Get it on Google Play
Download on the App Store

अश्रुधार

लेखक - अशोक दादा पाटील

आबांना ती रात्र सा-या आयुष्यात गुदमरलेल्या रात्रींपेक्षा अमंगळ अन् भयाण वाटली. मध्यरात्र उलटली होती, तरी त्यांच्या अस्वस्थ मनातले तप्त विचार शांत झाले नव्हते. या केस पिकलेल्या वयात अशा विचारांचा शीण आबांना असह्य व्हावा, यात नवल मुळीच नव्हते. कपाळाला गंध लावून देवाच्या भक्तीत कालहरण करण्याचे त्यांचे वय होते. तशा परिस्थितीत अशा विचारांचा ताण त्यांना कसा सहन होणार? परंतु या विचाराला कारणीभूत घटना मात्र नवलाच्या होत्या, आश्चर्याच्या होत्या.

आबा बाजल्यावर पहुडले होते इतक्यात. परंतु झोपेची तिळमात्र शक्यता नाही, हे त्यांनाही कळत होते.  पहुडल्या ठिकाणीच कूस बदलावी, हलत्या बाजल्याचा ‘करकर’ आवाज व्हावा, उंदरांची अंधारातली धडपड कानावर पडावी या सा-या गोष्टींवर लक्ष न देता शून्य नजरेने, कधी मोडक्या कवाडाकडे, कधी छपराच्या आढ्याकडे, कधी शीण होऊन जळणा-या दिव्याकडे पाहत विचार करावा. पुन्हा निराशेचे पटल मनावर पसरले, की तोंडावर पांघरूण ओढून डोळे मिटावेत अन् स्वस्थ थोडा वेळ पडून राहावे. मग पुन्हा स्वस्थ पसरलेल्या देहरूपी सापळयात वळवळणा-या आत्म्याच्या सामाधानासाठी विचारांच्या कडा तयार कराव्यात. त्या एकमेकींत गुंफून एक लांबलचक साखळी तयार करावी अन् ती ताणून पाहावी. ती घणाच्या फटका-याने तुटून जाणा-या साखळीप्रमाणे निखळून जावी. मग हताश मन अधिकच उदास बनावे. असे सतत कितीतरी वेळ चालू होते, अन् चालणारही होते.

खोलीतल्या प्रत्येक वस्तूंकडे पाहत विचार करण्याची आबांना सवयच जडून गेली होती. ते कुळव, ती तिफणी, तो नांगर, ती शेतीची अवजारे, ते दोरखंड या सा-याच वस्तू त्यांच्या नियमित जीवनात हरघडी पाहण्यात आल्या होत्या. त्यांच्या संगतीत आबांनी सारे जीवन फुलवले होते. ती साधने एकेकाळी आबांना प्राणाहून प्रिय अन् पवित्र वाटत होती, हवीशी वाटत होती. परंतु आज... आज ती हत्यारे आपली, आपल्या जीवनाची, आपल्या कर्तबगारीची हत्या करण्याच्या इराद्याने हसत आहेत, ते दोरखंड आपल्या मानेला फास आवळू पाहत आहेत, तो दिवा सा-या घराला आग लावू पाहत आहे, असे आबांना वाटत होते. त्यामुळे त्यांच्याकडे  अधिक वेळ पाहण्याचे धाडसदेखील आबांना होत नव्हते.

मिटल्या डोळ्यांवर पांघरूण ओढल्यामुळे आतमध्ये निर्माण झालेल्या पोकळीत अधिकच अंधार पसरला, काळ्याकुट्ट अंधाराने आबांचे मन क्षणभर बिथरले, घाबरले. एखाद्या चित्रपटगृहात अंधार व्यापताच समोरील पांढ-या पडद्यावर चित्रांची हालचाल सुरु व्हावी, तद्वत आबांच्या मिटल्या नेत्रांपुढे गतजीवनाचा चित्रपट सरकू लागला.

