Get it on Google Play
Download on the App Store

स्वदेशी समाज 24

व्यक्तीला काय किंवा राष्ट्राला काय, स्वातंत्र्य, मोक्ष, हेच अंतिम प्राप्तव्य आहे. या मोक्षप्राप्तीच्या पंथांतील अडचणी आपणच आपल्या कल्पनांतून निर्मित असतो. कोळी आपल्याच धाग्यात गुरफटतो. ह्या सर्व अडचणी संयमाने, विचाराने श्रमाने व अभ्यासाने आपण दूर केल्या पाहिजेत ?

श्रम हे आपले कर्तव्य, वादविवाद नव्हे. शब्द नकोत कर्म हवे आहे. ज्या कामाने आपणांस उत्साह मिळेल असे काम केले पाहिजे. “आपण आळशी आहोत, कष्टांचा व श्रमाचा आपणांस कंटाळा आहे” हा आपणांस लागलेला कलंक आपण कामाचे पूर वाहवून धुवून टाकला पाहिजे. आपले दारिद्र्य व आपले कलह यांच्या मुळाशी आळस व कर्मशून्यता आहेत. आळशी मनुष्य दरिद्य होतो व आळशी काही उद्योग नसल्यामुळे भांडत बसतो. आपण गुलाम आहोत, कारण आपला परस्परांवर विश्वास नाही. आपणांमध्ये ऐक्य येण्यासाठी आपण स्वतःला मर्यादाशील व संयमी बनविले पाहिजे. आपण विकारी न होता विवेकी झाले पाहिजे. आपण विकारी खटपट केली पाहिजे. ख-या वीराप्रमाणे वाणी व करणी यांवर संयम ठेवण्यास शिकले पाहिजे. आपण असे न होऊ, ह्या गोष्टी जर मनापासून आपण न शिकू, तर आपले कर्मक्षेत्र हे आपले कलहक्षेत्रच होऊन बसेल !

आपल्या देशांतून जी अलोट संपत्ति आतापर्यंत इंग्रजांनी नेली व जिच्यामुळे आजचे जगांतील महनीय स्थान त्यांना लाभले आहे, त्या संपत्तीचा एक अंशहि आपणांस परत मिळणार नाही ही खातरी बाळगा. आपल्यासमोर जे काम आहे, तो पोरखेळ नाही. आपले सारे सामर्थ्य, सारी सहनशीलता, या कामी ओतावी लागेल. उगीच आरडाओरड करून, उल्लूपणा करून, दिखाऊपणा करून, आधीच असलेल्या अनन्त अडचणींत जे भर घालतील ते कार्याची हानी करतील. न डगमगता आपण सारे कार्य शिरावर घेतले पाहिजे. आपण आपले उद्योगधंदे मोकळे केले पाहिजेत. आपण आपले शिक्षण आपल्या हाती घेतले पाहिजे. आपण संघटना निर्मली पाहिजे. सहकार्य केले पाहिजे. आपण बलवान्, शीलवान्, व संयमी झाले पाहिजे. कार्य अफाट आहे. ह्या प्रचंण्ड कार्यात रक्ताचे पाणी करावे लागेल. परंन्तु उगीच बेजबाबदारपणे दंगेधोपे माजवणे योग्य होणार नाही. त्याने कार्यहानि होऊन ध्येय अधिकच दूर राहील.

मी भीतीमुळे अतिसावधानगिरीमुळे हे बोलत आहे असे नका समजू. दुःख व कष्ट म्हणजे काय ते मी जाणतो. आपत्ती ही प्रभूची देणगी आहे व तिची मी पूजा करतो. आणि दुःखाबद्दल मला आदर आहे म्हणून त्याच्याबद्दल मी गंभीरपणे विचार करू लागतो. जे दुर्बळ असतात, ते दुःखामुळे एकतर धांगडधिंगा घालतात. आदळआपट करणे निराळे व खंबीरपणे उभे राहणे निराळे. बडबड निराळी, वीरता निराळी. दुःखाला जो धडा आपणांस शिकवायचा आहे, तो जर आपण शिकू तर वरील गोष्टींतील भेद आपण ओळखू शकू.

तर मग आपण कार्याला कसा आरंभ करावयाचा ? एक गोष्ट विसरू नका की कळस जितका उंच, तितका पाया खोल असला पाहिजे. आपल्या आकांक्षाप्रमाणे राष्ट्राची इमारत जर मध्य व टोलेजग उभारावयाची असेल तर प्रत्येक जिल्ह्यातून कामाला आरंभ झाला पाहिजे. प्रांतिक सभांनी आपापल्या प्रांतात कार्य करणा-या शास्त्रीची जाळी पसरली पाहिजेत. ह्या शाखाचे पहिले काम म्हणजे बारीकसारीक सारी माहिती गोळा करणे. कोणतेहि योग्य काम करण्यापूर्वी स्पष्ट व भरपूर अशी माहिती आधी हवी.

संघटना बलवान असावी म्हणून निरनिराळे घटक तयार करून त्या घटकांनाहि बलवान् बनविले पाहिजे. प्रत्येक गाव स्वावलंबी केला पाहिजे. प्रत्येक गावात शाळा हवी, उद्योगधंद्याची शाळा हवी, धान्याची कोठारे हवीत, बँक हवी. अशा संस्था खेड्यांतून निघाव्यात व टिकाव्यात म्हणून मदत केली पाहिजे. खेड्यांतून क्रीडांगणे हवीत, एकत्र येऊन काम काज करण्यासाठी पंचायतीचे ठिकाण हवे ; वाचनालय व ग्रंथालय असावे. हे सारे काम करावयाचे आहे.

स्वदेशी समाज

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
स्वदेशी समाज 1 स्वदेशी समाज 2 स्वदेशी समाज 3 स्वदेशी समाज 4 स्वदेशी समाज 5 स्वदेशी समाज 6 स्वदेशी समाज 7 स्वदेशी समाज 8 स्वदेशी समाज 9 स्वदेशी समाज 10 स्वदेशी समाज 11 स्वदेशी समाज 12 स्वदेशी समाज 13 स्वदेशी समाज 14 स्वदेशी समाज 15 स्वदेशी समाज 16 स्वदेशी समाज 17 स्वदेशी समाज 18 स्वदेशी समाज 19 स्वदेशी समाज 20 स्वदेशी समाज 21 स्वदेशी समाज 22 स्वदेशी समाज 23 स्वदेशी समाज 24 स्वदेशी समाज 25 स्वदेशी समाज 26 स्वदेशी समाज 27 स्वदेशी समाज 28 स्वदेशी समाज 29 स्वदेशी समाज 30 स्वदेशी समाज 31 स्वदेशी समाज 32 स्वदेशी समाज 33 स्वदेशी समाज 34 स्वदेशी समाज 35 स्वदेशी समाज 36 स्वदेशी समाज 37 स्वदेशी समाज 38 स्वदेशी समाज 39