Get it on Google Play
Download on the App Store

स्वदेशी समाज 13

इंग्लंडचे हे जे वास्तविक स्वरूप, त्यामुळे हिंदी जनतेचा फायदा होणार की नुकसान ? संकटात सर्वात अधिक आवश्यकता जर कशाची असेल तर ती सत्यदृष्टीची. सत्यदर्शन झाल्याशिवाय राष्ट्राला आशा नाही. जे आपण स्वतःच्या प्रयत्नांनी मिळवले पाहिजे, ते अर्जविनंत्या करून मिळणार नाही. जेथे अखंड सेवेनेच यश येईल, तेथे शब्द खर्च करणे म्हणजे मूर्खपणा आहे. हे कठोर सत्य पुनःपुन्हा संकटे व कष्ट पाठवून तो परमात्मा आपणा हिंदी जनांस शिकवू पहात आहे. प्रयत्न व अखंड सेवा- ही दोन साधी सत्ये जोपर्यंत आपणांस कळत नाहीत, कळून जीवनात उतरत नाहीत, तोपर्यंत दुःखापाठीमागून दुःख आपणांवर कोसळत राहील. अपमानापाठीमागून अपमान आपणांस सहन करावे लागतील.

आपल्या वाढत्या ऐक्यावर परकी सरकार भीतीने, संशयाने वा अन्यकारणाने जर घाव घालू लागले, त्या ऐक्याचे बाबतींत अडचणी मुद्दाम आणू लागले तर त्याविरूद्ध आपण आरडा ओरडा करणे हे फारच वाईट आहे. आरडा ओरडीने काम होत तर नाही उलट अधिक बिघडते. “ब्रिटिशांच्या साम्राज्यांत राहण्यांतच आम्हांस कृतकृत्यता वाटेल” असे तुम्ही कितीही गोडगोड शब्दांत इंग्रजांस सांगितले म्हणून का त्या शब्दांवर ते विश्वास ठेवतील ? ते का इतके दुधखुळे आहेत ? कितीहि गोड व कुशल शब्दरचना करा. त्या गोष्टीवर इंग्रजांचा विश्वास बसणार नाही. आज वा उद्या तुम्ही स्वतंत्र होऊ पाहणार ही गोष्ट तो पूर्णपणे जाणून आहे. परन्तु आपणांस ही स्वातंत्र्याची तहान कितीही लागली असली तरी ही गोष्ट स्पष्ट आहे की जोपर्यंत हिंदुस्थानांत अस्तित्वांत असणा-या शेकडो जाति व पंथ, नानाधर्म व नाना परस्परविरुद्ध गोष्टी यांच्यामध्ये मेळ निर्माण करात येत नाही, जोपर्यंत या सर्वांत आपणांस खरे आंतरिक जिव्हाळ्याचे ऐक्य निर्मिता येत नाही, तोपर्यंत ब्रिटिशांच्या संबंधाची आपणांस जरूर आहे. ते ऐक्य निर्माण झाल्यावर त्या संबंधाची आपणांस जरूर नाही.

अशी वस्तुस्थिती असल्यामुळे स्वार्थी इंग्रजांना जर असे वाटले की हे ऐक्यच होऊ द्यावयाचे नाही, हे ऐक्य रूजू द्यायचे नाही, वाढू द्यायचे नाही, तर आपण काय करणार ? स्वतःचे आसन अचल राखण्यासाठी, स्वतःची जरूरी तुम्हा आम्हांस सदैव भासविण्यासाठी इंग्रज आपणांस एकमेकांशी भांडावयास लावील, आपणांत स्पर्धा लावून दुही राखील. इंग्रज हे करणारच. लाकूडतोड्या कु-हाड पाजळून झाडावर घाव घालू लागताच जर ते झाड गयावया करून म्हणू लागले “नको रे घाव घालू. माझी फांदी तुटेल” –तर तो लाकुडतोड्या काय म्हणेल ? तो म्हणेल “मला माहीत आहे तुझी ती फांदी तुटेल. परंतु त्यासाठीच तर मी उभा आहे. तेच माझे काम.” त्या लाकूडतोड्याकडे शिष्टमण्डळे नेऊन झाडांनी चर्चा करित बसण्यांत काही अर्थ आहे का ?