तो दिवस... मुसळधार पावसाच्या सरीवर सरी पडत होत्या. वीजा लखलखत होत्या. मेघांची प्रचंड गर्जना चालू होती. पाऊस कमी होण्याची चिन्हे मुळीच दिसत नव्हती. आबांचा मळा गावापासून वाहणा-या ओढ्यापलीकडे फर्लांग-दीड फर्लांग अंतरावर होता. त्या गावचे बहुतेक सर्व मळे त्याचं बाजूला होते. कारण ओढा गावच्या तिन्ही बाजूला वळसा देऊन पुढे वाहत होता. एका बाजूला तर खुला मळाच पसरला होता. ओढ्याच्या ओलाव्याने विहिरींना पाणी भरपूर आल्याने गाव सुखी होते. पाऊस मोठया प्रमाणात पडत असल्याने तासाभरात ओढा दुथडी भरून वाहत होता. मळ्यातली माणसे, जनावरे मळ्यातच राहिली आणि घरातील माणसे अस्वस्थ झाली. आबांचा एक मुलगा मळ्यातच होता. मोठा मुलगा प्रकृती अस्वस्थ्याच्या कारणावरून घरीच अंथरूण धरून होता. आबांचा स्वभाव भारी भित्रा.  पडशा - खोकल्याचा आजार वाढणार नाही कशावरून? अशी शंका त्यांच्या मनात आली म्हणजे त्यापुढे कुणाचे काही चालत नसे. मग साधे दुखणे जरी असले तरी घरी विश्रांती घेणे क्रमप्राप्त असे. त्यामुळे आबांचा मोठा मुलगा सदाशिव घरीच होता आणि धाकटा शंभू मळ्यामध्ये कामावर गेला होता.

आबांची ही दोन पोरे म्हणजे राम-लक्ष्मणाची जोडी होती. दोन्ही पोरे एकमेकांवर निरतिशय प्रेम करीत अगदी लहान वयापासून आज पर्यंत ही मुळे एकमेकांशी भांडलेली कुणी पाहिले नव्हते. त्याचमुळे गावात त्या दोन मुलांकडे आणि आबांच्याकडे आदराने पाहणारे डोळे अधिक होते. या गोष्टींचा आबांनादेखील अभिमान वाटायचा. पोरे कर्ती सवरती झाल्याने आबांवरच्या कामाचा ताण कमी होऊन अप्रत्यक्षरीत्या शेती वाडीच्या देखरेखीचे अधिकार त्या दोघांना प्राप्त झाले होते. शंभूच्या काळजीने आबांच्या घरातील माणसेदेखील फारच अस्वस्थ झाली होती. आबा हरघडी दारातून तोंड बाहेर काढून बाहेर पाहत होते. सदाशिव एकसारखा घरात येरझा-या घालू लागला होता. ओढयाला दुथडी भरून पाणी आले आहे. रानोमाळ पाणी झाले आहे. सोसाट्याने वारा वाहतो आहे. अद्याप पावसाच्या धूमश्चक्रीला खंड नाही. त्यात शंभू काय करीत असेल? तो पावसाचे चिन्ह पाहून घरी आला असता तर? कदाचित यायला निघाल्यावर मध्येच ओढयाला पाणी आले असले अन् ते तसेच वाढले असले तर? शंभू संकटात तर नसेल? त्याला आता मदतीची जरुरी असेल कां? असे अनेक प्रश्न सदाशिवला भेडसावू लागले आणि त्यामुळे तो अस्वस्थ झाला. अशा विचारात पाच - दहा मिनिटे लोटली असतील नसतील, तोच त्याच्या मनाने काही निर्णय घेतला. डोक्यावर एक पोते ओढून घेऊन तो घराबाहेर पडला.

‘आरं, कुठ जातुयास? पाऊस हाय. अंगात कणकण बी आलीया. पाणी वाईच कमी होताच येईल शंभू.’ असे कुरकुरतच आबा म्हणाले. पण हे ऐकायला सदाशिव थांबला नाही. तो केव्हाच रस्त्याने दृष्टीआड झाला होता.

