Get it on Google Play
Download on the App Store

आळस

लेखक - राज धुदाट

‘आळस हा माणसाचा शत्रू आहे.’ हे  वाक्य मी प्राथमिक शाळेत शिकत असतांना आमच्या वर्गातील भिंतीवर लिहिलेलं वाचलं आणि ते वाक्य  कितीतरी  वेळा आमच्या शिक्षकांनी आमच्याकडून म्हणूनही घेतलं होतं, पण आळसावर कसा विजय मिळवायचा हे मात्र त्यांनी कधीच शिकवलं नाही. म्हणून हे वाक्य केवळ आमच्यासाठी एक घोकमपट्टीचं झाली होती. पण नंतर प्रत्यक्ष जेव्हा या शत्रूशी सामना व्हायला लागला तेव्हा कळालं की, आळस आपल्याला गरीबीत ठेवणारा ‘नंबर एकचा’ शत्रू आहे. या शत्रूवर विजय मिळवला नाहीतर तो आपल्याला व आपल्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांना गरीबीत ठेवू शकतो.

मला काही दिवसांपूर्वी एकजण भेटला; आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली, पण त्या व्यक्तीचा आणि कामाचा छत्तीसचा आकडा होता. आळस त्याचा मित्र होता म्हणून तो इच्छा असूनही गरीबीतून बाहेर पडू शकला नाही. आळशी व्यक्तींची लक्षणे काय आहेत? आळस आपल्याला गरीबीत कसा ढकलतो? आळसावर कशी मात करायची?  इ. प्रश्नांवर आपण सविस्तर माहिती घेऊया.

आळशी व्यक्तीची लक्षणे कोणती ?

१.     आळशी व्यक्ती निद्राप्रिय असतो. - झोप शरीरासाठी आवश्यक आहे. साधारणपणे  ७ ते ८ तास  झोप आपण घ्यायला पाहिजे. आपल्याला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपली झोप मदत करते. पुरेशी झोप मिळाल्यास आपण नेहमी उत्साही व सक्रीय राहू शकतो. परंतु आळशी व्यक्ती अति झोपतो तो निद्राप्रिय असतो. ७ ते ८ तासाची झोप झाली तरीही आळशी व्यक्तीला वाटते आणखी थोडावेळ झोपावे, थोडीशी डुलकी घ्यावी व हात उराशी धरून थोडं झोपावे. आळशीपणातून मिळणारे हे सुख त्याला फार आवडते. बिछाण्यावर लोळण्यात त्याला आनंद वाटतो. सकाळी ८, ९ किंवा १० वाजेपर्यंत आपल्या बिछाण्यावर  लोळत असतो. आळस त्याला घोर निद्रेंत लोटितो; दरवाजा आपल्या बिजागऱ्यावर फिरतो, तसा आळशी आपल्या अंथरूणावर लोळतो. दरवाजाला जसे बिजागऱ्यावर एका ठिकाणीच खिळून ठेवलेले असते तसे आळशी स्वत:ला बिछाण्यावर खिळून ठेवतो. (नीति २६:१४) घडयाळाचा गजर त्याच्या झोपेपुढे काहीच उपयोगाचा ठरत नाही. त्याच्या आळसामुळे तो इतका सुस्त होतो की अंथरूणातून  बाहेर पडण्याचा त्याला फार कंटाळा येतो. अंथरूण त्याला सर्व गोष्टीहून प्रिय असते. घरातील वडीलधाऱ्या मंडळींची शिस्त त्याला त्याच्या झोपाळू स्वभावामुळे कडू वाटते. आळशी व्यक्तीला जांभया देत झोप काढायला विशिष्ट वेळ लागत नाही. कामाच्या ठिकाणी सुद्धा तो कामाविषयी नव्हे तर फक्त आपल्या झोपेविषयी जास्त विचार करतो आणि संधी मिळताच डुलकी घेतो.

२.    आळशी व्यक्ती वेळ वाया घालवतो. - वेळ पैसा आहे (Time is money) असे आपण वारंवार ऐकत आलो आहोत. खरंतर  वेळ  पैसा  आहे  हे पूर्णपणे  बरोबर नाही कारण वेळ ही पैशापेक्षा  कितीतरी पट जास्त  मौल्यवान  आहे  कारण  पैसा  खर्च  होतो  आणि  तो परत कमविला जाऊ शकतो. पण वेळ एकदा निघून गेली की कोणतीही किंमत देऊन परत आणता येत नाही.

आळशी व्यक्ती वेळेला शून्य लेखतो. वेळ त्याच्या दुष्टीने मूल्यहीन असते. आजची कामं उद्यावर ढकलणं व मी हे काम नंतर करेन असं त्याचं नेहमीचचं म्हणणं असते.  तो आपल्या कामात हयगय करतो. (नीति १८:९) एखाद्या मुलाखतीला जायचे असल्यास मुलाखतीचा दिवस जवळ येईपर्यंत कोणतीच तयारी न करता वेळ वाया घालवतो. आळशी विद्यार्थी अभ्यासाच्या व्यतिरिक्त नको त्या गोष्टी करण्यात आपला मौल्यवान वेळ वाया घालवतो. परीक्षा तोंडावर आली की त्याला जाग येते. वेळेचं त्याला महत्व वाटत नाही.

आळशी व्यक्ती आपल्या मित्रांसोबत चौकात, चहाच्या टपरी जवळ, इंटरनेट कॅफेत किंवा एखाद्या हॉटेलमध्ये बसून अनेक तास वायफळ गप्पा मारतो. आवडीचा खेळ, सिनेमा किंवा मालिका बघण्यात आळशी व्यक्तीचा अख्खा दिवस कधी - कधी काहीच काम न करता निघुन जातो. वेळेचे भान त्याला राहत नाही.  फेसबुकवर प्रमाणापेक्षा जास्त वेळ खर्च होत आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. मोबाईलला त्याचे कान किंवा बोटे चिकटलेली  असतातचं. कामाच्या ठिकाणी, शाळेत, कॉलेजमध्ये, प्रार्थनेला किंवा एखादा कार्यक्रम असो आळशी नेहमी उशिराच पोहचतो. काम करण्यासाठी अख्खं आयुष्य पडलं आहे. टेन्शन नही लेने का! नशिबात असेल ते पूर्ण होईल. अशी वाक्ये सदैव त्याच्या मुखात असतात. 

