संग्रह १५
सासुरवासामंदीं गेली कांकनं कोपराला
बया इच्यारते काय जाचिलं लेकराला ?
*
येवढा सासुरवास नका करुसा सासुबाई !
चांदी आली या सोन्यापायी !
*
सासूचा सासुरवास नंदाबाईची लावणी
कळ लाविते येऊनी दीड दिसाची पाव्हणी !
*
ल्येक तो आपुला, सून लोक कशी म्हणूं ?
बंधुजीची कन्या, माझ्या नागाची पदमिणू !
*
धाकला दीर माझा सासुबाईचा खेळगडी
लावी वांकडं घडुघडी
*
चौसोपी वाडा पुरंना सैपाकाला
दीरा भाऊजी किती सांगूं ढेलज उतरा बैठकीला
*
आऊख मागतें चुडया मागल्या कंगनीला
चांदामागल्या चांदनीला, नंद कामिनीला
*
सासू नि सासरा, माझ्या देव्हारीचे देव !
पडावं त्यांच्या पायां, न्हाई मनीं दुजाभाव !
*
पाहांटेच्या पारामंदीं माझ्या हातांत रवीदोर
सासुसासर्यांनी पुन्याई केली थोर
*
सासू मालनीचा किती सांगुं उपकार
दिलाया मला, पीर्तीचा चंद्रहार
*
शेताच्या बांधावरी केलं शेल्याचं बुजावणं
काय सांगूं सई, हौशा राजसानं केली खूण
*
सावळी सुरत, सावळ्या वानाची
माझा ग राजस, कंठी गाळीव सोन्याची
*
तुझ्या जीवासाठीं जीव माझा हाराहुरा
कशानं सुकलास, शेतांतील राजगिर्या ?
*
शेताला जाईन, नदर माझी चहुकडे
माझ्या राज्यघरानं शिंपीले, शेतीं सोनियाचे सडे !
*
"लक्षुमीबाई ! काय पाहसी कावरी बावरी
गार आंब्याची सावली, माझ्या राजसाच्या वावरीं
*
शेरभर सोनं, काय पाहातांसां सोनियाला
बघा कडीच्या तान्हियाला
*
आगाशीचा चांद थांबला दारापाशी
तान्हुली माझी, चांदनी बघायासी
*
देवाजीचं देनं, पुन्य सासर्याचं
कडीला बाळ तानं हातीं दावं वासराचं !"
*
सरलं दळायाचं, सरलं म्हणूं कशी
सासर माह्यार भरल्या दोन्ही राशी