श्रीदत्तात्रेयजन्म - अभंग ३४१०
३४१०.
ऎका दत्तात्रेय आख्यान । पार्वतीस सांगे त्रिलोचन । सकळ पतिव्रतांमाजीं पूर्ण । अनसुया जाण पवित्रता ॥१॥
ऎकोनी शिवाची वाणी । गदगदां हासे भवानी । आम्हां तिघींवरती त्रिभुवनीं । श्रेष्ठ कोणी असेना ॥२॥
गर्व देखोनी पार्वतीचा । बोले त्रिलोचन तेव्हां वाचा । नारद सांगेल महिमा तिचा । तेव्हां तुज कळेल ॥३॥
ऎकोनि पार्वती मनांत । नारदाची मार्गप्रतीक्षा करीत । तंव तो मुनी अकस्मात । पावला तेथें ते क्षणीं ॥४॥
देखोनियां नारदमुनी । षोडशोपचारें पूजी भवानी । आम्हां तिघींवरती त्रिभुवनीं । आणीक कोणी असेना ॥५॥
ऎकोनी हांसला नारदमुनी । ऎकें पार्वती चित्त देउनी । अनसूया अत्रिपत्नी । तुम्हां तिघींहुनी पतित्रता ॥६॥
तुम्हां तिघींचे पुतळे करुनी । बांधिले असे वामचरणीं । असंख्य सामर्थ्य त्रिभुवनीं । समतुल्य कोणी असेना ॥७॥
तों पार्वती झाली चिंताग्रस्त । नारदातें उपाय पुसत । तो म्हणे प्रार्था विश्वनाथ । तो तेथवरी जाईल ॥८॥
नग्न होऊनि घालीं भिक्षा भोजन । तेणें होईल तिचें छळण । ब्रिदें तुमचे देईल सोडून । मग गर्व सहजचि गळेल ॥९॥
पार्वतीसी ऎसें सागोनी । स्वयें वैकुंठासी येत तत्क्षणीं । देखोनी लक्ष्मी संतुष्ट मनीं । मग पूजी आदरें तयातें ॥१०॥
कर जोडूनि करी विनंती । काहीं नवल सांगा स्थिती । मागें झाली जे रीती । वदला प्रति विनोदें ॥११॥
म्हणे धन्य अनसूया पतिव्रता । तुम्हां तिघींहूनि समर्था । तुमचे पुतळे तत्वतां । तिनें तोडरीं बांधिले ॥१२॥
ऎकोनी तटस्थ झाली रमा । आतां काय करुं पुरुषोत्तमा । मजहुनी वाढ ऎसी सीमा । ते कैसेनी निरसेल ॥१३॥
नारद म्हणे उपाय एक । तेथें पाठवा वैकुंठनायक । नग्न भोजन मागावें देख । तेणें ते छळेल ॥१४॥
सांगोनी ऎसा वृत्तान्त । सत्यलोकासी गेला ब्रम्हसुत । सावित्री पुसे त्वरित । काहीं अपूर्व वर्तलें ॥१५॥
मग तो म्हणे सावित्रीसी । अनसूया ऎशी गुणराशी । सामर्थ्य अधिक तियेपाशीं । पदा तिघींसी बांधिलें ॥१६॥
सावित्री म्हणे नारदाप्रत । कैसा उपाय करावा तीतें । जेणें भंगेल गर्वातें । शरण आम्हांतें येईल ॥१७॥
पाहतां आम्हांपासूनि उत्पत्ती । एवढी काय तिची स्थिती । टिटवी काय समुद्राप्रती । शोखूं शके ॥१८॥
आम्हांहुनि काय वाड । ऎसें पीडिलें महागूढ । आतां उपाय सांगा दृढ । जेणें गर्व भंगेल तिचा ॥१९॥
मग ती म्हणे नारदासी । काय उपाय करावा तिशीं । तंव तो म्हणे सावित्रीशीं । ऎक तुजसी सांगेन ॥२०॥
प्रार्थूनियां चतुरानना । पाठवावें अत्रिभुवना । जाये तूं आतां याच क्षणां । अवश्य वचन बोलवी ॥२१॥
म्हणावे हे नग्न भोजन । तेणें होईल तिचें छळण । मग यावें सत्व घेऊन । ब्रीद जाण तुटेल ॥२२॥