पात्र भरून ओढा वाहत होता. पाणी खालीवर होत घुसळत वेगाने निघाले होते. झाडाझुडुपांतून गंभीर आवाज निघत होता. पावसाच्या भडीमाराच्या आवाजाशिवाय दुसरा आवाज तेथे नव्हता.  सारे गाव कोशात दडलेल्या किड्याप्रमाणे नि:स्तब्ध होते. अधूनमधून होणा-या विजेच्या लखलखाटाने पाण्याचा विशाल प्रवाह चमकून जाई आणि त्याच्या विराट स्वरूपाचे दर्शन होई. सदाशिव मारुतीच्या देवळाच्या कट्ट्यावर उभा राहून पलीकडील तीर एकसारखा न्याहाळीत होता. त्याला कुठे काहीच दिसेना, तेव्हा तो अधिकच अस्वस्थ झाला. त्याचे मन अधिकच घाबरले, अन् नकळतच त्याच्या तोंडून हाक बाहेर पडली, ‘शंभू ओs’ त्या हाकेने निर्मनुष्य भासणारा आसमंत क्षणभर घुमून निघाला, आणि पुन्हा पूर्ववत शांतता पसरली. सदाशिवच्या हाकेला साद मिळाली नाही. त्याला काहीच कळेनासे झाले. विचार कुंठीत झाले. क्षणभरही विचार न करता त्याने पुरात उडी घेतली आणि सपसप पाणी कापीत पैलतीरी जाण्याचा तो प्रयत्न करू लागला. दोन-चार मिनिटांतच किनारा सोडून वाहत्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहात तो दिसेनासा झाला. 

मारुतीच्या देवळापर्यंत जाऊन तो परत येईल, या समजुतीने आता स्वस्थ बसलेले आबा संशयाने उठले. त्यांनी हातात कंदील घेतला. डोक्यावर घोंगडी पांघरून तेही घराबाहेर पडले. रस्त्याने घोटाभर वाहणा-या पाण्यातून ते मारुतीच्या देवळाजवळ पोहोचले. त्यावेळी शंभू अंगावरील कपडे पिळत देवळाच्या कट्ट्यावर उभा होता.

‘शंभू, कसा रे आलास? या पाण्यातनं पोहत आलास?’ आबा आश्चर्याने डोळे विस्फारून म्हणाले.

‘आबा, तुम्ही कशाला आलायसा पावसात? मी आलोचं असतो की. दादा घरी हाय ना? तो माझी वाट पाहील, काळजी करील, म्हणूनशान असा वढा पोहून आलो.’ शंभू हसत हसत म्हणाला.

‘तो इकडचं आलाया. म्हणून मी आलो. त्याची गाठ पडाय ठिकाण तुझीच गाठ पडली.’ आबा कातर आवाजात म्हणाले.

‘म्हंजी? मला पाहण्यासाठी आलाय त्यो?’ अंगात कणकण व्हती. आन् कुठं दिसत बी नाय. इकडचं आला नव्हं?’ असे म्हणत शंभू इकडेतिकडे पाहू लागला. त्याला जवळपास कोणीच दिसेना.

‘आरं, हे पोतं कुणाचं?’ त्या पायरीच्या कडेला पडलेल्या पोत्याकडे पाहून आबा म्हणाले, ‘आपलंच दिसतया, त्यानंच आणलं व्हतं हे.’ आबा अधिकच घाबरले.

‘मग ओढ्यात पोवत गेलाय की काय? म्हणूनच म्या लवकर यायला निघालो पर ह्यो वढा आला नव्हं का. त्यो तकडं गेला असलं अन् म्या इकडं.’ असे म्हणत शंभू पुढे होणार, इतक्यात आबांच्या हातातला कंदील भडकला आणि लगेच विझला. शंभूने मागे पाहिले आणि दिवा विझलेला पाहत तो आबांना म्हणाला, ‘आबा, देवळात दिवा दिसतुया, आत जाऊनशान पेटवून घ्या. कुठं हाय काय बघतो म्या.’ असे म्हणत शंभू बाहेर पडला.  कंदील पेटवून आबा बाहेर आले त्यावेळी शंभू कुठेच नव्हता. त्याने केव्हाच प्रवाहात उडी टाकली होती. पाणी धडाधड धावत होते. विजांचा लखलखाट होत होता. मेघांची गर्जना चालू होती. पावसाचे मुसळधार थेंब जमिनीवर कोसळत होते. आबा इकडेतिकडे थोडावेळ वाट पाहून घरी परतले. एक मन त्या दोघांच्या प्रेमाने भरून येत होते, अन् दुसरे मन अशा बेफिकिरीच्या वागण्याने कुरकुरत होते.

घरी आल्यावर आबांनी आपल्या कारभारणीजवळ मुलांच्या या खुळेपणाचा पाढा वाचून दाखवला आणि पोकळ राग व्यक्त केला. परंतु त्यांच्या मनाची तळमळ एकसारखी चालू होती. हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर त्यांच्या काळजीत भरच पडत होती. चिमणीच्या मंद प्रकाशात दोन्ही मुलांची वाट पाहत ते पासोडीवर बसून राहिले. पुढचे कवाड  वा-याच्या हालचालीने करकरत होते.

