Get it on Google Play
Download on the App Store

ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय – एक मनःपटलावरील युद्ध

लेखक - सिद्धेश प्रभुगावकर

(अभियांत्रिकी करताना लिहिलेला लेख)

हिंदी चित्रपटसृष्टी (Bollywood) आणि Hollywood चित्रपटसृष्टी यांची तुलना करणे कठीण असं म्हणण्यापेक्षा ते गैरवाजवी ठरेल! कारण Bollywood मध्ये वर्षात आठशे वर चित्रपट प्रदर्शित होत असले तरी चित्रपटाच्या लायकीला उतरणारे हाताच्या बोटावर मोजण्यसारखे असतात. त्यबाजुने Hollywood मध्ये वर्षिक ३०० ते ४०० चित्रपट निघतात. पण त्यतील बहुतेक चित्रपट कलात्मक असल्यामुले प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात आणि म्हणूनच त्यांच्या पसंतीला उतरतात.

काही अपवाद वगळता चित्रपट कथा, अभिनय, background effects, special effects यांतही Bollywood चित्रपट Hollywood चित्रपटांपेक्षा खूप मागे आहेत. माझ्या एका मित्राने म्हटल्याप्रमाणे – Hollywood चित्रपटांत गाणी न घुसवता त्यांचा एक album release केला जातो; तसंच Bollywood चित्रपटात गाणी दाखविण्यापेक्षा त्यांचा एक album करावा.  Bollywood चित्रपट बहुतेक एकाच theme वर आधरलेले असल्याकरणाने प्रेक्षकांच्या ह्रदयाचा ठेका चुकवू शकत नाहीत. तरीही Bollywood चित्रपटांचा व्यवसाय ठीक चालतो.

हा चित्रपट पाहिल्यावर माझ्या मनात उत्स्फुर्तपणे खालील विचार आले-

माणूस किती वर्षं जगला यापेक्षा तो कशाप्रकारे जगला याला महत्त्व आहे. स्वतःसाठी जगला तो मेला, दुसर्‍यांसाठी जगला तो जगला.

Once a great player comes, to write against your name;

Not whether you lost or won, But how you played the game!

‘ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’हा चित्रपट म्हणजे युद्धकाळातील एका पुलाच्या निर्मितीची आणि त्याच्या नाट्यमय विनाशाची कथा. तसेच पुलाच्या बांध्णीच्या निमित्ताने जपानी कर्नल स्सयटो व ब्रिटिश कर्नल निकोल्सन यांच्यातील तात्त्विक संघर्षाची ही कथा! जीवनाकडे बघण्याच्या विविध दृष्टिकोनांच दर्शन घडवणारा हा चित्रपट!

सन १९४३! दुसर्‍या महायुद्धाचा काळ! घनदाट जंगलातील जपान्यांचा एक कॅम्प – कॅम्प नं. १६. तेथे रेल्वेच्या रूळाचे काम चालू आहे. ब्रिटिश युद्धकैद्यांची एक बटालियन तेथे कामासाठी आणली जाते. कॅमेरा हळूहळू जथ्थ्यावरून फिरतो. कुणाचा हात तुटलेला. तर कुणाचा पाय, कुणाचे कपडे फाटके, तर तर कुणाच्या फासळ्यावर आलेल्या, पायातील बुटांचीही अशीच दशा! कँपजवळ येताच मात्र शिस्तबद्ध मार्चिंगला सुरूवात, पार्श्वभूमीला शिट्टीवरील मार्चिंगचे संगीत! जणू पराभूत झालेल्या तुकडीचं मनोबल वाढवण्याचं कामच ते करतं. शरीरयष्टीने लहानपण ताठ व्यक्तीमत्त्वाचा करारी निकोल्सन, कर्नल सायटोला आपली ओळख करून देतो. सायटोही आपली ओळख कँपप्रमुख म्हणून दिमाखात करून देतो. इकडे मार्चिंग तालात सुरूच! ‘विश्राम’ची सूचना मिळाल्यावरच सर्व थांबतात. काही जखमी सैनिक खाली कोसळतात. त्यांचे जोडीदार त्यांना सावरतात.

