इसवी सन
आज जगात मुख्यत्वे वापरात असलेले कॅलेंडर म्हणजे इसवी सन. ख्रिस्तजन्मापासून याची सुरवात मानली जाते पण त्याची खात्री देता येत नाही. ही कालगणना पूर्णपणे सौरवर्षाची आहे. महिन्यांचाहि चंद्राशी काही संबंध नाही. वर्षाचे ३६५ दिवस बारा महिन्यांमध्ये कमीजास्त वाटलेले आहेत. मात्र ३-३ महिन्यांत ते साधारण सारखे आहेत. प्रत्यक्षात ही कालगणना ज्युलियस सीझरने ख्रिस्तापूर्वी ४५ वर्षे आधी सुरू केली तेव्हा त्याला ज्युलियन कॅलेंडर नाव होते. वर्षाचे ३६५ दिवस होते. लीप इयरचीहि पद्धत होती मात्र लीप इयर दर तीन वर्षानी घेतले जाई. इ. स. ३६ पर्यंत यामुळे जादा दिवस मोजले गेल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा रोमन राजा ऑगस्टस याने ती दुरुस्त केली, जादा मोजलेले दिवस गाळले व लीप इयर ४ वर्षानी येऊ लागले. मात्र १००, २००, ३०० ही वर्षेहि लीप इयर मोजली गेल्यामुळे इ. स. १५८२ पर्यंत दहा दिवस जादा मोजले गेले होते असे दिसून आले. म्हणून पोप ग्रेगरी याने त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात असा फतवा काढला की ऑक्टोबर महिन्यात ४ तारखेनंतर दहा दिवस गाळावे व एकदम १५ तारीख घ्यावी. तसेच शतकाचे शेवटचे वर्ष लीप इयर घेऊ नये पण १६००, २००० ही वर्षे लीप इयर घ्यावी. तेव्हापासून हाच नियम लीप इयर बद्दल वापरला जातो. या सुधारणेनंतर या कॅलेंडरचे नाव ग्रेगेरियन कॅलेंडर असे पडले पोपचा फतवा त्याच्या अमलाखालील कॅथॉलिक राष्ट्रांनी लगेच अमलांत आणला. ब्रिटन, स्वीडन या प्रॉटेस्टंट राष्ट्रांनी मात्र १७० वर्षांनंतर १७५२-५३ मध्ये हा बदल केला. रशिया, ग्रीस ही राष्ट्रे कॅथॉलिक खरी पण त्यांचे ग्रीक चर्च हे पोपच्या लॅटिन चर्चपेक्षा वेगळे त्यामुळे रशियाने कम्युनिस्ट राज्यक्रांतीपर्यंत हा बदल केला नव्हता. तथाकथित ऑक्टोबर क्रांति प्रत्यक्षात नोव्हेंबरमध्ये झाली! ग्रीसने तर १९२३ मध्ये हा बदल अमलात आणला. युरोपातील या तथाकथित पुरोगामी राष्ट्रांनी हा आवश्यक बदल स्वीकारण्यास एवढा दीर्घ काळ घेतला.