जातककथासंग्रह भाग १ ला 98
७५. सहवासाचें फळ.
(दधिवाहन जातक नं. १८६)
एकदां वाराणसींत दधिवाहन नांवाचा राजा राज्य करीत होता; आणि आमचा बोधिसत्त्व त्याचा अमात्य होता. एके दिवशीं मगरांना दूर काढण्यासाठीं गंगेंत जाळीं सोडून त्यांच्या आंत दधिवाहन राजा जलक्रीडा करीत असतां हिमालयावरून एक सर्वोत्कृष्ट आंब्याचें फळ वहात येऊन जाळ्यास अडकलें. राजपुरुषांनीं तें फळ काढून घेऊन राजाला अर्पण केलें. राजाला तें फळ इतकें आवडलें कीं, देवलोकींचा अमृतरस त्यापुढें तुच्छ असावा असें त्याला वाटलें. त्यानें त्या आंब्याची कोय मोठ्या समारंभानें आपल्या उद्यानांत लावली आणि दुधाच्या पाण्यानें तिला वाढविली. कांहीं दिवसांनीं आंब्याचें झाड फोफावून तीन वर्षांच्या आंत त्याला फळें येऊं लागलीं. बीजाप्रमाणेंच तीं फळेंहि अत्यंत मधुर होतीं. राजानें त्या झाडाचा फारच सत्कार चालविला. त्याला साखरेचें खत घालीत असत, आणि दुधानें शिंपीत असत, भोंवतालचें कुंपण मखमलीचें होतें, व त्या भोंवती रोज अत्तराचे दिवे जाळण्यांत येत असत.
दधिवाहन फार मत्सरी होता. आपल्या आंब्यासारखे आंबे दुसर्या राजाच्या उद्यानांत पैदा होऊं नयेत यासाठीं तो फार खबरदारी घेत असे. भेटीसाठीं आंबे पाठवतांना एका विषारी काट्यानें कोयीला भोंक पाडून पाठवीत असे. राजो लोक आंब्याचा आस्वाद घेऊन फार संतुष्ट होत आणि कोय पेरून आंब्याचें झाड उगवण्याची वाट पहात. परंतु त्यांची आशा कधींहि सफळ झाली नाहीं. एका राजाला दधिवाहन मत्सरामुळें आंब्याच्या कोयीला भोकें पाडून पाठवतो ही गोष्ट समजली तेव्हां आपल्या हुषार माळ्याला बोलावून आणून तो म्हणाला, ''दधिवाहनाला आपल्या आंब्याची फार घमेंड आहे. तूं तेथें जाऊन त्याचा तो आंबा बिघडून जाईल अशी युक्ती करशील काय ?''
माळी म्हणाला, ''महाराज, आपली आज्ञा असेल तर दोन चार वर्षांचे आंत दधिवाहन राजाचा आंबा बिघडेल असा उपाय मला करतां येईल. पण येथून मला चार वर्षांची रजा मिळाली पाहिजे.''
त्या राजानें माळ्याला मोठ्या आनंदानें रजा दिली. वाराणसीला येऊन दधिवाहनाजवळ तो नोकरीस राहिला. भलत्याच वेळीं फुलें फुलवून दाखवून आणि भलत्याच ॠतूंत झाडांना फळें येतील असे उपाय करून दधिवाहनाला त्यानें प्रसन्न करून घेतलें. तेव्हां दधिवाहनानें जुन्या माळ्याला काढून टाकून मुख्य उद्यानाची सर्व व्यवस्था या नवीन माळ्याच्या हातांत दिली. त्यानें हळु हळु त्या सरस आंब्याच्या आजुबाजुला निंबाची आणि दुसरीं कडू जातीची झाडें लावून दिली आणि त्यांची चांगली जोपासना केली. दोन चार वर्षांत ती झाडें भराभर वाढलीं आणि त्यामुळें आंब्याचें फळ कडू झालें. तें पाहून बागबान तेथून पळून गेला. एके दिवशीं दधिवाहन राजा आपल्या अमात्यांसह उद्यानांत इकडे तिकडे फिरत असतां आंब्याच्या झाडाजवळ आला; आणि आपल्या लोकांकडून एक पिकलेला आंबा त्यानें झाडावरून काढून घेतला. पण तोंडात घातल्याबरोबर तो त्याला इतका कडूं लागला कीं, त्याचा रस त्यानें तेव्हांच थुंकून टाकला, आणि तो बोधिसत्त्वाला म्हणाला, ''मित्रा या आंब्याचें असे परिवर्तन कां झालें ? साखरेचें खत, दुधानें शिंपणें, गंधाच्या दिव्याची पूजा इत्यादि सर्व उपचार चालूं असतां आंब्याचें फळ निंबाच्या पाल्यासारखें कडू कां व्हावें ?''
बोधिसत्त्वानें निरीक्षण करून पाहिलें; आणि तो राजाला म्हणाला, ''* महाराज या आंब्याच्या झाडाला निंबाच्या आणि दुसर्या जातीच्या झाडांनीं वेढलें आहे हें तुम्ही पहातच आहां. त्यांच्या शाखा या झाडाच्या शाखेंत मिसळल्या आहेत, त्यांचीं मुळें याच्या मुळाशीं संबद्ध झालीं आहेत आणि त्यामुळें या आंब्याच्या झाडांतील मधुरता जाऊन त्याच्या अंगीं कडुपणा आला आहे. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे वाईट सहवासाचें हें फळ आहे.''
---------------------------------------------------------------------------------------------------------
* मूळ गाथा-
पुचिमंदपरिवारो अंबो ते दधिवाहन ।
मूलं मूलेन संसठ्ठं साखा साखा निसेवरे ।
असतं सन्निवासेन तेनम्बो कटुकप्फलो ॥
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
राजानें आजुबाजूचीं कडू जातीचीं झाडें तोडून टाकण्यास हुकूम केला. तीं तोडून त्याचीं मुळें खणून काढण्यांत आलीं. तेव्हां त्या आंब्याच्या झाडाला पूर्ववत् मधुर फळें येऊं लागलीं.