनी गप्प राहिला.
“ बोला ना सर.”
“ दोन वेगळ्या मुली असायची शक्यता मी गृहित धरतोय कारण मी जिच्या बरोबर क्लबात घालवला ती मुलगी म्हणजे स्वतःला मिष्टी म्हणवून घेणारी मुलगी हीच कनक ने साक्ष देण्यासाठी आणलेली आणि आपल्या ऑफिसातून साक्ष न देता पळून गेलेली मुलगी असावी हे मानायला माझं मन तयार नाही.”
“ पण ती क्लबात वावरताना जरी मिष्टी नाव लावत असली तरी तिचं खर नाव सिया आहे अशी माहिती तुम्हाला कनक च्या हेराने दिली होती ना?” –सौम्या
“ पण दोघींच्या मानसिकतेत फरक होता, वागणुकीत होता.”  पाणिनी म्हणाला.
“ आणि दोघींची घरे वेगळ्या शहरात आहेत.” –सौम्या ने पुष्टी जोडली.
दाराची बेल वाजली. डॉक्टर शुचिष्मंत दारात उभे होते.
“ कुठे आहे तुमचा रुग्ण?” ते घाई घाईत आत शिरत म्हणाले. “ आणि इथे काय मिळेल? गरम पाणी मिळेल लगेच?”
सौम्या ने कौतुकाने पाणिनीकडे पाहिलं.आणि हसली. “ सरांनी आधीच सांगून ठेवलं होतं. ”
डॉक्टरांनी तिला तपासायला सुरुवात केली.  “ एका मोठया चमच्यात उकळते पाणी आणा.” ते म्हणाले.
सौम्या लगेच ते करायला गेली.
“  कोण आहे ही? आणि किती वेळ झालाय गोळ्या घेऊन तिला?” शुचिष्मंत नी विचारले.
पाणिनी ने मान हलवली. “ आम्हाला ती इथे याच अवस्थेत आढळली.”  पाणिनी म्हणाला.
“तुम्ही इथे कशासाठी आला होतात? आणि तुम्हाला आत कोणी घेतलं? ”
“ आम्ही पुरावा शोधत होतो.”  पाणिनी म्हणाला.
“तुम्हाला आत कोणी घेतलं? ” तानी पुन्हा विचारलं.
“ त्यामुळे तुमच्या उपचारात फरक पडेल?”  पाणिनी ने विचारलं.
“ उपचारात नाही पडणार पण मृत्यू दाखला सही करायची वेळ आली तर मला माहीत असावं.” डॉ.शुचिष्मंत म्हणाले.
“ ती वेळ येईल असं वाटतंय तुम्हाला?”  पाणिनी ने विचारलं.
“ अत्ताच नाही सांगता येणार मला.”
सौम्याने  मोठया चमच्यात आणलेल्या  उकळत्या पाण्यात डॉक्टरांनी एक गोळी विरघळवली आणि सिरींज काढून तिला त्यातले औषध टोचलं.
“ सुरक्षिततेच्या दृष्टीने, तिला हॉस्पिटल मधे न्यायला हवं.” डॉ शुचिष्मंत म्हणाले.
“ घेऊन जा तिला.”   पाणिनी म्हणाला.
“ आणि तिथे प्रश्न विचारले मला तर काय सांगायचे?”
“तुम्ही सांगा की वॉचमन ने बोलावून घेतलं, इथे मुलगी बेशुद्ध पडल्ये असं सांगून. ”  पाणिनी म्हणाला.
“ पण त्यांनी वॉचमन ला विचारलं आणि त्याने ते नाकारलं तर? ” डॉ शुचिष्मंत म्हणाले.
“ तुम्ही म्हणू शकता ना की  फोन वर तो मला वॉचमन बोलतोय असं म्हणाला.माझ्या दृष्टीने तो कोण बोलतोय हे शोधून काढण्यापेक्षा मुलीचा जीव वाचवणे महत्वाचं होत. ”  पाणिनी म्हणाला.
“ पण माझ्या फोन चं रेकोर्ड तपासलं तर मला  कोणाचा तरी  फोन आलाय हे सिध्द व्हायला हवं.” डॉ शुचिष्मंत म्हणाले.
“ मी तुम्हाला इथून फोन केलाच होता डॉक्टर. तुम्ही तो फोन वॉचमन ने केला असं  म्हणू शकता. ”  पाणिनी म्हणाला.
“वॉचमन ने नाकारलं तर? ”
“ मग सांगा त्यांना ह्या वॉचमन ने नसेल केला तर त्याचे नाव सांगून कोणीतरी केला असेल. चला निघूया इथून.”  पाणिनी म्हणाला.
( प्रकरण १६ समाप्त)