रुक्मिणीस्वयंवर हळदुली - अभंग ३४८७
३४८७.
काढिली हळदुली लखलखीत सोज्वळी । जन्म ब्रह्मचळी झालें तिये ॥१॥
अति सूक्ष्म सुरंग शोभिवंत अंग । ज्यासी होय भाग्य त्यासीच लागे ॥२॥
शेष कूर्मासनीं सतशक्तिपासुनी । भूमिका शोधूनि शुध्द केली ॥३॥
तयावरी देख बहुलें सुरेख । देखतांची सुख होय मना ॥४॥
उठिती वधूवरें हळदुली स्वानंदे । लाज मध्यें मध्यें परम प्रीती ॥५॥
नोवरा मेघश्याम बहुलाल पुरुषोत्तम । उटणी या संभ्रम मूळ केलें ॥६॥
कृष्णमेचु अलंकार लेवूनि सनागर । बैसली सुंदर वामभागीं ॥७॥
वराअंगी भली नोवरी बिंबिली । म्हणती प्रकाशली पुरुषोत्तमें ॥८॥
नोवरी शहाणी आपुला निजगुणी । वश्य चक्रपाणी करुनी ठेली ॥९॥
मुळें पाठविल्या आल्या बारा सोळा । करवली वेल्हाळा उन्मनी चाले ॥१०॥
पदोपदीं त्याग करितसे आनेग । वराचें तें अंग टाकूनि आली ॥११॥
आणिक नवजणी आल्या व-हाडिणी । जयाच्या वचनीं वरु वर्ते ॥१२॥
त्या हितगुजाचिया वरा निजाचिया । सदा यशाचिया काय समीप असती ॥१३॥
सकलांमाजीं वृध्द शांति पैं प्रबुध्द । ते म्हणे हा विध ऐसा आहे ॥१४॥
सर्व स्वयंवरा कुरवंडी करा । मग पाय धरा उटणीया ॥१५॥
उजळूनियां वाती अक्षता पैं देती । भीमकीये म्हणती वेगु करी ॥१६॥
तंव भवया देऊनियां गाठीं न पाहे ते दिठी । सखी म्हणे गोठी कळली मज ॥१७॥
तंव शांति म्हणे सरा सांगेन ते करा । कुरवंडी या वरा ऐसी नोहे ॥१८॥
जया दीपमेळी नाहीं धूम काजळी ।तो दीपु उजळी निरंजना ॥१९॥
ऐकोनि ते बोली भीमकी आनंदली । मनीं म्हणे भली साधु होसी ॥२०॥
मनोगत कळे ऐसें संवाद जे मिळे । तें दैव न कळे काय वश्य झाली ॥२१॥
तेज बीज रुप प्रकाश अमुप । चिद्रत्नाचे दीप भीमकी लावी ॥२२॥
ते प्रकाशता प्रभा सूर्या लोपे उभा । कोंदलेसे नभा लखलखीत ॥२३॥
तो पाहतां प्रकाशु अवघा ह्रषीकेशु । तंव तंव उल्हासु भीमकीयेसी ॥२४॥
त्या प्रकाशावेगळी न निवडे ते बाळी । निजभावें वोवाळी प्राणनाथा ॥२५॥
धन्य तुझें दैव सिध्दी गेले भाव । घेऊनियां नांव पाय मागें ॥२६॥
येरी म्हणे पोटीं काय बोलो ओठी । नांवांची हे गोठी नाहीं यासी ॥२७॥
याच्या नामभेदा नेणवेचि वेदां । नेती म्हणोनि सदा परतला तो ॥२८॥
जेथें रुपाचा दुष्काळू नामाचा विटाळू । उच्चारीचा चळू केवीं चळे ॥२९॥
म्हणे कळलें आतां गो इंद्रिया नियंता । गोवळा म्हणतां दोष नाहीं ॥३०॥
ऐसे विचारुनि बाळा न्याहाळी चरणकमळा । मग म्हणे गोवळा पाय देसी ॥३१॥
तंव पिटली टाळ्या टाळी होसीजे सकळी । भीमकीया रांडोळी भली केली ॥३२॥
त्या वचना संतोषला देतुसे पाउला । वर्तती आंतुला खुणा दोघे ॥३३॥
कृष्ण बहु काळा उटी वेळोवेळां । उठुनी सोज्वळा करुं पाहे ॥३४॥
जैं कृष्ण अंगी लागे तें मागुतें न निघे । मळी लागवेगें निघेल कैंची ॥३५॥
मळी काढावयालागीं पाहे नख भागीं । अभिन्नव तें अंगीं देखियेलें ॥३६॥
