Get it on Google Play
Download on the App Store

होल्ड अप प्रकरण 13

 


होल्ड अपप्रकरण १३
 
“ कनक, या प्रकरणात काहीतरी जबरदस्त लोचा आहे.” पाणिनी पटवर्धन कनक च्या केबिन मधे आत शिरता शिरता म्हणाला.
“ तू बोलतोयस हे पाणिनी ! ”—कनक
“ ती सिया माथूर नक्कीच दुहेरी आयुष्य जगत असली पाहिजे. तिचे इथेही घर आहे आणि विलासपूर मधे पण, आणि नोकरी मरुशिका क्लब-३ मधे.”
कनक ओजस ने मान हलवून संमती दिली.
“ ती तसे का करत असावी? आणि कसे जमवले असावे हे तिने?” पाणिनी स्वतःशीच बोलला
“ अँम्ब्युलन्स आली तेव्हा तू तिथे समोरच्या हॉटेलात होतास पाणिनी?” –कनक
पाणिनी मानेने हो म्हणाला.
“ माझा दुसरा माणूस अँम्ब्युलन्स च्या मागावर निघाला लगेच पण एवढया ट्राफिक मधून अँम्ब्युलन्स ला जसं पोलीस सहज जाऊन देतात तस त्याला शक्य होणार नव्हत. तरी त्याने अँम्ब्युलन्स ला अगदी चिकटून पाठलाग केला पण पोलिसांनी त्याला अडवलाच.त्याने बतावणी केली की त्यांची बायको अँम्ब्युलन्स मधे आहे तेव्हा पोलिसांनी त्याला जाऊ दिला, पण तो पर्यंत अँम्ब्युलन्स पुढे निघून गेली होती. ”—कनक
“ मी समजू शकतो.पण मला त्याची काळजी नाही. मला दुसरीच चिंता सतावते आहे. ”  पाणिनी  म्हणाला.
“ आधी माझी पुढची हकीगत ऐकून घे म्हणजे तुला अत्ता ज्याची चिंता वाटत्ये, त्या पेक्षा वेगळ्याच गोष्टीची वाटायला लागेल.”
“ सांगून टाक एकदा.”  पाणिनी  म्हणाला.
“ माझा माणूस हुशार आहे. त्याने अँम्ब्युलन्स चा नंबर टिपून ठेवला होता.त्या अनुषंगाने आम्ही ती कुठल्या हॉस्पिटल मधे गेली ते शोधायचा प्रयत्न केला.” –कनक
“ कुठे नेलंय तिला?”  पाणिनी ने विचारलं.
“ तिला कुठल्याही हॉस्पिटल मधे नेलं गेलं नाही. कनक ने धक्का दिला.”
“ अरे बापरे ! पण ठीक आहे, तुझ्या कडच्या नंबर वरून अँम्ब्युलन्स च्या मालकाचा शोध घे ”  पाणिनी  म्हणाला.
“ आधीच केलंय आम्ही ते.पण त्याचा काही उपयोग नाही.”
“ का?”  पाणिनी ने विचारलं.
“ तो बोगस नंबर निघालाय. म्हणजे या राज्यात तसा नंबरच अजून दिला गेला नाही कुठल्याच वाहनाला. ” –कनक
“ नंबर टिपून घेताना तुझ्या माणसाची काही चूक झालेली नाही ना? ”  पाणिनी ने विचारलं.
“ अजिबात नाही.”
“ माझ्या अंदाजापेक्षा सिया माथूर च्या दारात अँम्ब्युलन्स फार लवकर आली.म्हणजे तू पोलिसांना कळवणे, पोलिसांनी स्वतः यायच्या आधी अँम्ब्युलन्स पाठवणे यात जेवढा काळ जायला हवा होता त्याहून निम्या वेळेत ती आली. मला तेव्हाच संशय आला,मी तसं तुझ्या सर्वेश नावाच्या माणसाला बोलून दाखवलं होतं. ”  पाणिनी  म्हणाला.
“ हो.मला म्हणाला तो तसं.तुझ्या बोलण्यावर तो जसजसा विचार करायला लागला तसं ते त्याला पटायला लागलं.मग मला त्याने फोन करून आपल्याला काय वाटतंय ते सांगितलं. मी लगेचच जवळच्या सगळ्या हॉस्पिटल ला फोन करून नव्याने दाखल झालेल्या पेशंट ची माहिती घेतली पण त्यात आपल्याला हवी ती अँम्ब्युलन्स आणि हवी ती पेशंट कुठेच आली नसल्याचं आढळलं.”
“ कनक, आत्ताशी अर्धा तासच झालाय, अजूनही तिला कुठेतरी हॉस्पिटल....”
