जातककथासंग्रह भाग १ ला 32
२१. भलत्याच मार्गानें उपजीविका करूं नये.
(कपोतजातक नं. ४२)
एकदां आमचा बोधिसत्त्व पारव्याच्या कुळांत जन्मला होता. त्याकाळीं वाराणशीनगरवासी लोक पुण्यबुद्धीनें पुष्कळ ठिकाणीं तुसानें भरलेल्या पिशव्या टांगून ठेवीत असत. हेतू एकढाच कीं त्या पिशव्यांत पक्ष्यांनीं आपलीं घरटीं करावीं. वाराणशीच्या महाश्रेष्ठीच्या स्वयंपाक्यानें देखील असली एक पिशवी आपल्या पाकशाळेंत टांगली होती. त्या पिशवींत आमचा बोधिसत्त्व रहात असें.
एके दिवशीं स्वयंपाक्यानें मत्स्यमांसादिक पदार्थ धुवून टाकलेल्या पाण्याच्या गंधानें लुब्ध झालेला एक कावळा आपला प्रवेश त्या पाकशाळेंत कसा होईल या विचारांत पडला, व तेथेंच जवळ बसून राहिला. बोधिसत्त्व नियमाप्रमाणें चरण्यासाठीं जंगलांत जात असतां त्याला त्या कावळ्यानें पाहिलें. व तो मनांत म्हणाला, ''या पारव्याची संगती केली असतां श्रेष्ठीच्या महानसांतील मत्स्यमांसादिक पदार्थांचा आस्वाद घेण्यास संधि सांपडेल.'' दुसर्या दिवशीं बोधिसत्त्व बाहेर निघण्यापूर्वीच कावळा तेथे येऊन बसला, व बोधिसत्त्वाच्या मागोमाग जंगलांत शिरला. या कावळ्याच्या कृत्याचा अर्थ न समजल्यामुळें त्याला बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज, तुमचें आचरण इतकें चांगलें आहे कीं, आजपासून तुमच्याच सेवेंत आयुष्य घालाविण्याचा मी निश्चय केला आहे.'' बोधिसत्त्व म्हणाला, ''पण आमचे दोघांचे जुळावें कसें. माझें भक्ष्य निराळें तुझें भक्ष्य निराळें. कावळा म्हणाला, ''महाराज, तुम्ही ज्यावेळीं आपला चारा शोधण्यासाठीं जाल त्यावेळीं मी देखील तुमच्या बरोबर जाऊन माझ्या पोटाची व्यवस्था करीन.'' बोधिसत्त्व म्हणाला, ''असें असेल तर ठीक आहे. पण माझ्यासारखें तूं देखील मोठ्या सावधगिरीनें वागलें पाहिजे.''
याप्रमाणें कावळ्याला उपदेश करून बोधिसत्त्व गवताच्या बीजावर आपली तृप्ति करूं लागला. कावळ्यानें देखील गाईच्या शेणांतील किड्यांवर आपला निर्वाह केला. संध्याकाळीं बोधिसत्त्वाबरोबरीच तो त्या पाकशाळेंत आला. तेव्हां स्वयंपाक्यानें तो पारव्याचा मित्र असावा अशी कल्पना करून त्याच्यासाठीं दुसरी एक तुसाची पिशवी टांगून दिली. त्या दिवसापासून दोघेजण तेथें राहूं लागले.
एके दिवशीं श्रेष्ठीच्या घरीं पुष्कळ मासे आणि मांस आणलें होतें. स्वयंपाक्यानें तें पाकशाळेंत जिकडे तिकडे लोंबकळत ठेविलें. संध्याकाळी कावळ्याची दृष्टी जेव्हां त्यावर पडली तेव्हां त्याच्या पोटांत दुखूं लागलें, व त्यावर कसा ताव मारितां येईल या विवंचनेंत त्यानें सारी रात्र घालविली. दुसर्या दिवशीं चरावयाला निघण्याच्या वेळेला बोधिसत्त्व त्याला म्हणाला, ''कावळेबुवा चला आतां; चरावयाला निघण्याची वेळ झाली.'' कावळा म्हणाला ''महाराज, माझ्या पोटांत, दुखत आहे. तेव्हां तुम्हीच जा.'' बोधिसत्त्व म्हणाला, ''पण मित्रा, कावळ्याला पोटदुखीचा रोग झाला असे कोणीच ऐकिलें नाहीं; आणि कितीही खाल्लें तरी त्याची तृप्ति होते असेंहि नाहीं. पण मला वाटतें आज तुझी दृष्टी या माशांवर व मांसावर गेल्यामुळे तुझ्या या पोटदुखीला आरंभ झाला असावा. हें मनुष्याचें भक्ष्य आहे, व आमच्यासारख्या आश्रिताचें भक्ष्य नाहीं हें लक्षांत ठेव, आणि अशा पदार्थावर कुदृष्टि न ठेवितां रोजच्याप्रमाणें माझ्याबरोबर चरावयाला चल. कावळा म्हणाला ''तुम्ही म्हणतां हें मला कबूल आहे परंतु तुमच्याबरोबर जाणें आज अगदींच अशक्य आहे. पारवा म्हणाला, ''असें आहे तर तूं येथेंच रहा. पण निदान लोभाला वश होऊन घातक कर्म करूं नकोस !''
बोधिसत्त्व चरण्यासाठीं बाहेर गेल्यावर कावळा स्वयंपाक घरांत काय प्रकार चालला हें हळूच मान वर काढून पहात बसला. स्वयंपाक्यानें सर्व पाकाची सिद्धता करून ठेविली, व तो विश्रांतीसाठी थोडा वेळ स्वयंपाकघराबाहेर पडला. ही संधी साधून कावळा आपल्या निवासस्थानांतून बाहेर पडला, आणि विचार करूं लागला कीं, मांसाचे लहान तुकडे खावे किंवा एकदम एखादा मोठा तुकडा लांबवावा. शेवटीं, एखादा मोठा तुकडा घेऊन पिशवींत जाऊन बसण्याचा त्यानें निश्चय केला. परंतु स्वयंपाक्यानें मांसाचे तुकडे झांकून ठेविले होते त्यावरील झांकण जेव्हां कावळ्यानें खाली पाडलें तेव्हां स्वयंपाक्याला संशय येऊन तो आंत शिरला. त्यानें कावळ्याचें दुष्ट कृत्य पाहिलें, व तो आपणाशींच म्हणाला, ''माझ्या धन्यासाठीं तयार केलेलें पक्वान्न हा दुष्ट कावळा खाऊं पहात आहे ! जणूं काय हाच माझा धनी आहे ! तेव्हां आतां या खळाला भरपूर प्रायश्चित्त दिल्यावांचून रहातां कामा नये !'' त्यानें दारें आणि खिडक्या बंद करून कावळ्याला पकडलें व त्याची पिसें उपटून आल्याच्या रसांत मीठ आणि जिर्याची पूड मिसळून त्याच्या अंगाला लेप दिला; आणि त्याला त्या पिशवींत टांकिलें. कावळा अत्यंत पीडित होऊन तेथें तळमळत पडला !
बोधिसत्त्व बाहेरून संध्याकाळी परत आल्यावर त्याची ती अत्यंत हृदयद्रावक दुर्दशा पाहून म्हणाला, ''अरे लोभी कावळ्या, तूं माझें वचन न ऐकल्यामुळें या संकटांत पडलास ? जो आपल्या हितमित्राचें वचन ऐकत नाहीं, व लोभाला वश होऊन खोट्या मार्गानें आपली उपजीविका करूं पाहतो, त्याची गत अशीच होत असते.