सहित रवि चंद्र आणि क्षीरसागर । बिंबसे अरुवार नखामाजीं ॥३७॥
शेषाचिया बहुला श्रीकृष्ण नोवरा । उटणे सुंदरा करवी त्या ती ॥३८॥
तेथें व-हाडी हे देव बैसलेजी सर्व । अक्रुर उध्दव चवरे ढाळा ॥३९॥
देवकन्या व-हाडिणी भोंवल्या सवासिणी । हळदी लावी चरणीं क्षीरात्मजा ॥४०॥
ऐसे कृष्णनखी देखे एकाएकी । देखतां भीमकी मूर्च्छित झाली ॥४१॥
तेथें आश्वासित गुरु म्हणे स्थिरु स्थिरु । निर्धारेंसी धरी धिरु बाळे ॥४२॥
तंव बाष्प दाटे कंठी कंप जाली गोरटी । उन्मळितां दृष्टी होउनी ठेली ॥४३॥
तंव धांविन्नली धाये म्हणे झाले काये । झणे तुज माये दिठी लागे ॥४४॥
जें दृष्टी देखिले तें न बोलवे बोले । धायें तें वरिलें संज्ञेनें ॥४५॥
कृष्ण ओहणीचें बिरडें फ़ेडी आपुले चाडे । सुभद्रा हे लाडे बोलतीसे ॥४६॥
मेहुणे म्हणती जगजेठी जाणे हातवटी । यमुनेच्या तटीं अभ्यासू केला ॥४७॥
तंव यादव म्हणती कृष्णा उशीर कां येसणा । बिरडिया फ़ेसण पाहूं आम्हां ॥४८॥
झुंझारा विराचें बिरडें फ़ेडिलें । मग इथें परणीलें राजबाळें ॥४९॥
कृष्ण पाहे दृष्टी तंव बिरडें सुटे गांठी । कांचोळी समदृष्टी द्वैताची फ़ेडी ॥५०॥
पाहा गे नवल केलें डोळांचि उगविलें । बिरडें काढिलें नयनबळें ॥५१॥
कृष्णदृष्टीपुढें फ़िटे संसार बिरडें । मग हें केवढें नवल त्यासी ॥५२॥
व्रत तप याग करितां न टिके अंग । परि भाग्य सभाग्य भीमकी्चें ॥५३॥
मुखां मुख सन्मुखी बैसविली भीमकी । लाजे अधोमुखीं होउनी ठेली ॥५४॥
तंव तळीं कृष्णमुख देखिलें सन्मुख । पाठिमोरी देख होउनी ठेली ॥५५॥
मागाहीं ते मूर्ति सन्मुख श्रीपती । म्हणे मी केउती रिघों आतां ॥५६॥
वाम सख्य दिशा पडिला कृष्ण ठसा । लाज ह्रषीकेशा माजीं नुरे ॥५७॥
यापरी गोरटी कृष्णी लाजे भेटी । मग उघडियेली दृष्टी स्वरुप बळें ॥५८॥
सुभद्रा म्हणे चांग उटी ईचें आंग । स्वलीला श्रीरंग हळदी घेती ॥५९॥
तंव रेवती म्हणे देवा आधीं घ्यावें नांवा । हळदुली मग लावा उटी इसी ॥६०॥
मज नांव घेतां लाज नाहीं आतां । सावधान चित्ता ऐका तुम्ही ॥६१॥
नामा हे रुपाची गुणमयी गुणाची । प्रिया हे कोणाची कवण जाणे ॥६२॥
माझें येथें लक्ष वधुवरासी साक्ष । पुसा पां प्रत्यक्ष रुक्मिणीसी ॥६३॥
ऐकोनी तया नांवा गहिंवरु उध्दवा । तटस्थ यादवा सुरवरांसी ॥६४॥
कवण जाणे लीळा आकळ याची कळा । हांसती सकळ व-हाडिणी ॥६५॥
यावरी श्रीरंगे हळदी घेऊनि स्वांगे । उटीतु अष्टांगें रुक्मिणीचीं ॥६६॥
कृष्णकरयोगें सबाह्य निवों लागे । जाणतील अंगे अनुभवीये ॥६७॥
लाभु चरणकमळा जाणें ब्रम्हबाळा । त्याचिया करतळा वैदर्भी भोगी ॥६८॥
हा ईशु ब्रम्हादिकी तो सेवक भीमकी । केलासे कवतीकी हळदी मिसें ॥६९॥
दासाचाही दासु साचा ह्रषीकेशु । भीमकीया उल्हासु देतु असे ॥७०॥
जया जैसा भावो तया तैसा देवो । भक्तीचा निर्वाहो हाचि जाणें ॥७१॥
कृष्णचरणावरती सुरंग अक्षता । भीमकीये माथां ठेवी वेगीं ॥७२॥