मध्यरात्र उलटून गेली. आबांचे लक्ष कवाडाकडे लागून राहिले होते. इतक्यात कवाड लोटून शंभू सदाशिवाला खांद्यावर घेतल्या स्थितीत आत आला. त्याला खांद्यावरून उतरवीत म्हणाला, ‘बाई, वाईच जाळ कर गं.’ आणि सदाशिवला उतरवून वाळलेले कपडे आणण्यासाठी तो दुसरीकडे वळला. आबा आणि बाई आश्चर्याने पाहतच राहिले. त्यांच्या दोघांच्या तोंडून एकदम उदगार निघाले, ‘ काय झालं रे? खांद्यावरनं का आणलंयास याला?’

‘खांद्यावरनं म्हंजी...?’ शंभू म्हणाला, ‘थंडीनं काकडतुया नव्हं का? हतनं पोवत मळ्याला गेलाया. पाण्यात भिजत मळ्यावर भटकलाया. म्या नाय म्हणूनशान परत इकडं येत व्हता. म्या गेलो झालं. थंडी-पावसाची बाधा व्हईल म्हणूनशान तसचं पोवत आणलं त्याला. नायतर वढा उतरसपतुर तकडंच राह्यचा. म्हंजी इथंपतुर ताठला असता ह्यो. अंगात कणकणबी व्हतीच.’ असे म्हणत त्याने सदाशिवच्या अंगावरील कपडे बदलायला कपडे दिले आणि आपणही आपले कपडे बदलले. यानंतर कित्येक दिवस सदाशिवाच्या अंगी आजार ठाण मांडून बसला. त्याच्या सेवेत घरातली सारी माणसे जीवाभावाने गढून गेली. शंभू तर अहोरात्र सदाशिवाच्या सेवेसाठी धडपडला. दोन्ही भावांच्या प्रेमाला सीमाच नव्हती. जनरूढीप्रमाणे आबांनी दोन्ही पोरांचा विवाह मोठया थाटामाटाने आटोपून घेतला.

सुना घरात नांदू लागल्या. आबांच्या आणि बाईच्या माथ्यावरचे बहुतेक ओझे हलके झाले. प्रपंचाचा भर वाहण्यास पोरे समर्थ झाली होती. साथीला त्यांच्या बायका चांगल्याच हुशार आणि कर्तबगार लाभल्या होत्या. घरचा सर्व व्यवहार सुरळीत चालू झाला होता. शेतातली कामे पोरांच्या उमेदीने ठाकठीक सुरु होती. आबांना देखरेखी शिवाय दुसरे कामच शिल्लक राहिले नव्हते.

सुखात सरणारे दिवस वा-याचा वेग घेतात. तसे आबांच्या कुटुंबाचे दिवस झपाझप जाऊ लागले होते. एकोपा, सलोखा, प्रेम, भक्ती, कर्तबगारी यांचा सुरेख संगम त्या कुटुंबात झाला होता. गावाला हेवा वाटेल असे आदर्श कुटुंब वाटत होते ते. दैव देखील भारी खोडकर असते. क्षणात ते कुणाला रत्नांच्या राशीत बसवील, तर क्षणात दु:खाच्या खाईत लोटून देईल. आबांच्या कुटुंबातले सुख अधिक काळ टिकले नाही. दोन तलवारी एका म्यानात राहू शकत नाहीत हा नियम दोन कुटुंबांच्या बाबतीत कितपत लागू पडतो? हे मात्र निश्चित सांगता आले नाही; तरी दोन कुटुंबे एकत्र नांदल्याची उदाहरणे फारच कमी आढळतात, एवढे मात्र खरे.

आबांची धाकटी सून माहेरी जाऊन आल्यानंतर एकेक तक्रारी सुरु झाल्या. त्या तक्रारी प्रथम शंभूच्या कानात भरून उरल्या. शंभूच्या शांत स्वभावावर त्यांचा विशेष परिणाम झाला नसला, तरी त्याचे मन संशयाने पछाडायला अधिक वेळ लागला नाही. संशय हा कोणत्याही गोष्टींच्या नाशाला कारणच ठरतो. आपल्या मनात निर्माण झालेले संशयाचे वादळ शंभू बाहेर कुणाला दाखवीत नसला तरी त्याचे मन अस्वस्थ बनले, आणि तो प्रत्येक गोष्टींवर संशयाने नजर ठेवू लागला. आपल्या मोठया भावाच्या हातात पैशाअड्क्यांचा कारभार आहे. त्याच्या बायकोच्या अधिकारात घरातल्या सा-या माणसांना राहावे लागते. घरातला स्वयंपाकाचा भार आपल्या पत्नीवर पडतो. दादाची बायको दुपारची थोडा वेळ झोप काढते? असा विचार त्याच्या अवलोकनात आलेल्या काही गोष्टींवरून त्याच्या मनात डोकावू लागला. त्यामुळे त्याच्या वागण्यात दिवसेंदिवस तुसडेपणा वाढतच गेला.