३.     आळशी व्यक्ती अंधविश्वासू असतो;  काम न करण्यासाठी त्याच्याकडे अनेक कारणे असतात. - आळसी व्यक्तीला काम न करण्याचं निमित्तचं लागते. आळशी व्यक्ती  वर्तमानपत्रात आपल भविष्य वाचतो त्यात लिहिलेलं असते. आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा आहे. आवक असमाधानकारक असेल. आजच्या कामात अपयश मिळण्याची शक्यता आहे. क्वचित समोरच्या व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे. आज केलेल्या कामात यश मिळणार नाही इत्यादी. आपलं भविष्य  वाचून आळशी व्यक्ती ठरवतो की, आज माझं भविष्य मला सांगते, आज केलेल्या कामात मला यश मिळणार नाही म्हणून  मी आज अमुक अमुक काम करणार नाही. आळशी व्यक्ती म्हणतो हिवाळा आला थंडी वाजते. आत्ता  मी नांगरणी करणार नाही.  (नीति २०:४)            

काम पाहताच ते अशक्य असल्याची तक्रार करणं आळशी व्यक्तीचा स्वभाव आहे. एखादे काम जर आळशी व्यक्तीला सांगितले तर  आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे; भररस्त्यावर मी ठार होईन. मला ते काम करता येत नाही”        (नीति २२:१३) आळशाची वाट कांटेरी कुंपणासारखी  असते. नकारात्मक विचारानेच तो आपले जीवन चालवतो (नीति १५:१८) मला नोकरी मिळणार नाही असा त्याचा नकारात्मक विचार असतो म्हणून  आळशी कामाच्या शोधात जात नाही. मी अपयशी होईल, लोक मला हसतील ही त्याची भावना असते.  आळशी मनुष्य, काम करावे लागू नये म्हणून वाटेल ती सबब सांगण्यास कमी करीत नाही.

४.       आळशी व्यक्ती दुसऱ्याचा सल्ला ऐकत नाही . - दुसऱ्याचा सल्ला न घेणे हे आळसी व्यक्तीचे आणखी एक लक्षण आहे. समजा सल्ला ऐकला तर तो कृतीत आणत नाही. कितीही ज्ञानी लोकांनी योग्य उत्तर किंवा सल्ला दिला तरीही आळशी स्वतःला शहाणा समजतो. (नीति २६:१६)  त्याला वाटते लोकांनी माझे ऐकावे माझ्या कल्पनांचा स्विकार करावा व त्यानुसार कार्य करावे. पण जो कोणी आळशाचे ऐकतो तो स्वत:ला नाशाच्या आणि अपयशाच्या खाईत ढकलतो. 

मत्तय २५:१४ – ३० मध्ये प्रभू येशूने रुपयांचा दाखला दिला तो खालील प्रमाणे आहे... परदेशी जाणाऱ्या एका मनुष्यानें आपल्या दासांना बोलावून त्याच्यांवर आपली मालमत्ता सोपवून दिली. एकाला त्यानें पांच हजार रुपये, एकाला दोन हजार रुपये, व एकाला एक हजार रुपये असें ज्याच्या त्याच्या  योग्येतेप्रमाणे दिले; आणि तो परदेशी निघून गेला. ज्याला पांच हजार मिळाले होते त्यानें लागलेच जाऊन त्यांवर व्यापार केला व आणखी पांच हजार रुपये मिळविले. तसेंच ज्याला दोन हजार रुपये मिळाले होते त्यानेही आणखी दोन हजार रुपये मिळविले; परंतू ज्याला एक हजार रुपये मिळाले होते त्यानें जाऊन  जमीन खणली व तींत आपल्या धन्याचा पैसा लपवून ठेवला. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून  हिशोब घेऊं लागला. तेव्हा ज्याला पांच हजार रुपये सोपवून दिले होते तो म्हणाला, “महाराज आपण मला पांच हजार रुपये दिले होते; पाहा त्यावर मीं आणखी पांच हजार रुपये मिळविले आहेत.”  त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास भल्या व विश्वासू दासा, तूं थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन; तु आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.

ज्याला दोन हजार रुपये सोपवून दिले होते तोही म्हणाला, “महाराज आपण मला दोन हजार रुपये दिले होते; पाहा त्यावर मी आणखी दोन हजार रुपये मिळविले आहेत.” त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास भल्या व विश्वासू दासा, तूं थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी  पुष्कळावर नेमणूक करीन; तु आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.

नंतर ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, “महाराज, मी जाणून होतो कीं, तुम्ही कठोर माणूस आहां; जेथें तुम्हीं पेरिलें नाहीं तेथें कापणी करितां व जेथे पसरून ठेविलें नाही तेथून गोळा करितां; म्हणून मीं भ्यालो  व तुमचे एक हजार रुपये मी जाऊन जमिनींत लपवून ठेवले होते; पाहा ते तुमचे तुम्हांला  मिळाले आहेत.” तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले; “अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मीं पेरिलें नाही  तेथें कापतों व पसरून  ठेवलें नाहीं तेथून गोळा करितो हें तुला ठाऊक होते काय? तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे होतें, म्हणजे मी आल्यावर माझें मला व्याजासकट परत मिळाले असते.” शेवटी त्या आळशी दासाला बाहेरील अंधारात टाकले गेले; जेथे रडणें व दात खाणे  चालते.

वरील दाखल्यावरून आपणाला शिकायला मिळते की, पहिल्या व दुसऱ्या दासाला धन्याने शाबासकी दिली त्यांना त्यांनी केलेल्या कष्टाचे प्रतिफळ मिळाले परंतू तिसऱ्या दासाला त्याच्या आळशीपणाची शिक्षा मिळाली त्याच्याकडे  चालून आलेल्या संधीच त्याला सोनं करता आलं नाही. इतरांचा सल्ला घेणे त्याला महत्वाचे वाटले नाही. खरंतर त्याने पहिल्या व दुसऱ्या दासाला विचारायला हवे होते की त्यांना मिळालेल्या पैशाचे ते काय करणार आहेत? कदाचित त्यांनी त्याला मदत केली असती.

बरेच जण या आळशी दासाप्रमाणे वागतात. पाळकांचा, कुटुंबातील वडिलधाऱ्या मंडळीचा, आपल्या शिक्षकांचा, अधिकारी वर्गाचा, आपल्या क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी मंडळीचा सल्ला घेणे त्यांना योग्य वाटत नाही. स्वतःला वाटेल तसा निर्णय घेतात आणि शेवटी काम अपूर्ण राहते किंवा अपयश पदरी पडते.

एकदा एक तीसच्या आसपास वय असलेला एक व्यक्ती  माझ्या दारापुढे येऊन भिक मागू लागला. मी नाही म्हंटले तरीही; मी त्याला काहीतरी द्यावे म्हणून त्याने आग्रह धरला. मला त्याला काहीच देण्याची इच्छा नव्हती कारण तो धडधाकट होता. तीन वेळा नाही म्हटले तरीही पाच रुपये तरी द्या असे त्याने म्हटल्यावर, “तुम्ही धडधाकट आहात काही काम का करीत नाही?’’ असा प्रश्न मी त्या व्यक्तीला केला. “द्यायचे असेल तर दे उगाच शहाणपणा शिकवू नकोस”. असे बोलून तो रागाने निघून गेला.  त्याचा आळशी स्वभाव त्याला  दारोदारी भिक मागायला लावत होता हे त्याला  माझ्याकडून कदाचित ऐकायचे नव्हते.

