स्वदेशी समाज 8
ही भांडणे मिटविण्याची आपणांस शक्ति आहे हा आत्मविश्वास आपण बाळगू या. प्रेमरज्जूनें सर्वांस आवळून ठेवण्याची कला हिंदुस्थानच्या सा-या जीवनात आज शेकडा वर्षे मुरलेली आहे. नानाप्रकारच्या बिकट परिस्थितींत भारतवर्षाने पुन्हा पुन्हा सुव्यवस्था निर्माण केली आहे. आणि म्हणून तर हा थोर देश अद्याप उभा आहे. अशा या भारतावर माझी श्रद्धा आहे. भारतवर्षाच्या आजच्या परिस्थितीत सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी या, सारे या. सुखलोलुप होऊन मातेला का तुम्ही रडत ठेवणार ? तुमच्या रक्ताच शिंतोडे तिच्या अंगावर उडवणार ? छे. तसे होणार नाही व कधीही न होवो.
बाहेरच्या जगाशी भारताचा आज काही प्रथमच संबंध आला नाही. प्रथम आर्य आले व येथील रहिवाश्यांशी त्यांचे भयंकर कलह माजले. परन्तु विजयी आर्यांनी अनार्यांचे उच्चाटन केले नाही. अमेरिकेत किंवा ऑस्ट्रेलियात गो-यांनी केले तसे य़ेथे झाले नाही. मूळच्या रहिवाश्यांचे आचार विचार, चालीरीती, दैवते सारी निराळी. तरीही आर्यांच्या समाजरचनेत त्यांना स्थान मिळाले. आर्यांच्या समाजात विविधता व वैचित्र्य आणून मूळ रहिवाश्यांनीही हे ऋण फेडले.
पुढे बुद्ध काळांत भारताचा बाहेरच्या जगाशी झपाट्याने परिचय वाढत चालला. दळण वळण वाढत चालले. अशा प्रकारची मैत्री कधी कधी विरोधापेक्षाहि गंभीर स्वरुपाची असते. न कळत दुस-याच्या आहारी आपण जात असतो. ज्या वेळेस वैर नसते, झगडा नसतो, त्या वेळेस स्वसंरक्षणाचा विचारच मनांत नसतो. आरोग्य हे बेफिकीर असते. दोन घास कमी काय जास्त काय. बुद्ध काळात अशीच स्थिती झाली. हजारो लोकांशी संबंध आले. बाहेरच्या नाना जाति जमातीशी व्यवहार होऊ लागले. बुद्धधर्माचा लोढा आशियाभर पसरला व परस्पर विरुद्घ ध्येये, परस्पर विरुद्ध संस्था यांचा हिंदुस्थानांत अनिरुद्ध संचार होऊ लागला. आणि समाज विस्कळित होणार असे वाटू लागले.
परन्तु अशा त्या अंदाधुंदीच्या काळात जरी भारत दिङमूढ झाला तरी एकता व सुव्यवस्था निर्मिण्याची त्याची जी अपूर्व बुद्धी, तिचा अस्त झाला नव्हता. पूर्वी घरांत जे होते, व जे दारांत नवीन येऊन पडले होते, त्या दोहोंनी भारतीय बुद्धि आपले घर पुन्हां सजवू लागली. त्या प्रचंड विविधतेंतून तिने पुन्हा ध्येयैक्यता निर्माण केली व ती अधिकच दृढ केली. आज पुष्कळ लोक असा प्रश्न विचारतात की “भारतीय विविधतेत ऐकता कोठे आहे ? परस्परविरुद्ध व परस्परांत भेद पाडणा-या येथे शेकडा संस्था व गोष्टी आहेत.” अशा प्रश्नास निशःक करणारे उत्तर देणे जरा कठीण आहे. वर्तुळ जितके मोठे, तितके त्याचा मध्यबिंदु शोधून काढणे कठिण जाते. हा मध्यबिंदु शोधून काढणे कठिण जाते. हा मध्यबिंदु, असे चटकन् बोट ठेवता येणार नाही. त्याप्रमाणेच हिंदु समाजातील ऐक्य कोठे आहे हे दाखवता येणार नाही. तरीपण ते ऐक्य आहे ही गोष्ट मनास पटते, हृदयास ठाऊक असते.
बुद्धधर्मानंतर तिसरा प्रसंग मुसलमानांच्या आगमनाने आला. मुसलमानांचा आमच्या समाजावर परिणाम झाला नाही असे म्हणता येणार नाही. मुसलमान येतांच ऐक्य निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु झाले. तडजोड, देवाण घेवाण सुरु झाली. सलोख्याचे संबंध प्रयत्नानी निर्माण केले जाऊ लागले. निरनिराळे साधु संत झाले. रामानंद कबीर अशासारख्यांनी फार थोर कामगिरी केली आहे. वैष्णव साधुसंतांच्या खालच्या जातींतील अनुयायांनी या ऐक्याचे बाबतींत किती केले ते काळालाच माहीत. समाजांत ज्या घ़डामोडी होत असतात, त्यांच्याकडे समाजातील वरच्या वर्गांचे फारसे लक्ष नसते. या बाबतीत हे वरिष्ठ वर्ग बेफिकीर असतात. ते जर या घडामोडी पाहतील, या घडामोडीशी संबंध ठेवतील तर आजहि अशी स्थित्यंतरे समाजांत होत आहेत ही गोष्ट त्यांना दिसून येईल.