आई व तिची मुले 3
ती मुले रडू लागली. त्यांचा आनंद पार मावळला. त्यांचा आधार म्हणजे आई. ती आईच रागे भरू लागली; आता कोणाकडे त्यांनी जावे? कोणाकडे बघावे? ती मुसमुसत तेथे अपराध्याप्रमाणे उभी राहिली. आईचे गोड शब्द ऐकण्यासाठी ती भुकेलेली होती. पोटातील दुसरी भूक निघून गेली. परंतु आईच्या प्रेमाची भूक फार लागली होती.
शेवटी त्या आईला मुलांचा कळवळा आला. सणावारी आपली मुले रडावीत असे कोणत्या आईला वाटेल? तिने त्या सा-यांना जवळ घेतले. त्यांचे ओले डोळे स्वत:च्या पदराने पुसले. सर्वांच्या तोंडावरून, डोक्यावरून, पाठीवरून तिने प्रेमळ हात फिरवला. ती म्हणाली, “उगी, रडू नका हो. कोंबडीच्या पिलांचा सण झाला. त्यांना नको का चांगले खायला? तुमची आई तुम्हांला गोड देणार,
कोंबडी तिच्या पिलांना देणार. घरात थोडे बाजरीचे पीठ आहे. त्यांत ही थोडीशी कणीक आहे ती पण मिसळीन. गूळ घालून त्याचे गाकर करीन. तेलाशी खा कुसकरून. चांगले लागतात.
आज सणाचा वासर। करू आपण गाकर।।” असे तिने गाणेच केले.
एका क्षणात मुलांचे दु:ख गेले. ती हसू-खेळू लागली. आईने केलेली कविता त्यांनी आणखी वाढविली.
आज सणाचा वासर। करू आपण गाकर।।
रोजची आहे भाकर। खाऊ आज गाकर।।
खाती कोंबडीची पिले। तील आईची मुले।।
करू कोंड्याचा मांडा।चला खेळ गोड मांडा।।
आईचे प्रेम पाहून मुले कवीच झाली. चुलीजवळ त्यांची आई गाकर करीत होती. तिच्या अवतीभोवती मुले नाचत होती. तिने त्यांची पाने मांडली. कढत कढत गाकर त्यांना तिने वाढले. मुले आनंदाने खाऊ लागली. मुलांचा आनंद पाहून त्या मातेचे हृदय भरून आले.