ऎसा नारद सांगून गेला । मग तिघी प्रार्थिती तिघांला । श्रुत करोनि नारद गेला । म्हणवूनि विनविती ॥२३॥
ऎकुनी ऎसें वचनीं । तिघे निघाले तत्क्षणीं । स्त्रियांची करुणा देखुनी मनीं । कृपा आली तयांसी ॥२४॥
मग पवनवेगें ते अवसरीं । तिघे प्रवेशले आश्रमाभीतरीं । वाहनें ठेवूनियां दुरी । माध्यन्हकाळीं पैं आले ॥२५॥
तंव ते म्हणती तिघेजण । आम्हांस घेणें अनसूयादर्शन । ऋषीनें आज्ञा करुन । दाराबाहेर पाठविली ॥२६॥
ते देखोनि अत्रिऋषीनें । तिघांचे केलें सांग पूजने । मग म्हणे येणें काय कारणें । आवश्यक पैं झालें ॥२७॥
तंव दाराबाहेर तिन्ही मूर्ति । ब्रम्हा शिव कमळापती । नमस्कारु झालिया पुसती । काय आज्ञा ते सांगिजे ॥२८॥
ते म्हणे अनसूयेसी । तूं पतिव्रतेमाजीं श्रेष्ठ म्हणविसी । तरी मागतों तें देई आम्हांसी । म्हणोनि भाकेसी गोंविलें ॥२९॥
मग म्हणती तयाप्रयी । तुमचें देणें त्रिजगतीं । आणि तुम्ही मागतां मजप्रती । इच्छा जैशी मागिजे ॥३०॥
देव म्हणती होऊनि नग्न । आम्हांसी घालावें भोजन । अनसूया अवश्य म्हणे । मग काय करिती जाहली ॥३१॥
ठेवूनियां तिघांचे मस्तकी कर । तंव ते तिघे झाले कुमर । मग नग्न होऊनि सत्वर । करवी स्तनपान तयांतें ॥३२॥
करुनि तयांची उदरतृप्ती । वसन नेसली शीघ्रगती । मग घालूनि पालखीप्रती । गाती झाली तेधवां ॥३३॥
मग म्हणे चतुरानना । जो जो जो जो रे सगुणा । उत्पन्न करुनि त्रिभुवना । बहु श्रम पावलासी ॥३४॥
याकारणें केलें बाळ । आतां राहिलें कर्तुत्व सकळ । स्तनपान करोनि निर्मळ । सुखें निद्रा करावी ॥३५॥
जो जो जो जो रे लक्ष्मीपती । तुझी तंव अगाध कीर्ति । अवतार धरुनि पंक्ति । दुष्टसंहार पैं केलें ॥३६॥
तैं पावलासी थोर । निद्रा करावी बा सत्वर । म्हणोनि केला कुमर । विश्रांती सुख पावावया ॥३७॥
जो जो जो जो रे बा शंकरा । महादेवा पार्वतीवरा । करोनि दुष्ट संहारा । बहु श्रम पावलासी ॥३८॥
तरी आतां सुखें निद्रा करी । कुमारत्व पावले यापरी । आतां क्लेश नाहीं तरी । पालखींभीतरीं पहुडावें ॥३९॥
आसे आखेद स्तनपान । पालखींत निजवी बाळकें पूर्ण । नित्य गीत गायन । भक्ती ज्ञान वैराग्य ॥४०॥
ऎसें गेले बहुत दिवस । मार्ग नाहीं जावयास । न सुटे बाळपणाचा वेष । सामर्थ्य विशेष अनसूयेचें ॥४१॥
उमा रमा सावित्रीतें । थोर गर्व होतां तिघींतें । तो निरसावयातें । विंदान केलें नारदें ॥४२॥
मागुती सांगे तिघींप्रती । काय निश्चिंत बैसल्याती । बाळकें करुन तिघांप्रती । अनुसया सती खेळवितसे ॥४३॥
नित्य करवी स्तनपान । षण्मासांचें बाळें करुन । पाळण्यामाजीं निजवून । गीत गायन करीतसे ॥४४॥
पाहतां ऋषिपत्नी जाण । परी सामर्थ्य आगळें तुम्हांहुन । तिचें तुळणें न पुरे त्रिभुवन । आतां जाणें शरण तियेशीं ॥४५॥
