जातककथासंग्रह भाग १ ला 30
१९. हलकटाचें बल द्रव्य
(नंद जातक नं. ३९)
वाराणसी नगरींत ब्रह्मदत्तराजा राज्य करीत असतां बोधिसत्त्व एका गृहस्थाच्या कुळांत जन्मला होता. त्याच्या एका मित्रानें उतारवयांत लग्न केलें होतें; व त्या संबंधापासून त्याला एक मुलगा झाला. तेव्हां त्यानें असा विचार केला कीं, माझी बायको अद्यापि तरुण आहे, व मी जर मरण पावलों तर ती दुसरें लग्न करून घरांत असलेले द्रव्य त्या नवर्याच्या स्वाधीन करण्यास मागें पुढें पहावयाची नाहीं, व त्यायोगें माझ्या मुलाची मोठी हानि होईल. म्हणून त्यानें नंद नांवाच्या आपल्या दासाकडून घरांतील सर्व द्रव्य जंगलांत नेववून एका ठिकाणीं पुरून ठेविलें. व तो नंदाला म्हणाला, ''माझा मुलगा वयांत आल्यावर त्याला हें द्रव्य दाखवून दे; व त्याला सोडून दुसर्या ठिकाणीं जाऊं नकोस.''
त्यानंतर कांही काळानें तो गृहस्थ मरण पावला. त्याचा मुलगा वयांत आल्यावर आई त्याला म्हणाली, ''बाळ, तुझ्या पित्यानें नंद दासाकडून घरांतील द्रव्य कोठेंतरी गाडून ठेविलें आहे. तें नंदाला विचारून उकरून काढ, व त्याचा व्यापारधंद्यांत उपयोग कर.''
तेव्हां तो मुलगा नंदाला म्हणाला, ''नंद मामा, माझ्या वडिलांनी पुरून ठेविलेलें कांही द्रव्य आहे काय ?'' नंदानें ''होय'' असें उत्तर दिलें. नंतर एके दिवशीं तें द्रव्य घेऊन येण्याच्या उद्देशानें कुदळ, टोपली वगैरे घेऊन ते दोघे जंगलात गेले. तेथें ज्या जागीं धन पुरून ठेविलें होतें त्या जागी उभा राहिल्याबरोबर नंद मोठ्या गर्वानें त्या मुलाला म्हणाला, ''अरे दासीपुत्रा, ह्या ठिकाणीं धन तुला कोठून मिळणार ?''
ह्याप्रमाणें जेव्हां जेव्हां द्रव्य आणण्याच्या हेतूनें ते दोघे अरण्यांत जात व नंद त्या ठिकाणीं उभा राही, तेव्हां तेव्हां तो ह्या तरुण मुलाला अनेक शिव्यागाळी देत असे. तरी नंदाच्या हातीं आपली किल्ली आहे हें जाणून तो मुलगा मोठ्या विचारानें त्याच्या त्या शिव्यागाळी सहन करीत असे. शेवटीं कंटाळून जाऊन तो आपल्या बापाच्या मित्रापाशीं-बोधिसत्त्वापाशीं-गेला; व त्यानें त्याला इत्थंभूत वर्तमान सांगितलें. तेव्हां बोधिसत्त्व त्याला म्हणाला, ''द्रव्य पुरून ठेवलेली जागा सांपडणें कठीण नाहीं. ज्या ठिकाणीं उभा राहून नंद तुला शिव्यागाळी देतो, त्या ठिकाणींच तें धन पुरलेलें असावें. का कीं, द्रव्याच्या सान्निध्यानें हलकटाला बळ चढतें. पुनरपि जेव्हां त्या ठिकाणीं राहून नंद तुला शिव्या देईल तेव्हां त्याला तेथून ओढून काढ, व तेथें खण म्हणजे तुला तें द्रव्य सांपडेल.''
बोधिसत्त्वाच्या सल्ल्याप्रमाणें वागून, त्या तरुणानें तें द्रव्य आपल्या घरी आणलें व त्याचा सदुपयोग केला.