मधुराणी 4
परंतु तेथे दुसरी फळी होती, तिच्यावर पुढीलप्रमाणे लिहिलेले होते-
‘राजकन्येच्या शयनमंदिराची किल्ली सरोवरात आहे ती काढून आणली पाहिजे.’
तो बटुवामन सरोवराच्या काठी आला. ते खोल सरोवर, किती लांब व रूंद. ती कशी सापडणार? परंतु ती दोन कृतज्ञ बदके त्याच्याजवळ आली व म्हणाली, “तू आम्हाला वाचविलेस. आम्ही तुला वाचवू. चिंता करू नकोस.” ती बदके गेली पाण्यात. बुड्या मारून त्यांनी किल्ली शोधून काढली. ती त्यांनी त्या राजपुत्राजवळ आणून दिली.
परंतु अजून तिसरी फळी होती. तिच्यावरची अट फारच कठीण होती. तिच्यावर पुढील मजकूर होता-
राजाच्या तीन मुली सारख्याच सुंदर दिसत होत्या. त्यांच्याच कोणताच फरक दिसत नव्हता. अगदी हुबेहुब एकमेकांची जणू बिंबप्रतिबिंब. त्या राजपुत्राला एक गोष्ट मात्र सांगण्यात आली होती. ती गोष्ट म्हणजे ‘सर्वांत वडील मुलीने साखरेचा तुकडा खाल्ला आहे, मधलीने गोड सरबत घेतले आहे व धाकटीने चमचाभर मध घेतला आहे.’ ही होय. आता मध घेणारी कोणती, हे ओळखून काढावयाचे होते.
ती मधमाश्यांची राणी आली. ज्या मधमाश्यांना त्याने जाळू दिले नाही, त्यांची राणी त्याच्यासाठी धावून आली. ती मधमाशी त्या तिघी मुलींच्या तोंडाचा घेऊ लागली व शेवटी जिने मध घेतला होता तिच्या ओठावर ती बसली! धाकट्या भावाने मुलगी शोधून काढली.
तिन्ही अटी पु-या झाल्या. जादू निघून गेली. जे दगड होऊन पडले होते ते सारे पूर्वीप्रमाणे होऊन उभे राहिले, त्या बुटबैंगणाचा त्या सर्वांत लहान असलेल्या मुलीशी विवाह झाला, त्या दुस-या
दोन राजकन्या त्याच्या दुस-या भावांना देण्यात आल्या. त्या मुलींचा बाप मेल्यावर तो बिटुकला राजा झाला. सारे सुखी झाले.