५.    आळशी व्यक्ती फक्त बोलतो काम करत नाही. - आळशी व्यक्ती नुसते बोलण्याचं काम करतो पण प्रत्यक्षात तो निष्क्रिय असतो. देवाचे वचन सांगते कोणतेही काम असो ते जर मनापासून केले तर  आपल्याला त्यात यश हमखास मिळते. (नीति १४:२३) पण आळशी हात चालवण्यात कमी पडतो आणि वटवट करण्यात पहिला नंबर मिळवितो.  

आळशी माणसे कधी - कधी असे बोलतात की, शहाण्या व्यक्तीला देखील त्याच्या अर्धवट ज्ञाना पुढे शांत व्हावे लागते. एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. एक आळशी मुलगा आरामात खाटेवर बसलेला असतो. त्याचे वडीलयेऊन आपल्या आळशी मुलाला उपदेश करू लागतात. आणि बोलता बोलता ते म्हणतात. माणसांने खूप काम करावं, खूप पैसे मिळवावे खूप मोठं व्हाव, चांगल नावं कमवाव आणि मग आपले उरलेले आयुष्य आरामात घालवाव.त्यावर आळशी मुलगा म्हणतो "मग मी आत्ता काय करतोय?"

६.   आळशी व्यक्ती अर्धवट कामे करितो. - खाण्यासाठी अन्न मिळणे ही एक आशीर्वादित गोष्ट आहे. पण आळशी आपले हात त्यात घालतो व आळसपणामुळे त्याला ते अन्न खातायेत नाही. आळशी आपला हात ताटांत घालतो, तो परत तोंडाकडे  नेण्यास त्याला श्रम वाटतात. (नीति २६:१५) कोणीतरी मला भरवावं अशी त्याची अपेक्षा असते.

देवाच्या मंडळीत देवाचा सेवक आत्मिक अन्न तयार करून देवाच्या लोकांना आपल्या संदेशाद्वारे भरवत असतो पण जे आळशी आहेत ते त्याच्या आळशीपणामुळे आत्मिक अन्न ग्रहण करू शकत नाहीत. पवित्र शास्त्र उघडणे काहींसाठी अवघड होते.

आळशी शिकारीला निघतो शिकार करतो पण तो ती शिकार घेऊन येणार नाही. कधी ती शिकार स्वच्छ करू; शिजवून खायला बराच वेळ लागेल असे विचार त्याच्या डोक्यात येतात म्हणून केलेली शिकार तो तेथेच सोडून देतो. त्याच्या अंगी असलेला आळस त्याला कोणतच काम पूर्ण करू देत नाही. अर्धवट काम करणे हे आळशाचे वैशिष्ट आहे.    (नीति १२:२७)

कधी - कधी असे होते की, आपण एखाद्या मिटींगला जातो.  वक्ता आपल्याला उत्तेजन देतो.  त्याचा संदेश ऐकून आपण फार प्रभावित होतो किंवा एखादे  पुस्तक वाचून आपण स्वतःला बदलण्याचा विचार करतो. उद्या पासून मी अमुक - अमुक  गोष्ट नित्यनियमाने करणार असा संकल्प करतो. कामसू व्यक्ती केलेल्या संकल्पाप्रमाणे कृती करतो आणि यशस्वी  होतो; परंतु आळशी व्यक्तीच्या बाबतीत उलटेच घडते. ठरवल्याप्रमाणे आळशी व्यक्तीचे  दोन - चार दिवस व्यवस्थितपणे पार पडतात आणि मग जैसे थे! अशी स्थिती निर्माण होते. आळशीपणामुळे त्यांचे सर्वच संकल्प अधुरे राहतात.

 आळशी असल्याचे तोटे

१.    आळशी व्यक्तीची स्वप्ने पूर्ण होत नाहीत. - प्रत्येकाला वाटते की, मी कोणीतरी मोठा व्यक्ती व्हावे. माझ्याकडे ह्या  गोष्टी असाव्यात, त्या गोष्टी असाव्यात. मी अनेक सुख सुविधांनी वेढलेला असलो पाहिजे. आळशी लोकही अशा चांगल्या जीवनाची अपेक्षा करतात  पण ती पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष मात्र काहीच करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या जिवाला हाव असली तरीही त्यांना काहीच मिळत नाही. त्यांचे हात त्यांना काम करू देत नाहीत. मला चांगली नोकरी मिळावी ही आळशी व्यक्तीची इच्छा असते पण त्याचे आळशी पाय नोकरीच्या शोधात बाहेर पडत नाहीत. परंतू जो उद्योगी असतो त्याचा जीव पुष्ट होतो. (नीति १३:४, २१:२५) आळसाने  घराचे  छप्पर खालीं येतें; हाताच्या सुस्तीने घर गळतें. (उपदेशक  १०:१८)

२.    आळशी व्यक्तीची उपासमार होते. - आळशी व्यक्ती काही कामधंदा न करता नुसता फिरत बसतो म्हणून त्याच्यावर उपाशी राहण्याची पाळी येते. (नीति १९:१५) त्याच्या भौतिक गरजा भागत नाहीत, शिवाय आत्मिकरित्या देखील त्याला उपाशी रहावे लागते. प्रार्थनास्थळी किंवा एखाद्या सभेला जाताना तो पवित्र शास्त्र घेऊन जात नाही. समजा गेला तर वही किंवा पेन त्याचाकडे नसते. संदेश लिहून घेताना त्याचे हात दुखतात त्याला त्यात रस नसतो.             (नीति १९:१५) वेळीच पेरणी न केल्यामुळे शेवटी हंगामाच्या वेळी त्याला भिक  मागण्याची वेळ येते आणि त्याला भिक देखील कोणीच देत नाही.

३.     आळशी व्यक्ती  गरीब होतो  /  राहतो. - सैल हातानें काम करणारा दरिद्री होतो, परंतू  उद्योग्याचा हात धन मिळवितो. (नीति १०:४) आपल्या कामात हयगय करणारा स्वतःची नासधूस करून घेतो. (नीति १८:९) आपल्या आळसामुळे आलेल्या गरीबीतून बाहेर पडणे अशक्य होते. निद्राप्रिय व्यक्ती भिकेला लागतो परंतू जो झोपेवर ताबा मिळवतो तो पोटभरून खातो (नीति २०:१३)

दरोडेखोर आणि सशस्त्र मनुष्य दोन्ही कोणत्याही क्षणी कोणालाही पकडू शकतात. दरोडेखोर जेव्हा एखाद्या ठिकाणी दरोडा टाकतात तेव्हा ते ठिकाण पूर्णपणे उध्वस्त करतात त्या ठिकाणी असलेली मालमत्ता हडप करतात शिवाय काही वेळेला एखाद्याला शारिरीक दुखापत करतात किंवा  एखाद्याचा खून करतात. दरोडेखोराप्रमाणेच गरीबी आळशी व्यक्तीच्या जीवनात प्रवेश करते. त्याचं भौतिक, आत्मिक व शारिरीक जीवन नष्ट करते. अशा आळशी व्यक्तीला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे व गरीबी हत्यारबंद माणसाप्रमाणे गाठते. कधी-कधी तो व्यक्ती आयुष्यभर गरीबीतच राहतो . गरिबीतून बाहेर पडणे त्याला नको वाटते.

