Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह २२

घराचा घरधंदा मी करतें

पाण्याला एकली जातें

जिवूबाई करींदरा कामानी

जातें माहेराला ॥

कधीं मी सोडिला का घराचा उंबरठा

कधीं हा भेटला का बाप माझा गोमटा ॥

कधीं मी सोडिली का दारींची पायरी

कधीं ही भेटली का आई माझी सोयरी ॥

कधीं मी सोडिला का दारींचा पिंपळ

कधीं हा भेटला का भाऊ माझा विठ्‌ठल ॥

कधीं मी सोडीली का नदीची साखळी

कधीं ही भेटली का भैन माझी धाकली ॥

*

शिवकळा भिवकळा

नवरत्‍नांचा पुतळा बाई

सभेशीं दोघं

तुमी रांजण मी घागर

तुमा परास मी नागर बाई

सभेशीं दोघं

तुमी दार मी चौकट

तुमापरास मी बळकट बाई

सभेशीं दोघं

तुमी दवत मी लेखणी

तुमापरास मी देखणी बाई

सभेशीं दोघं

तुमी चांद मी चांदणी

तुमी आगाशीं मी गंगनीं बाई

सभेशीं दोघं

तुमी हंडा मी परात

तुमी दारांत मी घरांत बाई

सभेशीं दोघं

*

खजूर गवळ्याची बानू

बानू खजूर वपी

घालावं नंदच्या कानीं

सका उतरीला रातीं

लक्षुमन वळत्याती म्हशी

दुधं भरीला वाडा

धुरपाय करत्याती ताक

पदूर वार्‍यानं गेला

*

दोन तीन बैलांच्या लागल्या ढुशी बाई

लागल्या ढूशी

त्यांत माजी करंगळी गुमावली कशी बाई

गुमावली कशी

धाकल्या दिराला गवसली कशी बाई

गवसली कशी

धाकल्या दिराचं काय मत झालं बाई

काय मत झालं

सासू सुग्रीणिला कळूं गेलं बाई

कळूं गेलं

सासू सुग्रीणिचं काय मत झालं बाई

काय मत झालं

दोन तीन चाबुक चमकाविले बाई

चमकावीले

दोन तीन चाबूक दूरच्या दूर बाई

दूरच्या दूर

माझं म्हायार पंढरपूर बाई

पंढरपूर

माझं आजूळ रत्‍नांगिरी बाई

रत्‍नांगीरी

*

अग अग फुलाई माळणी

राजा ग तुला बोलवीतो

कशाला मेला बोलवीतो

येत न्हाई म्हणून सांग जा

अग साखळ्या तुला घडवितो

राजा ग तुला बोलवीतो

जळया ग मेल्याच्या साखळ्या

येत न्हाई म्हणून सांग जा

माझा माळी ग बरवा

दंडीं रुमाल हिरवा

*

ह्या बाई पांखराचं

अंजनी डोळ

ह्या बाई पांखराचं

गुंजनी डोळ

हें बाई पांखरुं

राजाशीं बोलं

राजाच्या पलंगाशीं

कोन बाई उभं

राजाच्या पलंगाशीं

लक्षुमण उभं

त्यांनीं काय आंदील्या

केळाच्या फन्या

त्या काय लावील्या

धुरपायच्या म्हालां

घाल ग धुरपे

अंजनी वारा

घाल ग धुरपे

गुंजनी वारा

चतुर भरतारा

लागूं दे डोळा

*

चला ग सयांनू कवलाला

काळ्या कौलाची लई बडाई

शेजारीन बाई चंद्राबाई

तुमचे पती कुठं वो गेले

गेले असत्याल नांद्रुकी बनीं

नांद्रुकी बनींच्या कालूवा नाइका

रानी पाटावू मागती

पाटावू पडला हिरवा रंग

तिथं मांडीला दोघांनीं छंद

छंद न्हवं त्यो सोंगाडया

केळी घालूनी गेला सोंगाडया

त्यानं बाई मोर धरील

त्या बाई मोरांनीं घागरी गुमावल्या

आमी बाई गवराय जागीवल्या