स्वदेशी समाज 4
कार्यकर्त्यांचा एक संघ असे मेळे तयार करून जर या जिल्ह्यांतून त्या जिल्ह्यांत असा फिरूं लागेल, पोवाडे, गाणीं, नकला, संवाद, कुस्त्या, खेळ, सदीप व्याख्याने, वगैरे सरंजाम बरोबर बाळगील तर पैशाचा प्रश्नही सहज सुटेल. या मार्गाने थोडी फार मदत मिळून, संघाचा खर्च निघून, थोडा फार फायदाहि उरेल. या उरलेल्या पैशांचा उपयोग जर राष्ट्रकार्याकडे केला तर जनता व मेळे करणारे यांच्यामध्यें सेवेचे अभंग व बळकट बंधन निर्माण होईल. कार्यकर्ते व जनता यांच्यांत असा हा स्नेहसंबंध एकदां जडला म्हणजे मग बहुमोल राष्ट्रजागृतीची अनेक कामे ते करून घेऊ शकतील.
पूर्वी संस्कृतीचें शिक्षण अशा यात्रांतून व उत्सवांतून मिळे. परन्तु हल्ली तसे दिसून येत नाही. यात्रांतील, उत्सवांतील गंभीरता, सदभिरुचि जात चालली, पुष्कळ वेळा यात्रांतून तमाशे व तगतराव यांचेच प्राबल्य दिसते. मारुतिजन्माला, रामजन्माला तमाशे करतात. ही सुकून गेलेली संस्कृतिगंगा नवीन विचारप्रवाहाने युक्त करून भगीरथ प्रयत्नांनी तरुण कार्यकर्ते जेव्हा खेड्यांत नेऊन ओततील, तेव्हाच राष्ट्राला नवीन फळा चढेल.
खेड्यांतील तळी सुकली, पाण्याचा दुष्काळ पडत चालला, रोगराई फैलावत चालली, मरणाचा सुकाळ झाला. ह्या बरोबरच खेड्यांतील सांस्कृतिक व नैतिक जीवनहि बहुतेक संपुष्टात येऊ लागले. पिण्याला शुद्ध पाणी नाही, मनाला शुद्ध विचार नाही. शरीराला रोग व बुद्धीला रोग. खेड्यांत स्वच्छ पाणी नाही, त्याप्रमाणे खेड्यांतील यात्राउत्सवांत सात्त्विकता व शुद्धता उरली नाही. ज्या शेताची नीट निगा राखिली जात नाही तेथे सुंदर धान्य तर नाहींच होत, उलट विषारी तण मात्र माजते. त्याप्रमाण यात्रा-महोत्सवांचे होत आहे. ह्या संस्थांचा अधःपात न व्हावा असें वाटत असेल तर कळकळीच्या तरुण सेवकांनी तेथे धावून गेले पाहिजे. या संस्थांचा बचाव न करू तर आपण मोठे आपराधी ठरूं.
हे सारे सांगण्याचा हेतु एवढाच की पूर्वी ज्या स्वाभाविक व सहज रीतीनें आपण खेड्यांतील जनतेंत मिसळत होतो, त्या मार्गाचा पुन्हा अवलंब व्हावा. जुन्या संस्थांत नवचैतन्य यावें. त्यांची नीट संघटना व्हावी. त्यामुळे आपल्या देशाला अपंरपार फायदा होईल.
परकी सरकारकडे अर्जविनंत्या करण्याच्या उपायांवर ज्यांची श्रद्धा बसत नाही, त्यांना विरुद्ध पक्षाचे लोक निराशावादी असे संबोधतात. परन्तु माझे तर असे म्हणणे आहे की जो हताश व दुबळा असतो, तोच दुस-याच्या कृपेकडे जास्त आशेने बघत असतो. दुस-याच्या दयेवर विसंबणे म्हणजेच खरी निराशा. गुढगे टेंकल्याशिवाय व हात जोडल्याशिवाय आपणांस काही आशा नाही असे म्हणणा-यांपैकी मी नाही. माझ्या देशावर माझी श्रद्धा आहे. माझ्या देशबांधवांच्या शक्तीबद्दल मला आदर आहे. जर आपले आजचे ऐक्य हे खरे जिव्हाळ्याचे असेल, भारतवर्षाची जी खरी आंतरिक एकता, तिचा जीवनातील साक्षात्कार म्हणून जर आपण आजची ऐक्याची भाषा बोलत असू तर आपणास निराश होण्याचे कारण नाही. यश हे ठेवलेले आहे. परन्तु आपले ऐक्य जर खरे नसेल, आपल्यांत भेद पाडण्यासाठी परकीयांनी कोणाला अधिक देऊ करताच ते ऐक्य सोडून जर परकी सत्तेस कोणी जाऊन मिळणार असतील तर मात्र यशाची आशाच नको. परकी सत्ताधा-यांची कृपा वा अवकृपा यांवर आपले ऐक्य विसंबून राहता कामा नये.