कर्नल सायटो सर्वांसमोर जोरदार भाषण ठोकतो, “बँकॉक ते रंगून या रेल्वेमार्गांचे काम चालू आहे, तुम्हां ब्रिटिश कैद्दांना येथे कामासाठी आणले आहे. काम चांगलं केलंत तर चांगली वागणूक मिळेल अन्यथा शिक्षा! तुकडीतील सर्व अधिकर्‍यांनीही काम करायलाच हवं!” यावर निकोल्सन त्याला जिनिव्हा कराराची आठवण करून देतो. त्यातील एका कलमानुसार, अधिकार्‍यांना शरीरिक कष्टाचे काम देऊ नये, असे म्हटल्याचे सांगतो.

 

त्याच वेळी अमेरिकन कमांडर शिअर्स व लेफ्टनंट जिनिग्ज तात्पुरत्या रुग्णालयात बसून काय भानगड चाललीय याचा अंदाज बांधतात. दोघेही अंगानं धडधाकट असतात. पण इथे काम करुन काय फायदा?, असा विचार करून दोघेही रुग्णाचं सोंग घेऊन वावरतात.

सायटोच्या मते तो ठरवेल तो कायदा! त्याच वेळी तो धोक्याची सूचना देतो, ’कुणीही पळायचा प्रयत्न करु नका. येथे घनदाट जंगलात तुम्ही आहात. एक तर आमचे सैनिक तुम्हाला पकडतील अन्यथा येथील निसर्गच! एक दिवस विश्रांती घ्या अन् उध्यापासून कामाला लागा.’

सर्वजण आपल्या बराकीत जातात. रात्री धो-धो पाऊस पडतो; पण निकोल्सनला त्याची पर्वा नाही. आपल्या पराभूत सैनिकांचं मनोधैर्य त्याला टिकवायचं आहे. त्यासाठी तेथील तात्पुरत्या रुग्णालयाला तो भेट देतो. तेथील इतर अधिकार्‍यांना जागविण्याचा प्रयत्न करतो. तेथे त्याला भेटतो अमेरिकन कमांडर शिअर्स! एका बोटीतून जाताना त्यांची बोट फुटते अन्हा वाचतो; पण येऊन पोहोचतो सायटोच्या युद्ध कैद्यांच्या कँपवर! आजारी म्हणून सवलत घेऊन राहाणं त्याला जास्त पसंत! निकोल्सन त्याला आपल्या अधिकार्‍यांच्या चमूत सामील करून घेऊ पाहातो; पण त्याच्या डोक्यात पलायनाचे विचार पक्के! निकोल्सन आपल्या अधिकार्‍यांना बजावतो, ”आपल्या सैनिकांच्या मनात आपण सैनिक आहोत्, ’गुलाम’ नाही; ही भावना जागी राहायला हवी”.

कर्नल सायटो ‘ब्रिटिश प्रिझनर्स’ असे संबोधत त्यांची मानहानी करण्याचा प्रयत्न करतो. ‘आपले अधिकारी हमाली काम करणार नाहीत, ’ या कायद्याच्या भूमिकेवर निकोल्सन ताठ. सर्व ब्रिटिश सैनिक कामाला जातात; पण अधिकारी मात्र तसेच असहकार पुकारून उभे! कर्नल निकोल्सनही! सूर्य चढतोय! त्यांच्यावर सायटोच्या सैनिकांच्या बंदुका रोखलेल्या! रुग्णालयातील डॉक्टर क्लिप्टन आणि सर्व रुग्ण हे दृश्य पाहताहेत. कर्नल सायटो जरी अरेरावी करत असला तरी इतका निर्ढावलेला नाही! संध्याकाळ होते. युद्धकैदी परततात. मुद्दाम त्यांच्या डोळ्यांदेखत सर्व अधिकार्यांना Punishment Hut मध्ये डांबण्यात येते; तर निकोल्सनला एका पत्र्याच्या बंद झोपडीत! पण सैनिकांचे मनोधैर्य खचत नाही. सामूहिकपणे ते ‍आपल्याने त्यच आता खरे धर्मयुद्ध सुरु-‘सुसंस्क्रुत जगाचे युद्धाचे नियम, कायदे तुम्ही पाळत नसाल तर तुमची आज्ञा माझे अधिकारी पाळणार नाहीत’-निकोल्सन्ची ठाम भूमिका. एक शिस्त त्याच्या रक्तात भिनलेली. कुठल्याही परिस्थितीत आपल्या सैनिकांनी भेकडपणे पळून जाऊ नये. येथे कायदा नसेल तर आपण तो आणू. पराभूत असलो तरी सैनिक म्हणून मानाने काम करू.’ हे त्याचे सांगणे.

