Get it on Google Play
Download on the App Store

होल्ड अप प्रकरण 21


 

प्रकरण २१
 
“ मी जसा विचार करतोय तसं मला जाणवतंय की माझी चूक झाली सांगताना.मी तिला सिगारेट ऑफर केलीच नाही. आधीच्या संध्याकाळी हा प्रसंग घडला होता, त्यावेळी मी तिला सिगारेट देऊ केली होती.त्याही वेळी तिने  माझा ब्रँड नाकारला होता. ती नेहेमी तिचा स्वतःचा ब्रँडच पिते. ”
“ पण तुम्ही तिला सिगारेट ऑफर केल्यावर दरवेळी तिची सिगारेट तुमच्याच लायटर ने पेटवता?”  पाणिनी ने विचारलं.
“ नाही.तिच्या सिगारेट केस ला लायटर जोडलेला आहे.त्यामुळे ती त्यानेच पेटवते.”
“ तू ती केस बघितली आहेस की कोणाकडून ऐकलं आहेस फक्त?”
“ बघितली आहे अनेकदा. त्या संध्याकाळी पण आणि या पूर्वी ही अनेकदा. पण तेव्हा मला ही कल्पना नव्हती की मी किती वेळा बघितली ती केस या बद्दल मला साक्ष दयावी लागेल म्हणून.” कामोद  खवचट पणे म्हणाला पाणिनी ने त्याच्या शेऱ्याकडे लक्ष न देता पुढचा प्रश्न विचारला, “ तू या पूर्वी सांगितलं आहेस की आरोपीच्या चेहेऱ्याचा अगदी बारिक सारिक तपशील तुला लक्षात आहे म्हणून.”
“नक्कीच. मी त्याच्या चेहेऱ्याकडे नीट बघत होतो सतत. ” कामोद म्हणाला.
“किती वेळ? ”  पाणिनी ने विचारलं.
“ दरोडा चालू असतांना पूर्ण वेळ.”
“ जो खूपच घाई घाईत पार पडला असं तू म्हणालास? ”  पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ किती वेळ चाललं हे नाटकं?”
“ पाच ते दहा सेकंदापेक्षा जास्त नाही? ”  पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ आणि ती पूर्ण  दहा सेकंद तू त्याचा तोंडाकडे बघत होतास?”  पाणिनी ने विचारलं.
“ अर्थात. म्हणूनच मिस्टर पटवर्धन, माझ्या हातून लायटर पडणे, त्यामुळे सीट कव्हर ला भोक पडणे या गोष्टीकडे माझं लक्ष नाही गेलं.” कामोद म्हणाला.
“ आरोपीने तुझ्या कोटाच्या खिशात हात घालून तुझं पाकीट खेचलं ? ”
“ हो.”
“ आणि ते त्याने त्याच्या खिशात टाकलं?”
“ हो.”
“ त्या नंतर त्याने तुझ्या टाय ची हिऱ्याची पिन खेचून काढली?”
“ हो.”
“ त्या नंतर तुझ्या पलीकडे बसलेल्या तुझ्या साथीदाराची पर्स त्याने घेतली?”
“ हो. मरुशिका ची पर्स.” कामोद म्हणाला.
“ तू तुझं पाकीट कोटाच्या आतल्या डाव्या खिशात ठेवलं होतंस? ”
“ हो.”
“ कोट उघडा का ठेवायची सवय आहे तुला?”  पाणिनी ने विचारलं.
“ कोणी सांगितलं हे तुम्हाला? मी नेहेमीच बटणे लावतो.” कामोद म्हणाला.
“ तर मग तुझं पाकीट काढण्यासाठी त्याला कोटाच्या गळया जवळच्या ठिकाणी हात घालून पाकीट काढावे लागले असेल ना?”
“ हो.”
“ मग तसं करताना त्याच्या डोक्याचा वरचा भाग तुझ्या जबड्याजवळ यायला पाहिजे होता.”
“ बरोबर तसाच आला होता.”
“ आरोपी ने बंदूक कोणत्या हातात धरली होती?”
“ उजव्या.”
“ म्हणजे त्याने तुझ्या डोक्याला उजव्या कानशिलावर बंदूक लावली?”
“ बरोबर.”
“ आणि त्याच वेळी डाव्या हाताने कोटात हात घालून डाव्या बाजूच्या आतल्या खिशात हात घातला, पाकीट घेण्यासाठी?”
“ हो.”
“ डावा हात कोटाच्या वरच्या बाजूने आत घालताना त्याने तुझ्या माने च्या मागून हात घातला ? आणि तो तुझ्या कोटाच्या डाव्या खिशा पर्यंत पोचला अशी समजूत करून द्यायची आहे का तुला.. ?”  पाणिनी ने विचारलं.
