Get it on Google Play
Download on the App Store

या मताचें सामर्थ्य

या मताचें सामर्थ्य

अभिनव या मताची थोरी । मी एक विस्तारें नानापरी । परी एकपणाच्या अंगावरी । नाहीं दुसरी चीर गेली ॥४२॥

या मताचेनि महायोगें । निजले ठायीं मी जागें । जागाही निजें, निजोनि जागें । यापरी दाटुगें मत हें माझें ॥४३॥

हें मत कशानेंहि प्राप्त होत नाहीं

हें मत नातुडे अष्टांग योगें । हें मत नातुडे महायोगें । हें मत नातुडे स्वर्गभोगें । शिखात्यागे नातुडे मत ॥४४॥

हें मत नातुडे तपें । हें मत नातुडे मंत्रजपें । हें मत नातुडे दिगंबररुपें । शास्त्रपाठें आटोपें नव्हे तैसें ॥४५॥

हें मत नाटोपे वेदाध्ययनें । हें मत नाटोपे महाव्याख्यानें । हें मत नाटोपे महादानें । बैसतां धरणें नाटोपे मत ॥४६॥

हें मत नाटोपे स्वधर्माचारें । हें मत नाटोपे बहुधा विचारें । हें नाटोपे तीर्थसंभारें । मतमतांतरें नाटोपे हें ॥४७॥

हे मत नाटोपे पढणी पढतां । हें मत नाटोपे त्रिवेणीं बुडतां । हें मत नाटोपे थोरें रडतां । जाणिवा चरफडितां नाटोपे हें ॥४८॥

हे मत नाटोपे वेदविधी । हे मत नाटोपे अष्टमहासिद्धी । हे मत नातुडे नानाछंदी । हे जीवबुद्धीसी नाटोपे ॥४९॥

हे मत नाटोपे ध्येयध्यानें । हें नाटोपे दृढमौनें । हें मत नातुडे अनुष्ठानें । ज्याचें देखणें तोचि जाणें ॥६५०॥

हें मत नातुडे घराचारीं । हें नातुडे आश्रमांतरीं । हें नातुडे गिरिगव्हरीं । रिघतां कंदरीं नातुडे मत हें ॥५१॥

हें मत नातुडे सिद्धीसाठीं । हें मत नातुडे करितां गोष्टी । हे मत नातुडे कपिलपीठीं । भेददृष्टी नाटोपे ॥५२॥

हें मत नातुडे तीर्थवासी । हें नातुडे क्षेत्रसंन्यासी । हे नातुडे वैराग्यासी । कामक्रोधासी न जिंकिता ॥५३॥

हें मत नातुडें प्रयाग स्नानी । हें नातुडे महास्मशानीं । हें नातुडे गयावर्जनीं । कष्टतां त्रिभुवनी नातुडे मत ॥५४॥

हें नातुडे पृथिवी फिरतां । हें नातुडे तीर्थे करितां । हे नातुडे ध्यान धरितां । साधनीं सर्वथा नातुडे हें ॥५५॥

हें मत नातुडे कथा ऐकतां । हें नातुडे कथा करितां । हें नातुडे शास्त्रार्था । गुरुकृपेवीण हातां नये हें मत ॥५६॥

गुरुकृपेनेंच फक्त हें ‘ मत ’ लाभते

हे मत नातुडे क्षीरसागरीं । हें मत नातुडे वैकुंठशिखरीं । हे मत नातुडे सगुणसाक्षात्कारी । साम्यसमाधीवरी गुरुकृपें लाभे ॥५७॥

विवेकवैराग्य यथाविधी । विषयविरक्ती निरवधीं । सर्वत्र होय समबुद्धी । तें गुरुकृपा प्रबोधी हे मतसिद्धी माझी ॥५८॥

विवेकाचें निजनेटीं । धडधडीत वैराग्य उठी । विषयाची काढुनीं कांटी । समाधिदृष्टी समसाम्य प्रगटे ॥५९॥