४.    आळशी व्यक्तीला कधीच बढती  मिळत नाही. - जे लोक उद्योगी असतात ते आयुष्यात पुढे जातात. त्यांच्या हाती अधिकार येतो, जो आपल्या कामात चपळ असतो त्याला राजासमोर स्थान मिळते हलकट लोकांसमोर उभे राहण्याची त्यावर पाळी येत नाही,  पण जे आळशी आहेत त्यांना दास्य प्राप्त होतें. त्यांचा चा आळसपणा त्यांना मालक होऊ देत नाही. (नीति १२:२४, २२:२९)  नेहमीच शारिरीक कामे त्यांना करावी लागतात. आळसपणा त्यांना खालच्या पातळीवर ठेवतो. ज्याच्या हाताखाली आळशी काम करतो त्याला देखील त्याचा त्रास होतो. जशी आंब दांतांस, जसा धूर डोळ्यास, तसा सुस्त मनुष्य आपल्या मालकास असतो.  (नीति १०:२६)

आळशाला एखादं काम करायला पाठवलं तर तो होईल तितक्या कमी वेळेत कमी श्रमात करण्याचा प्रयत्न करतो. काम बरोबर होईल की चुकीचे याकडे त्याचे लक्ष नसते, तर या कामातून मी कधी एकदाचा मोकळा होईन याकडे लक्ष असते. ज्याने त्याला काम सांगितले ती व्यक्ती त्याची नावडती बनते. आळशी व्यक्ती आपल्या आळसामुळे आपल्या मालकाच्या नजरेतून उतरतो. देवाने नेहमीच उद्योगी लोकांची संदेष्टा /  सेवक म्हणून नेमणूक केल्याचा उल्लेख पवित्र शास्त्रात केलेला आहे.   

दानीएल कष्टाळू होता. त्याची देवावर गाढ श्रद्धा होती. नबुखद् नेस्सर राजाला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ त्याने सांगितला व त्यासाठी त्याने सर्व गौरव देवाला दिला. स्वतःला त्याने देवापुढे नम्र केले. दानीएल म्हणाला, “देवाचे नाव युगानयुग धन्यवादित असो; कारण ज्ञान व बल हीं त्याचीच आहेत; तोच प्रसंग व समय बदलतो; तोच राजांस स्थानापन्न अथवा स्थानभ्रष्ट करितो; तो ज्ञान्यांस ज्ञान देतो  व बुद्धिमानांस बुद्धी देतो. तो गहन व गूढ गोष्टी प्रकट करितो; अंधारात काय आहे हे त्याला ठाऊक असते; त्याच्या जवळ प्रकाश वसतो.”

दानीएलाने नबुखद् नेस्सर राजाच्या स्वप्नाचा अचूक अर्थ सांगितल्याने राजानें दानीएलास बढती दिली, त्याला मोठी इनामे मिळाली, त्याला सगळ्या बाबेल परगण्याची सत्ता दिली आणि त्यास बाबेलाच्या सर्व ज्ञानी लोकांच्या प्रमुखाचा अध्यक्ष केले. (दानीएल २:४८)

योसेफाला त्याच्या जीवनात अनेक संकटाला सामोरे जावे लागले. त्याच्या स्वतःच्या भावांनी त्याला जीवे मारण्याचा  प्रयत्न केला. शेवटी त्याला गुलाम म्हणून विकून टाकले. इजिप्त देशात राहत असतांना देखील संकटानी त्याचा पिच्छा सोडला नाही. तरीही योसेफ देवाला भिऊन वागला प्रत्येक कामात त्याने प्रामणिकपणा  दाखविला आणि शेवटी योग्यवेळी त्याला उच्च पद मिळाले. इजिप्तचा राजा फारो योसेफास म्हणाला, “देवानें तुला ह्या सर्व गोष्टीचे ज्ञान करून दिले त्या अर्थी तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. तर तु माझ्या घराचा अधिकारी हो; तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल, राजासनापुरताच तो  मी तुजपेक्षा मोठा.” (उत्पती ४१:३९-४२)

कल्पना करा योसेफाने देवावर अविश्वास दाखविला असता, त्याला मिळालेल्या कामात हयगय केली असती, देवाशी व अधिकाऱ्याशी अप्रमाणिक वागला असता, आळसात आयुष्य घालवले असते  तर हे चांगले दिवस त्याला पाहायला मिळाले असते का?

५.    आळशी व्यक्ती देवाची सेवा करु शकत नाही. - आळसात राहणारे लोक देवाच्या पसंतीस उतरत नाहीत. देव अशा लोकांना पाचारण करितो जे आपल्या व्यवसायात किंवा कामात कष्ट करतात व विश्वासू राहतात. पवित्रशास्त्रातून अशी  अनेक उदाहरणे देता येतील;

१.  योसेफ:- योसेफाला स्वप्न पडलं तेव्हा तो फक्त सतरा वर्षाचा तरुण होता व आपल्या भावंडासोबत कळप चारत होता. (उत्पती ३७ )

२.  मोशे:- मोशेला देवाने पाचारण केले तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याची मेंढरे विश्वासूपणे राखीत होता. (निर्गम ३:१-२)

३.  यहोशवा:- मोशेच्या जागी पुढारी म्हणून देवाने यहोशवाची निवड केली पण त्याअगोदर अनेक वर्ष मोशेच्या हाताखाली काम करत होता. (यहोशवा १:१-२)

४.  गिदोन: - इस्रायल लोकांची मिध्यानी लोकांपासून सुटका करण्यासाठी देवाने गिदोनाची नेमणूक केली आहे हे सांगण्यासाठी देवदुताने गिदोनाला दर्शन दिले तेव्हा तो शेतात काम करत होता.          (शास्ते ६:११)

५. अलीशा:- एलीयाने अलीशाला पाचारण केले तेव्हा अलीशा आपल्या शेतामध्ये बैलांसोबत कष्ट करीत होता. (१ राजे अ. १९)

६. दावीद:- शमुवेल इशायाच्या मुलांपैकी एकाला अभिषेक करण्यासाठी गेला तेव्हा दावीद मेंढरांना राखीत होता.(स्तोत्र ७८:७०)

