सत्त्वशील राजा 3
राजाचा निश्चय कायम राहिला. डोळे काढणा-याला बोलावण्यात आले. वेलीवरचे फुल खुडावे, तळ्यातील सुंदर कमल तोडावे, तसा तो डोळा काढण्यात आला. राजाने हूं की चूं केले नाही. त्याच्या तोंडावर अपार आनंद व शांती विलसत होती. राजाच्या दुस-या डोळ्यातून पाणी आले. राजा आंधळ्याला म्हणाला, “माझा डोळा तुम्हाला चांगला बसला. जणू तुमच्यासाठीच तो होता. तुमच्या खाचेत नीट बसला. हा दुसराही घ्या. ह्या डोळ्याला वाईट वाटत आहे. दोन्ही डोळे दोघा भावांप्रमाणे एकत्र राहू देत.” राजाने दुसरा डोळा काढविला. तो दुसरा डोळाही आंधळ्याच्या डोळ्याच्या जागी बसविण्यात आला. आंधळ्याला ते दोन्ही डोळे चांगलेच शोभू लागले.
राजा आंधळ्याला वंदन करता झाला. आंधळ्याने त्या राजाच्या डोक्यावर हात ठेवला व त्याच्या डोळ्यांवरूनही हात फिरवला. तो काय आश्चर्य? राजाला एकदम पुन्हा डोळे आले. पूर्वीच्या डोळयांहून सुंदर डोळे! राजा समोर बघतो तो प्रत्यक्ष भगवान् शंकराची मूर्ती! डोक्यावर गंगा आहे, कपाळावर चंद्र आहे, अंगावर साप आहेत; अशी ती शंकराची कर्पूरगौर मूर्ती पाहून राजाने त्याच्या पायांवर डोके ठेवले.
भगवान् शंकर म्हणाले, “राजा, ऊठ. तुझी उदारता पाहून मी प्रसन्न झालो. नीट राज्य कर व अंती माझ्याकडे ये. तुला बाहेरचे डोळे परत दिलेच; पण ह्या बाहेरच्या डोळ्यांहून मौल्यवान असे जे अंतरीचे डोळे, जे ज्ञानचक्षू, ते तुला मी देतो म्हणजे तुझ्या हातून चूक होणार नाही, अन्याय होणार नाही. सर्वांपेक्षा राजाला या विचाराच्या डोळ्यांची, या ज्ञानदृष्टीची फार जरूरी असते. कारण,
कोट्यावधी लोकांचे हिताहित त्याच्या कृत्यांवर अवलंबून असते.”
भगवान शंकर गुप्त झाले अंतर्धान पावले. राजाला नवे डोळे आले व ज्ञानदृष्टीही आली. तो सर्व प्रजेला प्रिय झाला. पुष्कळ वर्षे न्यायाने व सत्याने राज्य करून अंती तो कैलावासी होऊन भगवान् शंकराजवळ राहिला! खरा थोर राजा!