तंव त्या तिघीजणी बोलती । आम्ही तरी आदिशक्ती । आमुचे सामर्थ्य त्रिजगतीं । प्राणी वर्तती एकसरें ॥४६॥
सुरनर गंधर्व किन्नर । पशुपक्षी अपार । आमुच्या सामर्थ्या थोर । चराचर नादंत ॥४७॥
तरी आमुचे आम्हीच पती । सोडवूं आपुले सामर्थी । अनसूया ते बापुडी किती । काय तिची कीर्ति आपुल्यापुढें ॥४८॥
ऎसें बोलोनी अभिमानी । तिघी निघाल्या ते क्षणीं । लगबग आल्या धांवुनी । अनसूया भुवनीं तत्काळ ॥४९॥
ते देखोनियां ऋषीश्वरें । तिघीं पूजिल्या षोडशोपचारे । काय आज्ञा पुसे त्वरें । ते प्रत्योत्तरें सांगिजे ॥५०॥
त्या तिघीजणी बोलती । पाठवावें अनसूयाप्रती । येरें आज्ञा करुनी शीघ्रगती । स्त्रियांप्रती आणविलें ॥५१॥
तंव ते पातलीसे त्वरें । केला तिघींस नमस्कार । आज्ञा पुसे सत्वर । भाग्य थोर आलेती ॥५२॥
तिघी म्हणती आमुचे पती । आणून देई शीघ्रगती । तंव त्या बाळकांच्या मूर्ती । पुढें क्षितीं ठेविल्या ॥५३॥
तंव ते सारखे बाळ तिन्ही । बोलूं नेणती वचनीं । तिघी चकित झाल्या मनीं । परि कोण्हा न लक्षवेना ॥५४॥
सर्वही सामर्थ्य वेंचलें । अभिमान धैर्य गळालें । मग लोटांगण घातलें । चरण वंदिले सतीचे ॥५५॥
अनसूया थोर तूं पतिव्रता । धन्य धन्य तुझी सामर्थ्यता । आम्हीं लीन जाहलों पहातां । नको निष्ठुरता करुं माये ॥५६॥
जैसे होते आमुचे पती । तैसे करावे पुढती । अगाध धन्य तुझी कीर्ति । पूर्ण सती पतिव्रता ॥५७॥
ऎकोनी सतीत्रयीचें वचन । तिघांचे मस्तकीं स्पर्शे करुन । कृपायुक्त अवलोकून । पूर्वचर्यां ते आणिले ॥५८॥
तिघांचे स्वरुप जैसें होतीं । तैशा केल्या तिन्ही मूर्ती । देव अंतरिक्षीं कवतुक पहाती । वृष्टी करिती पुष्पांची ॥५९॥
दुदंभी वाजविल्या भेरी । आनंद झाला सर्वांतरीं । बोलिले सत्वरीं । अनसूया तूं पतिव्रता ॥६०॥
त्रये देव म्हणती धन्य माते । अगाध सामर्थ्य तुझें सत्य । प्रसन्न झालों मागा वरातें । मनोरथ पूर्ण करुं हो ॥६१॥
मग ते बोले करुणावचन । अपूर्व तुमचें दरुशन । मज न गमे तुम्हांविण । अर्धक्षण जाणिजे ॥६२॥
तरी तिघे रुप असावें । एवढें वरदान मज द्यावें । आणीक न लगे स्वभावें । म्हणोनी भावें प्रार्थितसे ॥६३॥
मग देवत्रयाची मूर्ती । करकमळीं जाली शीघ्रगती । दत्तात्रेय नामें ऎसी ख्याती । तिहीं लोकांप्रती विशेष ॥६४॥
वर देऊनि गेला स्वस्थाना । शक्तीसहित आरुढलें वाहना । सर्व देवसमुदाय जाणा । स्वर्गभुवन पातले ॥६५॥
येरीकडे दत्तात्रेय मूर्ती । बालरुपें अनसूयेप्रती । पुढें व्रतबंध झाले निश्चिती । अभ्यासिल्या सकळ कळा ॥६६॥
एका जनार्दन म्हणे । दत्तात्रेय जन्मकथन । भावें करितां श्रवण । मनोरथ पूर्ण श्रोतियांचें ॥६७॥