Get it on Google Play
Download on the App Store

स्वदेशी समाज 10

भारताने सत्ता गाजवण्यासाठी दुस-यांवर कधी स्वारी केली नाही. युरोपीयनांचा चंचुप्रवेश होऊ नये म्हणून चीन, जपान, तिबेट आपली दारे लावून घेत. परन्तु हिंदुस्थानासाठी त्यांनी सदैव स्वागताचे हात पुढे केले. हा लुटारु नसून ज्ञानदाता तारणारा गुरु आहे असे समजून हिंदुस्थानाला हे देश वंदन करीत. हिंदुस्थानाने दुस-यांस गुलाम करण्यासाठी कधी सैन्य बाहेर पाठवले नाही, तर शांतीचे, प्रेमाचे ज्ञानाचे धडे डोक्यावर देवून त्याने आपले शांतिदूत जगभर पाठवले. मोठमोठी अवाढव्य साम्राज्ये स्थापण्यापेक्षा, आपल्या संयमाने हे जे थोर वैभव व सत्कीर्ती भारताने मिळविली, ती अपूर्व व दिव्य तर खरीच.

परन्तु ते आपले थोर वैभव लयाला गेले. भित्रेपणामुळे चुलीजवळ जुडी करून आपण बसलो. आणि नेमक्या अशाच वेळी ब्रिटिश आले. त्यांच्या जोरदार लोंढ्यासमोर तर आणखीच दाणादाण उडाली. आपण आत आत लपत छपत जात चाललो. ते अधिकाधिक पुढे येत चालले. हा हल्ला आपण कसा परतवणार स्वसंरक्षणाची सारी साधने भंगली. आज आपण उघडे पडलो आहोत. दोनच गोष्टी आपणांस दिसतात. आपण एकेकाळी किती वैभवांत होतो, आणि आज किती भंगण भिकारी बनलो !

अतःपर भ्याडपणाची वृत्ति ठेवून चालणार नाही. सदैव माघार घेण्याचे बचाव होत नसतो. क्षणभर माघार घेऊन पुन्हा दुप्पट जोराने उठावे लागते. स्वसंक्षणाचा खरा मार्ग म्हणजे आपल्या सर्व निद्रित शक्ति जागृत करणे हा होय. स्वतःचा आत्मा जागा झाला पाहिजे. बुद्धि पेटली पाहिजे. परकीयांची नक्कल करून स्वसंरक्षण करू पाहणे ही आत्मवंचना आहे. अशा अनुकरणांत अर्थ नाही. अनुकरण म्हणजे मरण नक्कल कधीहि अस्सलाचा पराभव करु शकणार नाही. आपल्या बुद्धीचा, सदाभिरुचीचा जो –हास होत आहे, तो जर थांबवावयाचा असेल तर आपण स्वतःशीच सत्याने वागू लागले पाहिजे. आपले आपण खरे होऊ या. स्वतःशी आज आपण पारखे झाली आहोत. स्वतःची नीट ओळख करून घेऊ या. विदेशी लोकांचे सुसंघटित थवे पाहून आपल्या सर्व शक्ति जागृत झाल्या पाहिजेत. जगाला आज आपल्या ऋषींनी संयमाच्या बळावर मिळवलेल्या थोर फळांची फार जरुर आहे. ती अमोल फळे परमेश्वर वाया जाऊ देणार नाही. म्हणून तर आज योग्य वेळ येताच संकटाचा दूत पाठवून प्रभूने आपणांस जागे केले आहे.

विविधतेंत एकता पहाणे, विभिन्न सुरांत मेळ राखून दिव्य संगीत निर्माण करणे, हे हिंदुस्थानचा देवदत्त सनातन धर्म आहे. हा धर्म आपल्या रोमरोमांत भरलेला आहे. हाडीमासी खिळलेला आहे. भेद असणे म्हणजे विरोध असणे नव्हे, वैरी होणे नव्हे. कोणी परकी दिसतांच त्याला शत्रू मानणे हे योग्य नाही, अशी भारतवर्षाची सनातन सांगी आहे. भारताने त्याप्रमाणे आचरणहि ठेवले. परक्यांच्या ठायी त्याने शत्रूता मानली नाही. परक्यांला दारांतून हांकलून लाविले नाही. कोणाचा नाश करीत नाही. ती कोणत्याही पंथाचा सर्वस्वी तिरस्कार करित नाही. निरनिराळ्या ध्येयांतील भव्यता व दिव्यता ती पाहू शकते. प्रत्येक ध्येयांत, प्रत्येक पंथांत काही तरी संदेश असतोच व भारताला तो पाहण्याची सवय झाली आहे. निरनिराळ्या ध्येयाची एकवाक्यता करण्यासाठी भारताची सदैव खटपट चाललेली असते.

हिंदुस्थानच्या ठिकाणी ही अपूर्व ऐक्यवृत्ति असल्यामुळे हिंदु, मुसलमान, ख्रिश्चन यांना आपणांपैकी वरचढ कोण होणार या विचाराने झगडावयास नको. भारतमाता सर्वांना पोटाशी धरील, तिच्या घरी कोणसही प्रतिबंध नाही. यामुळे आपले हिंदुत्व जाईल असे नका समजू. उलट वातावरण अधिक यथार्थतेने हिंदुमय होईल. निरनिराळे अवयव भिन्न भिन्न दिसले तरी हृदय भारतीयच राहील.

स्वदेशी समाज

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
स्वदेशी समाज 1 स्वदेशी समाज 2 स्वदेशी समाज 3 स्वदेशी समाज 4 स्वदेशी समाज 5 स्वदेशी समाज 6 स्वदेशी समाज 7 स्वदेशी समाज 8 स्वदेशी समाज 9 स्वदेशी समाज 10 स्वदेशी समाज 11 स्वदेशी समाज 12 स्वदेशी समाज 13 स्वदेशी समाज 14 स्वदेशी समाज 15 स्वदेशी समाज 16 स्वदेशी समाज 17 स्वदेशी समाज 18 स्वदेशी समाज 19 स्वदेशी समाज 20 स्वदेशी समाज 21 स्वदेशी समाज 22 स्वदेशी समाज 23 स्वदेशी समाज 24 स्वदेशी समाज 25 स्वदेशी समाज 26 स्वदेशी समाज 27 स्वदेशी समाज 28 स्वदेशी समाज 29 स्वदेशी समाज 30 स्वदेशी समाज 31 स्वदेशी समाज 32 स्वदेशी समाज 33 स्वदेशी समाज 34 स्वदेशी समाज 35 स्वदेशी समाज 36 स्वदेशी समाज 37 स्वदेशी समाज 38 स्वदेशी समाज 39