जातककथासंग्रह भाग १ ला 23
१२. कुसंगतीचें फळ.
(महिलामुख जातक नं.२६)
वाराणसीराजाचा महिलामुख नांवाचा एक मंगल हत्ती होता. राजाचें त्यावर फार प्रेम असे. एके दिवशीं त्याच्या हस्तिशाळेजवळ मध्यरात्रीच्या सुमारास चोर येऊन मसलत करूं लागले. घराची भिंत अमुक तर्हेनें फोडावी, कोणी पकडण्याला आलें तर त्याला कसें ठार मारावें, पेट्या, कपाटें, वगैरे कशीं फोंडावीं, त्या वेळीं मनामध्ये दयेचा अंशदेखील असतां कामा नये, अशा प्रकारच्या गोष्टी करून त्या रात्रीं त्या चोरांनी दरोडा घातला. त्यांत यश आल्यामुळें मसलतीला तें ठिकाण शुभप्रद आहे अशी त्यांची समजूत झाली; आणि ते वारंवार रात्रिसमयीं त्या ठिकाणीं मसलत करूं लागले. त्यांच्या भाषणाचा महिलामुख हत्तीवर इतका वाईट परिणाम झाला कीं त्याच्या अंतःकरणातील दयेचा अंश आटून जाऊन त्यानें प्रथमतः जवळ आलेल्या आपल्या माहुताला ठार मारिलें !
महिलामुख पिसाळला हें वर्तमान राजाला तेव्हांच निवेदित करण्यांत आलें. त्या वेळीं आमचा बोधिसत्त्व राजाचा एक अमात्य होता. राजा त्याला म्हणाला, ''पंडिता, हस्तिशाळेंत जाऊन मंगल हत्तीच्या वेडाचें खरें कारण शोधून काढ. इतका चांगला हत्ती एकाएकी वेडावला हें संभवेल तरी कसें ?''
बोधिसत्त्वानें हस्तिशाळेंत जाऊन महिलामुखाला तपासून पाहिलें. परंतु त्याच्या शरिराला कांहीं पीडा झाल्याचें चिन्ह दिसून आलें नाहीं. तेव्हां बोधिसत्त्वानें आसपासची जागा तपासून पाहिली. एका कोंपर्यांत घरें वगैरे फोडण्याचीं एकदोन शस्त्रें व चोरांनीं टाकून दिलेल्या कांहीं मोडक्या तोडक्या जिनसा त्याच्या पाहण्यांत आल्या. तेव्हां चोरांच्या मसलती ऐकून हा हत्ती बिघडून गेला असावा अशी त्याची खात्री झाली; आणि राजाजवळ जाऊन तो म्हणाला, ''महाराज ! महिलामुखाला दुसरा कोणताहि रोग झाला नाहीं. त्याच्या जवळपास चोरांनीं चालविलेल्या मसलती ऐकून त्याचें मन बिघडून गेलें आहे व तो उन्मत्त झाला आहे ! दुष्ट संगतीचें हें फळ आहे !''
राजा म्हणाला, ''पंडिता, पण त्याला सुधारण्याचा कांहीं उपाय आहे किंवा नाहीं ?''
बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज ! याला सोपा उपाय आहे. सुशील साधुसंताला बोलावून त्याच्या शाळेंत धर्माविषयीं संभाषण करण्यास सांगावें. म्हणजे तो आपोआप सुधरेल.''
राजानें वाराणसीच्या आसपास राहणार्या कांहीं साधुसंतांना आमंत्रण करून हस्तिशाळेंत धार्मिक संभाषण करण्यास विनंती केली. त्यांनी तेथें बसून मनुष्यानें शीलवान व्हावें, शांति धरावी, परोपकार करावा, दया वाढवावी इत्यादि गोष्टींची चर्चा केली. ती ऐकून हत्तीचा मद जागच्याजागीं निवाला; व तो पूर्वीपेक्षांहि सौम्य झाला !
राजानें पुनः चोर किंवा धूर्त लोक त्या शाळेंत येणार नाहींत असा बंदोबस्त केला; आणि बोधिसत्त्वाच्या चातुर्याची वाखाणणी करून त्याचा योग्य गौरव केला.