७.  पेत्र , योहान व याकोब :-  प्रभूने त्यांना पाचारण केले तेव्हा ते आपली जाळी नीट करत होते. ( मत्तय ४:१८-२२)

८.  मत्तय:- मत्तय व्यवसायाने जकातदार होता प्रभूने पाचारण केले तेव्हा तो कर गोळा करत होता. ( लूक ५:२७-२८)

९.  आमोस :-  आमोस मेंढपाळ होता

पवित्र शास्त्रातील या सर्व उदाहरणांवरून आपल्याला समजते की, देवाने आळशी माणसाला सेवेकरिता पाचारण केलेले नाही. ज्यांना कोणाला देवाने पाचारण केले ते सर्वचजण आपापले काम करण्यात व्यस्त होते. आपण करत असलेल्या व्यवसायात किंवा नोकरीत कष्टाळू व विश्वासू असावे अशी देवाची इच्छा आहे.  देवाची सेवा करण्याचा आशीर्वाद आळशी माणसाला कधिच मिळत नाही.

 आळशी व्यक्तीशी कसे वागावे?

देवाच्या वचनातून त्यांना बोध करा. कारण दोष दाखविणें सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरीतां देवाचे वचन  उपयोगी आहे .हवे असेल तर थोडसे कठोरतेने वागा. पौलानेही थेस्सलनीका येथील मंडळीला अशी आज्ञा केली होती कीं, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्यानें खाऊंही नये. तरी जे कित्येक अव्यवस्थीतपणानें वागणारे असून ते कांहींएक काम न करिता लुडबुड करितात, अशा लोकांनी स्वस्थपणें काम करून स्वतःचेंच अन्न खावें.  (२ थेस्सलनी ३:१०-१२) कशाचीही गरज पडू नये म्हणून आपापला व्यवसाय करा आणि आपल्या हातांनी काम करा, ह्याची हौस तुम्हांला असू द्या. (१ थेस्सलनी ४:११-१२) आळशी व्यक्तीला योग्य वेळीच चूक दाखवून दिली नाही तर त्याला वाटते की तो जे काही करतो ते योग्यच आहे.

मी बायबल कॉलेज मध्ये होतो तेव्हा तिथे रोज सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी पहिली बेल वाजायची. ५:१५ ते ५:३० या पंधरा मिनिटात तयार होवून प्रार्थना खोलीत जावे लागायचे पण जो विद्यार्थी प्रार्थनेला वेळेवर हजर नसायचा त्याला सकाळची न्याहरी दिली जात नसे. कॉलेजचे प्रिन्सिपल पास्टर बार्थोलोम्यु यांनी एका बोर्डवर  No Prayer No Breakfast (प्रार्थना नाही तर न्याहरी नाही) असे लिहून ठेवले होते. कॉलेज मध्ये आलेल्या नवीन विद्यार्थ्यांना सकाळी उठण्याची सवय नसल्याने सुरवातीचे दोन - तीन दिवस सकाळची न्याहरी मिळत नसे पण मग नंतर काही दिवसातच प्रयत्नपुर्वक ते आळशीपणावर विजय मिळवत.

प्रिन्सिपल बार्थोलोम्यु यांनी जर कडक नियम केला नसता तर आळशी विद्यार्थी अंथरुणात लोळत पडले असते. त्यांची मनमानी त्यांना करता आली असती व ते पुढे काहीच शिकू शकले नसते.

आईवडिलांनी कधी कधी मुलांशी कठोरतेने वागले पाहिज. मुलांना शिस्त लावतांना अतिरेक मात्र टाळावा. मुलांच्या वयोमानाप्रमाणे त्यांना घरातील लहान सहान कामे करण्याची सवय लावावी. एकुलता एक / एकुलती एक आहे. आम्ही असतानां त्याला / तिला काम करण्याची काहीच गरज नाही असे विचार करत बसला तर तुम्ही तुमच्या मुलांना बिघडवत आहात व आळशी बनण्यास प्रवृत्त करत आहात हे पालकांनी लक्षात घ्यावे. चांगल्या सवयी मुलांना लहानपणीच लागल्यातर भविष्यात त्यांना आणि पालकांना त्याचा भरपूर फायदा होतो.

 आळसपणावर मात कशी कराल?

आळशी व्यक्तींची लक्षणे आणि त्याला होणारे तोटे तुम्ही वाचलीत, तुम्ही स्वत: आळशी असाल तर "मी कधीच बदलू शकणार नाही, माझा आळशी स्वभाव मला मरेपर्यंत सोडणार नाही’’ अशी चुकीची कबुली द्यायची थांबवा कारण तुम्ही आळशीपणातून बाहेर पडू शकता हे सत्य आहे व त्यासाठी पुढील गोष्टी कृतीत आणा... त्या वाचल्यावर त्यानुसार कृती करणे तुम्हांला लगेचच शक्य होणार नाही पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या आळसावर विजय मिळवत नाही, तो पर्यत प्रयत्न करत राहा. तुम्ही प्रयत्नच केला नाहीत तर काहीच होणार नाही.  तुम्ही आळशी एका दिवसात बनला नाहीत तसेच एका दिवसात त्यातून बाहेर पडणेही शक्य होणार नाही म्हणून सयंमी व्हा आणि प्रयत्न चालू ठेवा.

१.       इतरांच्या जीवनातून  बोध घ्या . - तुमच्या अवतीभोवती अनेक आळशी लोक तुम्ही पहिले असतील. त्यांच्या आळसाने त्याचं जीवन उध्वस्त झालेलं तुमच्या पाहण्यात आले असेलचं. कदाचित तुम्हीपण आळशी असाल आणि तुमच्या आळसाने तुमचे किती नुकसान केले, तुम्हाला गरीबीत ढकलले आहे हे तुम्हाला चांगलेच ठाऊक असेल. तर बघितलेल्या किंवा झालेल्या गोष्टी वरून बोध घ्या. शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही तो स्वत:हून शिकू शकतो हे लक्षात घ्या. शलमोनाने एक दिवस आळशाचे शेत बघितले ते काट्यांनी भरलेले  होते. जमीन खाजकुइरीने व्यापली व त्याची दगडी भिंत पडली होती हे पाहून शलमोनाने त्याच्या जीवनातून बोध घेतला. (नीति२४:३०-३३)

शलमोन म्हणतो, “मुंगीकडे जा आणि तिच्यापासून शिका.” देवाने  बनवलेल्या सुंदर विश्वातून आपण बरेच काही शिकू शकतो  मुंगीचं निरीक्षण केल्यास तुमच्या लक्षात येईल की, ती सदैव कामातच असते. कुठून तरी कुठेतरी ती चाललेली असते. धान्याचा, साखरेचा किवां कशाचातरी कण इकडून तिकडे ओढत नेत असते. त्यांच्यामध्ये शिस्त असते त्या एका मागोमाग जातात. एकमेकांना मदत करतात. त्यांना कोणीच कॅप्टन नसतो तरी त्या आपापली जबाबदारी पार पाडतात. आपण तर मुंगीपेक्षा फार भिन्न आहोत देवाने आपल्याला त्याच्या प्रतीरुपाप्रमाणे तयार केलेले आहे.  