येरी आनंदली रोमांचित जाली । कपाळा पैं आली दशा आजी ॥७३॥
तंव सखीया देखोन दिठी लाज आली पोटीं । तोचि भेदु दृष्टी आशंकेचा ॥७४॥
तेणें चुकविलें समचरण तत्वतां न लगती अक्षता । नमस्कारी माथां भूमि लागे ॥७५॥
तंव अभिमानली बाळी धरी अंगुष्ठ करतळीं । नमन इये वेळीं चुकों नेदी ॥७६॥
मस्तक जंव लोटी तंव पायां पडे फ़ुटी । अभिमानें तुटी चरणकमळा ॥७७॥
नमस्कार भले मागुतें अवंगिलें । तंव समचरणीं पाउलें दिसों नेदी ॥७८॥
अभिमानाचें बळ तें जाली पटळ । नेणें चरणकमळ अंतरले ॥७९॥
उश्वासें निश्वासें स्फ़ुंदे ते कामिनी । आसुवें लोचनीं पूर्ण आलीं ॥८०॥
मनीं ऐसी आस नमीन सावकाश । ते दैव उदास आजी जालें ॥८१॥
म्हणे कटकटा धांत्रया विकटा । चरण लल्लाट न भेटती ॥८२॥
आजि हें कपाळ जालें हें निर्फ़ळ । कृष्णचरणकमळ नातळती ॥८३॥
चंडवातें केळी कांपे चळचळी । त्याहुनी वेगळी भीमकी दिसे ॥८४॥
गळती कांकणें अवस्था भूषणें । अवशेष प्राणें मूर्च्छित जाली ॥८५॥
देखोनि तो भावो गहिंवरे उध्दव । एकाएकीं देव निष्ठुर जाले ॥८६॥
भीमकी आनंद मेळीं न संडे उकळी । उध्दव ते वोसंडला ॥८७॥
नेत्रीं आनंदजळ वहातसे सोज्वळ । म्हणे धन्य बाळ भीमकाची ॥८८॥
धरुनी तिची बाहे म्हणी उठी माये । नमस्कारी पाये या वरिष्ठाचे ॥८९॥
सांडिली लाज अभिमान निर्विकल्प मन । मस्तकीं श्रीचरण धरुनी ठेली ॥९०॥
यापरी कामिनी घाली लोटांगणी । जडली कृष्णचरणीं उठवेना ॥९१॥
तें अभिनव मुख फ़िटलें जन्मदु:ख । विसरली नि:शेख देहभावा ॥९२॥
तेथें सुखें वांकुलिया बोधाच्या गुतकुलीया । उसळती उकलीया आनंदाच्या ॥९३॥
अहं सोहं गांठी सुटल्या चरणभेटी । आनंदुची सृष्टी हेलावतु ॥९४॥
सेव्य सेवक भावो नाठवे विवाहो । देवी आणि देवो एक जाली ॥९५॥
सच्चिद पाउली स्वानंदु तळवटी । जाहली उठाउठी सहजीं निज ॥९६॥
तेथें वाच्यवाचक मौन ना जल्पक । म्हणावें ते एक म्हणतें नाहीं ॥९७॥
हरी म्हणे वेल्हाळ झणीं होय बरळ । करिती कोल्हाळ सोयरे या ॥९८॥
उपराटी विकडी देवासी सांकडी । सावध हे किडी केवीं होय ॥९९॥
त्या सुखाचे अंतरीं प्रवेशले हरी । तंव विसरली सुंदरी सावध करुं ॥१००॥
दोघां एक सुख लागली टकमक । चेतविते देख कवणा कवण ॥१॥
त्या मुखा वेगळी न निवडे ते बाळी । सुखेसी वेल्हाळी उठविली ॥२॥
त्या देहा जरी येणें तरी देह मी न म्हणें । अवघी कृष्णपणें रचली असे ॥३॥
चराचर दिसे तें मजमाजींच असे । रचले मदांशें ब्रह्मगोळ ॥४॥
ऐसी कृष्ण रुक्मिणी बैसली ऐक्य होउनी । तटस्थ अस्तानी काय सकळीकेसी ॥५॥
तो सोहळा देखोनि एका जनार्दनीं । उल्हासु जनीं वनीं साठवेना ॥६॥
त्या आनंदाचा लोंढा न कळे उदंडा । तेणें सुखें झेंडा नाचतसे ॥७॥
एका जनार्दनीं बोलतांची मौनी । हळदुली कैसेनी हातां आली ॥८॥
पितामहाचा पिता सुभानु तत्वतां । हळदुली हे कथा येथुनी जाली ॥९॥