स्वदेशी समाज 36
हे असे माघारे येणे अगत्याचे होते. या भरतभूमीत परमेश्वर जो इतिहास घडवून आणित आहे, त्यांतील हेतु ओळखण्यासाठी असे माघारे मुरडणे आवश्यकच होते. जे आपण दुबळेपणाने, अधाशाप्रमाणे, बरे वाईट न पाहता, घेत सुटलो होतो, त्याची योग्य किंमत कळणे अशक्य झाले होते. जे श्रमाने झगडून आपण मिळवतो, त्याची महती आपण जाणतो, त्याची किंमत ओळखतो. पाश्चिमात्यांचे जे जे आले, ते आपले भरले घरांत, असे जर आपण केले असते, तर त्यांच्या विचारांचे, त्यांच्या ध्येयांचे खरे मोल आपणांस कळते न. आणि वस्तूचे मोल कळल्याशिवाय आपण तिचा जीवनांत उपयोग तरी कसा करणार? पाश्चिमात्य विचारांना, शोभेचा एक दागिना, एवढेच महत्त्व आपण देत होतो. आणि ही गोष्ट जेव्हा आपणांस कळून आली तेव्हा हे जड ओझे फेकून देण्यास आपण सिद्ध झालो.
पाश्चिमात्य विचार व ध्येये, यांच्याशी राममोहन राय एकरूप होऊ शकले. कारण पाश्चिमात्य विचारांनी ते दिपून गेले नव्हते. त्याचे हृदय दरिद्री व दुबळे नव्हते. ते स्वतःच्या भूमिकेवर उभे होते. स्वतःते भरलेले घर त्यांना होते व मिळविलेले नीट त्या घरांत ठेवता येत होते. हिंदुस्थानांतील विचारांची, ध्येयांची खरी संपत्ति त्यांच्याजवळ होती. जुना ठेवा त्यांनी दिपून जाऊन गमावला नव्हता. ते स्वतः असे ज्ञानधन असल्यामुळे, भारतीय विचारसंपत्तीने संपन्न असल्यामुळे, दुस-यांच्या विचारसंपत्तीचे मोल करण्यास त्यांच्याजवळ कसोटी होती. ज्याच्याजवळ हिरेमाणके पडलेली आहेत, तोच नवीन आलेल्या हि-याची परिक्षा करील. राममोहनरायांजवळ भारतीय ज्ञानभांडार भरपूर होत. पाश्चिमात्य विचारांची पारख करून त्यांतीलहि भर या भारतीय भांडारांत त्यांनी घातली. भिका-यांप्रमाणे हात पुढे करून स्वतःला त्यांनी विकले नाही व जे दिसेल ते न पारखता खिशांत कोंबले नाही. पाश्चिमात्य विचारांचा त्यांना बाऊ वाटला नाही. बोजा वाटला नाही. त्यांची पचनशक्ती समर्थ होती व पाश्चिमात्य विचारहि त्यांनी सहज पचविले.
आपल्या या पहिल्या थोर पुढा-यांत जी ही शक्ति होती, ती हळुहळु आपणांतहि येत आहे. नाना प्रकारच्या धडपडींतून व विरोधांतून ही शक्ति वाढत आहे. लंबकाप्रमाणे आपण त्या टोकाला जातो, कधी या टोकाला येतो. कधी कधी शतजन्मांचे जणु उपाशी अशा अधाशी पणाने पाश्चिमात्यांचे सगळेच्या सगळे आपण घेऊ पाहतो, तर कधी रागाने त्यांचे सारेच भिरकावून दूर राहू पाहतो. असे चालले आहे. परंतु यांतूनच आपल्या ध्येयाकडे आपण जात आहोत. आपले पाऊल पुढेच पडत आहे. एक दिवस असा येईल की लंबक स्थिर होईल, आपणांस योग्य ते प्रमाण सापडेल.
सारासार विवेक न करता भरमसाटपणाने ज्या शेकडो परकी कल्पना आपण घेतल्या, त्या सर्व फेकून देण्यासाठी आपण उठलो आहोत. परंतु या आपल्या असकाराचे हे एकच कारण नाही.
पश्चिम दिशा आपणांकडे अतिथि म्हणून आली आहे. अतिथीच्या या येण्यांत जो हेतु आहे, तो पुरा होईपर्यंत अतिथीला परत पाठवणे योग्य होणार नाही. या पाहुण्याला योग्य ते स्थान व योग्य तो मान दिलाच पाहिजे. पाश्चिमात्यांचा खरा मोठेपणा आपणांस कळत नाही म्हणून, किंवा पाश्चिमात्यच आपले खरे मंगल रूप येथे प्रकट करित नाही म्हणून म्हणा, किंवा आणखी काहीहि कारण असो ; जर त्यामुळे काळाचा जो हा महान् प्रवाह काही विशिष्ट हेतूने वहात आला आहे, त्याला जर धक्का घातला गेला, बांध घातला गेला, तर महान् नाश होईल यांत शंका नाही.