“ नाही, ... मला विचार करू दे......” कामोद म्हणाला.
पाणिनी हसला.
“ नाही ... नाही... माने मागून नाही पुढूनच हात आत घातला.” कामोद म्हणाला.
“ तसं असेल मिस्टर कामोद, तर पुढून हात घालण्यासाठी त्याला त्याच्या डाव्या हाताच्या दंडाने तुझा चेहेरा मागे दाबावा लागला असेल.आणि तुमच्या कपाळ आणि डोळ्या वर त्याचा दंड आला असणार.”
कामोद काही बोलला नाही.
“ हवं तर आपण इथे प्रात्यक्षिक करून दाखवू कोर्टाला.”  पाणिनी म्हणाला.
“ नाही, नाही, गरज नाही. तुम्ही म्हणता तसचं झालं असणार.” पटकन कामोद म्हणाला.
“ आणि त्याने तुमच्या पाकिटाला नेमका कधी हात घातला?”  पाणिनी ने विचारलं.
“ त्याने दार उघडलं गाडीचं, त्याच क्षणी.”—कामोद
“ हात वर करा असं म्हणण्यापूर्वी?”
“ ते म्हणत असतानाच.”—कामोद.
“ त्याने हात वर करायची आज्ञा दिल्यावर लगेचच तू हात वर केलेस? ” पाणिनी ने विचारलं.
“ लगेच.”
“ आणि त्याने  त्याच वेळी जेव्हा कोटाच्या गळ्याच्या बाजूने डावा हात आत घातला तेव्हा तुझं डोकं आपोआपच मागे रेटलं गेलं असेल आणि त्याचा दंड तुझ्या डोळ्यावर आल्यामुळे तुला त्याचा चेहेरा त्या काही क्षणा पुरता म्हणजे कोटाच्या आतल्या खिशातून पाकीट काढे पर्यंत तरी दिसला नसेल.”  पाणिनी म्हणाला.
“ तसं नसेल झालं.”—कामोद
“ तसं झालं नसेल तर तीन शक्यता आहेत. एक म्हणजे तुझी गाडी लेफ्ट हँड ड्राईव्ह असावी त्यामुळे आरोपीने उजव्या हातात बंदूक घेऊन तुमच्या उजव्या कानशिलावर टेकवून डाव्या हाताने कोटाच्या गळया जवळून डावा हात आत घालून पाकीट बाहेर काढलं असलं पाहिजे  किंवा दुसरे म्हणजे  तुमची गाडी राईट हँड ड्राईव्ह असेल तर आरोपी डावखोरा असला पाहिजे , म्हणजे त्याने डाव्या हातात बंदूक धरली असली पाहिजे आणि उजवा हात कोटाच्या गळया जवळून आत घातला असला पाहिजे आणि तिसरी शक्यता की तुम्ही ड्रायव्हिंग व्हील वर नसून तुमची सहाय्यक स्त्री ड्रायव्हिंग व्हील वर बसलेली असली पाहिजे. या तीन शक्यता असतील तरच आरोपीच्या हाताचा अडथळा तुमच्या डोळ्यावर न येता तुम्ही त्याचा चेहेरा पाहू शकत होतात. बरोबर आहे की नाही ? ”  पाणिनी ने विचारलं.
साक्षीदार चांगलाच पेचात पडला.
“ गाडी मीच चालवत होतो आणि गाडी राईट हँड ड्राईव्ह आहे.” – कामोद हताश होवून म्हणाला.
“ आणि आरोपी सुध्दा राईट हँडेड आहे. म्हणजे डावखोरा नाही.”  पाणिनी म्हणाला.  “आणि हे मी व्यावहारिक दृष्टीने अत्ता इथेच आणि शास्त्रीय दृष्टीने त्यांची तपासणी करवून घेऊन सिध्द करू शकतो. ” पाणिनी ने आरुष काणेकर ला आव्हान देत म्हंटलं.
न्यायाधिशांच्या चेहेऱ्यावर स्मित उमटलं. त्यांनी पाणिनी चा मुद्दा लिहून घेतला.
“ हीच गोष्ट तुझ्या टाय पिन बाबत आणि शेजारी बसलेल्या तुझ्या स्त्री साथीदाराच्या पर्स बाबत.”  पाणिनी म्हणाला.  “ म्हणजे उजव्या हाताने तुझ्या उजव्या कानशिलावर बंदूक टेकवलेली असतांना डाव्या हाताने तुझी टाय पिन खेचताना, आणि शेजारणी ची पर्स ओढताना आरोपीचे खांदे आणि दंड तुझ्या डोळ्यासमोर आल्या शिवाय त्याला हे करणे शक्य नाही.आता आपण या सर्वाला लागलेला वेळ बघू. या तिन्ही वस्तू घेतला कमित कमी किती वेळ प्रत्येक हालचालीला लागला असेल आणि जास्तीत जास्त किती लागला असेल?”
