संग्रह २३
ढवळ पवळा जी नंदी
मोटा जुंपील्या दोनी
सोडा सोडा वो पानी
वरल्या बागाच्या कोनीं
पिकल्या लिंबून्या दोनी
पिकलं लिंबू मी तोडीतें
हिरंव लिंबू मी टाकीतें
अश्शी माळीन नखर्याची
राणी शंकर शेल्याची
सहज बसली ग न्हायाला
हार बाई ठेवलाय खुंटीला
घारीनं मारली झडप ग
हार बाई केलाय गडप ग
चला सयांनू जाऊं ग
आपुन धुणं ग धुयाला
धुणं धुतां जी धूतां
माजे हरवले मोतीं
तिकून आले शिरपती
कां ग जमुना पवती
काय सांगूं तुमा पती
माजे हरवले मोतीं
माज्या मोत्याची निळा
चांद सूर्व्याची कळा
पतीदेव मला पावले ग
हार बाई माजे घावले ग
हार बाई अंगणीं झाडीती
केस बाई कुरळे गुंफिती
*
"एकशेंची चंची, दोनशांचीं पानं
तीनशेंचा कात, जायफळ आठ
लवंगा साठ, नगरीच्या नारी
पग भिरीभिरी, हातामंदीं वजरी
पायामंदीं जोडा, डोईला पटका
बंधु माज्याला झाली ग दिष्ट
कौलारी वाडा, पदर घाला----"
*
मी तर होईन चांदणी
अतीच उंच गगनीं
तिथं तूं कैसा येशिल रे
तुझी माझी भेट कैशी रे
तूं तर होशिल चांदणी
मी तर होईन पांखरूं
चंद्राला घिरटया घालिन ग
आणि मग तुजला भेटिन ग
मी तर होईन आंबा
देईन साखरचुंबा
तिथें तूं कैसा येशिल रे
तुझी माझी भेट कैशी रे
मी तर होईन रावा
आंबा न् आंबा पाडिन ग
फांदी न् फांदी झोडिन ग
आणि मग तुजला भेटिन ग
मी तर होईन मासोळी
राहिन समुद्रतळीं
तिथें तूं कैसा येशिल रे
तुझी माझी भेट कैशी रे
मी तर होईन भोया
आशा जाळं टाकिन ग
त्यामधिं तुजला पकडिन ग
तळमळ तळमळ करशिल ग
आणि मग तुजला भेटिन ग
*
गाडीच्या गाडीवाना
दोन बैल हौसेची
गळ्यां घुंगुरमाळा गोंड रेशमाची
ह्येच्या बागेंत बंगला
हिरव्या रंगाचा
वर पिंजरा टांगला
राघूमैनांचा
नार घेती झुल्यावर
वारा मौजेचा
सुटलाय वारा लावलाय फरारा
ह्यो वारू गेला कैलासी बंदरा
गेलाय कैलासी बंदरा
नारी लागे निदरा
तूं माझी जाई ग
मी तुझा मोगरा
*
जीव माजा शिणला उसं तुमच्या मांडीवर
तांबडया मंदिलाची छाया पडूं द्या तोंडावर "