पृथ्वीच्या पोटात उष्णता वाढली की तिचा स्फोट होतो. कोणत्याही पदार्थाचे भांडे भरले की सांडायला लागते. कित्येक दिवसांपासून शंभूच्या मनात धुमसणारी आग वेगवेगळ्या प्रसंगी थोडी थोडी बाहेर पडू लागली. काही दिवसांनी ही गोष्ट इतकी पराकोटीला पोचली, की एके दिवशी शंभूने आबांच्या पुढे तक्रार मांडली. मोठमोठयाने भांडण केले. एवढ्याने ती आग विझली नाही, तर दिवसेंदिवस वाढत जाऊन विभक्त राहण्याचे सूर शंभूच्या तोंडातून बाहेर पडू लागले. आबांना ही गोष्ट अशुभसूचक वाटली. पण ही भांडणे मिटविण्यासाठी संपत्तीची व घरादाराची वाटणी करून देणे त्यांना उचित वाटले. नाही तर मनात निर्माण झालेल्या अढ्या  अधिकच वाढतील आणि त्याचा परिणाम अधिकच दु:खदायी होईल, याची आबांना पुरेपूर कल्पना होती. म्हणून जमीनजुमल्याची व घराची वाटणी करून त्यांची जबाबदारी पूर्णपणे त्यांच्या गळ्यात अडकवावी आणि आपण ‘हरी हरी’ म्हणत बसावे, असे आबांनी ठरवले.

वास्तविक आबांना आणि बाईला या गोष्टींचा त्रास पोचणार होता ही गोष्ट जरी सत्य असली, तरी पोरांच्या इच्छेविरुद्ध आपण कसलीच आडकाठी आणायची नाही, असे आबांनी आपल्या मनास तसेच बाईलादेखील बजावले होते. यात आबांच्या, बाईच्या सांभाळाचा प्रश्न अधिक वादाचा आणि बिकट होता, तरी ते आबांनी मनावर घेतले नाही.

ठरल्याप्रमाणे आबांनी चार पंचांसमोर घरादाराची वाटणी केली. घरचा व भांड्याकुंड्यांचा प्रश्न थोडयाबहुत तक्रारीने मिटला. परंतु मळ्याच्या वाटणीचा प्रश्न अधिक बिकट झाला. मळ्यामध्ये ज्या समान वाटण्या झाल्या त्यातील एका भागात विहीर होती. दुस-या भागाच्या मालकाने त्याच विहिरीच्या पाण्याचा आळीपाळीने उपयोग करावा असे पंचांनी ठरविले होते.  शिरस्त्याप्रमाणे धाकट्याने वाटणीचा हिस्सा पहिल्यांदा उचलला. विहिरीचा समावेश झालेली जमीन धाकट्याच्या वाट्याला गेली, हे मोठ्याला पसंत पडले नाही आणि पंचांचे म्हणणे देखील त्याने कानावर घेतले नाही. ‘मिळाली तर तीच वाटणी आपणास मिळावी. दुस-या कोणत्याच वाटणीशी आपले कर्तव्य नाही.’ असे म्हणून तो चालता झाला. परंतु पंचांनी शंभूला आपल्या वाटणीत आलेल्या जमिनीचा वापर करण्यास परवानगी दिली आणि पंचमंडळी निघून गेली. मोठयाच्या वाट्यास आलेली जमीन करण्याचा अधिकार ओघानेच मोठ्याला मिळाला होता. आबा आणि बाई यांनी मळ्यातच राहावे आणि वर्षाकाठी लागणारे धान्य व खर्च दोघांनी सारखाच द्यावा, असेही अगोदरच ठरले होते. शंभू नेहमीप्रमाणे आपल्या वाट्याला आलेली जमीन कसू लागला, घाम गाळू लागला, जीवापाड मेहनत करू लागला. देवाच्या कृपेने भरघोस पिक थयथय नाचू लागले. श्रमाच्या सार्थकाचे तेज शंभूच्या चेह-यावर खेळू लागले.

