Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह २०

वाजत गाजत शेजेचं बाळ आलं

सखे ऊठ घाल माळ सईबाई

गोरिया जांवयाला समयी नाहीं दिली

चंद्रज्योत उभी केली सईबाई

*

साडें संपून गेले सुपल्याचें दिलें वान

सई झाली पराईण

वरातीचे वेळीं माळत्यांनीं ओटी भरा

सई जाते परघरा

गोरिया जांवयानं दूरची वस्ती केली

कळपीची गाय नेली

*

जिव्हाळ्याची परदेशी माझ्या जीवाला ग जड

नका सांगूं हरणीला पडेल धरणीला

*

आयुक्ष चिंतितें परक्याच्या मुला

सई तुझ्या कुंकवाला

आयुक्ष चिंतितें परक्याच्या पुत्रा

सई तुझ्या मंगळसुत्रा

*

वाजत गाजत चालली वरात

सई चालली बघा बाई सत्तेच्या घरांत

*

सोनावले गहूं रवा येतो दाणेदार

फेणियाचा जेवणार भाईराजा

सोनावले गहूं रवा येतो दाणेदार

लाडवाचा पाहुणचार भाईराजा

बारीक तांदूळ यमुनामाय तुझं पाणी

भावाला मेजवानी बासुंदिची

भावाला मेजवानी केली मोतीचूर लाडू

एका पंक्ती दोघी वाढूं वन्सबाई

*

चांदीचं पंचपाळ वहिनीबाई तुझ्या हातीं

केलं खरेदी अमरावती

भाईराज तक्तपोशी सोनार अंगणां

सांग इच्छेचा दागिना

लेणार्‍या वहिनीबाई मन्सुर्‍यापुढें गोट

कुळकर्णी पाटील मोठा भाईराज

सई भावजय भांग कर तूं सरसा

सखा बिल्लोरी आरसा भाईराज

*

जाऊन उभ्या वाटे न पाहे कोणीकडे

लौकीकाला पाणी चढे वहिनीबाई

जाऊन उभ्या बिदी न दिसो उजवी भूज

राखील कूळ तुझं भाईराज

*

आंबे आले पाडा चिंचेबाई कधीं येशी

डोहाळे पुरविशी वहिणीबाईचे

गर्भार बाईला खावा वाटतो फणस

धाडा गांवाला माणूस

डोहाळजेवण करावं बगिच्यांत

सख्या आणा पालखींत

*

यादवरावा ! राणी घरास येइना कैशी

सासुरवाशी सून रुसोनि बैसली कैशी

सासरा गेला समजावयाला !

चला चला सुनबाई आपुल्या घराला

अर्धे राज्य देतों तुम्हांला

अर्धे राज्य नको बाई मला

मी नाहीं यायची तुमच्या घराला ! यादवराया.....

*

पतिराज गेले समजावयाला

चला चला राणी अपुल्या घराला

लाल चांबुक देतों तुम्हाला

"लाल चाबुक हवा मला"

मग मी येत्यें तुमच्या घराला

*

चांदीचा पोळपाट सोन्याचं लाटणं

तेथें आमच्या सासूबाई

लाटीत होत्या पोळ्या

सून : सासुबाई सासुबाई मला मूळ आलं

पाठवितां कां माहेरा माहेरा

सासू : मला काय पुसतेस बरीच दिसतेस

पूस आपल्या सासर्‍याला सासर्‍याला

चांदीचं ताम्हण सोन्याची पळी

तेथें आमचे मामंजी संध्या करीत होते

सून : मामंजी मामंजी मला मूळ आलं

पाठवितां कां माहेरा माहेरा....

*

जांवईबापूनी 'रातून' येणं केलं

जसं पालखीचं सोनं

साखरेचे लाडू लेकीसाठीं केले

जांवयाच्या ताटीं गेले

जांवई पाटील कोणाचे ग कोण

नातं ग लाविलं माझ्या मयनानं

जांवयाचा मान लेकीकरितां केला

गंगासागराचा शेला बनातीला जोडीला

जांवया पाटलाच्या शेल्याला ग दोरे भरा

सोबत मयनेला सारं करा

जांवई पाहून हरली तहान भूक

माझ्या ग मैनाचा जोड दिसे ठीक

*

जांवयाची जात मोठी मनांत अघोरी

सोडून पाहिली ग माझ्या मैनाची शिदोरी

*

सासूबाई मी हो जातें माहेरा

माझ्या चुडयाची जतन करा

*

माहेराला येतां लगबग झाली

तोडियाचा जोड बाई मी इसरली

*

माझें घर मोठे दिवे लावूं कोठें कोठें

चिरेबंदी वाडे मोठे ! मामंजीचे