संपादकीय
आपणा सर्वांना दिवाळीच्या तेजोमय शुभेच्छा!
लाख दिव्यांच्या उधळत ज्योती, आली ही दिवाळी,
ती येता सार्यांच्याच मनास हर्ष होतो भारी...
फराळ, फटाके, कपड्यांचा थाटच असे वेगळा,
कंदिल, पणत्या, रोषणाईचा रंगच असे न्यारा...
दिवाळी अंकाच्या सोबतीने साजरा करु हा आनंद सोहळा...
दिवाळीच्या बाबतीत कुणीतरी या ओळी अगदी बरोबरच लिहिल्या आहेत. अश्विन महिन्याची चाहूल लागली की आपल्याला दिपोत्सव साजरा करण्याचे वेध लागातात. दिवाळीत आवलेल्या पणत्या, दिव्यांची रोषणाई आणि आनंदी वातावरण यांनी आपल्या मनातील आणि बाहेरचा अंधार दूर होतो आणि आपले आयुष्य प्रकाशमय होतं. घरातील साफसफाई, आकाशकंदिल बनवणे, दिवे रंगवणे, रांगोळी काढणे, फराळ बनवणे हे तर आपण करतोच, पण दिवाळीची खरी रंगत वाढते ती या दरम्यान येणा-या दिवाळी अंकांमुळे. वेगवेगळ्या विषयांवरचे प्रतिभावान लेखकांचे लेख, कथा, कविता आणि मनोरंजक माहिती यांनी दिवाळी अंक भरगच्च भरलेला असतो. दिवाळी अंक म्हणजे वाचकांसाठी फराळा बरोबरची मेजवानीच असते आणि अर्थ मराठी ई-दिवाळी अंक 2015 आपल्यासाठी ही मेजवानी घेऊन आला आहे.
सदर संकल्पनेच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर हा ई-दिवाळी अंक वाचत आहात. अर्थ मराठीचा तिसरा ई दिवाळी अंक आपल्यासमोर सादर करत असताना मला अतिशय आनंद होत आहे. जगभरातील मराठी लेखक आणि वाचक यांचा समन्वय घडवून आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की, या वर्षी देखील मोठ्या संख्येने परदेशातून दिवाळी अंकासाठी लेख आले होते, त्यातील अनेक साहित्य वगळत असताना वाईट वाटत होतेच, पण विषयाचे बंधन नसल्याने प्रत्येक साहित्यीक आपले विचार येथे मनमोकळेपणाने मांडू शकतो आहे.
दिवाळी अंकातील लेख वाचत असताना आपल्याला डॉ.भगवान नागापुरकर यांचे दोन बालकांची पत्रे आणि मंगेश सपकाळ यांचा पॉर्न हा लेख खुप वेगळा वाटेल, अनेक जनांना पॉर्न हा लेख आवडणार देखील नाही, लेखकाने स्वतः तो लेख संपादित करुन प्रकाशित करण्याची मला पुर्ण परवानगी दिली होती, परंतु विषयाला कात्री लावण्यापेक्षा नक्की म्हणने काय आहे हे वाचकांपर्यंत पोहोचने चांगले, आणि वाचक सुशिक्षीत असल्याने आपला सदर लेखावर आक्षेप नसेल याची मला पुर्ण खात्री आहेच.
अनेक वाचकांनी मला व्हॉट्सअॅप वरील लेख दिवाळी अंकामध्ये प्रकाशित करण्याची विनंती केली, परंतु ही गोष्ट चैकटीत बसत नसल्याने मी त्या सर्व वाचकांना नकार कळविला, परंतु शक्य त्या सर्व प्रकारे चर्चा करुन आणि ते सर्व लेख वाचून आपणांपर्यंत त्यातील चांगले विचार पोहोचावे या दृष्टीने केवळ सादरकर्ते म्हणून आम्ही ते लेख प्रकाशित करत आहोत. कारण,
जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करुन सोडावे सकळ जन।।
आपलाच
अभिषेक ज्ञानेश्वर ठमके
संपादक