सदाशिव मात्र शेताकडे फिरकला नाही. त्याने जमीन कसली नाही. पीकपेरणी केली नाही. मोती पिकतील अशा जागी काळी जमीन जशीच्या तशीच पडून राहिली. सभ्य माणसांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तो वाया गेला. शंभूला मिळालेली जमीनच आपल्याला मिळावी हा त्याचा हट्ट कायमचं होता. गावात चार रिकामटेकडी माणसे असली, की सा-या कुचाळक्या तिथं त्यांच्याकडे ऐकायला मिळायच्या. गावात नवीन उपद् व्यापांना तोंड तिथेच फुटायचे, हा खेड्यात सर्वमान्य नियम असतो. सदाशिव आपला बहुतेक वेळ त्या टवाळखोरांच्या संगतीत घालवत असल्याने त्याच्या विचाराला वेगळेच वळण मिळत गेले. ‘तुझ्या हक्काने मिळणारी जमीन शंभू बळकावून बसला. तू मात्र नामर्दासारखा स्वस्थ राहिलास. आता त्याच्या मळ्यात सोन्यासारखे पीक नाचायला लागले. तू मात्र उपाशी मरतो आहेत.’ अशा अनेक त-हांनी सदाशिवचे कान भरण्यास त्या टवाळखोर टोळीने कमी केले नाही. सदाशिवलादेखील परिस्थितीप्रमाणे ते सारे पटत गेले आणि त्याचे मन राग, द्वेष आदी विकारांनी पछाडून निघाले.

आपल्या अपमानाचा, नुकसानीचा बदला कसा घ्यावा, शंभूच्या उत्कर्षाला कोणत्या रीतीने पायबंद घालावा, त्याच्याकडे असलेली जमीन आपण कशी मिळवावी याचा विचार तो सतत करू लागला. एके दिवशी गावभर एक बातमी वा-याच्या वेगाने पसरली. सदाशिव आपल्या चार सहका-यांच्या मदतीने शंभूच्या मळ्यातले पीक कापून आणणार आहे. सारे गाव आश्चर्याने चर्चा करू लागला. काही काळ या दोघा भावांच्या प्रेमाची चर्चा गाव करीत होते, त्यांच्यावर स्तुतीची फुले उधळीत होते, त्यांचे गोडवे गात होते. आता सारे काही बदलले होते.

 

आबांना ही बातमी कळाली त्यावेळी त्यांचे मन चरकले. मस्तक जड झाल्यागत वाटायला लागले. ते उपाशीपोटी बाजल्यावर पडून राहिले. तडफडले. विकल हृदयाने अश्रू गाळत बसले. कोंबडा आरवला. गतकाळातील काही प्रसंग चित्रपटासारखे नेत्रांपुढून सरकून गेले. चित्रपट संपताच चित्रपटगृहात स्वच्छ प्रकाश पडावा, तद्वतउगवत्या सूर्यप्रकाशाने सगळीकडे उजेड पडला होता. जड झालेली काया सावरीत आबा कसेबसे अंथरून बाजूला सावरून उठले. रात्रभर जागरण झाल्याने आणि विचारांचा ताण पडल्याने त्यांना कमालीचा थकवा आला होता. थकव्याची त्यांना कदर नव्हती. आयुष्यभर खपून निर्माण केलेल्या चित्रांवर काळ्या शाईचा डाग पडून ते चित्र भेसूर होणार, याचा त्यांना कमालीचा खेद वाटत होता.