मुंगीकडून शिकण्याची पाळी आपल्यावर यायला नको.  खरंतर आपल्याला असे वागले पाहिजे की इतरांनी आपल्या जीवनातून बोध घ्यावा. (नीति ६:६ २४:२४-३३)  

देवाचे सेवक, आपले मित्र, नातलग, शेजारी, अधिकारी, सहकारी, शिक्षक किंवा जे कोणी लोक आपल्या आयुष्यात येतात  त्यांच्या जीवनातून बोध घ्या. त्यांच्या आयुष्यातील सकारात्मक बाजू लक्षात घ्या.

  1. जीवनात ध्येय बाळगा. - कोणत्या गावाला जायचं हे माहीत नसेल तर बसमध्ये बसून काहीच उपयोग नाही हे आपल्या सर्वांना चांगलेच ठाऊक आहे. ध्येयाचं ही तसचं आहे. ध्येय जर नसेल तर आपले आयुष्य वाया जाते.  

ध्येयहीन जीवन तुम्हाला आळसात राहण्यास मदत करते. खायचं प्यायचं आणि एक दिवस निघून जायचं हा आपल्या जन्माचा उद्देश मुळीच नाही. काय करायचं ते ठरवा. तुमच्यात असलेलं कौशल्य ओळखा. प्राण्यांना आपण जीवन का जगतो ते ठाऊक नसते, ते ध्येयहीन असतात. तुम्ही ध्येयहीन असाल. जीवन का जगत आहात याची किंचितही कल्पना तुम्हाला नसेल तर प्राण्यामध्ये व तुमच्या जीवनात काय फरक? तुम्हांला वाटत असेल तुमची प्रगती व्हावी तर जिद्द, महत्त्वाकांक्षा हे गुण प्रगतीसाठी अत्यावश्यक आहेत हे लक्षात घ्या.

पवित्र शास्त्र सांगते, “उद्योगाचे संकल्प केवळ समृद्ध करणारे आहेत” (नीति २१:५) देवाने दिलेल्या सुंदर आयुष्याचा आनंद घेण्यासाठी योजना आखणे अत्यंत गरजेचे असले तरी प्रत्येक संकल्प पूर्ण होण्यासाठी देवाची कृपा लागते हे माहित असायलाच पाहिजे. प्रेषित याकोब म्हणतो, “जे तुम्ही म्हणता की, आज किंवाउद्या अमुक शहरी जाऊ तेथे वर्षभर राहू व व्यापार करून नफा मिळवू, त्या तुम्हाला तर उद्याची गोष्ट समजत नाही,  कारण तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही तर वाफ आहात, ती थोडाच वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. त्याऐवजी असे म्हणावे, जर प्रभूची  इच्छा असेल तर आम्ही जगू व हे किंवा ते करू.” (याकोब ४:१३-१५)

मनुष्याचे मन मार्ग योजीते  पण परमेश्वर त्याच्या पावलांस मार्ग दाखवितो. (नीति १६:९) म्हणून आपण आपल्या सर्व मार्गात (योजनेत) परमेश्वरावर भाव ठेवला पाहिजे आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहता कामा नये. म्हणजे देव आपला मार्गदर्शक होईल. (नीति ३:५-६) जर तुम्ही देवावर विश्वास ठेवता तर हे कधीही विसरू नका की आपला देव आपल्या पाठीशी नाही तर आपल्या सोबत आहे. आणि जर तो आपल्याला अनुकूल आहे तर आपल्याला प्रतिकूल कोणीच नाही.   (रोम ८:३१) परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. (उत्पती ३९:२)

ध्येय कसे बाळगायचे आणि ते पूर्णत्वास कसे न्यायचे हे आपण नहेम्याच्या जीवनातून उत्तमरित्या शिकू शकतो. आळस झटकून पवित्र शास्त्रातील  फक्त १३ अध्याय असलेले नहेम्याचे पुस्तक वाचून काढल्यास पुढील मुद्दे तुम्हाला समजण्यास मदत होईल आणि ते समजले की, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यत पोहचलाचं असे समजा.

   नहेम्या कोण होता?

बाबिलोनच्या राजाने इस्त्राएल लोकांना कैद करून बाबिलोन येथे नेले होते. ७० वर्ष बाबिलोन येथे राहिल्यानंतर  देवाने इस्त्राएल  लोकांना त्याच्या मायभूमीत परत आणले. त्यावेळी नहेम्या अर्तहशश्त राज्याच्या राजवाड्यात प्यालेबदार म्हणून  काम करत होता नहेम्याने आपले ध्येय कसे पूर्ण केले ते आपण पुढील पाच पायऱ्या द्वारे  शिकूया

१.  ध्येय निश्चित केलं. ( नहेम्या १:१- ४ ) - नहेम्याने हनानी नांवाचा त्याचा बांधव जो इस्त्राएलला जाऊन आला त्याला तेथे असलेल्या बांधवाविषयीची विचारपूस केली तेव्हा त्याला  कळाले  की येरुशलेमचे  तट पडलेले आहेत. वेशी जाळून खाक करण्यात आल्या आहेत व मायभूमीत परत गेलेल्या लोकाची दुर्दशा व अप्रतिष्ठा होत आहे. त्याचं क्षणी त्याने त्याच ध्येय निश्चित केलं  आणि ते होतं येरुशलेम शहराचे पडलेले तट व वेशी पुन्हा उभारणे

२.   ध्येय पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली. ( नहेम्या १:४ - ११) - नहेम्याने उपवास करून  स्वर्गीय देवाची प्रार्थना केली. त्याने त्याची व त्याच्या लोकांची पातके देवासमोर कबूल केली. सार्वभौम परमेश्वरा समोर स्वतःला नम्र केल. देवाची कृपा त्याच्या बांधवावर असावी व त्याने योजलेल्या ध्येयात देवाने यश द्यावे म्हणून विनवणी केली .

३.  ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी विचारात घेतल्या   (नहेम्या २:५ - १६) - यरुशलेमचे पडलेले तट व वेशी पुन्हा पूर्वस्थितीत आणणे हे नहेम्याचं ध्येय होत. पण हा एक भावनिक निर्णय नव्हता. ध्येयप्राप्तीसाठी होईल ती किंमत मोजण्याची तयारी त्याने केली होती. येरुशलेमला जाताना कोणी अटकाव करू नये म्हणून नहेम्याने राजाकडून अधिकारपत्रे  घेतली. तसेंच तट बांधणीसाठी लागणारे लाकूड जंगलाच्या अधिपतीने द्यावीत म्हणून राजाकडून पत्र घेतले. येरुशलेमला पोहचल्यावर नहेम्याने काळजीपूर्वक  पडलेल्या तटाचे निरीक्षण केले. थोडक्यात सांगायचे म्हणजे तट व वेशी उभारण्यासाठी लागणारी सामग्री, मनुष्यबळ, वेळ आणि पैसा याची  नहेम्याने  जुळवाजुळव केली.