इकडे अमेरिकन कमांडर शिअर्स, लेफ्टनंट जिनिग्ज व दोन कैदी पळून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यात शिअर्स सोडून सर्व मारले जातात. शिअर्स पळताना उंचावरून खाली वाहत्या नदीत पडतो. तो बुडून मेला, अशी सैनिकांची समजूत; पण त्याचं नशीब – नव्हे दुर्दम्य इच्छाशक्ती किंवा जीवनेच्छा प्रबळ म्हणा – म्हणून एका सुंदर बेटाला तो लागतो व तेथील आदिवासी त्याला मदत करतात. पुरेसे खायला – प्यायला व एक होडकं देऊन प्रेमाने पाठवणी करतात.

त्या बाजूने निकोल्सनच्या सैनिकांनी असहकार पुकारलेला. काम तर ते करतात; पण अगदी मंदगतीने, मुका निषेध दाखवीत. कर्नल सायटोवर वरिष्ठांकडून पुलाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी दबाव आहे, त्यातच चालू काम पुनःपुन्हा कोसळते आहे. त्याची सर्व बाजूंनी कोंडी झालेली. तो ही कर्नल निकोल्सन वर वेगवेगळ्या प्रकारे मानसिक दबाव आणू पाहतो आहे.

डॉ.क्लिप्टनला निकोल्सनच्या भेटीला पाठविले जाते, तेही कर्नल सायटोची पूर्वपरवानगी घेऊनच! त्याच्या सहकार्‍यांनी त्याच्यासाठी छोट्या भेटी दिलेल्या. पाण्याने भरलेला नारळ, काही खाद्दपदार्थ चोरून, राखून ठेवलेले. बंद पेटी चे दार उघडले जाते. क्षणभर उजेडाने निकोल्सन्चे डोळे दिपतात. ल्किप्टन त्याला सांगतो की, जर अधिकार्‍यांनी कान केले नाही तर रुग्ण कैद्दांना कामाला जुंपले जाईल अन्त्यांचं काही बरंवाईट झाल्यास त्याची जबाबदारी निकोल्सनवर राहील.

क्लिप्टनचे पाय जमिनीवर आहेत – तो निकोल्सनला विनवतो, “सर, रुग्णांनी काम करून मरणं आणि अधिकार्‍यांना कैदेत अन्न न मिळाल्याने मरण येणं, यापेक्षा त्यांनी काम केलेलं काय वाईट?”

पण निकोल्सन आपल्या भूमिकेवर ठाम, “माझ्या एकाही अधिकार्‍याला मजुरासारखं हीन दर्जानं वागवलेलं मला चालणार नाही.”

क्लिप्टन त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो,” सर, आपण खूप दूर – हजारो मैल पसरलेल्या जंगलात अडकले आहोत. इथे सायटोचाच कायदा चालणार. तो म्हणेल ते करून दाखवेलच. आपल्या जिवाचं काही बरंवाईट झालं तर कोण विचारणार आहे आपल्याला? कृपा करून हट्ट सोडा. आता सायटोच्या दृष्टीनेही हा त्याचा आत्मसन्मानाचा प्रश्न बनला आहे. तुम्ही या भूमिकेत फार काळ राहू शकत नाहीत.” तरीही निकोल्सन आपल्या तत्त्वावर ठाम!

 

पुलाचे काम पूर्ण करण्याची तारीख जवळ येते आहे. सायटो त्याच्या बांधकामात तज्ज्ञ अशा ले.म्यूरोकडून काम काढून घेऊन स्वतः नेतृत्व करू पाहतो. पण व्यर्थ! शेवटी नाईलाजाने क.निकोल्सनला कोठडीतून बाहेर काढून तो त्याची भेट घेतो. घनदाट अंधार्‍या रात्री; तरीही अंधाराला हजारो डोळे फुटलेले, सर्व सैनिक ही भेट पाहताहेत.