आपणाला वाटते की इंग्रजाजवळ वाद विवाद करून त्याला पटवून दिले म्हणजे झाले काम! तिकडे ते पार्लमेंटमध्ये वादविवाद करितात हे आपण इकडे इतिहासांत शिकतो, वर्तमानपत्रांत वाचतो. त्यांच्याकडे एकपक्ष दुस-याला उत्तर देतो. विजयी पक्षास आनंद होतो. तिकडच्या अशा गोष्टी वाचून आपणांसही वाटते की वादविवादांतील जय म्हणजेच खरा जय. परन्तु त्यांच्यामधील व आपल्यामधील फरक आपण विसरतो. इंग्लंडमध्ये ते पक्ष एकाच शरीराचे डावे उजवे भाग असतात. एकच शक्ति त्या दोन्ही पक्षांस पोषित असते. तसा प्रकार येथे आहे का ? सरकारची येथील सत्ता व आपली सत्ता एकाच उगामापासून उत्पन्न झालेल्या आहेत का ? तेंच झाड हलवल्याने आपणां दोघांस तीच फळे मिळतात का ? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मिल् काय म्हणतो, स्पेन्सर काय म्हणतो, सीलीनें काय लिहिले आहे. मोलेंचे काय मत आहे हे नका पाहू. तो क्रमिक पुस्तके, परक्यांनी लिहिलेली ती पुस्तके दूर ठेवा. राष्ट्राचे पुस्तक डोळ्यासमोर उघडे आहे व खरे उत्तर तेथे लिहिलेली आहे.

थोडक्यात सार म्हणजे असे की राजा बोलतो व दळ हालते. धनी सांगतो तसा सूर लागतो. आपण काही धनी नाही. परन्तु वादविवादाचीच ज्याला हौस, त्याचे एवढ्याने समाधान होणार नाही. “आपण इतके कोटी रूपये कर देतो. आपल्याच पैशावर सरकार चालते. आपण आपल्या पैशांचा हिशेब नको का मागायला” वगैरे तो बोलतच राहतो. परन्तु या आपल्या देशांत सरकार जवळ हिशेब मागणे म्हणजे आपल्या धन्याची पोरे लठ्ठ करण्यासाठी गाय जे दूध देते, त्या दुधाचा हिशेब शिंगे उगारून तिने मागण्याप्रमाणे आहे. गाय का बरे असा हिशेब मागत नाही ? आणि जर ती विचारील तर काय बरे होईल?

स्वदेशी समाज

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
स्वदेशी समाज 1 स्वदेशी समाज 2 स्वदेशी समाज 3 स्वदेशी समाज 4 स्वदेशी समाज 5 स्वदेशी समाज 6 स्वदेशी समाज 7 स्वदेशी समाज 8 स्वदेशी समाज 9 स्वदेशी समाज 10 स्वदेशी समाज 11 स्वदेशी समाज 12 स्वदेशी समाज 13 स्वदेशी समाज 14 स्वदेशी समाज 15 स्वदेशी समाज 16 स्वदेशी समाज 17 स्वदेशी समाज 18 स्वदेशी समाज 19 स्वदेशी समाज 20 स्वदेशी समाज 21 स्वदेशी समाज 22 स्वदेशी समाज 23 स्वदेशी समाज 24 स्वदेशी समाज 25 स्वदेशी समाज 26 स्वदेशी समाज 27 स्वदेशी समाज 28 स्वदेशी समाज 29 स्वदेशी समाज 30 स्वदेशी समाज 31 स्वदेशी समाज 32 स्वदेशी समाज 33 स्वदेशी समाज 34 स्वदेशी समाज 35 स्वदेशी समाज 36 स्वदेशी समाज 37 स्वदेशी समाज 38 स्वदेशी समाज 39