मोत्यासारख्या टपो-या दाण्यांनी टिच्चून भरलेली कणसे ताटव्यांच्या डोईवर थयथयत होती. पीक उतरणीला आल्यामुळे ताटव्यांची पाने पिवळीजर्द होऊन सूर्यकिरणांनी तकतकत होती. वा-याच्या झुळूकांबरोबर सारे शेत डुलत होते. सूर्य वावभर आकाशात उभा होता. किरणांची प्रखरता ओसरली होती. सारे रान दिवसभरच्या प्रखर किरणांच्या प्रहाराने मलूल बनले होते. सारी माणसे दिवसभराच्या श्रमाने थकली भागली होती. श्रमपरिहारासाठी घरची ऊब घेण्याकरिता सारेच जीव धडपडत होते. परंतु शंभू... शंभूला सकाळपासून बिलकुल चैन नव्हती. वर्षभर गाळलेल्या घामातून निर्माण झालेले एक सुंदर फुल खुडले जाणार आणि ते स्वतःच्या हाताने नव्हे, स्वतःकरिता नव्हे, तर दुस-याकरिता याचे त्याला भारी दु:ख वाटत होते. तो आपल्या विहिरीवर चिंताग्रस्त बसला होता. त्याला काही सुचेनासे झाले होते. सूर्यनारायणाने किरणे आवरती घेतली, तरी त्याच्या विचारांत खंड पडला नाही.

आरोळी, कलकलाट, गोंधळ ऐकून तो बांधावर उभा राहून पाहू लागला. वीस- पंचवीस माणसे अगदी त्याच्या शेतातील पिकात येऊन उभी होती. त्यांच्या हातात कोयते होते. कु-हाडी होत्या. चकचकीत धारांचा लखलखाट दिमाखात त्या हत्यारांवर तळपत होता. शंभूच्या हृदयात कालवाकालाव झाली. नेत्र डबडबले. क्षणातच अश्रूंचे थेंब गालावरून ओघळले. प्रतिकार करावा असे त्याला मुळीच वाटले नाही. प्रतिकार करून उपयोग होणार नाही हे त्याला कळून चुकले होते. तो करुण दृष्टीने त्यांच्या हालचालीकडे पाहत उभा राहिला. पीक कापायला सुरवात झाली. दिमाखात डुलणारी कणसे जमिनीशी सलगी करू लागली. सोन्याप्रमाणे तकतकणारी पाने जखमी झालेल्या पक्ष्यांच्या पंखाप्रमाणे फडफडत जमिनीवर पडून राहिली. पिकाचा ताठरलेला दिमाख जमिनीवर लोळण घेवू लागला. कोयते आपले काम बजावू लागले. शंभू हे सारे पाहत उभा होता. त्याला ते फार वेळ पाहवले नाही. मन मारण्याची त्याने पराकाष्टा केली. परंतु त्याला ते जमले नाही. त्याचे भान हरपले. विचार कुंठीत झाले, विवेक नष्ट झाला. पाणावलेले नेत्र कोरडे झाले. हृदय एखाद्या दगडाहून कठोर झाले. आणि एखाद्या विजेच्या चपळाईने छापरातली कु-हाड घेऊन तो बाहेर आला. त्याने धोतर वर सारले. पुढे पाऊल टाकणार इतक्यात -

सदाशिव पुढे झाला. तो आपल्या हातातील कोयता उगारून शंभूवर आवेगाने धावून गेला आणि दोघांची झुंज सुरु झाली. दोघांचे शरीर रक्ताने माखून निघाले. दोघेही एकमेकांवर हिंस्त्र हल्ला चढवीत होते. तोच... त्यांच्या अंगावर एक थरथरता हात स्थिरावला. ‘शंभू, जाऊ दे बाळ.’ म्हातारे आबाच होते ते. ‘पोरा, त्यो काही परका नाय. खाऊ दे त्याला. एका एकानं माणुसकी गमावली म्हणून दुस-यानं तसंच वागावं, हे ग्वाड नाय दिसत.’ आबांच्या डोळ्यातून अश्रूंची धार ओघळत होती. सुरकुतलेल्या चेह-यावर करुणेचे जाळे विणले होते.

‘आबा, उपाशी मरण्यापेक्षा असे मरण आले, तर त्यात वंगाळ काय हाय? सोडा मला. मला जाऊ द्या. मी त्याची पर्वा केली नाय.’ असे म्हणत त्याने कु-हाड सावरली. डोळे तारवटले. वारा संचारलेल्या जनावराप्रमाणे तो भरधाव पळत सुटला. आबाही त्याच्या पाठोपाठ धावले. शंभू येत असलेला पाहून सारी माणसे कापणी थांबवून शंभूकडे वळली. शंभूच्या अंगात राक्षस संचारला होता. त्याचे डोळे लाल इंगळासारखे लखलखत होते. पिळदार स्नायू टणक होऊन थरथरत होते. रक्ताची तहान लागलेल्या वाघाप्रमाणे चेहरा उग्र दिसत होता. त्याचा तो अवतार पाहून प्रतिस्पर्धी माणसे बिथरली, घाबरली. त्याची कु-हाड रक्ताची तहान भागविल्याशिवाय राहणार नाही, याची प्रतिस्पर्ध्यांना कल्पना आली आणि त्यांनी आपले पाय काढते घेतले.