आपापला आब, ताठा राखत दोघांचे सवाल-जवाब होतात. निकोल्सन त्याला म्हणतो, “माझे दोन अधिकारी या कामात अत्यंत कुशल आहेत. आमचे सैनिक आमच्याच अधिकर्‍याच्या हाताखाली व्यवस्थित काम करतील.” तो सायटोचे आव्हान स्वीकारतो – दिलेल्या चेळात पुलाचे काम पूर्ण करण्याचे! सायटोला नाईलाजाने ते मान्य करावेच लागते.

शरीराने दुबळा झालेला निकोल्सन लडखळत्या पावलांनी; पण ताठ मानेने बाहेर पडतो. ब्रिटिश यद्धकैद्यांत आनंदाचे वातावरण; तर अवमान झाल्याच्या दु:खाने सायटो वेडा पिसा – धायमोकलून एकांतात रडतो. सर्व अधिकार्‍यांची सुटका होते. मोठ्या जोमाने नियोजन सुरू होते; उपलब्ध साधनसामग्रीचे तसेच उपलब्ध मनुष्यबळाचे. आपल्या अधिकार्‍यांच्या बैठकीत निकोल्सन म्हणतो, “आपल्या बटालियनला एकत्र बांधून, गूंतवून ठेवण्यासाठी ‘पुलाचे बांधकाम’ हे उद्दिष्ट साधन म्हणून वापरू.”

पुलाची पाहणी होते, तेव्हा रिव्हच्या लक्षात येते की पूल फार ठिसूळ जमीन असलेल्या ठिकानी बांधला जातो आहे. त्यामुळे बांधकाम टिकत नाही. पुलाची जागा बदलली जाते. भक्कम एल्म वृक्षाचे भरपूर लाकूड जंगलात उपलब्ध असते. ते वापरायचे ठरते. युद्धकैद्यांमध्ये त्यांचा नेता परत आल्यने उत्साहाचे वातावरण-आता काम दुप्पट वेगाने सरू होते. सायटो आता त्रयस्थ नजरेने सगळीकडे लक्ष ठेवून आणि निकोल्सन पूल पूर्ण करण्याच्या ध्येयाने भारलेला!

अशाच एका क्षणी डॉ.क्लिप्टन आणि क. निकोल्सन यांच्यातील एक अविस्मरणीय संवाद – “सर शत्रूचा पूल इतक्या उत्तम पद्धतीने बांधायचा तुमचा आटापिटा कशासाठी?” क्लिप्टनच्या या प्रश्नावर निकोल्सन म्हणतो- “अरे तुला दिसत नाही का, आपल्या लोकांचं मनोधैर्य वाढलंय, शिस्त वाढलीय. त्यांची अवस्था सुधारलीय; ते आनंदात आहेत.”

“ते खरंय सर, पण तरीही आपण जे काम करतो ती शत्रूशी हात मिळवणी तर ठरत नाही ना?”

“आपण युद्धकैदी आहोत. आपण काम नाकारू शकत नाही.”

“ते खरंच सर, पण एतकं परिपूर्ण काम करायला हवंच का?”

“हे बघ क्लिप्टन तू एक डॉक्टर आहेस. इथे सायटोवर शस्त्रक्रिया करायची वेळ आली असती तर तू ती नीट केली असतीस, की त्याला मरू दिलं असतंस? आपली बटालियन आळसाने गांजून विखुरली गेली तर तुला कसं वाटेल? या लोकांना आपल्याला दाखवून द्यायचंय की धाकद पटशानं आपली शरीरं वा आत्मा ते नाही मोडू शकत. युद्ध एक दिवस संपेल; पण येणार्‍या भविष्यात लोक हा पूल वापरतील आणि आपली आठवण काढतील. कैद्यांनी नव्हे तर सैनिकांनी केलेलं नेटकं काम म्हणून – ब्रिटिश सैनिकांनी युद्धकैदी असतानाही केलेलं काम!”

क. निकोल्सनचे हे परिपक्व विचार थक्क करणारे!

