संग्रह ६
बाई लेकीचा जलम । घालूं न्हव्हं तो घातिला
परघरंच जातिला
*
लेकीचा जलम । घालूनी देवा काई
नेल्या बाजाराला गाई । पराई दावं लावी
*
"लेकीच्या बापाला । नेत्राला नाहीं झोंप
कोठं द्यावं शामरुप"
*
सासरीं जातांना । नेत्रासी आली गंगा
महिन्याची बोली सांगा
*
सासरीं जातांना । डोळ्यांना येतें पाणी
बाप म्हणे माझी तान्ही
*
माहेरची वाट । दिसे सोनियासरसी
कधीं जाईन मी बाई । वारियासरसी
*
दळन दळीतें । बाह्या माज्या लोखंडाच्या
गुटी देल्या येखंडाच्या । मायबाई हरनीनं
*
जनलोक पूसती । तुला भाऊ हैतं किती
हजाराचें चार मोतीं । नथेला शोभा देती
*
शेजी गे घरां आली । पाट देतें बसायाला
हरणीचा शीक मला । मायबाईचा
*
मायबाईच्या ग राज्यीं । राज्य केलें मोंगलाई
भरला तांब्या देला नाहीं । माय माज्या हरनीला
*
कासारा रे माज्या दादा । धरुं नको माजा हात
मन माजं कारल्यांत । माय माजी म्हायेरांत
*
काळी ग चंद्रकळा । लेवूं वाटली जिवाला
आलाय् रंगारी गांवाला । घ्याया लावीतो भावाला
*
गुरगुंज्या पांखरा, जाय माझ्या माहेरा
माहेरच्या बुरुजावर शेवंती मोगरा
तितं कीं बसावं मातेला पुसावं
मातेच्या लेकीच्या गेंटया कीं मोडल्या
मोडल्या तर मोडल्या
टिक्का लावुन जोडल्या
टिक्कचा उजेड फार
अंगनीं भरलाय् बाजार
अंगनीं भरलाय बाजार
*
काळ्या वावरांत माय कारल्याचा येल
तेथ्थं उरतले माय नांदेडचे सोनार
त्याहिच्या पेटींत मोत्याचा घोस
'लेव लेव माय' "कशीं लेवूं दादा
घरीं नन्दा जावा, करतील हेवादावा"
"ननन्दा घरोघरीं हेवा परोपरी"
फुइ फुई फुगडी, फुइ फुई फुगडी
*
सनामंदे बाई सन । नागरपंचीम खेळायाची
वाट पहातें बोलाव्याची
*
पंचमी दिवाळीला । लोकांच्या लेकी येती
बहेना तूजी वाट पहाती । भाईराया
*
माज्या ग दारांत । घोडीनं हिस्स केला
भाऊ नव्हं भासा आला । मूळ मला
*
माहेरा जाईल । बसल सांवलीला
कमळ तुमच्या हावेलीला । देसाईराया
*
माहेरा जाईल । बसल पारावरी
भासा राघव विचारी । आत्याबाई कवां आली
*
वाटंच्या वाटसरा । होय वाटंच्या आगळा
जीव लागला सगळा । माय हरणीकडं
*
तुज्या माज्या भेटीला ग । वरीस बाई लोटलं
कसं तुला ग कंठलं । मायबाई
*
गूज ग बोलतांना । सप्तर्षी आले माथां
शेजेला जाय आतां । मायबाई
*
सासरचं बाई गोत । कडूनिंबाचा ग पाला
नांवासाठीं गोड केला । देसाईरायाच्या