 

‘हं. यापुढं पीक कापायचं हाय नव्हं, इकडच्यानं बांगड्या नाय भरल्या.’ शंभू सदाशिवपुढे आडवा होत म्हणाला आणि आपली कु-हाड नीट सावरून धरली. म्हातारे आबा एवढ्या जख्ख म्हातारवयातदेखील एखाद्या चपळ तरुणाप्रमाणे धावून पुढे आले. त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. घामाने शरीर थबथबून निघाले होते. दोघांच्या मध्ये पडून आबा ओरडले, ‘पोरांनो, माझ्या कुडीचे तुकडे पहिल्यांदा करा, अन् मग तुमी काय बी करुन घ्या. माझ्या म्होरं माझ्या पोटच्या गोळयांचं मरण नगं. पोटाच्या गोळ्यांपुढे मलाच मरू द्या. मी या शेतात राबलोया, घाम गाळलाया. या जमिनीच्या उपकाराने ह्यो तुमचा अन् माझा पिंड वाढला. भूमीच्या उपकाराची फेड आपून असं अपकारानं कराया नगं. प्वारांनो. तुम्ही दोघे एकमेकांचे भाऊ हायसा. माझ्या वंशाच्या पणतीत जळणा-या तुम्ही दोघं वाती हायसा. माझ्याकडं बघा. या केस पिकल्या तुमच्या वेड्या बापाची दखल घ्या. तुम्हास्नी भांडायचंच असेल तर मला आधी मोकळं करा. पर प्वोरांनो, जिथं तुमी सा-या गावाकडनं शाबासकी मिळवली, तिथं शेताचा भार होण्यापतुर जनावरं होऊ नका.’ आबा आवेशाने बोलत होते.

शंभू आणि सदाशिव दगडी पुतळ्याप्रमाणे उभे राहून पाहत होते. त्यांना स्वतःच्या शरीरावरील जखमांची जाणीव राहिली नव्हती. दगडालाही पाझर फोडणारी आबांची करुण मूर्ती, शंभू आणि सदाशिवसारख्या माणसांना पाझर फोडणार नाही असे कसे होईल? ती ही दोघे माणसेच होती. आबांच्या अश्रूंच्या धारेपुढे शंभूच्या आणि सदाशिवच्या हातातल्या शस्त्रांची धार बोथट झाली. त्यांचे हृदय विरघळून गेले. दोघांनी स्वतःला विसरून आबांच्या पायांना घट्ट मिठी मारली. आबांनी दोन्ही पोरांना पोटाशी धरले आणि तिघांच्या अश्रूंत ती भूमी पवित्र झाली.

आबा, शंभू आणि सदाशिव गावात आले.

वेशीवर हजारो जनसमुदाय उभा होता. आबांच्या दोन्ही बाहुला अलगत धरून शंभू आणि सदाशिव गावाकडे येत होते.

अर्थ मराठी दिवाळी अंक २०१५

अभिषेक ठमके
Chapters
संपादकीय प्रस्तावना अमेरिकेतील एक डेटिंग सेंटर (डेटींग - मनाची उकल संकल्पना) कुटुंबाचा आधारवड जगा आणि जगू द्या! ईश्वराने लिहीलेलं... आपलं आयुष्यं...! दोन बालकांची पत्रे ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय – एक मनःपटलावरील युद्ध अश्रुधार शिक्षणाचा बोजा (नाना पाटेकर) जे तुला शिकता आले नाही… अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम... श्रद्धा सर्वांनी लक्षात ठेवावे असे... सामन्याने पाहिलेले असामान्य स्वप्न नाते समृद्ध होण्यासाठी... जमिनीवर बसून जेवणाचे फायदे स्वर्ग आणि नरक आहाराविषयी ‘ओम’ नाम चांगली विचारधारा Marathi Status दिवाळी नमू प्रारंभी गणेश दंगल साम्राज्य...! गूढ मनाच्या खेळी खेळ...! शिवबाची कृपा छत्रपती शिवाजी धरणीमाता क्षण मी व राजकारणी भरत उपासनींच्या चारोळ्या तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल आळस