Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह १२

गोरा ग गोरा रंग । भीवया कम्मानी ।

चांगला चिंतामणी । भाईराजस ग माझा ।

भाईराजसाच्या । भीवया कांतीव ।

रुप सख्याचं ओतीव ॥

मोठे मोठे डोळे । भीवया रत्‍नरेघा ।

राजस बंधू माझा । वर कोन्या रानीजोगा ।

राजस बंधू माझा । काशीखंडाचा केवडा ।

सांवळे भावजई । भागीरथी तूझा जोडा ।

ढवळ्या घोडीचा । पीवळा चाबूक ।

वरता शीपाई नाजूक । भाई राजस ग माझा ॥

ढवळ्या घोडीचा । पीवळा जीन ।

माझ्या ग भावाची । बसणाराची कवळी शीण ॥

एकूलता एक । मनीना सारा येळ ।

राजस बंधवा । तुमां देवाचं पाठबळ ॥

दिवस काळ असा । नीघूनी जाईल ।

राजस बंधवाला । तेज मोत्याला येईल ॥

संपत सोयरी । मला भाजीच्या मोलाचा ।

सोयरा बंधू माझा । हात्ती माझा अंबारीचा ॥

अंबारीचा हत्ती । हत्ती वाडयाला भीडला ।

मायबाईनं माझ्या । मला कीराना धाडीला ॥

संपत सोयरी । आहे ऊसाची पाचोट ।

सोयरा बंधू माझा । नाहीं करणीला हाटत ॥

*

सकाळीं ऊठूनी । दुधाची धार वाजं ।

गंगा गवळी नांव साजं । माझ्या बंधवाला ॥

गाईच्या गवतराची । अंगनीं झाली गंगा ॥

भाईराज माझा । गवळ्या पांडुरंगा ॥

गाईच्या गवतराचा । अंगणीं झाला सडा ।

माझ्या ग बंधवाचा । ऊंच गवळ्याचा वाडा ॥

गाई वारानं । पानंद दाटली ।

बंधू तुझ्या दईवाची । मला मऊज वाटली ॥

शेत पीकलं पीकलं । म्हसोबाची पट्‌टी ।

हातीं शेदराची वाटी । ऊभा मदनाच्या काठीं ( खळं )

शेत पीकलं पीकलं । माल येईना गाडयानं ।

बंधवानं माझ्या । लमाण लावले भाडयानं ॥

काळ्या आवारांत । काळ्या बैलाचं आऊत ।

बंधवाच्या घरीं । आली लक्षीमी धांवत

बैलांचीं ग नांवं । पवळ्या चिंतामणी ।

याच्या पाठीवर गोणी । वाडा चढं नंदीवाणी ॥

बैलामंदीं बैल । झाला पवळ्या चंचळ ।

झाली पेरणी पातळ । कणस पडले कंबळ ॥

तीफन्याताईनं । घेतीला उभा माळ ।

माझ्या ग बंधवाची । रासन्याची तारांबळ ॥

पाऊस पडतो । गर्जु गर्जु आध्या रातीं ।

सोयर्‍या बंधवाची । अर्जुनाची बैलशेती ॥

पाऊस पडतो । गर्जु गर्जु मेघा ।

सोयर्‍या बंधवाला । अर्जुनाला पेरूं लागा ॥

शेताआड शेत । कोन्या शेताला मी जाऊं ।

बंधवाचा माझा । हेलवा देतो गहूं ॥

शेताआड शेत । ओळखूं येईना नंबर ।

सोयर्‍या बंधवा । लावा धुर्‍याला ऊंबर ॥

वाटेवरी हरभरा । आल्यागेल्याची ओटी ।

सावळ्या बंधवाच्या । पेरीला शिंगीसाठीं ॥

वाटेवरी हरभरा । आल्यागेल्याचा हुळा ।

बंधव माझा । झाला दईवान भोळा ॥

*

शेजी वीचारीती । तुला भाऊ कीती ।

नको सांगूं एकाएकी ।

एकामागें एक । येतील चौघे भाऊ ।

नको शेजी दृष्‍ट लावूं ॥

पावना माझा दादा । शेजी मनीती सूतार ।

देतें मीठाचा ऊतार ॥
पावना माझा दादा । शेजी मनीती रोहिल्ला ।

तूला होईन दृष्‍ट । वेगीं वाडयांत बाहीला ।

दृष्‍ट मी काढीतें । मीठ मोहर्‍या लिंबू ताजा ।

दृष्‍टी जोगाबंधू माझा ।

दृष्‍ट मी काढीतें । मीठ मोहर्‍या शींक्यावर ।

राजस बंधूला । दृष्‍ट झाली नाक्यावरी ।

काय तरी सूकलासी । माझ्या गुलाबाच्या फूला ।

राजस बंधवा । माझी दृष्‍ट झाली तूला ।

माळ्याच्या मळ्यांत । इसबंदाचा ग वाफा ।

भाई राजसाला माझ्या । दृष्‍ट झाली बापलेका ॥

*

भावाची भाऊकी । ईळ्याईतकी वांकडी ।

बंधवा माझ्या । शब्द बोलावा तांतडी ।

*

वाटंन चालला । दादा माझा साळाभोळा ।

नार चंद्रावळ । घाली धोतराला पीळा ।

नाचनी नाचती । ताळ तोडीती भूईचा ।

भाऊचा माझ्या । रुमाल मागती डोईचा ।

नाचनी नाचती । खाले पाहून हांसती ।

भाऊची माझ्या । शीन कवळी दिसती ।

गांवा आल्या कळवातीणी । उतरल्या कोसामानी ।

चालविलं शीदापानी । भोळ्या माझ्या बंधवांनीं ॥

गांवा आल्या कळवातीणी । ऊतरल्या ग बागांत ।

सीता मालन माझी । रानी जुल्हाळ वाडयांत ॥

रानीचं चांगुलपन । जसं मोतीयाचं पानी ।

सांगते बंधवाला । नको ठेवूं कळवातीणी ॥