संग्रह ४
झुण झुण पांखरा । हूं हूं.
जा माझ्या माहेरा । हूं हूं.
माझ्या माहेराचा । हूं हूं.
कमानी दरवाजा । हूं हूं.
त्यावर बस जा । हूं हूं.
माझा निरोप । हूं हूं.
सांग माझ्या बयेला । हूं हूं.
दिवाळी सणाला । हूं हूं.
ये मला नेयाला । हूं हूं.
*
संकराती सण बाई आला एकाएकी
नेणंती माझी मैना आपण ववसूं मायलेकी
*
"काय सांगूं सई माझ्या माहेरच्या रीती
तांब्याच्या पराती भावजया पाय धुती
*
माय तों माहेर बाप तों येऊं जाऊं
पुढें आणतील भाऊ लोकाचारा
माय तो माहेर बाप तों माझी सत्ता
नको बोलूं भाग्यवंता भाईराया
*
बहिणीचे बोल जशी दुधाची उकळी
मैनाबाई माझी आहे मनाची मोकळी
बहीणभावंडाचा झगडा रानींवनीं
बहिणीच्या डोळ्यां पाणी बंधू चिंतावला मनीं
*
"पोटच्या परीस मला पाठाच्याची गोडी
ताईत बंधू माझ्या आपली बाळपणची जोडी !
*
लिंबाच्या झाडाखालीं निंबोण्या पसरल्या
भावाला झाल्या लेकी बहिणी भाच्या विसरल्या
*
"लेन्हं वा लुगडं नाहीं मजला लागत
ताईता बंधू माझ्या तुझ्या जिवाचा आगत"
*
बहिणीला भाऊ एक तरि तो असावा
चोळीचा एक खण एका रातीचा विसावा
संवसारामधीं किती असतीं नातीं गोतीं
बहीणभाऊ हीं मोलाचीं माणिक मोतीं !
सासुरवासिनीला न्हाई आधार कुणायाचा
बोलती भैनाबाई कंथ देवाच्या गुणायाचा
सासूरवाशिनी ग बस माझ्या तूं वसायिरी
लाडकी माजी बाळ नांदं तुझ्याच सासरीं
साखळ्याचा पाय सये पडला चिखलांत
गडयिनी बोलती ग तुला दिली गोकुळांत
*
"उत्तम कुळांत जन्मलें, थोर कुळांत आलें
x x x रावांच्या जिवावर भाग्यशाली झालें"
*
"राधाकृष्णांची मूर्ति पहातें मी आरशांत न्
x x x रावांचं नांव घेतें आयाबायांच्या घोळक्यांत."
*
"सासर एवढा वस नका करुसा सासूबाई
दारींच्या चांफ्यापाई दूरदेशाची आली जाई
आईबाप बोले हरबर्याची डाळ
जाशील परघरीं तिथं होईल तुझी राळ
सासर बाई वस जिर्यामिर्याएवढा घास
माझें तूं बाळाबाई जातीवंताची लेक सोस"
*
सासर्याला जाते लेक कुणाची तालीवर
हात भरुनी बिलवर
सासर्यास जाते ऊन लागतं माझे बाई
दोन्ही बाजूंनीं लावीन जाई
सासर्याला जातां ऊन लागतं माझ्या बाळं
दोन्ही तर्फानी चांफा डोल
*
अंतरीचं गुज बांधी शेल्याच्या पदरांत
माझ्या बंधुराया सोड वयाच्या हुरद्यांत
*
बापाजी माझा वड बया मालन पिंपरण
दोघांच्या सावलीं झोंप घेतें मी संपूरण
सावली शितळ हितं उतरीलं वज्जं
मावली माजी बया इसाव्याचं झाड माजं
*
सासू सासरे दोन्ही देव्हारीचे देवू
बसले पूजेला आम्ही जोडीनं फुले वाहूं
चांदीची उतरंडी त्याला सोन्याचं झाकण
सासूसासरे माझी घराला राखण
माझ्या अंगणांत गरडया लिंबाची सावयिली
सया मी किती सांगूं सासू नव्हे ती मावयिली
*
जातें मी उभ्या गल्लीं वाजू देईना जोडवं
चुडयान्ला माझ्या लावीना आडवं
जातें मी उभ्या गल्लीं झाकुनी पाकूनी
वडिलांचं नांव माझ्या पित्याचं राखुनी
जातें मी उभ्या गल्लीं हालू देईना हाताला
लावयीना बोल दोन्ही तर्फेच्या गोताला
*
भरताराचा राग डाव्या डोळ्याची तराटणी
अंतरीची मीं शानीबाई हंसून देतें पाणी
*
भरतार नव्हं माझा सये पूरवीचा राजा
मावलीवाणी छंद पुरवीला माझा
भरतार नव्हं माझा मखमली शेला
त्येच्या सावलीमंदीं माजा फुलला पानमळा
*
माझी ती जाऊबाई परसदाराची तुळयिस
माझा तो दीरराजा राजवाडयाचा कळयिस
*
सासरीं म्हायेरीं मैना माझी आवडली
धन्याची कोथिंबीर कशी गुणाला निवडली
*
बारीक पिठाची बाई भाकरि चौघडी
बया माजीच्या जेवणाची याद होतीया घडोघडी
*
सासर एवढा वस नको करुसा सासूबाई
दारींच्या चांफ्यापाई दूर देशाची आली जाई
*
माडी वर ग चढली माडी
बाई सासर मामंजींची
लंका तिथूनी बघतें बाई मी
माझ्या ग माहेराची