“ नाही. वेळ गेली ती.” ठाम पणाने कनक म्हणाला.  “ अशा पेशंट ला शक्यतो जवळच्याच हॉस्पिटल मधे नेलं जातं. फक्त पोट रिकामं करून विष बाहेर काढणे एवढंच करायचं आहे तिथे गेल्यावर.ती काही फार सिरीयस नव्हती जेणे करून थोडया लांबच्या मोठया हॉस्पिटलात तिला न्यावे लागेल आणि त्यात वेळ लागेल.”-कनक
“ मी सांगतो तुला आता काय करायचं ते. मला एक संशय आहे आणि त्याला पुष्टी देणाऱ्या घटना बरोब्बर घडल्या आहेत. आता माझ्या समोर एक चित्र स्पष्ट झालाय कनक.”
“ काय आहे ते चित्र?”—कनक ओजस
“ आपल्याला जी मुलगी हवी आहे ती हीच आहे कशावरून?”  पाणिनी ने विचारलं.
“ म्हणजे सिया माथूर? का? इथे राहणाऱ्या मुलीचं नाव ही तेच आहे. फोटो वरून माझ्या माणसाने तिला ओळखलंय. ”
“ फोटोवरून ओळखण्यात चूक होवू शकते.”  पाणिनी  म्हणाला.
“ त्या माणसाने अतिशय काळजी पूर्वक ओळख पटवल्ये ”
“ कशावरून? ”  पाणिनी ने विचारलं.
“ अरे ! कशावरून म्हणजे? ती मरुशिका क्लब-व्हिला मधे कामाला आहे.तिचं नाव, वर्णन, जुळतंय.तू स्वतः तिला बघितलंयस. भेटलायस तुला दाखवलेल्या फोटोतलीच ती होती ना? ” कनक
“ मी प्रत्यक्ष सिया माथूर ला पाहिलंच नाही. मी क्लब मधे तिला ओळखलं ते तू दिलेल्या फोटो वरून.मला वाटतंय की दोन सिया माथूर असाव्यात.कदाचित सख्ख्या बहिणी, हुबेहूब दिसणाऱ्या. ”
“ किंवा जुळ्या.” कनक म्हणाला.
“ कनक, तुझा माणूस तिच्या अपार्टमेंट मधे पाठव.मला त्याने तिचे घरात पसरलेले हाताचे ठसे घ्यायला हवे आहे.ते कपाटावर, आरशावर,...”  पाणिनी  म्हणाला.
“ आता हे ठसे कुठे मिळतील हे तू कशाला सांगायला हवंस पाणिनी? आम्ही या धंद्यात  बरेच वर्षं आहोत. मला प्रश्न आहे की तिच्या घरात कसं शिरायचं?”
“ तू मास्टर की हा शब्द ऐकलं नाहीस कधी, कनक?”  पाणिनी ने विचारलं.
“ मी बेकायदा घुसखोरी, घरफोडी, अटक ,कोठडी, हे पण शब्द ऐकलेत.”  कनक म्हणाला.
“ मला वाटत , तरीही ही संधी सोडू नये.”
“ मला नाही वाटत तसं. माझं लायसेन्स जप्त होईल त्यामुळे.” कनक म्हणाला.
“ एवढा भित्रट आणि जुनाट होऊ नकोस कनक. अगदी असंच मला तिच्या विलासपूर च्या घरी करून हवंय.तिथले ठसे मिळाले की तुझ्या माणसाला लगेच ते इथे आणायला सांग.आपण ते जुळतात का तपासून बघू ”  पाणिनी  म्हणाला.
“ तसलं करता येण्याची शक्यता नाही.”—कनक
“ म्हणायचंय काय तुला?”  पाणिनी ने विचारलं.
“ त्यासाठी स्त्री गुप्त हेराची आवश्यकता आहे.आणि मला ती व्यवस्था नाही करता येणार.”
“ का? स्त्री कशाला पाहिजे?”
“ पुरुष हेर पाठवला तर पटकन दिसून येऊ शकतो. बाई असेल तर कोणाचं फारसं लक्ष जात नाही.म्हणजे ती आपण नातलग किंवा मैत्रीण असल्याचं भासवू शकते.”—कनक
“ मग शोध ना योग्य अशी बाई.”
“अत्ता तरी  नाहीये माझ्याकडे अशी चांगली हेर, म्हणजे हे काम करू शकेल अशी.”
“ अरे पण आपण त्या घरातून काही चोरी मारी करत नाही फक्त ठसे घेणार आहोत.”  पाणिनी  म्हणाला.
“ नाही नाही. नकोच तो धोका.तुझ्या अंदाजावर असं आत घुसणं जोखमीचं आहे.”
“ समज खरोखर दोन सिया माथूर अस्तित्वात असल्या तर?”  पाणिनी ने विचारलं.
कनक जरा विचारात पडला.