ऐशी सर्वत्र समबुद्धी । या नांव परमसमाधी । ते समाधीवरी त्रिशुद्धी । माझ्या मताची सिद्धी गुरुकृपा लाभे ॥६६०॥

चतुःश्लोकी भागवत

एकनाथ महाराज
Chapters
सदगुरुवंदन गुरुमहिमा गुरुदास्याचें महिमान नाथांचें अनहंकारी आत्मनिवेदन श्रोत्यांना विनंती व कथासूत्र भगवदभजनाशिवाय ब्रह्मदेवालासुद्धां ज्ञानप्राप्ति नाहीं कामनारहित तपानें भगवत्प्राप्ति स्वरुपाची यथार्थ ओळख न झाल्यामुळें ब्रह्मदेव सृष्टिरचना करण्यास भांबावला किंकर्तव्यमूढ ब्रह्मदेवाचा भगवंताचा धांवा हरिकृपेशिवाय अनुताप नाहीं चित्तशुद्धीशिवाय हरीची भेट नाहीं अनुतापयुक्त ब्रह्मदेवाला तप ही दोन अक्षरें ऐकावयास आलीं तपाचें महिमान स्वयंचिंतनांतून ‘ तप ’ याचा अर्थ त्याला स्फुरला तप म्हणजे नेमकें काय ? कामक्रोधनिरसनार्थ ब्रह्मदेवानें तप आरंभिलें गुरुकृपेशिवाय आत्मज्ञान नाहीं वैकुंठमहिमा वैकुंठलोकाची स्थिति हरिभक्तांचे स्वरुप पतिव्रतांचें निवासस्थान स्वानंदधुंद रमेकडून हरिगुणसंकीर्तन श्रीविष्णूची स्तुति वैकुंठींचे मुख्य पार्षदगण अशा भगवंताजवळ सृष्टीच्या निर्मितीचें कार्य कसें चालतें तें ब्रह्मदेवाला दिसलें अहंकारशून्य ब्रह्मदेवांचे नारायणाला नमन नारायण ब्रह्मदेवाला वर देण्यास उद्युक्त तपस्सामर्थ्य ज्ञान देण्याला अधिकारी कोण आत्मज्ञान चार श्लोकांत नारायणानें शब्दबद्ध केलें. माया म्हणजे काय ? छाया माया यांचे नाते छाया व माया सदगुरुचरणसेवेनें मायेचा निरास होईल श्रोत्यांकडून ग्रंथाची स्तुति माझी प्राप्ति कोणाला होत नाहीं ? व्यतिरेकाचें लक्षण या मताचें सामर्थ्य समाधि म्हणजे काय ? ब्रह्मदेव अहंकारशून्य पूर्णबोधयुक्त झाला गुरुचें लक्षण चार श्लोकांत ब्रह्मदेवाला सुखी केलें ब्रह्मदेव सृष्टी करण्यास पात्र झाला जनार्दनकृपेनेंच आपणांस ही कथा श्रोत्यांना सांगता आली - एकनाथ ब्रह्मदेवाला प्रजापति कां म्हणतात ? पितृसेवेनें नारद ज्ञानी झाले भागवताची दहा लक्षणें सांगून ब्रह्मदेवानें नारदाला ज्ञानी केले भागवताची दहा लक्षणें नारद ब्रह्मज्ञानी झाल्यामुळें ब्रह्मदेवानें आनंदानें त्याला आपली ब्रह्मवीणा दिली गुरुकृपेशिवाय इतर साधनें व्यर्थ अशा अनुतापी व्यासांना नारदांचें दर्शन होतें श्रीव्यासांनीं आपला पुत्र शुकयोगींद्र यांना आपल्यासारखेंच ‘ ज्ञानी ’ केले ब्राह्मणाचें सामर्थ्य राजा परीक्षितीची योग्यता संताकडे क्षमायाचना भागवत सार