Get it on Google Play
Download on the App Store

स्वदेशी समाज 18

आपणाला जे जे पाहिजे ते सरकारने लगेच दिले तर सरकार व प्रजा यांच्यांत प्रेमाचे संबंध उत्पन्न होतील असे आपणांपैकी काहींना वाटते. परन्तु हे वाटणे अनुभवाच्या विरुद्ध आहे. एका बाजूने भीक मागणे व दुस-या बाजूने भीक घालणे-या गोष्टी संपणार कधी ? अग्नीवर तेल ओतल्याने ज्वाला शमत नाही. भिका-याला मिळत चालले म्हणजे त्याचा लोभही बळावतो व त्याचे समाधानहि कमी होते. जेथे मिळवणे हे मिळवणा-याच्या मेहनतीचे फळ नसून, दात्याच्या कृपेचे फळ असते-तेथे देता व घेता दोघांचा नाशच व्हावयाचा. दोघांचा त्यांत अधःपातच आहे.

जेथे परस्पर देवाणघेवाण असते, जेथे अन्योन्य संबंध समान दर्जाचे असतात, तेथेच प्रेमसंबंध निर्माण होण्याची शक्यता असते. भिकारी व दाता यांचा स्नेह कसा जमणार ? प्रेमाचे संबंध जोडून उभय पक्षाचा जो फायदा व्हाईल तोच खराखुरा फायदा होय. आपणांस हे केव्हा बरे शक्य होईल ? ज्या वेळेस स्वावलंबनाच्या पायावर आपण उभे राहू त्यावेळेस हे शक्य होईल. आपण आपली कामे तीव्रतेने व जिव्हाळ्याने जेव्हा करावयास उठू, तेव्हा हे शक्य होईल. आपणांस स्वतःची कामे केल्याने सामर्थ्य लाभेल, आत्मविश्वास वाटेल. दोन समर्थ व्यक्तींतील देवघेव सुंदर असते. त्या व्यवहारांत मोकळेपणा, आनंद व समाधान असते. तेथे कुणी कुणाची कीव करावयाची नसते, कोणी कुणाची मनधरणी करावयाची नसते. असे संबंध चिरस्थायी, सन्मान्य व अन्योन्यांस सुखद, हितद असे असतात. सरकारने देशासाठी काय केले याचा हिशेब मागण्यापूर्वी आपणांकडून राष्ट्र ज्या सेवेची अपेक्षा करीत आहे ती पूर्ण करणे ही गोष्ट महत्त्वाची आहे. ज्या मानाने आपण राष्ट्राला देऊ, त्या मानाने सरकारजवळ मागण्याचा आपणांस हक्क प्राप्त होईल. स्वतः सेवा न करता सरकारला जाब विचारण्याचा आपणांस अधिकार नाही. ते योग्य होणार नाही व त्याचा काडीचाहि उपयोग नाही. जो स्वतः रात्रंदिवस श्रमतो, जिवाचे रान करतो, त्यालाच दुस-यास जाब विचारण्याचा अधिकार पोचतो.

आम्ही जर राष्ट्राची खरीखरी सेवा करू लागलो तर सरकार अडथळे नाही का करणार ? अशी कोणी शंका विचारील. शंका रास्त आहे. आपल्या मार्गांत सरकार कांटे पसरणार नाही असे नाही. जेथे परस्परांची हिते एकरूप नाहीत तर उलट विरोधी आहेत, तेथे असे अडथळे येणारच. परन्तु पुढे अडचणी येतील म्हणून कामाला हात न घालणे हे चांगले नाही. प्रामाणिकपणे काम करणा-याच्या मार्गात मुद्दाम अडचणी आणून उभ्या करणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. सरकारने कृपा न करणे, आणि सरकारने आपल्या सेवाकार्यात अडथळे आणणे, ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. ह्या दोन्ही क्रिया एकरुप नाहीत. उदाहरण म्हणून स्थानिक स्वराज्याचा प्रश्न घेऊ. लॉर्ड रिपनने काही दिले व ते दुस-या एका लॉर्डने काढून घेतले. म्हणून आपण घसा बसेपर्यंत ओऱडतो. ज्यांनी दिले, त्यांनी ते परत घेतले म्हणून ओरडणे यांत काय अर्थ ? भिकेच्या तुकड्याला आपण किती महत्त्व देतो ! काय ही आपली स्थिती ! धिक्कार असो आपणाला ! आणि असल्या भिकेच्या तुकड्यांना स्थानिक स्वराज्य म्हणून आपण गौरवितो हा तरी केवढा मूर्खपणा व बावळटपणा !

आणि वास्तविक खरे म्हटले तर स्थानिक स्वराज्य आपल्या दारांत आपली वाट पहात आहे. ते कोणी द्यावयास कशाला हवे ? स्वराज्य आपल्या जवळ आहे. या स्वराज्यापासून कोणता लॉर्ड आपणांस दूर करील ? हे घरचे स्वराज्य आजवर कोणी हिरावले नाही, आणि पुढेहि कोणाला हिरावून घेता येणार नाही. आपल्या खेडेगावांना जे जे पाहिजे ते सारे आपणांस करता येईल. खेड्यामधील शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रस्ते, दवाई, पाणीपुरवठा, सारे आपण करू शकू. कामास लागावयाचाच अवकाश आहे. निश्चयपूर्वक ऐक्याने वागू व कामे करू तर कामाचे हा हा म्हणता डोंगर उठवता येतील. ही कामे करण्याला सरकारच्या परवानगीची जरूरी नाही. परन्तु आपला निश्चय अद्याप होत नाही. त्याला कोण काय करणार ? जर आपण एकत्र येऊन कार्य कऱणार नाही तर हे गोवर्धन कसे उचलले जाणार?

स्वदेशी समाज

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
स्वदेशी समाज 1 स्वदेशी समाज 2 स्वदेशी समाज 3 स्वदेशी समाज 4 स्वदेशी समाज 5 स्वदेशी समाज 6 स्वदेशी समाज 7 स्वदेशी समाज 8 स्वदेशी समाज 9 स्वदेशी समाज 10 स्वदेशी समाज 11 स्वदेशी समाज 12 स्वदेशी समाज 13 स्वदेशी समाज 14 स्वदेशी समाज 15 स्वदेशी समाज 16 स्वदेशी समाज 17 स्वदेशी समाज 18 स्वदेशी समाज 19 स्वदेशी समाज 20 स्वदेशी समाज 21 स्वदेशी समाज 22 स्वदेशी समाज 23 स्वदेशी समाज 24 स्वदेशी समाज 25 स्वदेशी समाज 26 स्वदेशी समाज 27 स्वदेशी समाज 28 स्वदेशी समाज 29 स्वदेशी समाज 30 स्वदेशी समाज 31 स्वदेशी समाज 32 स्वदेशी समाज 33 स्वदेशी समाज 34 स्वदेशी समाज 35 स्वदेशी समाज 36 स्वदेशी समाज 37 स्वदेशी समाज 38 स्वदेशी समाज 39