४.      ध्येय आपल्या बांधवाना सांगितले.  (नहेम्या २:५ - १६) - नहेम्याला ठाऊक होते की जे ध्येय पूर्ण करण्याचे स्वप्न त्याने पाहिले आहे ते त्याच्या एकट्याने पूर्ण होणे शक्य नव्हते. म्हणून त्याने आपल्या बांधवांना ते ज्या बिकट परीस्थितीत जीवन जगत आहेत त्याची आठवण करून दिली. देवाच्या मदतीने तट बांधण्याच काम आपण पूर्ण करू शकतो हा विश्वास त्यांना दिला. देवाचा वरदहस्त  त्याच्यावर होता म्हणूनच अर्तहशश्त राजाने त्याला काही दिवसाची रजा दिली होती तसेंच त्याच्या काही मागण्या पूर्ण केल्या होत्या. ही साक्ष देऊन त्याने सर्वाच मनोबल उंचावलं, त्यांना प्रोत्साहित केल व स्वतः पुढाकार घेतला .

५.      ध्येयाच्या आड येणाऱ्या शत्रूवर मात करून ध्येय पूर्णत्वास नेल.  (नहेम्या २:१९, २०/ अध्याय ४, ५ - ६ ) - चांगल्या कामाला नेहमीच विरोध होत असतो. देवाचं काम बंद पाडण्यासाठी सैतान डावपेच आखत असतो. नहेम्याच्या  बाबतीतही तसेंच झाले. येरुशलेमचे तट बांधण्यासाठी त्याला रजा मिळाली, आवश्यक सामग्री मिळाली व लोकांची मदतही मिळाली सर्व काही व्यवस्थित चालू झाले होते. पण त्याच वेळी होरोनी संनबल्लट व अम्मोनी  तोबिया या दोघांनी  नहेम्याची  व त्याच्या सोबतीला असलेल्या सर्वांची निर्भत्सना केली. त्यांना तुच्छ लेखल. तुम्ही यहुदी दुर्बळ आहात तुम्ही काय करणार. तुम्ही जे बांधकाम करत आहात त्यावर एखादा कोल्हा चढला तरी तो कोट पाडून टाकील  असे बोलून त्यांची थट्टा केली. ते राजाविरुद्ध बंड पुकारत आहेत असा चुकीचा आरोप त्यांच्यावर केला. तसेच नहेम्याला जीवे मारण्यासाठी  कट रचला.  शत्रू पूर्ण शक्तीनिशी त्यांचे काम थांबवण्याचा प्रयत्न करत होता. या बिकट  परिस्थीतीत नहेम्याने हार मानली नाही. प्रभू परमेश्वर आम्हांस यश देईल, म्हणून आम्ही त्याचे सेवक कमर कसून हे बांधणार असे सडेतोड उत्तर शत्रूला दिले. सर्वांनी मन लावून काम केलं. शत्रूशी दोन हात करण्याचीही तयारी केली आणि  शेवटी विजय संपादन केला. ध्येय पूर्णत्वास नेलं.

 

वेळेचे नियोजन करा. - तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ कोठे वाया घालवता त्याचा शोध घ्या. एखादी गोष्ट करत असतांना ती करणे गरजेचे आहे का? असा प्रश्न स्वत:ला विचारा. कोणती गोष्ट करतांना किती वेळ दिला पाहिजे याचा अभ्यास करा.  जर एखादे काम आजच करावयाचे असेल, तर ते उद्यावर ढकलू नका. महिन्याभरात किती चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघायचे. किती वेळ  मोबाईल, फेसबुक, ईमेल व गूगल सर्च साठी द्यायचा हे ठरवा. वेळ वाया घालवणे हे आयुष्य वाया घालवण्यासारखे आहे.

एक साध तत्त्व समजून घ्या: चित्रपटात किंवा टी. व्ही. मालिकांतून काम करणाऱ्या कलाकारांना पैसे मिळवायचे असतात म्हणून ते अभिनय करतात. ते पैसे कमवत असतांना आपण आपली वेळ व पैसे त्यांच्यासाठी किती खर्च करावे यांचे भान ठेवायला हवे. मनोरंजनासाठी किती पैसा व वेळ खर्च करायचा हे ठरवलचं पाहिजे, नाहीतर तुमचे आवडते कलाकार श्रीमंत होत जातील व तुम्ही गरीब.  तुम्ही इतरांना श्रीमंत बनवाल व आपण मात्र स्वत: गरीबीत रहाल.

वेळेचे नियोजन करणे फारच गरजेचे आहे.  कारण दिवस फार वाईट आहेत (इफिस ५:१५-१६) या पृथ्वीवरीलं आपलं आयुष्य फारच अल्प आहे. याकोबाने आपल्या आयुष्याची वाफे सोबत तुलना केली आहे.  याकोब ४:१४ मध्ये म्हंटले आहे, “तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात ती थोडा वेळ दिसते; आणि मग दिसेनाशी होते.” या अल्पशा जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर नियोजन गरजेचे आहे. (स्तोत्र ९१)

देवाने दिलेलं हे सुंदर आयुष्य जगताना वेळेचे नियोजन नसेल तर देवाच्या अनेक आशिर्वाद आपल्या पासून दूर राहू शकतात. देवाची सेवा कमी होऊ शकते. “प्रभू आम्हांला आमचे दिवस मोजायला शिकव’’ मोशेने केलेल्या ह्या प्रार्थने प्रमाणे आपणही प्रार्थना केली पाहिजे.            (स्तोत्र ९०:१२)

पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळी मंदिराकडे जात होते. त्यांच्या जीवनात शिस्त होती. प्रार्थनेच्या वेळी ते जर दुसऱ्या कामात गुंतले असते किंवाप्रार्थनेला जाण्यासाठी हयगय केली असती तर लंगडा भिकारी बरा झाला नसता. (प्रेषित३:१-५)

वेळेच्या नियोजनाची सुरुवात दैनंदिन कामापासून करा. त्यासाठी पुढील पायऱ्या वापरा. त्यामुळे तुमची धावपळ होणार नाही शिवाय सर्वच कामे वेळेवर पूर्ण झाल्याचे समाधानही मिळेल.

1.       कामाची यादी करा.

2.       कामे वाटून घ्या.

3.       कामाचा प्राधान्यक्रम ठरवा.