तिकडे सुरूवातीला पळून गेलेला कमांडर शिअर्स हा आता सिलोनला हॉस्पिटलात आराम करतो आहे.तेथील Force-316 या दोस्त राष्ट्रांच्या बटालियनचा प्रमुख मेजर वॉर्डन याला त्याची माहिती कळते.शिअर्स खरं तर कमांडर नाहीच. बोट बुडाल्यानंतर क. शिअर्स मृत्युमुखी पडलेला.त्याचे नाव धारण करून सायटोच्या कँपवर तो सवलती मिळवण्याचा प्रयत्न करतो; पणव्यर्थ! मात्र, पुढेही त्याने हे च सोंग चालू ठेवलेले असते.Force-316 ला पूल बांधणीचे चालू असलेले काम उद्ध्वस्त करायचे आहे.खरेतर निकोल्सनही त्यांच्यातलाच; पण शिस्त म्हणून, नियमाचे पालन करायचे म्हणून, पुलाच्या उभरणीत सर्वस्व ओततोय आणि त्या पुलाचा वापर करून जपानी सर्वत्र हात पाय पसरतील म्हणून त्याच्याच वरिष्ठांच्या आज्ञा आहेत. घनदाट जंगलातील तो कँनं. १६ – शिअर्स येथे राहून आलेला, पळताना तेथील आदिवासींशी दोस्ती झालेला.त्यालाच वाटाड्या करायचे ठरते.

मे.वॉर्डन, कमांडर शिअर्स, उत्तम पोहणारा जोईस हे त्रिकूट या कामावर निघतं.पॅराशूट्च्या साहाय्यानं जंगलात उतरणं, रातोरात झाडं तोडत नदी पार करणं, वाटेत जळवा, जंगली साप भेटतातच; पण आता थोडा वेळ उरलेला.धुवांधार पाऊस पडत असतो.पहिली गाडी येण्याच्या क्षणी पूल उअडवायचाच! सगळे अहोरात्र वाटचाल करताहेत…

इकडे पुलाचं काम पुरं होत आलं आहे; पण तरी ठरलेल्या वेळात काम पूर्ण होणं अवघड वाटू लागलं आहे.अधिकार्‍यांना हमाली काम करण्याची सक्ती होऊ नये म्हणून सुरुवातीला तत्त्वासाठी झगडणार्‍या निकोल्सनचे अधिकारी आपणहून काम करायचं ठरवतात; एवढंच काय रुग्णालयातले रुग्ण्ही मदतीला सज्ज होतात. यथा शक्य सर्वांच्या प्रयत्नांतून साकार होतो तो अतिशय देखणा, मजबूत असा पूल!

वाटेत मे.वॉर्डन जखमी होतो.सर्वांची चाल मंदावते; पण त्याला सोडून पुढे जाण्याची आज्ञा क. शिअर्स मानत नाही.बिकट वाटेने धबधब्याच्या अंगाने चढतते नियोजित स्थळी पोहोचतात. वॉर्डन आणि शिअर्स मधील संवाद ही खूप बोलका आहे.

शिअर्स म्हणतो, “तो निकोल्सन एक वेडा.तुम्हीदुसरे! नियमांवर, शिस्तीवर तुमचं ईतकं प्रेम की  त्यासाठी तुम्ही मरायलाही तयार व्हाल. पण त्या पेक्षा माणसारखं जगावं हे महत्त्वाचं नाही का? मी तुम्हाला मरु देणार नाही मेजर, तुमचे नियम बियम मला माहीत

नाहीत. आपण एकत्रच वाटचाल करू; जगू किंवा मरू.” (इथे एक गोष्ट मला आवर्जून नमूद करावीशी वाटते- माणसानं सिंहासारखं जगावं किंवा आणखी कोणासारखं जगावं असे अनेक लेखक लिहितात. पण माणसानं माणसारखं किंवा स्वतःसारखं जगावं असे क्वचित सांगतात.)

त्याला फांद्यांच्या स्ट्रेचरवर घालून शिअर्स निघतो. अखेर दूरवर पूल दृष्टिपथात येतो.

एक रात्र त्यांच्या हातात आहे. योजनेप्रमाणे काम सुरू होते. एका तराफ्यावर सामान टाकून जॉईस पुलाखाली सुरुंग लावण्याच्या कामावर निघतो. रात्रभर धुवांधार पाऊस पडतो. नदीचे पात्र फुगलेले; नदीच्या पलीकडच्या तीरावर एका खडकाआड सुरुंग उडविण्याचे यंत्र ठेवलेले.