“ पाकीट काढायला चार ते पाच सेकंद असतील.” –कामोद.
“ आणि टाय पिन आणि पर्स साठी ?”  पाणिनी ने विचारलं.
“ प्रत्येकी तीन ते चार सेकंद.”
“ त्यानंतर आरोपीने त्या वस्तू  ताब्यात घेऊन गाडीचे दार लावलं?, आणि त्या वेळी त्याच्या हातात बंदूक होती? ”  पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ किती वेळ लागला असेल दार लावायला?”  पाणिनी ने विचारलं.
“ एक किंवा दोन सेकंद.”
“ म्हणजे जास्तीत जास्त दहा ते बारा सेकंदात हे नाट्य घडलं आणि त्या पूर्ण वेळेत तू आरोपी कडे बघत होतास असं तुझं म्हणणं आहे पण अत्ताच आपण बघितलं त्यानुसार पहिल्या तिन्ही वस्तू उचलताना तुला आरोपीचा चेहेरा दिसणे शक्य नव्हतं, त्या आधी सुध्दा म्हणजे  दरोडा प्रक्रीया सुरु होण्याचे वेळी आरोपीने दार उघडताना तुला हात वर करा अशी आज्ञा दिली त्यावेळी सुध्दा तू त्याला बघत नव्हतास कारण तुझं लक्ष तेव्हा सिग्नल कडे होतं असं तूच साक्षीत सांगितलं आहेस. म्हणजे दरोडा संपल्यावर आरोपी दार बंद करताना तुला सेकंदभर दिसला असेल तो सुध्दा समोरून नाही तर बाजूने. ”  पाणिनी म्हणाला.
“ मला नाही वाटत तसं.” –कामोद
“ ठीक आहे आपण मगाचची प्रश्नोत्तरे क्लार्क ला वाचायला लावू पुन्हा. तू प्रत्येक सेकंदाचा हिशोब आठवून बघ.”
साक्षीदार वैतागला.
“ मिस्टर पटवर्धन हे सर्व इतकं झटपट घडलं की मला तुम्ही म्हणता तसं नेमके पणाने सेकंदाचा हिशोब देता नाही येणार.” –कामोद.
“ तेच म्हणायचंय मला.”  पाणिनी म्हणाला.  “ दरोडा एवढा झटपट घडला की तुझ्या समोर आरोपीचा चेहेरा फार कमी वेळ आला पण पोलिसांशी बोलून आणि आरोपीचा फोटो बघून बघून तू तुझ्या मनाची समजूत करून घेतली आहेस की तुमच्यावर दरोडा घालणारा माणूस म्हणजे आरोपी आहे.”
“ तसं नाहीये, मी बरोब्बर ओळखलंय त्याला.” –कामोद
“ बरं तर मग, आपण पुन्हा गुन्हा घडला रात्री कडे वळू.”  पाणिनी म्हणाला.
“ ठीक आहे.”
“ तुम्ही हातात लायटर धरून त्याला सिगारेट चे टोक लावलं, आणि त्याच वेळी तुमचं लक्ष सिग्नल च्या दिव्याकडे ही होतं?”  पाणिनी ने विचारलं.
“ हो , जरासे तसचं.”
“तुमची नजर पेटलेल्या लायटर कडे होती की सिग्नल च्या लाल दिव्याकडे?”  पाणिनी ने विचारलं.
“ खास करून सिग्नल च्या लाल दिव्याकडे.”
“ तो लाल दिवा खूप प्रखर आहे ना? आणि त्या सिग्नल च्या अगदी जवळ नियॉन ची प्रखर अशी जाहिरात आहे ना?”  पाणिनी ने विचारलं.
“ बरोबर आहे.”—कामोद
“ त्यामुळे तुमच्या डोळ्यांना प्रखर दिव्याची सवय झाली होती.बरोबर का?”
“ आणि तुझी गाडी जिथे सिग्नल ला उभी होती तिथे तुलनेने अंधार होता?”
“ हो.”
“ आणि या प्रखर दिव्याची सवय झालेल्या डोळ्यांनी थोडया अंधारलेल्या जाग्यावर उभा असलेला आरोपी तू जेमतेम एक सेकंदभर पाहिलास?”  पाणिनी ने विचारलं.
