भरत उपासनींच्या चारोळ्या
प्रतिबिंब
झाडांची शांत प्रतिबिंब..
पाण्यात...!
तशा तुझ्या आठवणी..
मनात..!
अश्रूवादळ..!
कालच्या वादळात..
केव्हढं मोठ्ठं झाड उन्मळून पडलं..!
आणि आभाळ..
किती मोठयाने रडलं..!
ओझं..!
किती काळ वहायचं..
हे आठवणींचं ओझं..!
तुझ्या दीर्घ प्रतिक्षेत..
थकलं गं पाऊल माझं..!
झुंबर
कलावंताच्या काळजाला...
संवेदनांची झुंबरं असतात..!
त्याच्या अनुभूतींच्या दवबिंदूत..
हासूआसूंची चित्रं दिसतात...!
संन्यासी
श्वासांशी खेळू नका रे
मी गरीब एक संन्याशी
घेऊन कटोरा फिरतो
प्रेमाचा सतत उपाशी
फकीर
कंदिल घेऊनी रात्री
एक फकीर मला सांगतो
लिहिण्यासाठी जन्म तुझा रे
का उगा बसून राहतो
एकांत
मनाने तुझ्यासाठी
कितीही आकांत केला
तरी एकांत सुटला नाही
तुच सांग,विजय कोणाचा झाला ?
फकीर
तू आहेसच तशी रुपगर्विता
आत्मकेंद्री, आत्मनिष्ठ !
पण,मीही एक फकीर
बेफिकीर आणि दूरस्थ !
काहूर
तुझ्या आठवणींचं काहूर
पावसासारखं बरसलं
धरणीच्या खोल गर्भात
पावसासारखंच जिरलं
चंदन
असणे सुगंधी माझे
हा मजसी शाप आहे
चंदन म्हणून जगणे
हा मजसी ताप आहे
विसावा
विसाव्याचे क्षण तुला
असे जीवनी लाभावे
गुलाबाच्या फुलापरी
गड्या फुलूनीया यावे
फुलपाखरं
रंगीत फुलपाखरं...
दूरूनच चांगली दिसतात...!
पकडण्याचा अट्टाहास करू नये
उगाच त्यांचे पंख फाटतात..!
पक्षीतीर्थ
महाविद्यालय म्हणजे जणू...
पाखरांचा थवा असतो...!
प्रत्येकाच्या मनात...
एक आठवणींचा ठेवा असतो..!
रित
वाऱ्यापासून जगण्याची...
रित शिकून घ्यावी..!
वारा वाहील तशी आपण..
पाठ फिरवून घ्यावी...!
अनुभव
अगदी बारकाईने ओळखले...
सगळे तुझे चाळे...!
नुसता जगत नाही आलो...
पाहिले उन्हाळे पावसाळे..!
वरपांगी
समोरासमोर आपलं...
किती वरपांगी वागणं असतं..!
मनाच्या रंगभूमीवर मात्र..
खरंखुरं जगणं असतं...!