जातककथासंग्रह भाग १ ला 70
५३. दांभिक तपस्वी.
(गोधजातक नं.१३८)
एका काळीं बोधिसत्त्व घोरपडीच्या कुळांत जन्मला होता. तो एका गांवाजवळ अरण्यांत एक मोठें बीळ पाडून त्यांत रहात असे. त्याच्या बिळाजवळ एक उत्तम तपस्वी पर्णकुटिका बांधून रहात असे. त्याच्या दर्शनाला आसपासच्या गांवांतून पुष्कळ लोक येत असत. आमचा बोधिसत्त्व देखील त्याच्या दर्शनाला दिवसांतून दोन तीन वेळा जात असे व त्याचा धर्मोपदेश ऐकत असे. कांहीं कालानें तो तपस्वी मरण पावला; व त्याच्या जागीं दुसरा एक तपस्वी येऊन त्याच पर्णकुटिकेंत राहूं लागला. याहि तपस्व्याचा उपदेश ऐकण्यासाठीं बोधिसत्त्व वारंवार जात असे.
एका उन्हाळ्यांत अकालवृष्टि झाली व तिजमुळें वारुळांतून पुष्कळशा माशा बाहेर पडल्या. त्या खाण्यासाठीं घोरपडी जिकडे तिकडे हिंडू लागल्या. ग्रामवासी मनुष्यांनीं कांहीं घोरपडी पकडून त्यांच्या मांसावर आपली चैन चालविली. या नवीन आलेल्या तपस्व्याला देखील घोरपडीचें मांस लोकांनीं खाऊं घातलें. तें त्याला फारच आवडलें, व तें कोणच्या प्राण्याचें मास आहे याची त्यानें चौकशी केली. पण दोन चार दिवसांनीं घोरपडीचें मांस मिळेनासें झालें. तपस्व्याला त्या मांसाची एक प्रकारची फारच चटक लागली. त्याला चैन पडेना. तेव्हां आपल्याजवळ धर्मोपदेशक ऐकण्यासाठीं येणार्या घोरपडीचा वध करून दोन दिवस चैन करावी असा त्यानें बेत केला; व गांवांतून मांस शिजविण्यासाठीं भांडें, मीठ, तूप, मसाला वगैरे पदार्थ आणवून आपल्या पर्णकुटिकेंत तयार ठेविले, आणि एक दांडकें काखेंत आपल्या भगव्या वस्त्राखालीं लपवून बोधिसत्त्वाची मार्गप्रतिक्षा करीत मोठ्या गंभीर मुद्रेनें तो पर्णशाळेच्या दाराशीं बसला. सुदैवानें वारा तो बसला होता तिकडून येत असे. जवळ आल्याबरोबर बोधिसत्त्वाला त्याची फाजील गंभीर मुद्रा पाहून एक प्रकारचा संशय आला. इतक्यांत वारा येऊन त्याबरोबर घोरपडीच्या मांसाचा त्याला वास आला. तेव्हां तपस्व्यानें घोरपडीचें मांस खाल्याबद्दल त्याची पक्की खात्री झाली, व त्यानें तपस्व्याला दुरूनच नमसकार केला. तापसानें आपल्याजवळ येण्याविषयीं त्याला पुष्कळ आग्रह केला परंतु अनेक कारणें सांगून बोधिसत्त्वानें जवळ जाण्याचें नाकारलें. तेव्हां आतां हातची शिकार जाते असें वाटून तपस्व्यानें आपलें दांडकें बोधिसत्त्वावर फेंकलें. त्याच्या शेपटीला तेवढा थोडासा धक्का लागला. बाकी कांही इजा झाली नाहीं. तो दूर उभा राहून म्हणाला, ''अरे ढोंग्या, या तुझ्या जटा, अजिनचर्म आणि भगवीं वस्त्रें घेऊन काय करावयाचीं ! तुझें अंतःकरण इतकें वाईट आहे कीं, या सर्व पदार्थांनी तें परिशुद्ध होण्याचा संभव नाहीं. बाहेरून तुझा डामडौल पाहून बिचारे भोळे लोक मात्र फसत आहेत !'' असें बोलून बोधिसत्त्व तें बीळ सोडून घोर अरण्यांत निघून गेला.