“ तुम्हाला तसं वाटतंय तर तसं.”
“ मला किंवा आणखी कोणाला काय वाटतंय टे सांगू नका, तुमच्या पुढे मी नियॉन ची, लाल सिग्नल ची  आणि लायटर ची प्रखर  उजेडाची जी वस्तुस्थिती मांडली आणि त्या तुलनेत गाडी उभी असलेल्या ठिकाणी असलेल्या ठिकाणी जी अंधाराची स्थिती असल्याचं सांगितलं ते बरोबर की चूक होतं ते सांगा आणि तुम्ही आरोपीला एक सेकांदापेक्षा जास्त बघू शकला नाहीत हे खर आहे की नाही सांगा. ”  पाणिनी म्हणाला.
“ हो.”
“ त्या गाडीचा पुढचा भाग पोचा आला होता आणि जाळी उजव्या बाजूने तुटली होती?”  पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ तुम्ही दक्षिणेकडे चालला होता?”
“ हो ”
“ आणि आरोपीच्या गाडीचे तोंड उत्तरेकडे?”
“ बरोबर ”
“ तिथून तुम्हाला ती तुटकी जाळी बरोबर दिसतं होती?”  पाणिनी ने विचारलं.
“ नाही, तिथून नाही, जेव्हा तो गाडीत बसून निघून जात होता, तेव्हा त्याने गाडी भरकन वळवल्यावर मला दिसलं. मी गाडी ओळखायच्या दृष्टीने काही वेगळे वैशिष्ट्य दिसतंय का यावर लक्ष ठेउनच होतो.”—कामोद
“ त्या नंतर ती गाडी  तुम्ही पुन्हा पाहिलीत?”  पाणिनी ने विचारलं.
“ हो.पोलीस चौकीत काल पाहिली.”
“ ओळखलीत ती?”  पाणिनी ने विचारलं.
“ हो सर, तीच गाडी होती ती.”—कामोद
“ पण मग खुनाच्या रात्री पोलिसांना खबर  देताना  त्या तुटलेल्या जाळी बद्दल सांगितलं नाहीत तुम्ही.”
“ त्यावेळी मी मानसिक दृष्टया खूप हादरलो होतो त्यामुळे त्या रात्री मी संगीतलं नाही ते,पण दुसऱ्या दिवशी बोललो त्यांना..” –कामोद
“ दॅटस् ऑल.”  पाणिनी म्हणाला.
“मला एक आणि एकच प्रश्न फेर तपासणीत विचारायचा आहे युअर ऑनर.” सरकारी वकील आरुष काणेकर उठून म्हणाला. न्यायाधीशांनी मान डोलावली.
“ मिस्टर कामोद, पाणिनी पटवर्धन यांनी सेकंदा सेकंदाचा हिशोब तुला विचारून आणि प्रखर दिव्याचा मुद्दा काढून तुझा कितीही गोंधळ करायचा प्रयत्न केला असला तरी  आरोपीला ओळखण्या एवढा वेळ तुम्ही आरोपीला पाहिलं होतं हे तुम्ही ठाम पणाने सांगू शकता ना?” आरुष काणेकर ने विचारलं.
कामोद ने उत्तर द्यायच्या आत पाणिनी उठून उभा राहिला आणि ओरडला, “ ऑब्जेक्शन !  माझी जोरदार हरकत आहे. हा प्रश्न सूचक आहे. म्हणजे साक्षीदाराने काय उत्तर द्यावे हे त्याला सुचवणारा आहे.”
“ सस्टेंड ” न्या.एरंडे म्हणाले.
आरुष आनंदाने हसला. त्याचं काम झालं होतं. पाणिनी पटवर्धन ची हरकत जरी कोर्टाने मान्य केली असली तरी आरुष काणेकर ना काय उत्तर हवंय ते कामोद ने बरोब्बर ओळखलं आणि तो म्हणाला, “ दरोडा टाकणारा माणूस म्हणजे आरोपी इनामदार हाच  होता.”
“ पटवर्धन तुम्हाला काही विचारायचं आहे अजून?” – एरंडे.
“ काही नाही युअर ऑनर.”  पाणिनी म्हणाला.  “  मला जे सिध्द करायचं होतं ते सिध्द झालंय. फेर तपासणीत पुन्हा साक्षीदाराला प्रश्न विचारून आपल्याला हवंय ते काढून घेण्याचा प्रकार म्हणजे नापास झालेल्या मुलाला सोपा प्रश्न विचारून पुन्हा पास करण्याचा केविलवाणा प्रयत्न मिस्टर काणेकरांनी केलाय.”
 
(प्रकरण २१ समाप्त.)