प्रामाणिक नोकर 3
“ह्याचा आणखी काही अपराध आहे का?” बापाने विचारले.
“नाही, तसा तो फार चांगला आहे, गोड बोलतो, गोड वागतो. परंतु नुसत्या गोडपणाला काय चाटायचे आहे? व्यवहार आधी. व्यवहारासाठी गोडपणा; व्यवहारासाठी तिखटपणा; व्यवहारासाठी खरे; व्यवहारासाठी खोटे. व्यवहार चालला पाहिजे.” तो शेठजी म्हणाला.
“माझ्या मुलाचा एवढाच अपराध असेल तर मीच त्याला तुमच्या दुकानात ठेवू इच्छित नाही. तुमचेही नुकसान नको व्हायला व त्याच्याही जन्माचे नुकसान नको व्हायला. चल रे बाळ, येथे तू राहू नकोस!” असे म्हणून बाप आपल्या मुलाला घेऊन गेला. त्या मुलाची ही कीर्ती सर्वत्र पसरली व एका नामांकित दुकानातून त्याला मुद्दाम मागणी आली. त्या दुकानात तो रूजू झाला. तो मुलगा त्या दुकानात कामावर राहताच त्या दुकानाची विक्री दसपट वाढली. त्या नव्या मालकाने त्या मुलाला पुढे आपल्या दुकानात भागीदारी दिली व तो मुलगा सुखी झाला.
तो मुलगा आपल्या वृद्ध आईबापांना प्रेमाने म्हणतो, “तुम्ही मला प्रामाणिक केलेत त्याचे हे फळ. आणि हे फळ न मिळता आपण गरिबीत राहिलो असतो. तरीही मी सुखाने राहिलो असतो. कारण मनाचे समाधान ही सर्वांत मोठी संपत्ती होय. ज्याचे मन खाते, तो कितीही श्रीमंत असला तरी दु:खी व दरिद्रीच असणार! आई. खरे आहे ना म्हणतो मी ते?”