Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ७

सासूचा सासरवास । नन्देचें टालेटोले

इचें काकन ढिलें झालें

*

लेक सासर्‍याला जाती । माय आडामोडा घाली

बंदु शिनगारीतो घोडी

*

लेक सासर्‍याला जाती । आडबड गडबड माईचं

वाळू तापंलं भोईचं । लेकी लंकाला जायाचं

*

बाप करी बोळवन । पदरीं रामसीता

नवल केले पानवंता

*

सासूचा सासरवास । शितासारकीला व्हता

आपुली काय कता ?

*

सासूचा सासरवास । सोसल्यानं काय होतं

दोनी कुळां नांव येतं

*

दहाच्या घरामध्यें । कामानं होतं नांव

प्राणसई पुढं व्हावं । लेकीमैना

*

जोडव्या बिरोल्याचा । पाय ठेवावा जपून

लेकी भल्याच्या आपुन

*

जोडव्याचा पाय । हळूं टाकावा मालनी

देराभायाची बोलनी । हिची उधाट चालनी

*

भरताराचा बाई राग । जसा पेटरीचा नाग

त्याच्या मरजीनं वाग

*

चंदनापरीस । म्यां आपुल्याला झिजवीलं

नांव दूरवरी नेलं । देसाईरायाचं

*

सासूचा सासरवास । नन्दच्या लावन्या

कंथ करी संपादण्या

*

भरल्या बाजारांत । लुगडं होतं काय सवान

संगं शेजचा दीवान । मोडीना माजं मन

*

कचेरीला जातां येळां । निघना याचा पाय

वसरीला उभी राह्य । सून मालन

*

सांगूनी धाडीतें । कागदावरे ओळी

उभी भर्ताराजवळी

*

माझे ग मायबाई । करूं नको माजा घोर

मला देलं राज्यावर । देसाईरायानं

*

नारायेना बाप्पा । सोन्याचा उगव

हातीं कुंखाचं बगवं

नायायेना बाप्पा । तुजी पिंवळी रे छाया

कुंकु मागतें लेवाया । हळदीवरे शोभा

*

धाकला माजा देर । मला मनीतो ग बाई

मर्जी वंडाळीला न्हाई

*

आतां हिरवं लुगडं । पदरीं मोतींघोंस

देर मने भावी नेस । सत्येनारायनाला बस

*

घरां पाव्हनी ग आली । शेजी पूसते ती कोन

माज्या चूडयाची ग बहीन । नन्द ग मालन

*

माज्या की ग अंगनांत । अंथरीतें बाई बाजा

नन्दाबाई पती तूजा । नातीयानं बंदू माजा

*

भावाभावाचं भांडन । शेतीं पडल्यात दोर्‍या

जन मने जावा बर्‍या । अशीलाच्या लेकी खर्‍या

*

भावाभावाचं भांडान । जावांचं एक चित्त

नका घालूं आडवी भिंत । बाळ जाईल रांगत

*

पहिल्यानं गरभार । कंथ पूसे रंगम्हालीं

तुज्या तोंडावरे लाली । कोन्या महीन्यांत न्हाली ?