“ अर्थात मी क्लब मधली तथा कथित सिया माथूर पाहिलेलीच नाही.माझ्या माणसाकडे तिचा फोटो होता.त्याने तिला तिथे बघितलं आणि फोटो वरून ओळखलं, खात्री करायला म्हणून तिच्या नावाची चौकशी केली तेव्हा तिचं आडनाव माथूर आहे अशी माहिती मिळाली त्याला.त्याने मला  तसं  की आपल्याला हवी ती मुलगी इथे क्लबात आहे.मी तुला तसं कळवलं ”—कनक
“ आणि मी तुझ्या हेराने दिलेल्या भरोशावर तिथे गेलो.कदाचित मला भेटलेली मुलगी माथूर आडनावाचीच पण जुळी बहीण असू शकते. म्हणजे आपल्याला हवी असलेली सिया सोडून दुसरीच ! हे बघ मी आता माझ्या अशिलाला भेटून येतोय. ”  पाणिनी  म्हणाला.
“ मी काय करू? ”—कनक
“ तुझी माणसं कामाला लाव.मला कामोद ची माहिती हव्ये.अगदी इत्यंभूत. तुझी माणसं त्याच्या भोवताली सतत पेरून ठेव. क्षणभरासाठी सुध्दा त्याला दृष्टीआड न करता.”  पाणिनी  म्हणाला.
“ ठीक आहे.” कनक ओजस म्हणाला.
“ कनक, लक्षात घे आपण एकूण दोन मुलींचा माग गमावलाय. त्या दोन पैकी एक आपल्या खटल्याच्या कामात सहकार्य करणारी होती.”  पाणिनी ने विचारलं.
“ तू असं गृहित धरतोयस की त्या क्लबात माथूर आडनावाच्या दोन मुली बार बाला किंवा मरुशिका च्या भाषेत मॅनेजर म्हणून नोकरीला होत्या. किंवा आहेत.” कनक म्हणाला.
“ बरोबर.मिष्टी नाव घेणारी एक आणि सिया नावाची एक. या पैकी सिया ही माझ्या लायब्ररीत बसली होती, तिला कोर्टात बोलावलं जाण्याची वाट बघत.सकृत दर्शनी ती सहकार्य करणारी वाटत होती म्हणजे ती अशी न सांगता निघून जाईल असे वाटलं नव्हतं.मिष्टी म्हणवणारी मुलगी सो-सो होती. तिचा अंदाजच येत नव्हता.एक गूढ व्यक्ती.अचानक तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या काय आणि लगेचच आलेल्या  अॅम्ब्यूलन्स मधून ती गेली काय ! कुठे नेलं असेल तिला अॅम्ब्यूलन्स ने? ”  पाणिनी ने विचारलं.
“ जिथे तिला झोपेच्या गोळ्या चा अंमल उतरवणारी ट्रिटमेंट मिळेल तिथे.” कनक म्हणाला.
“ किंवा जिथे अशी ट्रिटमेंट मिळू शकणार नाही अशा जागी.”  पाणिनी  म्हणाला.
“ अरे! नेमकं काय सुचवायचं आहे तुला? तसे असेल तर तो खून ठरेल ना.” –कनक ओजस.
“ ठरेल खून पण तो सिध्द करू शकलो तरच.”   पाणिनी  म्हणाला.
“ तू अशिलालाकडे निघाला आहेस? ” –कनक
“ मी  आरोपी इनामदार ला भेटणार आहे. त्यांची पुतणी इथे माझ्या ऑफिस ला आली तर तिला थांबायला सांग. मी तासाभरात परत येतोच आहे. सौम्या ला मी ऑफिस ची सगळी काम मार्गी लावायला सांगतोय. ज्या पद्धतीने घटना घडत आहेत ते मला आवडलेलं नाही.तू मरुशिका आणि कामोद कुमठेकर दोघांची पार्श्वभूमी शोधून काढ. अगदी अद्यावत.मी निघालोय. ”  पाणिनी  म्हणाला.
निघता निघता पुन्हा पाणिनी थांबला. “ कनक, मी म्हणतो तसं मरुशिका खरोखरच त्या वेळी कामोद बरोबर गाडीत नसेल तर जिची पर्स पळवली गेली, ती बाई असणार गाडीत.”  पाणिनी  म्हणाला.
कनक ओजस ने मान डोलावली.
“ तर मग ओजस साहेब, कामाला लागा. ती पर्स पुरावा म्हणून कोर्टात आणली गेली आहे. आज शनिवार आहे, कोर्टातल्या क्लार्क ची ओळख काढून त्या पर्स वर उत्पादकाचे नाव, किंवा तत्सम काही माहिती मिळते का बघ.अशा उत्पादकांच्या पर्स कोणते दुकानदार विकतात .....”
“ हे म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखं आहे. हजारो पर्सेस, शेकडो दुकानातून विकल्या गेल्या असतील.” –कनक
“ पर्स नजरे खालून घाले पर्यंत  गंजीत पडलेली सुई आहे की मोठा गज आहे काय कळणार तुला?”  पाणिनी ने विचारलं.
( प्रकरण १३ समाप्त)