4.       प्रत्येक कामासाठी लागणारी  वेळ ठरवा.

उदाहरणार्थ: -   आज एखाद्या व्यक्तीला दिवसभरात पुढील पैकी काही  कामे करायची आहेत:  वर्तमानपत्र वाचणे, प्रार्थना करणे, पवित्र शास्त्र वाचणे, पोस्ट ऑफिस मधून पत्रे गोळा करणे, भाजीपाला आणणे, कामाला जाणे / ऑफिसला जाणे, पेट्रोल / डीझेल भरणे, मुलाला शाळेत सोडणे / आणणे, काही महत्वाचे फोन करणे, काही लोकांना भेटणे, अभ्यास करणे, संदेश तयार करणे, जिमला जाणे, स्वयंपाक करणे, कपडे धुणे, हॉस्पिटलमध्ये जाणे, गुरांना चारायला रानात नेणे, गाई म्हशींचे दुध काढणे, खरेदी करणे  इ. तुमच्या यादीत यापेक्षा वेगळी कामे असतील. समजा वर उल्लेख केलेल्या गोष्टी आज दिवसभरात पूर्ण करायच्या आहेत. वरील कामापैकी कोणते काम अधिक महत्वाचे आहे ते समजून घेतले पाहिजे. एका वेळी एक काम हे सूत्र वापरा.

तुम्ही कुणाच्यातरी हाताखाली काम करत असाल तर नेमलेल्या कामाच्यावेळेत इतर कामे करणे शक्य नाही. कामाला जाण्यापूर्वी किवां कामावरून परत आल्यावर काही कामे केली पाहिजेत. घरातील इतर सभासद पत्नी, मुलगा / मुलगी, भाऊ, बहिण, आई किंवावडील याच्यापैकी एखाद्यावर लहानलहान कामाची जबाबदारी सोपवता आलीतर घरातील एकाच व्यक्तीवर कामाचा बोझा पडणार नाही. उदा: भाजीपाला आणणे, लाईट / फोन बिल भरणे, लहान मुलांना शाळेत सोडणे / आणणे.  लहान सहान कामे कशी करायची हे घरच्यांना समजावून सांगा. निर्गम १८:१३-२२  आपण वाचतो की, मोशेने त्याची काही कामे इतर लोकांवर सोपवली होती, त्यामुळे त्याचे काम हलके झाले. बऱ्याच वेळेला असे होते की आपण एखाद्या व्यक्तीला भेटायला जातो पण तो त्याच्या घरी / ऑफिस मध्ये नसतो त्यामुळे आपला वेळ वाया जातो म्हणून ज्या लोकांना तुम्ही भेटणार आहात त्यांना फोन करून ते कोठे आहेत याची खात्री करा म्हणजे तुमची वेळ आणि पैसा वाचेल. आणि नियोजित कामही होईल. येणाऱ्या आठवड्यात किंवा महिन्यात एखाद्या सभेला / कार्यक्रमाला तुम्हाला जायचे असेल किंवा एखादे

महत्वाचे काम करायचे असेल तर  त्याची नोंद तुमच्या डायरीत, भिंतीवरील कॅलेंडरवर किंवा नोटीसबोर्डवर नोंद करून ठेवा. मोबाईलमध्ये रीमाइंडर सेट करा. घरातील एखाद्या व्यक्तीला त्याबद्दल कल्पना द्या, म्हणजे तुमचे काम वेळ वाया न जाता खात्रीशीर पूर्ण होईल .

आई  वडिलांच्या  संपत्तीचा  तेढा  मिरवू नका - आई वडिलांनी कमवून ठेवलेली संपत्ती कधी - कधी मुलांना आळशी बनवते. याचा अर्थ काय आई वडिलांनी मुलांसाठी काहीच कमवून ठेवायचे नाही का? नाही तसे नाही पण काहीजण  ज्याच्या आईवडिलांची अमाप संपत्ती असते त्यामुळे ते भविष्याची फार चिंता करत नाहीत आमच्याकडे भरपूर पैसा आहे. आम्हांला काम करण्याची गरज नाही. आम्ही आमच्या मनाचे राजे आहोत अशी विचारसरणी त्यांना चालवते. जिद्द आणि महत्त्वाकांक्षा त्याच्यात नसते त्यामुळे आळशीपणाने त्याचे जीवन भरते.

देवाचा उद्देश समजून घ्या. - देवाने आपल्याला विशिष्ट उद्देशाने निर्माण केलेले आहे. आपण सत्कृत्यें करावीं म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायीं निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहो; ती सत्कृत्ये आचरीत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा असे देवाचे वचन आपणाला सांगते. पण आळशीपणामुळे देवाचा उद्देश पूर्ण होत नाही. कधी कधी तुम्ही प्रभूमध्ये करत असलेल्या कामाची दखल घेतली जात नाही. बऱ्याच वेळेला तसा आपला गैरसमज झालेला असतो. पण तुम्ही जे काही करता ते प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा हे प्रभूचे वचन सदैव मनात ठेवा. देवाच्या वेळेत तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. (कलस्सै ३:२३)

  • सबब सांगण्यास जो फार चांगला असतो तो इतर गोष्टीत क्वचितच चांगला असतो.

       - बेंजामिन फ्रांकलीन

  • तुमच्या गरीबीसाठी सैतान जबाबदार नाही तर तुमच्यामध्ये असलेल्या दोन शत्रूंचे ते काम आहे. त्या शत्रूंची नावे आहेत आळसपणा आणि चालढकलपणा  

- मायकल जॉन्सन

  • आळस आकर्षक दिसू शकतो,  परंतु काम समाधान देते

अर्थ मराठी दिवाळी अंक २०१५

अभिषेक ठमके
Chapters
संपादकीय प्रस्तावना अमेरिकेतील एक डेटिंग सेंटर (डेटींग - मनाची उकल संकल्पना) कुटुंबाचा आधारवड जगा आणि जगू द्या! ईश्वराने लिहीलेलं... आपलं आयुष्यं...! दोन बालकांची पत्रे ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय – एक मनःपटलावरील युद्ध अश्रुधार शिक्षणाचा बोजा (नाना पाटेकर) जे तुला शिकता आले नाही… अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम... श्रद्धा सर्वांनी लक्षात ठेवावे असे... सामन्याने पाहिलेले असामान्य स्वप्न नाते समृद्ध होण्यासाठी... जमिनीवर बसून जेवणाचे फायदे स्वर्ग आणि नरक आहाराविषयी ‘ओम’ नाम चांगली विचारधारा Marathi Status दिवाळी नमू प्रारंभी गणेश दंगल साम्राज्य...! गूढ मनाच्या खेळी खेळ...! शिवबाची कृपा छत्रपती शिवाजी धरणीमाता क्षण मी व राजकारणी भरत उपासनींच्या चारोळ्या तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल आळस