Get it on Google Play
Download on the App Store

स्वदेशी समाज 6

ते काहींहि असो. आपले सारे कामकाज नीट करुनही शिवाय परस्पर प्रेमळ संबंधाची मधुरता जी एक असते, ती सोडून देण्यास भारतवर्ष तयार नाही. आपल्या ह्या स्वाभावामुळेंच अनाथदुबळ्यांस मदत करणे. मुलाबाळांच्या शिक्षणांची व्यवस्था करणे, वाटसरुंसाठी धर्मशाळा बांधणे, रस्त्यावर विहिरी बांधणे, अशी व इतर सार्वजनिक कामे आपण पार पाडीत असू. हा सर्व स्वजनांचा प्रश्न असे. आज ही पूर्वीची बंधने जरी शिथील झाली असली, शिक्षणाची व्यवस्था, रस्तेदुरुस्ती, पाणीपुरवठा इ. गोष्टी आपल्या मग्न समाजास आज जरी शक्य दिसत नसल्या, तरी निराश होण्याचे कारण नाही.

गृहस्थाने आपल्या घरापुरते वा आपल्या गावांपुरते पाहू नये. त्याने विशाल दृष्टीचे व्हावे. अशी हिंदुधर्माची शिकवण आहे. पंचमहायज्ञ करावे असे आपला धर्म सांगतो. पंचमहायज्ञ करावे असे ज्या गृहस्थास धर्म सांगतो, त्या गृहस्थाला आपले देशासाठी काहीच करता येणार नाही का ? आपल्या देशाच्या नावाने रोज  मूठभर तांदूळ, रोज एक पाव आणा आपणांस बाजूस काढून ठेवतां येणार नाही का ? आपल्या या थोर देशाविषयीचे जे ऐक्य तें कृतीत आणण्यासाठी सर्वांनी हातभार नको का लावावयास ? मूठभर धान्य, एक दिडकी हे का फार आहे ? ऋषींच्या तपोभूमीत, वीरांच्या कर्मभूमीत, देवांच्या या आवडत्या भूमींत एवढीशी अपेक्षा करणे म्हणजे का कठीण व्हावे ? आपल्या देशांतील सार्वजनिक सेवेच्या सर्व कर्माशी आपला संबंध नको का जोडायला ? आपली कामें आपण का परक्यावर सोपवणार आणि आपण उदासीन राहणार ?

आपल्या देशांतील संपत्तीचा प्रवाह सारखा बाहेर चालला आहे म्हणून आपण रात्रंदिवस ओरडत आहोत. परन्तु आपली मने स्वजनांपासून दूरदूर वहात चालली आहेत, ही गोष्ट त्याहून शतपट अधिक दुःखाची नाही का ? सरकारने अमुक करावे तमुक करावे एवढे सांगण्यातच फक्त आपली देशभक्ती का ? नाही. आपला हा स्वभाव नाही. दिवसभर काबाडकष्ट करुन जी चतकोर भाकर मिळेल, ती आपल्या दीदुबळ्या भावांसह खाण्याची आपली सनातन सवय आहे. आणि असे करण्यांत आपण मोठा त्याग करतो असे आपल्या मनातहि नसते. अशा प्रेमळ व कष्टाळू भारतीयांस आपल्या मातेचे का ओझे होईल ? परकी माणसाने माझ्या मातेचे दैन्य हरावे म्हणून त्याच्या दारांत का आपण भीक मागत बसणार ? छे. छे. आपणांस हे आवडणार नाही, आपल्या देशाचे ओझे प्रत्येकाने शिरावर घेतले पाहिजे. यांत आपला मोक्ष आहे. मी माझ्यापुरता असे म्हणण्याचे दिवस गेले. व्यक्ति कितीही क्षुद्र असो. तिची उपेक्षा अतःपर होता कामा नये. अत्यन्त क्षुद्राचीही अवहेलना होता कामा नये. मातेची सेवा त्यालाहि करु दे, ती सेवा थोरच आहे.

आज जर एखाद्या तरुणाला म्हटले “जा व समाजसेवेस वाहून घे-” तर तो गोंधळात पडेल. त्याने कोणते काम करावे, कोणाच्या जोरावर करावे ? त्याने काय खावे, कोठे रहावे ? असे अनेक प्रश्न त्या तरुणाच्या डोळ्यांसमोर उभे राहतील. आपल्या कार्याची योजना एका व्यक्तीस करतां येणार नाही. यासाठी संघटना हवी. एखादा आश्रम हवा. परंतु एखादी संस्था, एखादा आश्रम सुरु होतो. काम होऊ लागते. परन्तु पुढे काम टिकत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे कार्यकर्ते संस्थेशी एकरुप होत नाहीत. प्रत्येकजण आपल्यावरची जबाबदारी कमी कमी करीत जातो व संस्था लयाला जाते. अशाने कसे होणार ? ज्या परकीयांना आपणांस तोंड द्यावयाचे आहे ते अत्यंत सुसंघटित व कार्यक्षम आहेत. त्यांनी आपल्या भोवती अनेक जाळी पसरली आहेत. आपल्या देशांतील शाळांपासून तो दुकानांपर्यंत त्यांनी आपली पाळे मुळे घुसडविली आहेत. हे धृतराष्ट्राने भीमाला दिलेले आलिंगन आहे. हे कालियांचे कृष्णाभोवतीचे वेढे आहेत. या वेढ्यांतून, या मारक आलिंगनांतून मुक्त होण्यासाठी स्वदेशी समाजाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. ढिलाई दूर केली पाहिजे. शिस्त, संघटना यांची बळकट कास धरून जो एक आपण पुढारी मानू त्याच्या भोवती उभे राहिले पाहिजे. तो पुढारी आपल्या ऐक्याची खूण, तो आपल्या ऐक्याचा प्रतिनिधी. तो आपल्या ऐक्याचा सूर्य व त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालणारे आपण सारे ग्रहोपग्रह. त्याची आज्ञा शिरसा मान्य करणे व पूर्णपणे पाळेणे यांत आपणास कधीही कमीपणा वाटता कामा नये. कारण आपल्या स्वातंत्र्याचे खरे स्वरुप त्या नायकाच्या द्वारे, त्या महान् पुढा-याच्या द्वारे प्रतीत होत असते.

स्वदेशी समाज

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
स्वदेशी समाज 1 स्वदेशी समाज 2 स्वदेशी समाज 3 स्वदेशी समाज 4 स्वदेशी समाज 5 स्वदेशी समाज 6 स्वदेशी समाज 7 स्वदेशी समाज 8 स्वदेशी समाज 9 स्वदेशी समाज 10 स्वदेशी समाज 11 स्वदेशी समाज 12 स्वदेशी समाज 13 स्वदेशी समाज 14 स्वदेशी समाज 15 स्वदेशी समाज 16 स्वदेशी समाज 17 स्वदेशी समाज 18 स्वदेशी समाज 19 स्वदेशी समाज 20 स्वदेशी समाज 21 स्वदेशी समाज 22 स्वदेशी समाज 23 स्वदेशी समाज 24 स्वदेशी समाज 25 स्वदेशी समाज 26 स्वदेशी समाज 27 स्वदेशी समाज 28 स्वदेशी समाज 29 स्वदेशी समाज 30 स्वदेशी समाज 31 स्वदेशी समाज 32 स्वदेशी समाज 33 स्वदेशी समाज 34 स्वदेशी समाज 35 स्वदेशी समाज 36 स्वदेशी समाज 37 स्वदेशी समाज 38 स्वदेशी समाज 39