जातककथासंग्रह भाग १ ला 52
४३. वाईट परिस्थितींत वाढलेला प्राणी.
(अकालराविजातक नं. ११९)
एका जन्मीं बोधिसत्त्व औदिच्य ब्राह्मण कुलांत जन्मला होता. वयांत आल्यावर शास्त्राध्ययन करून वाराणसींत उत्तम आचार्य या नात्यानें तो प्रसिद्धीस आला. त्याजवळ पांचशें शिष्य अध्ययन करीत असत. त्या शिष्यांपाशीं एक वेळेवर आरवणारा कोंबडा होता. त्याच्या आरवण्यानें ते जागे होऊन अध्ययनाला सुरुवात करीत असत. तो कोंबडा कांहीं काळानें मरण पावला. तेव्हां दुसर्या कोंबड्याच्या शोधांत त्यांनी बरेच दिवस घालविलें. एके दिवशीं त्यांतील एक तरूण विद्यार्थी श्मशानाच्या जवळ लांकडें गोळा करीत असतां त्याला तेथें राहणारा एक दिसण्यास सुंदर असा कोंबडा सांपडला. त्याला आणून त्या विद्यार्थांनी आपल्या जागेंत ठेविलें व त्याची उत्तम रीतीनें शुश्रूषा चालविली. पण हा कोंबडा भलत्याच वेळीं आरवून त्यांना त्रास देऊं लागला. एखाद्या वेळेस तो मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्यानें ओरडत सुटे. तेव्हां पहाट झाली असें समजून विद्यार्थिगण जागा होऊन अध्ययनास लागे, व त्यामुळें सकाळीं गुरुजीजवळ पाठ म्हणण्यास सुरुवात केली असतां त्यांचे डोळे निजेनें भरून येत असत. एखादे वेळेस तो सकाळ झाली तरी ओरडत नसे व त्यामुळें विद्यार्थि तसेच बिछान्यावर पडून रहात असत. सकाळीं गुरूजवळ पाठ म्हणण्यास जावें तों यांची मुळींच तयारी झालेली नसे. हा प्रकार होऊं लागला तेव्हां त्यांनीं त्या कोंबड्याला ठार मारिलें, व आचार्याजवळ जाऊन ते म्हणाले, ''गुरुजी, कांहीं दिवसांपूर्वी आणलेल्या कोंबड्यानें आम्हाला फार त्रास दिला. आपल्या आरवण्यानें भलत्याच वेळीं जागें करून तो आमच्या अध्ययनांत व्यत्यय आणीत असे.''
आचार्यानें तो कोंबडा कोठें सांपडला वगैरे सर्व माहिती विचारून घेतली, व तो त्यांना म्हणाला, ''हा कोंबडा आईबापांशिवाय वाढलेला, आचार्याचा सहवास त्यानें कधींहि केला नाहीं. तेव्हां काल किंवा अकाल तो जाणत नसला तर त्यांत नवल कोणतें ? योग्यायोग्य जाणण्यास प्राणी चांगल्या परिस्थितींतच जन्मला असला पाहिजे.''