मोरू 3
मोरू- तुमची शक्ती एक दिवस द्या.
मनुष्य- बरे, तू आज गेलास की, ही शक्ती तुला येईल. काम करून, जेवण करून व अभ्यास करून अंथरूणावर पडलास की, तुला ही शक्ती येईल. आजच्या रात्रभरच फक्त ही शक्ती राहील. सकाळ होताच ती निघून जाईल. मोरू- बरे, मी जातो.
त्या मनुष्याला नमस्कार करून मोरू लगबगीने घरी आला. केव्हा एकदा आपल्याला त्या शक्तीचा अनुभव येतो, असे त्याला झाले होते. खोलीत येऊन तो काळाकुट्ट कंदील त्याने लावला. त्या उखळलेल्या चुलीवर भात करून तो जेवावयास बसला. भराभर जेवण करून त्याने ती भांडी तशीच तेथे गोळा करून ठेवली. नंतर आपली पथारी पसरून तो तिच्यावर पडला. अजून ती शक्ती आली
नव्हती. तो वाचीत पडला. त्याने दिवा बारीक केला. मोरूच्या चेह-यात तो पहा फरक पडू लागला.
मोरूला हळूहळू ऐकु येऊ लागले. त्याने डोळे ताठ केले व तो पाहू लागला. मागे, पुढे, खाली, वर सर्वत्र त्याला आवाज ऐकु येऊ लागले. एकाएकी दीनवाणे शब्द त्याच्या कानावर आले. त्याच्या समोर कंदील होता. तो रडत होता. मोरूला ते रडणे ऐकू आले. मोरू कंदीलाला म्हणाला, “का रे तु का रडतोस?”
कंदील म्हणाला,“ अरे तुझ्यासाठी मी काळा होतो. तू वाचावेस, ज्ञानाने तुझे तोंड उजळ व्हावे, म्हणून माझे तोंड काळे होते. परंतु तू मला कधी पुसतोस का? सकाळ होताच मला पुसून ठेव. पुन्हा रात्री तुझ्यासाठी तापेन; काळा होईन. सकाळी पुन्हा स्वच्छ कर. तू मला किती घाणेरडे केले आहेस बघ. मी रडू नको तर काय करू?”
इतक्यात मोरूला अगदी जवळच रडणे ऐकु आले. जणू त्याच्या अंगातून ते निघत होते. त्याच्या अंगातील सदरा व नेसूचे धोतर; तीही रडत होती.