संग्रह २४
बाप विचारतो लेकी, तुज सासुरवास कसा ।
केळीच्या पानावर, जिरेसाळीचा भात जसा ॥
*
सासूचा सासुरवास, सोसावा एकीनं ।
कुळवंताच्या लेकीनं, राजसबाळी सरु ॥
सासुचा सासुरवास, सोसल्यानं काय होतें ।
दोन्ही कुळा नांव येतें, राजसबाळी सरु ॥
सासूचा सासुरवास, सोसावा कटाकटी ।
मायबापाच्या नांवासाठी, राजसबाळी सरु ॥
*
लाडकी लेक अशी, लडकी होऊं नको ।
जाशील परदेशा, माया उगी लावूं नको ॥
*
गोरीया जांवाई, विष्णूचं रुप साजे ।
तुळस दिली पूजे, राजसबाळी सरु ॥
चूडीयाच्या बळें, हात पुरवीन गंगना ।
मेरू करीन ठेंगणा, राजस बाळी सरु ॥
शेरभर सोनं, नाहीं माझ्या खातरींत ।
ललाटीचं कुंकू, नीट पहातें भिंगांत ॥
*
सासू कशी, माझी सासू कशी
निर्मळ गंगा काशी जशी
*
ते कसे बाई ते कसे ?
देवघरांतले देव जसे ।
*
सासरीं जातावेळीं, डोळ्यास नाहीं पाणी ।
बाप म्हणे लेक गुणी, राजसबाळी सरु ॥
*
सासरीं जाते लेक, तिच्या डोळ्यास आली गंगा ।
महिन्याची बोली सांगा, राजसबाळी सरु ॥
सासरीं जातांना, आजोळावरुन वाट ।
मामा मावशीस भेट, राजसबाळे सरु ॥
*
बापाजी बापाजी, धन्य धन्य तुमची छाती ।
काळजाचा घड, दिला परक्याच्या हातीं ॥
गोरीया जांवयानं डोंगरीं वस्ती केली ।
मैना कळपाची नेली, राजसबाळी सरु ॥
*
सावळ्या मेव्हण्यास, समई नाहीं दिली ।
चंद्रज्योती उभी केली, मालनबाई माझी ॥
गोरीया जांवयानं, तप केलं गंगेकाठीं ।
मालतीच्या रुपासाठीं राजसबाळी माझी ॥
चोळी शिवजो शिंपिणी, मोतीं लावून पसा पसा ।
चोळी जाई दूर देशा, मालनबाईच्या ॥
कासारादादा तूझी, बांगडी कांचाची ।
आहे नाजूक हाताची, मालनबाई माझी ॥
*
किती मी सांगूं तुज, पदर घेई नीट ।
गोरी नागीण लागे दीठ, मालनबाई माझी ॥
*
मोठे मोठे डोळे, जसे आभाळाचे ढग ।
दीठ लागेल खाली बघ, मालनबाई माझी ॥
*
मैतर पुसती कारे गडया तूं पिवळा ।
घरीं राणीचा सोहळा, मालनबाई माझी ॥
विडे करितां करितां चांद आला ग माथ्याशीं ।
दिली कंथानं शाबाशी, मालनबाई माझी ॥
काळी चंद्रकला, काजळाचं बोट ।
घेणार्याचं मन मोठं, मालनबाई माझी ॥
*
हेकोडी, तेकोडी, गोरीची आहे नीज ।
आडवी लावे भुज, कोण तो सांग बये ॥
*
मज ठाऊक असतें, लेकी जन्मा आलें नसतें ।
सांबाच्या पिंडीवर, झाड बेलाचें झालें असतें ॥
लेकीच्या जन्माला, नको घालूस देवराया ।
मायबाईचा शीण, फुकट गेला वाया ॥