**प्रस्तावना 7
या प्रश्नांची उत्तरे लब्धप्रतिष्ठित टीकाकारांनी अवश्य द्यावीत. ‘मिरविसि सुज्ञत्व वृथा अन्याला स्वकृत ताप लावूनि,’ हे आर्यार्ध मोरोपंताने जणू काय ह्या लब्धप्रतिष्ठित लोकांना उद्देशूनच लिहिले असावे! यांनी आणि यांच्या पूर्वजांनी जी पापे केली, त्यांचे सर्व खापर बुद्धावर फोडून हे खुशाल सोवळेपणाचा शहाणपणा मिरवीत फिरत आहेत!
(३) बुद्धाच्या संबोधिज्ञानानंतर त्याच्या चरित्राचा कालक्रमपूर्वक आराखडा का देण्यात आला नाही?
उत्तर- सध्या उपलब्ध असलेल्या प्राचीन वाङ्मयाच्या आधारे तसा आराखडा तयार करता येणे शक्य नाही. बुद्धाचे उपदेश कालक्रमपूर्वक दिलेले नाहीत. इतकेच नव्हे, तर जे उपदेश आहेत, त्यांत पुष्कळच भर पडलेली आहे. त्यातून सत्य शोधून काढणे बरेच अवघड जाते. तो प्रयत्न मी या ग्रंथात केलाच आहे. पण कालक्रमानुसार बुद्धचरित्राचा आराखडा तयार करणे शक्य झाले नाही.
(४) ‘वैदिक संस्कृति’ आर्याचे भरतखंडात आगमन झाल्यानंतर उपस्थित झाली; त्यापूर्वी ‘दासांची’ म्हणजे ब्राह्मणांची संस्कृति होती याला आधार कोणते?
उत्तर- याचा विचार मी ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात केला आहे. तो ग्रंथ या पुस्तकाबरोबर वाचल्यास पुष्कळ गोष्टींचा नीट खुलासा होईल. माझे म्हणणे सर्व लोकांनी स्वीकारावे असा मुळीच आग्रह नाही. ते विचारणीय वाटल्यामुळे वाचकांसमोर मांडले आहे. ह्या दासांच्या आणि आर्यांच्या संस्कृतीचा बुद्धाच्या चरित्राशी फार थोडा संबंध येतो. त्या दोन्ही संस्कृतींच्या संघर्षाने उत्पन्न झालेली वैदिक संस्कृति बुद्धाच्या वेळी प्रतिष्ठित होऊन बसली होती, एवढे दाखविण्यासाठी पहिले प्रकरण या ग्रंथात घातले आहे.
(५) उपनिषदे व गीता बुद्धानंतर रचली गेली याला आधार कोणते?
उत्तर- याची देखील सविस्तर चर्चा ‘हिंदी संस्कृत आणि अहिंसा’ या ग्रंथात येऊन गेली आहे,* म्हणून त्या विषयाची पुनरुक्ति या पुस्तकात केली नाही. उपनिषदेच काय, तर आरण्यके देखील बुद्धानंतर लिहिली गेली हे मी सबळ पुराव्यानिश दाखवून दिले आहे. शतपथ ब्राह्मणात आणि बृहदारण्यक उपनिषदात जी वंशावलि दिली आहे, तिच्यावरून बुद्धानंतर ३५ पिढय़ांपर्यंत त्यांची परंपरा चालू होती, असे दिसते. हेमचंद्र रायचौधरी दर पिढीला तीस वर्षाचा काळ देतात. पण कमीत कमी पंचवीस वर्षाचा काळ दिला तरी बुद्धानंतर ८७५ वर्षापर्यंत ही परंपरा चालली होती, असे म्हणावे लागते. म्हणजे समुद्रगुप्ताच्या काळापर्यंत ही परंपरा चालू होती; आणि तेव्हा ब्राह्मण आणि उपनिषदे स्थिर झाली. त्यापूर्वी त्यांत यथायोग्य ठिकाणी फेरफार झाले नसतील, असे नाही. पालि वाङ्मयाचा देखील असाच प्रकार झाला आहे. बुद्धघोषापूर्वी सरासरी दोनशे वर्षे पालि वाङ्मय स्थिर झाले; आणि बुद्धघोषाने अट्ठकथा (टीका) लिहिल्यावर त्याच्यावर शेवटचा शिक्का बसला. उपनिषदांची टीका तर शंकराचार्यानी नवव्या शतकात लिहिली. त्याच्यापूर्वी गौडपादाच्या माण्डूक्यकारिका लिहिल्या गेल्या. त्यात तर जिकडे तिकडे बुद्धाची स्तुति आहे. फार कशाला, अकबराच्या कारकीर्दीत लिहिलेल्या अल्लोपनिषदाचा देखील उपनिषदांत समावेश करण्यात आला आहे!
उपनिषदांनी आत्मवाद व तपश्चर्या श्रमणसंप्रदायाकडून घेतली यात शंका बाळगण्याचे कारण नाही. का की, ह्या दोन गोष्टींचा यज्ञयागाच्या संस्कृतीशी काहीएक संबंध नाही. आजकाल जसे आर्य आणि ब्राह्मण समाज बायबलाचा एकेश्वरी वाद वेदांवर किंवा उपनिषदादिक ग्रंथांवर लादू पाहतात, तशाच रीतीने आत्मवाद आणि तपश्चर्या वेदांवर लादण्याचा उपनिषदांचा प्रयत्न दिसतो. मात्र त्यांनी श्रमणांची अहिंसा स्वीकारली नाही. तेवढय़ाने ते वैदिक राहिले. असे असता कर्मठ मीमांसक आजला देखील उपनिषदांना वैदिक म्हणण्यास तयार नाहीत!
ज्यांना पालि वाङ्मय किंवा त्याची इंग्रजी भाषान्तरे वाचणे शक्य असेल, त्यांना बौद्धकालीन इतिहाससंशोधनाच्या कामी या पुस्तकाचा उपयोग होईल, अशी मी आशा बाळगतो. पण ज्यांना तशी सवड नसेल, त्यांनी निदान खाली दिलेली पाच पुस्तके अवश्य वाचावी.
१. बुद्ध, धर्म आणि संघ. २. बुद्धलीलासारसंग्रह ३. बौद्धसंघाचा परिचय. ४. समाधिमार्ग. ५. हिंदी संस्कृति आणि अहिंसा.
हे पुस्तक लोकप्रियता संपादण्यासाठी लिहिले नाही; केवळ सत्यान्वेषणबुद्धीने लिहिले आहे. ते लोकादराला कितपत पात्र होईल याची शंका आहे. असे असता सुविचार प्रकाशन मंडळाच्या संचालकांनी या पुस्तकाला आपल्या ग्रंथमालेत स्थान दिले, याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. निर्विकार मनाने प्राचीन इतिहासाचा विचार करणारे पुष्कळ महाराष्ट्रीय वाचक आहेत आणि ते ह्या ग्रंथाला आश्रय देऊन सुविचार प्रकाशन मंडळाचा प्रयत्न सफल करतील असा मला भरवसा वाटतो.
प्रा. श्रीनिवास नारायण बनहट्टी यांनी प्रुफे वाचण्याच्या कामी मदत केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
धर्मानन्द कोसंबी