मोरू 4
मोरू म्हणाला, “अरे. माझ्या सद-या, का रे रडतोस?”
सदरा म्हणाला, “तुझा घाम लागून मी घामट झालो, तुझ्या अंगाचे रक्षण करून मी मळलो. धूळ व धूर मी अंगावर घेतो. परंतु तू मला कधी धूत नाहीस. मला स्वच्छ करीत नाहीस. पूर्वी पाण्यात पडताच मी ओला होत असे, आता पाणी माझ्यात शिरत नाही, ते सुद्धा जवळ येण्यास लाजते, इतका मी गलिच्छ झालो आहे. आणि हे सारे तुझ्यासाठी. मी रडू नको तर काय करू?”
धोतर म्हणाले, “त्या दिवशी तू उडी मारीत होतास, त्या वेळेस तुझ्या अंगात काटे बोचू नयेत म्हणून मी पुढे झालो व माझे अंग फाडून घेतले. परंतु मला चार टाके घातलेस का? तसेच ते शाईचे डाग माझ्या अंगावरचे धुतलेस का?”
सतरंजी व घोंगडी. त्याही बोलू लागल्या. “अरे, आमच्यात तुझ्या पायांची धूळ किती रे भरलीस? तुझे ते घाणेरडे पाय ते आमच्यावर ठेवतोस. आम्हांला जरा झटकून तरी टाकीत जा.”
खालची जमीन म्हणाली, “ अरे, माझे सारे अंग सोलून निघाले. तू माझ्यावर बसतोस, उठतोस, नाचतोस, कुदतोस. मला शेणामातीने कधी सारवतोस का? ते मलम अंगाला मधून मधून लावीत जा रे. सारे अंग ठणकते आहे. काय तुला सांगू? किती वेदना, किती हाल?”
चूल म्हणाली, “तुझ्यासाठी मी तापते. भाताचा कड जाऊन माझे अंग पहा कसे झाले? अरे, रोज सकाळी मला सारवीत जा. माझ्यावरून हात फिरव. अशी दीनवाणी नका रे मला ठेवू!”
ती खरकटी भांडी म्हणाली, “मोरू, तू जेवलास, परंतु आम्हाला सकाळपर्यंत अशीच खरकटलेली ठेवणार ना? चिखलात बरबटलेले बसून राहायला तुला आवडेल का रे? ही तुझी आमटी, हे ताक, हे शितकण- सारे तसेच आमच्या अंगावर. आम्हाला रात्री कधी झोप येत नाही. आम्हांला घासूनपुसून ठेवीत जा. तुझ्यासाठी चुलीवर आम्ही काळी होतो. तुझ्या जेवणामुळे आम्ही ओशट होतो. कृतज्ञता नाही का रे तुला?”