त्याच वेळी पूर्ण झालेल्या पुलावर कठड्याला टेकून निकोल्सन चिंतनात मग्न! २८ वर्षांच्या नोकरीतील कारकीर्द डोळ्यांसमोर उभी. तिकडून सायटोही येतो.‘उत्कृष्ट कलाकृती!’ म्हणून पुलाची स्तुती करतो. हे मान्य करायला खरं तर मनाला क्लेश होतात; पण सायटो हा काही खलनायक नाही. सर्व कैदी पूल पूर्ण झाल्याच्या जल्लोषात, त्यात गाण्यांचा आवाज, मध्येच पाण्याच्या वाहत्या प्रवाहाचा खळखळाट, पुलावर गस्तीचे आवाज आणि पुलाखाली त्याच्या विध्वंसाची चाललेली तयारी… क्षणभर प्रेक्षकांच्याही काळजाचा ठेका चुकतो.

आपल्या सैनिकांसमोर भाषण करताना निकोल्सन म्हणतो, “आपण घरी जाऊ, तेव्हा अपल्या या कामाचा आपल्याला मनातून अभिमान वाटेल. सैनिक आणि नागरिक, सर्वांना तुम्ही कामाचा आदर्श घालून दिला आहे. कैदेतही तुम्ही ताठ मानेने जगलात; त्यामुळ पराभवातही आपला विजय झाला आहे. मित्रांनो अभिनंदन!”

सकाळ उजाडते. पहिली आगगाडी पुलावरून जाणार – जाईस पूल उडविण्यास सज्ज! पण हाय! आता पाऊस थांबल्याने पाणी ओसरलेले. सुरुंग लावून तीरावर आणलेली वायर स्पष्ट दिसते आहे, वरून कुणाच्या लक्षात आलं तर… सगळ्यांच्या हृदयाचा ठेका चुकतो आणि नेमकं तसंच घडतं.

पुलाची अखेरची पाहणी करायला आलेल्या निकोल्सनच्या नजरेला ती पडतेच. काहीतरी काळंबेरं आहे हे लक्षात येऊन सायटोला घेऊन तो खाली येतो. वायर हातात घेऊन पैलतीरावर पोहोचतो. आगगाडी पुलावर येऊन ठेपते. अन्शिअर्सने केलेल्या हल्ल्याने लडखडणारा निकोल्सन सुरुंग पेटविण्याच्या दांड्यावर पडतो. ज्या हातांनी पुलाचं स्वप्न साकारलं, त्याच हातांनी एका क्षणात ते छिन्नविछिन्न होतं. पत्त्यांचा बंगला कोसळावा तसा स्फोटांच्या आवाजात पूल कोसळतो. केवढी ही दैवदुर्गती! डॉ.क्लिप्टन दुरून हे पाहातोय, विदीर्ण मनाने! तर मेजर वॉर्डन वेगळ्याच भावनेने!

माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे तसेच त्याच्या स्वभावाचे अनेक कंगोरे उत्कृष्टरित्या दाखवणारा हा चित्रपट.

अर्थ मराठी दिवाळी अंक २०१५

अभिषेक ठमके
Chapters
संपादकीय प्रस्तावना अमेरिकेतील एक डेटिंग सेंटर (डेटींग - मनाची उकल संकल्पना) कुटुंबाचा आधारवड जगा आणि जगू द्या! ईश्वराने लिहीलेलं... आपलं आयुष्यं...! दोन बालकांची पत्रे ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय – एक मनःपटलावरील युद्ध अश्रुधार शिक्षणाचा बोजा (नाना पाटेकर) जे तुला शिकता आले नाही… अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम... श्रद्धा सर्वांनी लक्षात ठेवावे असे... सामन्याने पाहिलेले असामान्य स्वप्न नाते समृद्ध होण्यासाठी... जमिनीवर बसून जेवणाचे फायदे स्वर्ग आणि नरक आहाराविषयी ‘ओम’ नाम चांगली विचारधारा Marathi Status दिवाळी नमू प्रारंभी गणेश दंगल साम्राज्य...! गूढ मनाच्या खेळी खेळ...! शिवबाची कृपा छत्रपती शिवाजी धरणीमाता क्षण मी व राजकारणी भरत उपासनींच्या चारोळ्या तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल आळस